हत्यारे (कर्मशालेतील) : एंजिने, यंत्रे, वाहने, साधने, उपकरणे, पंप इत्यादींच्या रचनेतील भाग अथवा गृहोपयोगी व इतर कामांसाठी लागणाऱ्या वस्तू आरेखन किंवा नमुन्याबरहुकूम इष्ट त्याआकार व आकारमानाच्या तयार करण्यासाठी व दुरुस्तीसाठी कारागीरजी हातसाधने वापरतो, त्यास हत्यारे म्हणतात. भागांची जोडणी वदुरुस्ती करण्यासाठीही हत्यारांचा वापर करावा लागतो. मात्र, या नोंदीत मानवी शक्तीने उपयुक्त कारागिरी काम करण्यासाठी विविध व्यवसायामध्ये फक्त कर्मशालेत वापरण्यात येणाऱ्या हत्यारांचा विचार केलेला आहे.
इतिहास : मानव स्वतःच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रागैतिहासिक काळापासून (सु. २६ लक्ष वर्षांपासून) स्वतःच्या परिसरातून विविध वस्तूंची निर्मिती करीत आला आहे. या विविध वस्तू तयार करण्याचे काम शक्यतोवर उपलब्ध हत्यारांचा उपयोग करून वा गरजेनुसार उपलब्ध हत्यारांचा विकास करून, तर काही वेळेस नवीन हत्यार निर्माण करूनतो करीत असे. त्यासाठी निरनिराळ्या युगांत त्या त्या काळी सृष्टीत आढळणाऱ्या पाषाण, लाकूड, तांबे व लोखंड या पदार्थांचा उपयोग करून घेतलेला दिसून येतो. मुख्यत्वे घरबांधणी व भांडीकुंडी बनविण्यासाठी सुतार, गवंडी, लोहार व तांबटकाम करणाऱ्या कारागिरांची हत्यारे प्राचीन अश्म, काष्ठ, ताम्र, ब्राँझ व लोह युगांत त्या त्या काळी आढळलेल्या पदार्थांपासून तयार केल्याचे दिसून येते. त्या काळी जनावरांची शिंगे व अस्थीही वापरल्या जात. इ. स. पू. ४००० वर्षांच्या आधीच्या काळात लाकूड तासून व दगड घडवून काही वस्तू बनविण्यासाठी धारदार कपारी असलेले पाषाण (अश्म) वापरीत. ईजिप्तमध्ये तांब्यापासून (इ. स. पू. ४०००), ब्राँझपासून (इ. स. पू. २०००) तर लोखंडापासून (इ. स. पू. १०००) काळात हत्यारे बनविल्याचे आढळून येते. ग्रीक संस्कृतीत( इ. स. पू. ५००) विविध कामांसाठी तर्हेतर्हेची लोखंडाची हत्यारे बनविण्यात आली. रोमन साम्राज्याच्या काळात (इ. स. ४००च्या पूर्वी) त्यांच्या रचनेत सुधारणा व वाढ झाली. सोळाव्या व सतराव्या शतकांत यूरोपातील चर्चवास्तूंच्या बांधकामात धातूंच्या कामासाठी अनेक प्रकारची हत्यारे तयार केली गेली.
हातोडा, छिन्नी, पटाशी, करवत, रंधा, सामता व कसणी, ऐरण, सांडशी, गुण्या, करणी किंवा थापी, ओळंबा, पातळीदर्शक फलक, मोजपट्टी, कर्कट, खतावणी, गिरपट्टी, व्यासमापक, कुर्हाड, वाकस, कोयता, कोक्षी , पकड, अंबूर, विभाजक, मार्फा (कानस), पोगर, ठोकणीकिंवा मोगरा, कस, पाना, सुरी, हातभाता, पटाशी, कैची किंवा कात्री, दाभण इ. मूलभूत हत्यारे होत. कामाप्रमाणे यांच्यात वेळोवेळी सुधारणा करून इतर हत्यारे बनत गेली.
प्राचीन हत्यारे : मूलभूत हत्यारे ग्रामसंस्था निर्माण होण्यापूर्वीची असून ती मुळात ओबडधोबड होती. कालांतराने त्यांचा अभ्यास व प्रयोग करून कार्य सुलभ होण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य ती प्रमाणबद्धता व शास्त्रशुद्ध स्वरूप देण्यात आले. ग्रामसंस्थेच्या काळातील हत्यारे प्रगल्भ अवस्थेतील होती, याचे स्पष्ट पुरावे त्या कालावधीतील कलाविष्कारांत पाहावयास मिळतात.
आ. १ मध्ये बहुतेक सर्व कामांसाठी मूलभूत मानलेल्या चोवीस हत्यारांची प्राथमिक अवस्था दाखविलेली आहे. मोजपट्टी कठीण लाकडाची केलेली असे. दगडी हातोडा (१) हा ठोकण्यासाठी वापरीत. तासणी (२) हा धारदार दगड असून लाकूड तोडण्यासाठी किंवा तासण्यासाठी वापरीत. दगडी कुर्हाड (३) हिच्यामध्ये धारदार पाषाण हरणाच्या शिंगात बसविलेला असून झाड तोडण्यासाठी किंवा लाकूड फोडण्यासाठी तिचा उपयोग करीत. घोड्याच्या हाडापासून सुरी (४) तयार केलेली असे. गारगोटीच्या लांब तुकड्याला धारदार दात्रे काढलेलेे दातेरी पाते (५) हे लाकूड कापण्यासाठी उपयोगात आणीत. लोखंडी कुर्हाड (६) हिला लाकडी किंवा सांबरशिंगाचा दांडा बसवीत. तांब्याचा वाकस (७) हा लाकूड तासण्यासाठी वापरीत. तांब्याची पटाशी (८) ही हातोडीने ठोकून लाकडात कुसू व विंधी (आरपार चौकोनी गाळे) पाडून त्यांची जोडणी करीत. सामता व कसणी (९) या हत्याराचा उपयोग छिद्रे पाडण्यासाठी करीत. कसणीला चामड्याची वादी बसविलेली असून सामता व टोपी लाकडी किंवा अस्थीची बनविलेली असे. छिद्रक (फाळ) लाकूड, शिंग, अस्थी किंवा लोखंडाचा बनविलेला असे. पंपछिद्रक (१०) याला गिरमिट म्हणतात आणि ते छिद्रण करण्यासाठी वापरीत. ईजिप्तमधील इ. स. पू. १९०० काळातील लाकडी टकळी किंवा चाती (११) ही वस्त्राकरिता धागा काढण्यासाठी वापरीत. ईजिप्तमध्ये इ. स. पू. ११०० काळात लाकडी फळीला दोरीने लावलेला ओळंबा (१२) हा कोणतेही बांधकाम लंबात आहे की नाही ते तपासण्यासाठी वापरीत. याच काळात लाकडी त्रिकोणी रचनेला लावलेला ओळंबा (१३) हा बांधकाम समपातळीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी वापरीत. दांडा असलेली लाकडाची ठोकणी किंवा मोगरा (१४) हा सुतारकामात [→ सुतारकाम] वापरीत. लाकडी पट्ट्या काटकोनात जोडून गुण्या (१५) याचा उपयोग संलग्न पृष्ठभाग ९०° कोनात आहे की नाही, ते तपासत. लाकडी दांड्याला सुपाच्या आकाराचे जाड कच्चे कातडे जोडून खाणकामात फावडे(१६) याचा उपयोग ऑस्ट्रियात करीत. इ. स. पू. १३०० काळात तांब्याची छिन्नी (१७) हिचा उपयोग ईजिप्तमध्ये छिनकामासाठी करीत. ईजिप्तमध्ये ब्राँझ धातूची वक्र पात्याची करवत (१८) वापरीत. ऑस्ट्रियातील ब्राँझचा हातोडा (१९) याला लाकडी दांडा बसवीत. फ्रान्समध्ये सुळाचा भाग जमिनीत खुपसून लोहारकामात ब्राँझची ऐरण (२०) वापरीत. ब्राँझच्या चपट्या व गोल मार्फा किंवा कानशी (२१) सुतारकामात लाकडाला वक्र आकार देण्यासाठी वापरीत. चीनमध्ये( इ. स. पू. ३००) घरबांधणीसाठी बिडाची करणी किंवा थापी (२२) ही गवंडीकामात वापरण्यात येत असे [→ गवंडीकाम ]. रोमन काळात लाकडाचा पृष्ठभाग तासून त्याला हवा तो आकार देण्यासाठी लोखंडीकोक्षी (२३) वापरीत. रोमन काळात लाकूड रंधण्यासाठी बिडाचा रंधा (२४) उपयोगात आणीत. यात धारेचे कठीण लोखंडाचे पाते बसवीत. यांपैकी बहुतेक सर्व हत्यारांचे नमुने भारतात केलेल्या उत्खननात मिळत असल्याचे भारतीय पुरातन वाङ्मयात उल्लेख आहेत. [→ तंत्रविद्या ].
अर्वाचीन हत्यारे : पश्चिम यूरोपातील प्रचलित प्राचीन हत्यारांत वारंवार सुधारणा करण्यात आल्या. इंग्लंड, अमेरिका व जर्मनी या विकसित देशांतील कारखान्यांतून पोलाद युगात अद्ययावत सुधारित हत्यारे पोलादापासून मोठ्या प्रमाणावर बनविली जाऊ लागली (१८००-१९६०). त्यांच्या रचनेत सफाई आणून योग्य कामाला योग्य त्या प्रकारचे पोलाद वापरल्याने, त्यांचे कार्य-आयुर्मान व कार्यक्षमता वाढविली गेली, तसेच कारागिराला ती हातात धरून थकवा न येता सुलभपणे वापरणे सोपे झाले. धारेच्या हत्यारांची धार तीक्ष्ण राहून दीर्घकाल टिकावी म्हणून प्रयोगान्ती त्यांना योग्य असे विशिष्ट कोन देण्यात आले. निरनिराळ्या व्यवसायांसाठी कामाच्या गरजेप्रमाणे आकार व आकारमानाच्या बाबतीत हत्यारांची रचना करण्यात आली.
हत्यारांचे वर्गीकरण : हत्यारे ज्या कामासाठी वापरावयाची ते कार्य आणि ती ज्या व्यवसायासाठी – कच्च्या मालाकरिता – वापरावयाची त्याचे गुणधर्म विचारात घेऊन हत्यारांचे वर्गीकरण केलेले असते. उदा., सोने मऊ तर लोखंड कठीण आहे त्यामुळे सोनाराच्या हातोडीचे वजन कमी तर लोहाराच्या हातोड्याचे वजन जास्त असावे लागते. म्हणजे घाव (ठोका) हलका किंवा भारी बसू शकेल. तांब्यापितळेच्या पत्र्यांना ठोकूनठोकून तांबट विविध आकार देतो. त्यासाठी विविध आकारांच्या कामाला अनुरूप अशी हातोड्यांची तोंडे असावी लागतात, त्यामुळे हातोडे अनेक प्रकारचे करावे लागतात. सुताराला लाकूड छिनण्यासाठी लागणारी पटाशी कठीण पोलादापासून तयार करतात, कारण लाकूड मऊ असते लोखंड तोडण्यासाठी जोडारी जी छिन्नी वापरतो किंवा दगड घडविण्यासाठी शिल्पकार जी छिन्नी वापरतो, अशा छिन्न्या उच्च प्रतीच्या कठीण पोलादापासून तयार कराव्या लागतात. शिंप्याची कापड कापण्याची व पत्राकारागिराची धातूचा पत्रा कापावयाची कात्री एकाच प्रकारच्या पोलादाच्या बनवून काम होणार नाही. लोहाराची हत्यारे मोठी असावी लागतात, तर घड्याळची हत्यारे छोटी करावयास हवीत. या कारणांसाठी एकाच हत्यारात विविध आकार व आकारमानांची अनेक हत्यारे तयार करावी लागतात. मोजमाप घेण्यासाठी निरनिराळ्या लघुतम अंशनाची विविध मापन हत्यारे तयार करावी लागतात.
व्यवसायावरून हत्यारांच्या काऱ्यानुरूप पुढीलप्रमाणे वर्गीकरण सर्व-साधारणपणे प्रचारात आहे : (अ) ठोकण्याची हत्यारे, (आ) ठोकणे व तोडणे क्रियांची संयोगी हत्यारे, (इ) नग (काम) धारक हत्यारे, (ई) कर्तन व तासणी हत्यारे, (उ) छिद्रण हत्यारे, (ऊ) मापन व रेखन हत्यारे, (ए) परीक्षण हत्यारे, (ऐ) लाग (आधार) हत्यारे व (ओ) रूपण हत्यारे.
ठोकण्याची हत्यारे : (आ. २). सोनार, लोहार, पाथरवट किंवा शिल्पकार, पत्राकारागीर, जोडारी, तांबट, चर्मकार, शल्यकर्म करणारा व नळकारागीर यांना जे निरनिराळ्या आकारांचे (धातू व लाकडाचे) हातोडे वापरावे लागतात ते या वर्गात येतात. पत्राकारागीर, नळकारागीर व सुतार काही कामांसाठी लाकडी हातोडे (मोगरा) वापरतात.
गोलक हातोडीच्या गोलक तोंडाने रिव्हेटिंग करताना रिव्हेटचे [→ रिव्हेट] शेपूट फुलविता येते, तर चपट्या तोंडाने छिन्नीवर घाव घालता येतात. अशा प्रकारची हातोडी जोडारी व लोहार वापरतात. बेचकी हातोडीच्या बेचकी तोंडाने सुतारास लाकडातील खिळे उपसून काढता येतात, तर सपाट तोंडाने खिळे ठोकता येतात. पाचरमुखी हातोडीने पट्टी ठोकूनठोकून वळविता येते. घन दुतोंडी सपाट असून त्याचे वजन ५-२५ किग्रॅ. असते. धातूचे जाड तप्तभाग ठोकून घडविण्यासाठी लोहार ते वापरतो. बीड फोडण्यासाठी किंवा जमिनीत पहारी ठोकण्यासाठीहीते वापरतात. तांबटकाम हातोडी दुतोंडी व समतोंडी असून धातूच्यापत्र्यांना ठोकूनठोकून हवा तो आकार देण्यासाठी ती वापरतात. मोगरा सुतारकाम व पत्राकामात वापरतात. कातडी हातोडीचे डोके बिडाचेअसून तिच्या दोन्ही पोकळ तोंडात कच्च्या कातडीची वेटोळी घट्ट बसवितात अथवा तांब्याचे किंवा शिशाचे तुकडे बसवितात. हिने पृष्ठभागावर घावाचे वण उठत नाहीत व तो खराब होत नाही. पाथरवटी हातोडी डोळ्याच्या आकाराची लांबट असून तिचे एक तोंड सपाट व दुसरे आखूड, निमुळते व टोकदार असते. छिन्नीने दगड घडविण्यास हिचा उपयोग होतो. मराठी विश्वकोशातील ‘सोनार कलाकाम’ या नोंदीत विविध प्रकारच्या हातोड्या दाखविल्या आहेत.
घाव घालणे व तोडणे क्रियांची संयोगी हत्यारे : (आ. ३). कुर्हाडीने झाडे तोडतात व लाकडे फोडतात. वक्र वाकसाने लाकडाचा ओंडका वक्राकार तासतात तर वाकसाने लाकूड सरळ तासतात. कोयत्याने फांद्या तोडतात व लहान लाकडे फोडतात. सुतकीने दगड फोडतात. टिकावाने (कुदळीने) रस्ते किंवा जमीन उकरतात. ही सर्व हत्यारे घाव घालण्याची व त्याच वेळी तोडण्याची, फोडण्याची किंवा उकरण्याची क्रिया एकाच वेळी करतात.
नगधारक हत्यारे : (आ. ४). कारागिराने नगावर (हत्याराने) काम करताना तो स्थिर व घट्ट पकडून ठेवण्यासाठी जी साधने लागतात त्यास नगधारक हत्यारे म्हणतात. मेज शेगडा बहुधा लाकडी मेजावर बसविलेला असून त्यात बिडाचा एक जबडा स्थिर असून दुसरा जबडा स्क्रूने सरकवून नग दोन जबड्यांतील दाबात पकडतात. मेज शेगड्यात स्क्रू, द्रवीय दाब व वायवीय प्रकार असतात. हात शेगडा चावी वगैरेंसारख्या चपट्या लहान वस्तू पकडण्यासाठी वापरतात. लोहारी शेगडा असाच, परंतु मोठा असून त्याचे जबडे त्वरित उघडण्याची त्यात योजना असते. खिळी व सुयांसारख्या बारीक वस्तू पकडण्यासाठी खीळ शेगडा वापरतात. धातूंचे नळ व नलिका यांचे वर्तुळाकार भाग घट्ट धरून ठेवण्यासाठी नळकाम शेगडा वापरतात. त्यात स्क्रू उभा दिशेत असून फिरणारा जबडा उभ्या दिशेतच काम करतो. यांत्रिक हत्यांरावर काम करताना नग पकडण्यासाठी यंत्र शेगडा वापरतात. या शेगड्यात दोन प्रकार आहेत. एक आडव्या पातळीत तर दुसरा उभ्या पातळीत हव्या त्या कोनात सिद्ध करता येतो. सर्वकामी शेगड्यात या दोन्हीचेही काम भागते. बीड व लाकडी फळ्या कोडीवर एकत्र जोडताना आवळून ठेवण्यासाठी वापरतात. जी-पकड व लाकडी फळ्या सपाट अंगावर दाब देण्यासाठी उपयोगात आणतात. स्क्रू-पकड जास्त पृष्ठभागावरदाब देऊ शकते. सांडश्यांचे निरनिराळे प्रकार लोहारकामात तप्त धातू पकडण्यासाठी वापरतात. साखळी सांडशीचा उपयोग नळ आवळण्यासाठी करतात. पेचकस लाकडात वुड स्क्रू व धातूत यंत्र स्क्रू पिळण्यासाठी वा काढण्यासाठी वापरतात [→ स्क्रू ]. पान्यांचे निरनिराळे प्रकार असून ते बोल्टावर नट आवळण्यासाठी वा सैल करण्यासाठी उपयोगात आणतात [→ बोल्ट व नट]. पकडीने तार तोडता येते व ती पिळून सुटे भाग एकत्र आवळता येतात. छिद्रक धारकात छिद्र पाडण्यासाठी छिद्रक बसवितात. छिद्रक चक्री पकडीत निरनिराळ्या आकारमानांचे छिद्रक बसविता येतात. आतले आटे पाडण्यासाठी अंतःसूत्रक हा अंतःसूत्रक पकडीत पकडतात. तसेच छिद्र तासणीसुद्धा बसवितात. अंबराने ठोकलेले खिळे उपसून बाहेर काढता येतात.
कर्तन व तासणी हत्यारे : (आ. ५). हातकरवतीने लाकूड कापतात. पटाशीने लाकडात गाळे पाडतात. रंध्याने लाकूड रंधतात. या सर्व हत्यारांत निरनिराळे प्रकार असतात. छिन्नीने धातू तोडतात किंवा दगड घडवितात त्या निरनिराळ्या प्रकारच्या असून टाकी व चिरणी दगडावर वापरतात. कानशीने धातूचा कीस काढतात [→ कानसकाम]. खर्ड्याने धातू खरवडतात. धातुकरवतीने धातू कापतात. यांच्यातही अनेक प्रकार असतात. तीन अंतःसूत्रकांच्या संचाने छिद्रांत आटे पाडतात. पेचपाटीने नळीवर किंवा सळईवर बाहेरचे आटे पाडतात. लोहारी छिन्नीने तप्त धातू तोडतात. लोहारी मुद्राकारकाने तप्त धातूत हव्या त्या आकाराचा आरपार गाळा पाडतात. अशाच प्रकारचे उच्च प्रतीच्या पोलादाचे निरनिराळ्या आकारांचे मुद्राकारक निरनिराळ्या आकारांच्या आरपार गाळ्यांत हातदाब यंत्राने घुसवून त्यांची सफाई करतात [→ दाबयंत्र]. कात्रीने पत्रा कापतात. नळीकर्तकाने नळीचे तुकडे करतात [→ नळकाम धातुव अधातूंचे जोडकाम]. रापीने चामडे कापतात व तासतात.सि लोहारकाम सुतारकाम].
छिद्रण हत्यारे : (आ. ६). पिळाच्या छिद्रकाने छिद्र जलद पडून छिद्रातील कीस आपोआप छिद्राबाहेर पडतो. हात छिद्रण यंत्राने धातूत छिद्रेपाडता येतात. रॅचेट छिद्रकाने अवघड जागी धातूत छिद्रे पाडतात. छिद्र तासणीने छिद्राचा आतील भाग अचूक वर्तुळाकार व गुळगुळीत करतायेतो. डोलमिटाने व स्क्रू गिरमिटाने लाकडात छिद्रे कातता येतात.[ → छिद्रण यंत्र ].
मापन व रेखन हत्यारे : (आ. ७). पोलादी मोजपट्टी निकेल-पोलादाची केलेली असल्याने वातावरणातील बदलत्या तापमानाला ती प्रसरण किंवाआकुंचन पावत नाही. त्यामुळे मापात फरक पडत नाही. इंग्लिश पद्धतीत इंचाचे लघुतम अंशन ¹/₆₄ पर्यंत केलेले असते, तर मेट्रिक पद्धतीत ते ½ मिमी.पर्यंत केलेले असते. नग तयार करताना आरेखनात दिलेली मापे या मोजपट्टीने नगाच्या मूळ ठोकळ्यावर अथवा पट्टीवर रेखून घेतात. अंतर्व्यासमापकाने पोकळ भागाच्या आतील पोकळीचे माप घेतात. बहिर्व्यासमापकाने कोणत्याही नगाचे बाह्य माप घेता येते. काम करताना नगावर रेखलेल्या रेषा पुसून जाण्याची शक्यता असल्याने रेखनबिंदू पोगर हातोडीने ठोकून उथळ बिंदू खुणा करून घेतात. कंपासाने नगावर वक्र रेषांचे रेखन करतात. गवंडी किंवा पत्राकारागीर गिरपट्टी याच कामासाठी वापरतात [→ धातुपत्राकाम]. जेनी कॅलिपरचा वाकडा पाय हमचौरस नगाच्या एका पृष्ठभागास टेकवून दुसऱ्या सरळ पायाने संलग्न पृष्ठभागावर समांतर रेषा रेखता येते. तसेच दंडगोल नगाचा केंद्रबिंदू काढता येतो.
रेखन ठोकळ्यातील सुईच्या अग्राने नगावर रेखणी करता येते, तर सुईच्या वाकड्या टोकाने निरनिराळ्या यंत्रांचे दंड किंवा दंडिका अक्षा-भोवती सम (केंद्रित) फिरतात की नाही हे तपासता येते. आधारकोन ठोकळा बिडाचा असून त्याचे एक पाखे सपाट पाटावर ठेवतात वदुसऱ्या पाख्याला नग हव्या त्या कोनात रेखणी करताना पक्का बसवितात किंवा टेकवून ठेवतात. आधारकोन ठोकळा याचे स्थिर व संयोजनक्षमअसे दोन प्रकार आहेत. दंडगोल नगाच्या पृष्ठभागावर, रेखणी करतानाकिंवा त्याचा केंद्रबिंदू काढताना तो सपाट पाटावर व्ही-ठोकळ्यांच्या जोडीवर ठेवतात. सपाट पाट ओतीव बिडाचा असून त्याचा वरचा पृष्ठभाग अचूकपणे समतल केलेला असून चारही बाजू काटकोनात कातलेल्या असतात. या पाटावर नग ठेवून रेखन ठोकळा, आधारकोन ठोकळा, मोजपट्टी व गुण्या या हत्यारांच्या मदतीने रेखणी करतात. त्यामुळे रेखणी अचूक मापाची होते. खतावणीने लाकडावर समांतर रेषा रेखता येतात. घडीची लाकडी मोजपट्टी ही पाणी न शोषणाऱ्या कठीण लाकडाची वदोन फूट लांबीची असून तिची सहा इंचांपर्यंत घडी करता येते. ती सुतारकामातही वापरतात. पोलादी रेखणीच्या अणकुचीदार अग्राने नगावर रेखणी करतात व दुसऱ्या टोकाने चुकलेली रेषा खरवडून टाकतात. गुण्याने नगावर काटकोनात रेखणी करतात. तसेच नगाचे दोन संलग्न पृष्ठभाग काटकोनात आहेत किंवा नाहीतहे तपासतात. संयोगी गुण्याने कोणत्याही कोनाने नगाचे रेखन करता येते. तसेच दोन संलग्न पृष्ठभागांतील कोन तपासता येतात. त्याच्या मोजपट्टीवर बसविलेल्या द्विशूल भागाने दंडगोल नगाचा केंद्रबिंदू काढता येतो. बहिर्सूक्ष्ममापक व अंतर्सूक्ष्ममापक इंग्लिश व मेट्रिक मापनाच्या पद्धतीसाठी वेगवेगळे असतात. इंग्लिश पद्धतीत फिरत्या दांडीवर ¹/₄₀’’ अंतरालाचे व्ही- -आटे पाडलेले असतात. दांडी बिडाच्या सांगाड्यात बसविलेली असून सांगाड्याच्या अस्तनीवर ( स्लीव्ह ) इंचाचे ४० समभाग पाडलेले असतात. अस्तनीच्या टोकाला तोंडात एक नट घट्ट बसविलेला असतो. दांडीच्या टोकावर एक पुंगळी (थिंबल) घट्ट बसविलेली असून तिच्या परिघी तोंडावर २५ समभाग पाडलेले असतात. या पुंगळीचा संपूर्ण व्हर्नियर मोजपट्टीच्या कडेवर प्रमुख पट्टीवरील २४ भागांएवढ्या लांबीचे २५ समभाग पाडलेले असतात. या पुंगळीचा संपूर्ण फेरा फिरविल्यावर ती अस्तनीवर ¹/₄₀’’ पुढे सरकते व तेवढीच दांडीही पुढे सरकते परंतु पुंगळीचा ¹/₂₅’’ फेरा फिरविल्यावर दांडी ¹/₄₀’’×¹/₂₅’’=¹/₁₀₀₀ पुढे सरकते. त्यामुळे या मापकाने ०.००१” पर्यंत अचूक माप घेता येते. मेट्रिक पद्धतीत फिरत्या दांडीवर ½ मिमी. अंतरालाचे व्ही-आटे पाडलेले असतात. अस्तनीवर ½ मिमी. चे समभाग पाडलेले असतात. पुंगळीच्या परिघी तोंडावर ५० समभाग पाडलेले असतात. पुंगळीचा ¹/₅₀ फेरा फिरविल्यावर दांडी ½ मिमी. × ¹/₅₀ = ¹/₁₀₀₀ मिमी. पुढे सरकते. त्यामुळे या मापकाने ०.०१ मिमी.पर्यंत अचूक माप घेता येते. पुंगळी बाहेर असलेल्या अस्तनीवरील माप मोजतात. खोली- मापकाची अशीच रचना असते परंतु त्याच्या अस्तनीवर शून्यापासून भाग सुरू न होता कमाल मापापासून उलट्या क्रमाने भाग पाडलेले असतात. नगाच्या गाळ्यातील खोलीचे माप याने घेता येते परंतु असे मापघेताना पुंगळीने झाकले गेलेले अस्तनीवरील माप मोजावयाचे असते. ⇨ व्हर्नियर व्यासमापकाचा शोध प्येअर व्हर्नियर (१५८०-१६३७) या फ्रेंच गणितज्ञांनी १६३१ मध्ये लावला. इंग्लिश पद्धतीच्या व्हर्नियर व्यास-मापकात एका टोकाला अंगचा जबडा असलेली प्रमुख मोजपट्टी असते. या पट्टीच्या एका कडेवर इंचाचे ४० समभाग पाडलेले असतात, तर दुसऱ्या कडेवर १ मिमी. चे समभाग पाडलेले असतात. या पट्टीवर एक सरकता जबडा बसविलेला असून त्यावर व्हर्नियर मोजपट्टी असते. इंचाकडील व्हर्नियर मोजपट्टीच्या कडेवर प्रमुख मोजपट्टीवरील २४ भागांएवढ्या लांबीचे २५ समभाग पाडलेले असतात. त्यामुळे व्हर्नियर मोजपट्टीचा ½₅ भाग हा ²⁴”/₄₀×½₅ = ²⁴”/₁₀₀₀ असतो व प्रमुख मोजपट्टीचा ¹/₄₀ हा भाग ²⁵”/₁₀₀₀ असतो. अशा रचनेने ²⁵”/₁₀₀₀-²⁴/₁₀₀₀= ¹”/₁₀₀₀ हा दोन्ही मोजपट्टीतील फरक असल्याने ०.००१ पर्यंत अचूक माप घेता येते. मेट्रिक पद्धतीत प्रमुख मोजपट्टीवर १ मिमी. चे समभाग पाडलेले असून त्यावरील ४९ भागांएवढ्या लांबीचे व्हर्नियर मोजपट्टीवर ५० समभाग केलेले असतात. त्यामुळे या १-⁴⁹/₅₀=¹/₅₀ मिमी. म्हणजेच ²/₁₀₀ मिमी. असतो. म्हणून या व्हर्नियरने ०.०२ मिमी.पर्यंत अचूक माप घेता येते. अशीच रचना उंचीमापकात असते. मात्र, तिची प्रमुख मोजपट्टी पक्क्या बैठकीवर काटकोनात उभी असते. व्हर्नियरवरील शून्याच्या डावीकडेप्रमुख मोजपट्टीवरील माप मोजतात. व्हर्नियर व्यासमापकाने आतील व बाहेरचे तसेच खोलीचे माप इंचात व मिमी.मध्ये मोजता येते. [→ मापक व तुल्यक]. कातण करण्याकरिता गोलीय, षट्कोणीय व अष्टकोनीय दंडाचा केंद्र अचूकपणे ठरविणे व रेखन करणे यांसाठी घंटी केंद्र पोगराचा वापर करतात.
परीक्षण हत्यारे : (आ. ८). सरळकड पट्टी ओतीव बिडाची निरनिराळ्या लांब्यांची असते. तिची कड अचूक सरळ असल्याने ती नगाच्या पृष्ठभागावर जागोजागी टेकवून तो पूर्णपणे समतल आहे की नाही ते तपासता येते. तबकडीमापक किंवा निर्देशक नगाच्या ठराविक मापात प्रत्यक्षात किती वाढ अथवा त्रुटी झाली हा फरक दर्शवितो. तबकडीच्या उजव्या अर्ध्या भागावर काटा गेल्यास वाढ (प्लस) व डाव्या अर्ध्याभागावर गेल्यास त्रुटी (मायनस) म्हणजेच मापातील फरक इंच किंवा मिमी.मध्ये दर्शवितो. यासाठी तबकडीवरील शून्यावर प्रथम काटा सिद्ध करून घेतात. तसेच याने नगाच्या पृष्ठभागातील चढ-उतारांचे परीक्षण करता येते किंवा फिरता दंड, चाक व दंडिका (तर्कू) स्वतःच्या अक्षाभोवती सम फिरते की नाही हे तपासता येते. कोन परीक्षकातील दोन भुज प्रथम हव्या त्या कोनात सिद्ध करून घेतल्यावर या हत्याराने नगाच्या तयार झालेल्या संलग्न पृष्ठभागांतील कोन तपासता येतो. गुडदी मापक व झटिती मापक यांत अनेक प्रकार आहेत. त्यांतील काही ठराविकच माप तपासतात, तर काही ठराविक मापांत वाढ किंवा त्रुटी किती चालू शकेल हे विचारात घेऊन बनविलेली असतात. ठराविक मापांमध्ये कमाल आणि किमान फरक किती चालू शकेल याच्या विशिष्ट मापमऱ्यादा अशा मापकांच्या रचनेत ठेवलेल्या असल्याने त्यांना मऱ्यादामापक म्हणतात. एखाद्या नगाची जाडी अथवा व्यास विशिष्ट मापमऱ्यादेत असल्यास, अशा मापकाच्या कमाल माप तोंडातून तो आत जात असल्यास व किमान माप तोंडातून जात नसल्यास तो योग्य मऱ्यादेत आहे की नाही हे ठरविले जाते. म्हणून त्यांना गो-नॉट्-गो मापकेही म्हणतात. अशी मापके निकेल-क्रोम पोलादाची बनविलेली असून उत्पादन कारखान्यात त्यांनी हजारो नगांचे कमी वेळात मापन केले जाते.
ज्या-गजाने (साइन बार) निमुळत्या किंवा नतप्रतल नगाचा नतकोन (टेपर अँगल) अंशात काढता येतो. त्यासाठी आ. ८ मधील (६) मध्ये दाखविल्याप्रमाणे नगाच्या नतप्रतल भागावर ‘ज्या-गज’ टेकवून घसरमापकांनी किंवा उंचीमापकाने दोन टोकांची मापे घेऊन त्यांतील फरकाच्या संख्येला ‘ज्या-गजा ‘च्या दिलेल्या लांबीने भागतात. अशा प्रकारे आलेल्या दशांशातील संख्येसमोर लॉगरिथमामधील ‘ज्या’ कोष्टकात जो कोन अंशात दिलेला असेल, तो नतकोन समजताति [→ लॉगरिथम]. एका लाकडी चौकटीत तिच्या तळच्या भुजेशी समांतर अशी द्रव भरलेली काचेची बंद तोंडाची आखूड नळी बसविलेली असते. यात हवेचा एक बुडबुडा ठेवलेला असून तो शून्य रेषेशी जुळला की, चौकट ज्या नगावर किंवा रचनेवर टेकविली असेल, तो पृष्ठभाग सम-पातळीत असल्याचे समजतात. फिरते दंडगोल व आडवे दंड समपातळीत उभारण्यात पाणसळ चौकटीचा उपयोग होतो. फटमापकाने दोन भागांच्या जोडात अंतर (माया) किंवा फट किती मापाची आहे, ते स्पर्शाने समजू शकते. स्क्रू अंतरालमापकाने स्क्रूच्या आट्यांचे अंतराल तपासता येते किंवा समजू शकते. त्रिज्यामापकाने अंतर्वक्र व बहिर्वक्र भागांच्या त्रिज्या समजतात. पत्रामापकाने पत्र्याची जाडी गेज नंबरांत समजते. तारमापकाने तारेची जाडी मोजता येते. सूक्ष्मी पाणसळीने यंत्राची बैठक व इतर महत्त्वाचे भाग समपातळीत आहे की नाही याचे परीक्षण केले जाते. प्रकाशीयमापक ही एक वर्तुळाकार जाड स्वच्छ काच असून तिची दोन्ही अंगे समतल व एकमेकांशी समांतर असतात. ज्या नगाचा पृष्ठभाग सपाटी-करणासाठी तपासावयाचा त्यावर ही काच टेकवितात. या काचेत प्रकाश-शलाका घुसविल्यावर नगाच्या पृष्ठभागावर हवेची पोकळी राहिल्यासरंगीत पट्टे दिसतात. पृष्ठभाग अचूक सपाट असल्यास असे पट्टे दिसत नाहीत. पट्ट्याच्या विविध रचनांवरून पृष्ठभागावर कोणत्या जागी चढ-उतार आहे ते समजते. केंद्रमापकाने लेथची दोन्ही केंद्रे सरळ रेषेत आहे कीनाही, हे तपासता येते व कातकाम हत्यार नगाशी काटकोनात लावता येते.
लाग (आधार) हत्यारे : (आ. ९). नसराळी लाग व पाचरी लाग मृदू पोलादाचे तयार केलेले असून त्यांचा उपयोग पत्राकारागिराला त्यांच्या आधाराने पत्र्याचे अंग किंवा कडा वळविण्यासाठी होतो. रिव्हेटिंग क्रिया करताना रिव्हेटच्या डोक्याला आधार देण्यासाठी रिव्हेट उखळी वापरतात. ऐरण शुद्ध ओतीव लोखंडाची असून तिच्या माथ्यावर अंगचा कठीण पोलादाचा पट्ट ठेवलेला असतो. गायीच्या शिंगासारखा आकार कवच कठिणीकरण प्रक्रियेने झिजू नये म्हणून कठीण केलेला असतो व त्यावर लोहार तप्त धातूच्या पट्ट्या किंवा गज ठोकून वाकवितो. ऐरणीच्या माथ्यावर लोहार तप्त धातू सांडशीत धरून त्याला हातोडीने ठोकूनठोकून घडवितो [→ घडाई, धातूची]. लाग ठोकळ्यात खुल्या आणि बंद तोंडाचे निरनिराळ्या आकार व आकारमानांचे गाळे ठेवलेले असल्याने त्या त्या आकाराचे नग धरून काम करता येते. हा ओतीव मृदू पोलादाचा असतो. शंकू लाग ओतीव बिडाचा असून त्यावर लोहार निरनिराळ्या व्यासांची तप्त धातूची कडी ठोकूनठोकून तयार करतो [→ लोहारकाम].
रूपण हत्यारे : (आ. १०). नळी वक्रण ठोकळा बिडाचा असून त्याच्या डोळ्यात नळीचे टोक पकडून नळीला बाक देता येतो. फुलवणक व परिघी रूपक हत्यारांच्या जोड्या असून त्या मृदू पोलादापासून तयार केलेल्या असतात. तप्त धातू फुलवणक जोडीत पकडून ठोकला असता त्याची लांबी वाढविता येते. परिघी रूपक जोडीत तप्त धातूचा नग पकडून त्याच्या पृष्ठभागाला दंडगोल आकार देता येतो. चिपटीकरणकाने तप्त धातूचे पृष्ठभाग सपाट करता येतात. कोपरी रूपकाने नगाच्या कोपऱ्यातील भाग कोरबंद करता येतो. रिव्हेट रूपकाने रिव्हेटच्या शेपटास डोक्याचा आकार देता येतो. ही हत्यारे मृदू पोलादाची असतात. डाखणीने डाखकाम करून सांधाबंदी करता येते [→ झाळकाम व डाखकाम]. डाखणीचा खडा तांब्याचा असतो.
साचेकाम नैल्याने रेतीच्या साचाच्या पृष्ठभागाची सफाई करता येते. साचेकाम चमच्याने साचाच्या विविध आकारांची सफाई करता येते. हे निरनिराळ्या प्रकारचे असून ते ओतीव पितळेचे केलेले असतात. साचेकाम फावडे निरनिराळ्या आकारांची असून ती मृदू पोलादाची तयार करतात. त्यांनी रेतीच्या साचात रसमार्ग उकरता येतात. साचात पडलेली सुटी रेती बाहेर काढून टाकता येते. साचेकाम रूपण घेरपट्ट्या लाकडी असून त्या निरनिराळ्या आकारांच्या तयार करतात. रेती खड्ड्यात हव्या त्या सममित आकाराचे साचे अशा घेरपट्ट्या खड्ड्यातील सुळदांडीवर बसवून फिरविल्यास तयार करता येतात. [→ ओतकाम].
भारतात सर्व प्रकारच्या हत्यारांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. उद्योगधंद्यांत सु. आठ हजार प्रकारची हत्यारे वापरली जातात. भारतात जालंदर येथे साधी हत्यारे बनविण्याचे २५० लघुउद्योग आहेत. भारतात हिंदुस्तान एव्हरेस्ट टूल्स लि. (दिल्ली), व्हिक्टर टूल्स कॉर्पोरेशन (जालंदर), प्रागा टूल्स लि. (सिकंदराबाद), इंडियन टूल्स लि. (मुंबई) इ. कंपन्या कर्मशालेतील हत्यारे तयार करतात.
पहा : आटे पाडणे; करवत; कानसकाम; छिद्रण यंत्र; छिद्रपाट व धारक पकड; दाबयंत्र मापक व तुल्यक; यांत्रिक हत्यारे; वेधन व छिद्रण हत्यार-योजन.
संदर्भ : 1. Burstall, A. F. A History of Mechanical Engineering, London, 1963.
2. Chapman, W. J. Workshop Technology, Part I and II, England, 1972.
3. Hajra Chowdhary, S. K. Bhattacharya, S. C. Elements of Workshop Technology, Vol. I, Bombay, 1965.
4. Judge, A. W. Engineering Workshop Practice, Vol. I, II, III, England, 1953.
वैद्य, ज. शि.; भिडे, शं. गो.; ओक, वा. रा.; दीक्षित, चं. ग.