हाजीमलंग : (मलंगगड). महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील धार्मिक स्थळ व गिरीदुर्ग. हा गड कल्याणच्या दक्षिणेस सु. १६.१ किमी.वर असून तो रस्त्याने कल्याण रेल्वेस्थानकाशी जोडलेला आहे. हा चढण्यास अवघड असून तीन टप्प्यात विभागला आहे. याच्या पहिल्या टप्प्यावर बाबा हाजीमलंग नावाच्या मुसलमान साधूची कबर आहे. पूर्वी ही किल्ल्याची माची होती. यास पीरमाची असेही म्हणत. दुसरा टप्पा सोनमाची असून येथे पुरातन अवशेष आहेत. तिसरा टप्पा कठीण म्हणजे बालेकिल्ला असून यावरही पुरातन अवशेष आहेत.

 

सुमारे आठशे वर्षांपूर्वी येथे नल राजा राहत होता. त्याच्या कारकीर्दीत हा गड बांधण्यात आला. या राजाच्या कारकीर्दीत येथेहाजी अब्दुल रहमान हा धर्मप्रसारक आपल्या साथीदारांसह राहत होता. त्याच्याशी नल राजाच्या मुलीने विवाह केला होता तसेच येथील कबरहाजी मलंग बाबा याची नसून ती नल राजाचे गुरू सिद्धनाथनामक योगी यांची समाधी असल्याच्या काही आख्यायिका आहेत. केतकर हे ब्राह्मण कुटुंबीय आजही हाजीमलंग बाबा कबरीचे वहिवाटदार आहेत. गडावर बख्तावरशाह व सुलतानशाह या हाजीमलंग बाबाच्या साथीदारांच्या कबरी आहेत.

 

हा गड १७८०–८२ मध्ये व १८१८ पासून इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता. कॅप्टन रिकीन्सन याने आपल्या १८१८ मधील येथील सर्वेक्षणात या गडाची माहिती नमूद केली आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेस येथे मोठा उरूस भरतो. सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो साजरा करतात. याशिवाय मे महिन्यामध्येही येथे मोठी यात्रा भरते. या गडास दरवर्षी हजारो भाविक भेट देतात.

गाडे, ना. स.