स्वाहिलीभाषा-साहित्य : पूर्व आणि मध्य आफ्रिकेत प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा. तिला किस्वाहिलीसुद्धा म्हणतात. आफ्रिकेच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर दक्षिण सोमालियापासून टांझानिया व मोझँबीकमधील सीमेपर्यंत तसेच हिंदी महासागरातील टांझानिया, लामू , कॉमॉरो बेटे आणि मादागास्कर बेटांवरच्या सु. पाच दशलक्ष लोकांची ती मातृभाषा आहे.

टांझानिया व युगांडा या देशांची ती प्रशासकीय कारभाराची आणि प्राथमिक शिक्षणाची भाषा असून तिला येथे अधिकृत भाषा म्हणून घोषित केले आहे. टांझानियात सु. ३५ द. ल. लोक स्वाहिली द्वितीय भाषा म्हणून बोलतात. केन्यातही इंग्रजीच्या खालोखाल स्वाहिलीलाच प्राधान्य दिले जाते. पूर्व आफ्रिकेतील मोझँबीक, रूआंडा, बुरूंडी, मालावी, झांबिया या देशांमध्ये तसेच दक्षिण आफ्रिकेतील दरबान शहरात आणि येमेन, ओमान इ. दक्षिणेकडील अरब राष्ट्रांमध्येही दुसरी, तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून स्वाहिली बोलणारे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.

जगभरात १२० – १५० द. ल. लोक ही भाषा बोलतात. पूर्वेकडे जपानपासून ते पश्चिमेकडे मेक्सिकोपर्यंत जवळजवळ शंभर विद्यापीठांमधून स्वाहिली शिकवली जाते. प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, शिक्षण यांमुळे स्वाहिली भाषकांची संख्या सतत वाढत आहे. ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जर्मनी तसेच रशिया, चीन, फ्रान्स, सूदान, दक्षिण आफ्रिका इ. देशांच्या आकाशवाणीवरून स्वाहिली भाषेतले कार्यक्रम प्रसारित केले जातात.

स्वाहिलीभाषेचाउगमवविकास: स्वाहिली भाषेचा झालेला विकास हा भाषावैज्ञानिकांसाठी आणि इतिहासकारांसाठी कायमच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. ही नायजर-काँगो भाषाकुलातील बांतू भाषा. ही मूळची अरबशासित झांझिबार प्रदेशातील भाषा मानली जाते. इ. स. च्या सहाव्या शतकापासून अरब व्यापाऱ्यांचा आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरच्या झांझिबारमधील स्थानिक लोकांशी संपर्क आला. त्याची परिणती संस्कृतीच्या आणि भाषांच्या संगमात होऊन स्वतंत्र अशी स्वाहिली संस्कृती अस्तित्वात आली. बारावे ते पंधरावे शतक या कालखंडात झांझिबार, मोंबासा, लामू इ. स्वाहिली राज्ये ही व्यापाराची केंद्रे बनली. स्वाहिली हा शब्द जसा भाषावाचक आहे, तसाच तो संस्कृतिवाचक आणि लोकवाचकही आहे. हे लोक भारत, चीन व पर्शिया या देशांशी सोने, हस्तिदंत आणि गुलाम यांचा व्यापार करीत असत. सोळाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत स्वाहिलींवर पोर्तुगीज, ओमानी अरब, जर्मन आणि ब्रिटिश लोकांनी राज्य केले. एकोणिसाव्या शतकात अरेबिया, पर्शिया आणि भारत या देशांतून व्यापारासाठी स्थलांतर केलेले लोक पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात येऊन स्थायिक झाले. इतिहासाच्या या प्रत्येक टप्प्याचा स्वाहिली भाषेवरही परिणाम होत गेला.

जर्मन आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांमुळे स्वाहिलीला प्राथमिक शिक्षणाच्या आणि राज्यकारभाराच्या भाषेचा दर्जा अधिकृतपणे मिळाला. १९२८ मध्ये झांझिबारमध्ये बोलली जाणारी किउंगुजा ही बोली स्वाहिलीच्या प्रमाणीकरणासाठी निवडण्यात आली. सांप्रत प्रमाण स्वाहिली या बोलीशी मिळतीजुळती आहे.

बोली: आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींना मिळून किस्वाहिली असे नाव आहे. स्वाहिलीच्या सु. पंधरा बोली अस्तित्वात आहेत. त्याशिवाय या भाषेची अनेक पिजिन रूपेही वापरात आहेत. त्यांपैकी तीन बोली महत्त्वाच्या मानल्या जातात : (१) किउंगुजा (kiungunja): ही झांझिबार बेटांवर आणि टांझानियाच्या मुख्य भूप्रदेशात बोलली जाते. स्वाहिलीची प्रमाण बोली लेखनभाषा या बोलीला जवळची आहे. (२) किम्व्हिटा (Kimvita): ही बोली मोंबासात आणि केन्याच्या इतर भागांत बोलली जाते. (३) किआमू (Kiamu) : ही केन्यातील लामू बेटावर आणि लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर बोलली जाते.

लिपी: स्वाहिली भाषेतले सर्वांत प्राचीन म्हणजे अठराव्या शतकातले वाङ्मय अरबी लिपीत लिहिले गेलेले आढळते परंतु इ. स. १९३० मध्ये जेव्हा ब्रिटिश वसाहतवादी अधिकाऱ्यांनी स्वाहिलीचे प्रमाणीकरण करण्याचे प्रयत्न केले, त्यावेळी स्वाहिली भाषेच्या लिपीतही बदल केले गेले. तेव्हापासून ही भाषा लॅटिनची वर्णमाला वापरून म्हणजेच रोमन लिपीत लिहिली जाते परंतु जुन्या पिढीतले लोक कधीकधी अरेबिक स्वाहिली लिपीतही लिहितात.

ध्वनिविन्यास: स्वर: प्रमाण स्वाहिलीत आ, ए, इ, ऑ आणि उ हे पाच स्वर आहेत. स्वरावर आघात असो किंवा नसो, स्वराचा उच्चार नेहमी दीर्घच होतो. तसेच या भाषेत द्विस्वर नाहीत. स्वरसंयुगांमध्येही दोन्ही स्वर स्वतंत्रपणे उच्चारले जातात. उदा., Chui (चित्ता-Leopard) हा स्वाहिलीतला शब्द चु.इ असा दोन अवयव (syllable) असल्याप्रमाणे उच्चारला जातो.

व्यंजने: स्वाहिलीत एकूण ३३ व्यंजने आहेत. (१) स्वाहिली लेखनव्यवस्थेत महाप्राणस्फुट व महाप्राणहीन ध्वनींसाठी वेगळी अक्षरचिन्हे नाहीत. त्यामुळे जेव्हा शब्दाच्या सुरूवातीला महाप्राणहीन स्पर्शध्वनी असतो, तेव्हा स्वाहिलीच्या काही बोलींमध्ये त्यासाठी महाप्राणस्फुट स्पर्शध्वनी उच्चारला जातो. उदा., टेंबो (tembo) = पाम वृक्षापासून केलेली दारू. हा शब्द ठेंबो (thembo) = हत्ती असा उच्चारला जातो. (२) नासिक्य स्पर्शध्वनी जर दुसऱ्या वर्गातील स्पर्शध्वनीच्या आधी आला, तर स्वतंत्रपणे उच्चारला जातो. उदा., mtoto(child) हा शब्द m.to.to/ मटोटो असा उच्चारला जातो.

पदविन्यास: स्वाहिलीत नामांचे तेरा वर्ग आहेत. स्वाहिलीतल्या नामांचे वर्गीकरण नामांच्या अर्थावर आणि त्यांना लागणाऱ्या पूर्वप्रत्ययांवर आधारलेले असते. उदा., मानवप्राणी एका वर्गात मोडतात. अनेकवचनाचा पूर्वप्रत्यय व किंवा वा (w/wa) आहे. म-टू (m-tu) म्हणजे एक व्यक्ती आणि वा-टू (wa-tu) म्हणजे लोक. स्वाहिली मातृभाषा असलेल्या भाषकांना वास्वाहिली म्हणतात. याउलट झाडे दुसऱ्या वर्गात येतात. एक झाड – m ti, झाडे – mi ti. लघुत्ववाचक आणि गुरुत्ववाचक अर्थही नामांना प्रत्यय लावून सूचित केला जातो. उदा., ndege – सर्वसाधारण आकाराचा पक्षी, kidege – छोटा पक्षी, dege – मोठा पक्षी इत्यादी. तसेच धातूला अर्थाप्रमाणे वेगवेगळे प्रत्यय लावून क्रियापदांची रूपे बनवली जातात. उदा., funga (shut, बंद करणे), fung-wa (be shut, बंद असणे ), fungika (shut down, बंद होणे).

वाक्यविन्यास: स्वाहिली ही विग्रहप्रधान भाषा आहे. या भाषेत पदबंधांचा सुसंवाद नामांशी असतो. क्रियापदे कर्ता किंवा कर्माच्या जागी येणाऱ्या नामवर्गाप्रमाणे चालतात. (१) वाक्यातील शब्दांचा क्रम बहुतांश आर्यभारतीय भाषांसारख्या कर्ता-कर्म-क्रियापद असाच असतो पण कधीकधी कर्माला असणाऱ्या महत्त्वानुसार हा शब्दक्रम बदलू शकतो.

(२) वाक्यात विशेषणे नामांनंतर येतात.

उदा.,

mtoto

mzuri

म.

मूल 

चांगले 

इं.

child

good

 पण विशिष्ट नामाचा निर्देश करताना दर्शक विशेषण नामाच्या आधी येऊ शकते.

उदा.,

yule

mtoto

म.

एक 

मूल 

इं.

the

child

शब्दसंग्रह: स्वाहिली भाषेच्या क्लिष्ट व्याकरणावर आणि शब्दनिधीवर बांतू भाषेचा प्रभाव असला, तरी तिच्या विकासात अरबी भाषेचा सिंहाचा वाटा आहे. स्वाहिली हा शब्दही अरेबिक भाषेतले अनेकवचनी विशेषण असून त्याचा अर्थ समुद्रकिनाऱ्यावरचे लोक असा आहे. सिता (सहा ), सबा (सात ), किताबु (पुस्तक) असे स्वाहिलीतले अनेक शब्द अरेबिकमधून आलेले आहेत. धर्म, व्यापार, कायदा यांच्याशी संबंधित शब्द अरेबिकमधून, तर सरकार, आधुनिक तंत्रज्ञान इ. साठींचे शब्द इंग्रजीतून घेतलेले आहेत. पोर्तुगीज, जर्मन, पर्शियन व फ्रेंच या भाषांतूनही स्वाहिलीत उसनवारी झालेली आहे. इतकेच नव्हे, तर पेसा (पैसा) हा शब्द हिंदीतून स्वाहिलीत आला आहे.

मेहता, कलिका

स्वाहिलीसाहित्य: स्वाहिली ही एक बांतू भाषा आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून उत्तरेस लामू आयलंड, केन्या आणि दक्षिणेकडे टांझानिया अशा विस्तृत प्रदेशांत ही मातृभाषा वा द्वितीय भाषा (सेकंड लँग्वेज) म्हणून प्रचलित आहे. [→ बांतू भाषासमूह ].

स्वाहिली भाषेतील लिखित साहित्य अठराव्या शतकाच्या आरंभा-पासूनचे असून ते अरबी लिपीत लिहिलेले आहे. त्यानंतरचे स्वाहिली साहित्य तीन बोली भाषांत लिहिले गेले : (१) किउंगुजा, (२) किम्व्हिटा आणि (३) किआमू . १९३० मध्ये वसाहतवादी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रमाण स्वाहिली भाषा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी काही आफ्रिकन विद्वानांची आणि लेखकांची मदत घेतली. अखेरीस झांझिबार येथे बोलली जाणारी किउंगुजा ही बोली भाषा प्रमाण स्वाहिली भाषेसाठी पायाभूत म्हणून धरली गेली. संपूर्ण पूर्व आफ्रिकेत पुस्तके आणि अन्य प्रकाशने, शिक्षण इत्यादींसाठी ही प्रमाण भाषा म्हणून वापरण्यात येऊ लागली.

आरंभी स्वाहिली भाषेतील कथात्मक साहित्य कथानिवेदनाच्या मौखिक परंपरेतून अवगत झालेल्या कथा, तसेच अरबी कथासाहित्य आणि यूरोपियन लेखकांनी केलेले अनुवादित साहित्य ह्या स्रोतांनी प्रभावित झाले होते. याला अपवाद म्हणजे जेम्स एंबोताला ह्याची ‘फ्रीडम फॉर द स्लेव्ह्ज’ (१९३४, इं. शी.) ही ऐतिहासिक कादंबरी होय परंतु शाआबान रॉबर्ट (१९०९-६२) याने प्रमाण भाषेतील स्वाहिली साहित्याला खरी चालना दिली. ह्या टांझानियन कवी-कादंबरीकार आणि निबंधकाराच्या साहित्याला १९४० च्या दशकापासून १९६० च्या दशकापर्यंत वाचकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि आजही त्याचे साहित्य पूर्व आफ्रिकेत वाचले जाते. महंमद फार्सी आणि महंमद सैद अब्दुल्ला हे दोन लेखकही महत्त्वाचे आहेत. महंमद फार्सीकृत ‘कुर्वा अँड दोतो’ (१९६०, इं. शी.) ही कादंबरी आणि महंमद सैद अब्दुल्ला ह्याची ‘श्राइन ऑफ द ॲन्सेस्टर्स’ (१९६०, इं. शी.) ही स्वाहिलीतील पहिली गुप्तहेर कथामाला. ह्या साहित्यकृती स्वाहिली साहित्यातील एका नव्या संक्रमणाच्या द्योतक आहेत. पूर्व आफ्रिकेतील औद्योगिकीकरणाच्या अनुभवाचे संस्कार त्यांवर आढळतात. संस्कृतीचे पश्चिमीकरण, स्वराज्यासाठी दिलेला लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील विकास हे विषयही स्वाहिली साहित्याने आपल्या कथात्मक साहित्यातून आणलेले दिसतात. टांझानियन साहित्यिक फराजी कटालांबुला ह्याची ‘डेथ कॉल’ (१९६५, इं. शी.) ही भयकथाही उल्लेखनीय आहे. स्वाहिली वाङ्मय १९६० च्या दशकात जलद गतीने प्रकाशित होऊ लागले.

हे साहित्य नंतरही लिहिले जात होतेच पण त्याच वेळी अनेक कादंबऱ्यांतून आणि नाटकांतून ऐतिहासिक घटनांची चिकित्सा केली जात होती. तसेच समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांचाही परामर्श घेतला जात होता. स्वाहिलीत आता केवळ पश्चिमी लेखकांच्या साहित्यकृतींचाच नव्हे, तर आफ्रिकन साहित्यकृतींचाही अनुवाद केला जाऊ लागला होता. ज्यांना स्थानिक, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली, अशा स्वाहिली साहित्यिकांत यूफ्रेझ केझिलाहाबी, महंमद एस्. महंमद (दोघेही टांझानियन कादंबरीकार), नाटककार एब्राहिम हुसेन आणि पेनिना ओ मिआमा हेही टांझानियाचे. त्याचप्रमाणे अली जमादार अमीर आणि पी. ए. कारेथी हे केन्याचे कादंबरीकारही उल्लेखनीय आहेत.

अशा सर्जनशील साहित्याच्या जोडीला इतिहासलेखनाचीही दीर्घ परंपरा स्वाहिली भाषेला लाभली आहे. अलीकडच्या काळात भाषाशास्त्रीय अभ्यास आणि वाङ्मयीन समीक्षाही विकसित होत आहे.

कुलकर्णी, अ. र.