हक्की पिक्की : दक्षिण भारतातील एक भटकी जमात. या जमातीच्या लोकांना हे नाव त्यांच्या पक्षी पकडण्याच्या व्यवसायावरून पडले आहे कारण कन्नड भाषेमध्ये हक्की म्हणजे पक्षी व पिक्की म्हणजे प्रतिध्वनीहोय. त्यांच्या सिंग, राव, अप्पा या नामावलींवरून ते गुजरातच्या सीमा-भागांतून दक्षिणेत आले असावेत. पुढे ते राजस्थान व आंध्र प्रदेशातआणि कर्नाटकातील म्हैसूर, कोलार, शिमोगा आणि हसन या जिल्ह्यांत विखुरलेले आढळतात. ते कोठेही प्रदीर्घ काळ वास्तव्य करीत नाहीत. त्यांची लोकसंख्या १४,७०० (२०११) होती. मुख्यतः त्यांची भाषा इंडो–आर्यन भाषासमूहातील वाघ्री असून ते ज्या प्रदेशात जातात तेथील स्थानिक भाषा आत्मसात करतात. ते मांसाहारी आहेत. शिवाय तांदूळ, नाचणी आणि ज्वारी यांचाही त्यांच्या आहारात समावेश असतो. स्त्री-पुरुष दोघेही नियमित मदिरापान करतात.

हक्कीपिक्कींमध्ये म्होतो आणि नाह्नो हे दोन मुख्य विभाग आहेत. म्होतोंमध्ये गुजरातिया, पनवार, कालिवाला आणि मेवार या चारकुळी आहेत. त्यांच्यात आते-मामे भावंडांत आणि थोरल्या बहिणीच्या मुलीशी विवाह प्रचलित आहे. वयात आलेल्या मुला-मुलींची लग्नेहोतात. त्यांच्यात एकपत्नीविवाहाची पद्धत आहे. क्वचित बहुपत्नी-त्वही आढळते. त्यांच्यात वधूमूल्याची चाल असून ताली (मंगळसूत्र) आणि जोडवी ही स्त्रियांची सौभाग्यचिन्हे होत. लग्नानंतर मुलगी पितृगृहीच राहते. व्यभिचार हे घटस्फोटाचे मूळ कारण असून पति-पत्नीत तसे आढळून आल्यास तो मिळतो. विधवाविवाहास जमातीत मान्यता आहे. घटस्फोटित मुलगी नवऱ्याच्या धाकट्या भावाशी वा मोठ्या मृतबहिणीच्या विधुराशी विवाह करू शकते. त्यांच्यात बीजकुटुंबीय वउदग्र (उभे) विस्तारित कुटुंब पद्धती असून सर्व मुलांत वडिलोपार्जित संपत्तीची समान वाटणी केली जाते. स्त्रिया जमातीच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक कृतींत सहभागी असतात. बाळाच्या जन्मानंतर सहादिवस अशौच पाळले जाते. सहाव्या दिवशी छटी विधी होतो. तीनमहिन्यांनी मुख्य शुद्धीकरण विधी केला जातो. नामकरण सोहळा जन्मानंतर पाचव्या दिवशी किंवा नंतर केव्हाही करतात. मुलगी वयात आल्यानंतर फुलवंती विधी केला जातो. मृताचे दफन केले जाते व बारा दिवससुतक पाळतात.

पक्षी आणि प्राण्यांना पकडणे त्याचबरोबर जंगलातील मध, वनौषधी इ. गोळा करणे हे हक्कीपिक्कींचे पारंपरिक व्यवसाय आहेत. बहुसंख्य लोक भटके जीवन जगतात व स्त्रियांनी बनविलेली सौंदर्यप्रसाधने विकतात.काही मोलमजुरी करतात. ते चामुंडी, दुर्गाम्मा, कालम्मा व येलम्मा या देवतांना भजतात. जमातीची पातालम्मा ही ग्रामदेवता, तर मारम्मा ही कुलदेवता आहे. ते हिंदू धर्मीय असून दिवाळी, शिवरात्री, उगाडी यांसारखे उत्सव साजरे करतात. उत्सवप्रसंगी प्राण्यांच्या बळींची पद्धत त्यांच्यात प्रचलित आहे.

हक्कीपिक्कींचे परंपरागत पंचायत मंडळ असून त्यात जमातीतील तंटेव तक्रारींचे निराकरण करण्यात येते आणि गुन्हेगारास दंड अथवात्यावर बहिष्काराची शिक्षा फर्माविण्यात येते. त्यांच्यात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाने शिकारीवर आणलेली बंधने आणि वनसंपत्तीगोळा करण्यावर आणलेले निर्बंध यांमुळे त्यांच्यातील बरेचसे लोकइतर व्यवसायांकडे वळलेले आहेत. कर्नाटकातील अरसपुरा गावचे हक्कीपिक्की पुष्परचना करण्यात तरबेज आहेत. त्या पुष्परचना शेजारच्या राज्यांत विकल्या जातात. एका जागी स्थिरता नसल्यामुळे त्यांच्या विकसनात बऱ्याच समस्या आहेत पण अलीकडे त्यांच्यातील स्थलांतर कमी होऊन शासनाकडून त्यांना घरबांधणीसाठी व जमिनीसाठी आर्थिकसाहाय्य मिळू लागले आहे. आय्आर्डीपी, आय्सीडीएस् व पीडीएस् यांच्या पाठिंब्यामुळे काही मूलभूत सोयी-सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत.

संदर्भ : Singh, K. N. The Scheduled Tribes, Delhi, 1994.

कुलकर्णी, शौनकह