हॅनिबल : (इ. स. पू. २४७ – १८२). प्रसिद्ध कार्थेजियनसेनापती व तत्कालीन एक श्रेष्ठ योद्धा. बहुधा कार्थेज (उ. आफ्रिका )येथे जन्म. तो कार्थेजचा सेनापती हॅमिलकार बार्क याचा मुलगा असूनपॉलिबियस व लेव्ही या इतिहासकारांच्या मते त्याच्या वडिलांनी त्याच्या बालपणीच त्याच्याकडून रोमचा निःपात करण्याविषयी शपथ घेतलीहोती. ती हॅनिबलने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर इ. स. पू. २२९/२२८ अखेरपर्यंत पाळली. त्या वेळी कार्थेजनगरी भरभराटीत होती. कार्थेज वरोम यांच्यामध्ये भूमध्य समुद्राच्या परिसरात कोणाचे अधिराज्य असावे,या प्रश्नावर रण माजले होते. रोमच्या आरमाराने मीलात्सॉची लढाई जिंकून आफ्रिका खंडात सैन्य उतरविले, तेव्हा हॅमिलकारने रोमन सैन्याचा पराभव करून त्यांचा आरमारप्रमुख मार्कस अटिलिअस रेग्यूलसला कैद केले तेव्हा उभयतांत तह झाला. त्याच्या अटी धुडकावून रोमने कार्थेजची अपरिमित हानी केली तेव्हा हॅमिलकारने स्पेनमध्ये कार्थेजचे बस्तान बसवून रोमला शह देण्याचा प्रयत्न केला. या सुमारास हॅनिबलने रोमनानुकूल सागून्टोवर हल्ला करताच रोमने युद्ध पुकारले व दुसऱ्याप्यूनिक युद्धास (इ. स. पू. २१८–२०१) सुरुवात झाली. तत्पूर्वी हॅनिबलने प्रथम स्पेनमध्ये आपला मेहुणा हझद्रुबल याच्या हाताखाली नाव कमाविले व वयाच्या सव्विसाव्या वर्षी तो सेनाधिपती बनला. त्याने स्पेनमध्ये कार्थेजचे वर्चस्व प्रस्थापिले. या वेळी रोमने हॅनिबलला शरणागतीचे आवाहन केले परंतु त्याचे चढाईचे धोरण कार्थेजियनांत इतके लोकप्रिय झाले होते की, त्यांच्या परिषदेने हॅनिबलला सर्वाधिकार दिले. त्यानेरोमवर स्वारी करण्याचा धाडसी बेत आखला. ५०–६० हजार फौजेनिशी पिरेनीज पर्वत ओलांडून दक्षिण फ्रान्समधून तो स्वित्झर्लंडमध्ये घुसला. त्याला तोंड देण्याकरिता रोमचा सेनापती थोरला सिपिओ ॲफ्रिकेनस समुद्रमार्गे दक्षिण फ्रान्समध्ये आला पण हॅनिबलच्या बेताची कल्पना येऊन तो इटलीत परतला. मोठ्या सैन्यानिशी दुर्गम आल्प्स पर्वत ओलांडणारा हॅनिबल हा पहिलाच सेनापती होता. वाटेत त्याचे सर्व हत्ती व बरेच सैनिक थंडीने मेले. मैदानात येऊन त्याने ट्रीबीअ नदीच्या दक्षिण तीरावर रोमन सेनापती मॅक्सिमस फेबिअसच्या नेतृत्वाखालील रोमन सैन्याचा पराभव केला. रोमन सैन्य अधिक असूनही हॅनिबलने आपल्या युद्धकौशल्याने ट्रॉझामेनो सरोवराकाठी रोमन सैन्याचा पुन्हा पराभव केला. मॅक्सिमस फेबिअसने नवे गनिमी तंत्र (फेबिअन टॅक्टिक्स्) निर्माण केले. काहीकाळ विश्रांती घेऊन हॅनिबलने रोमन लोकांचा कॅने येथील मोठा सामग्री-साठा काबीज केला. याच ठिकाणी इ. स. पू. २१६ मध्ये कॅनेची प्रसिद्धलढाई झाली होती. यात आपल्या नेतृत्व व कौशल्याच्या जोरावरहॅनिबलने संख्येने अधिक असलेल्या रोमन सेनेचा पूर्ण पराभव केलापण हळूहळू हॅनिबलचे सैन्य कमी होऊ लागले. मॅक्सिमस फेबिअसनेत्याची रसद तोडली. समुद्रावर रोमचे स्वामित्व असल्याने हॅनिबललारसद व मदत येईना. रोमन सैन्याने फ्रान्स व स्पेनमध्येही कार्थेजविरुद्धयुद्ध चालविले व शेवटी आफ्रिकेवरच स्वारी केली. हॅनिबलच्या मदतीस निघालेल्या हझद्रुबलचा रोमन सैन्याने वाटेतच बीमोड केला. हॅनिबलने मायदेशी येऊन लढा चालू ठेवला पण झामाच्या लढाईत थोरला सिपिओ ॲफ्रिकेनसने त्याचा पराभव केला. कार्थेजमध्येही त्यास स्थान उरलेनाही व त्यास देशत्याग करावा लागला. त्याने सिरियात आश्रय घेऊन आपला लढा चालू ठेवला पण तेथील राजाचा पराभव करून हॅनिबलला आपल्या हवाली करावे, अशी रोमन लोकांनी मागणी केली तेव्हा हॅनिबलने बिथिनियातील लिबेसा या खेड्यात विष खाऊन आत्महत्या केली.
जगातील नामांकित सेनापतींच्या मालिकेत हॅनिबलचे स्थान अढळ आहे. दुसरे प्यूनिक युद्ध अठरा वर्षे चालले. रोमन सेनापती मॅक्सिमस फेबिअस आणि थोरला सिपिओ ॲफ्रिकेनस यांचे व हॅनिबलचे डावपेच, उभय सैन्यांतील असंख्य झटापटी इत्यादींमुळे विश्वेतिहासातील एक महानसंग्राम म्हणून या युद्धाचा सैनिकीतज्ज्ञ उल्लेख करतात.
चाफेकर, शं. गं.
“