हान यू : (७६८–८२४). चिनी कवी, निबंधकार आणि तत्त्वज्ञ. जन्म होनान प्रांतातील तेंग चाऊ येथे. हान अनाथ होता तथापि आपले आयुष्य योग्य प्रकारे घडविण्याची त्याची इच्छा होती. शासकीय सेवेत जाण्यासाठी असलेल्या परीक्षा देण्याचा त्याने प्रयत्न केला तथापि त्यात त्याला अपयश आले. ह्याचे कारण, त्याची असांकेतिक गद्यशैली. परीक्षकाने ती मान्य केली नाही पण नोकरशाहीत त्याचा यथावकाश प्रवेश झालाच आणि मोठमोठी शासकीय अधिकारपदेही त्याने मिळवली.
तिसऱ्या व चौथ्या शतकापासून ⇨ ताओ मत आणि ⇨ बौद्धदर्शने ह्यांचा इतक्या वेगाने विकास झाला, की चीनमध्ये ? कन्फ्यूशस पंथाला जे अधिकृत स्थान होते, तेच धोक्यात आले. हान यू हाकन्फ्यूशस पंथाचा सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता होता. त्याने आपल्या पंथाच्या संरक्षणार्थ ताओ पंथ व बौद्ध दर्शने ह्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.ताओ मत आणि बौद्ध मत उदासीनता आणि निष्क्रियता शिकवत असल्यामुळे त्यांच्यापासून कन्फ्यूशस पंथाचे संरक्षण केले पाहिजे, अशी हान यू याची धारणा होती. असे असले, तरी ताओ मत आणि बौद्ध मत ह्यांतील अनेक तत्त्वे व संकल्पना कन्फ्यूशस मतात अंतर्भूत झाल्या. कन्फ्यूशस मताने धारण केलेले हे नवे रूप ‘नव-कन्फ्यूशस मत’ म्हणून ओळखले जाते.
हान यू हा अत्यंत निर्भीड होता. बुद्धाचे म्हणून मानल्या जाणाऱ्या एका बोटाच्या हाडाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या चिनी सम्राटावर त्याने कडक टीका केली होती. त्या कारणास्तव हान यूला जीवही गमवावा लागला असता तथापि शिक्षा म्हणून त्याला एका वर्षासाठी दक्षिण चीनमध्ये हद्दपार केले गेले.
हान यू याने मुक्त, साध्या गद्यशैलीचा पुरस्कार केला. त्या काळीप्रचलित असलेल्या चिनी गद्यशैलीपेक्षा ही शैली वेगळी होती. हान यूयाने लिहिलेले – सर्व इं. शी. – ‘ऑन द वे’, ‘ऑन द मॅन’, ‘ऑन स्पिरिट्स’ यांसारखे निबंध अशा शैलीत लिहिले असून ते निबंध जितके सुंदर, तितकीच त्यांची शैलीही सुंदर आहे. त्याच्या कवितेतही त्याने तत्कालीन काव्यशैलीपासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला तथापि वाङ्मयीन सुधारणा घडवून आणण्याचा त्याने जो प्रयत्न केला, त्यात तो फारसा यशस्वी झाला नाही.
चँग अन येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“