स्वामिनाथन्, जे. : (२१ जुलै १९२८—२५ एप्रिल १९९४) श्रेष्ठ भारतीय चित्रकार आणि भारतातील नवतांत्रिक कलाप्रवाहाचे एक जनक. जन्म संजौली (सिमला) येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडील सचिव होते. आई सरस्वती जमीनदार कुटुंबातील होती. स्वामिनाथन् यांचे शिक्षण द हॅरकोर्ट बट्लर स्कूल (सिमला) मध्ये झाले. त्यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. वास्तववादी निसर्गचित्रणावर त्यांचा भर होता. सिमल्यातील निसर्गरम्य परिसर टिपण्याकडे त्यांचा कल होता. मॅट्रिक झाल्यानंतर (१९४२) त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये पूर्व वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. मात्र या परीक्षेत नापास झाल्यावर ते कलकत्त्याला गेले. तिथे त्यांनी भारतातील विविध डाव्या चळवळींतील विचारसरणीचा अभ्यास केला, तसेच मार्क्स, एंगेल्स, लेनीन यांचे साहित्य वाचले.

जे, स्वामिनाथन्

दीड वर्षांनी दिल्लीला आल्यावर त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टीत (सी. एस. पी.) प्रवेश केला. त्यांच्याकडे दिल्ली विभागाची सर्व जबाबदारी आली. मजदूर युनियन या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वामिनाथन् यांचे जयप्रकाश नारायण यांच्याशी मतभेद झाले. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला (१९४८). सार्वत्रिक निवडणुकीत कम्युनिस्ट कार्यकर्त्यांबरोबर ते सक्रिय होते पण त्यांनी कम्युनिस्ट पार्टी सोडली (१९५३).

१९५५ मध्ये भवानी पांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या काळात त्यांनी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे अभिकल्प करणे तसेच, दैनिक हिंदुस्थान आणि सरिता यांत मुक्त लेखक म्हणून कामे केली. पीपल्स पब्लिशिंग हाउस करिता त्यांनी काही भाषांतराची कामे केली. १९६० पासून ते पूर्णपणे चित्रकलेकडे वळले. त्यांनी औपचारिक कलाशिक्षण घेतले नाही. दिल्ली पॉलिटेक्नीकमध्ये त्यांनी संध्याकाळच्या कला वर्गात प्रवेश घेतला तथापि लवकरच तेही शिक्षण संपुष्टात आले. तत्पूर्वी १९५८ मध्ये ग्राफिककरिता अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स, वॉर्सा (पोलंड) ची तीन वर्षाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती पण सहा महिन्यातच ते परत आले. १९६१ मध्ये त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले. लिंक या साप्ताहिकात त्यांनी राजकीय विषयांबरोबरच कला समीक्षक म्हणून १९६२ पर्यंत लेखन केले. १९६३ मध्ये त्यांनी समविचारी चित्रकारांचा गट स्थापन केला. जयराम पटेल, राजेश मेहरा, गुलाम शेख, हिम्मत शहा, ज्योती भट, रेहाप्पा नायडू आदी चित्रकारांचा त्यात समावेश होता. या गटाचे १९६३ च्या ऑगस्टमधे ललित कला अकादमीच्या रवीन्द्र भवनात (दिल्ली) पहिले प्रदर्शन झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचे उद्घाटन केले होते तर प्रदर्शनानिमित्त प्रास्ताविक मेक्सिकन कवी ऑक्टोव्हिओ पाझ यांनी लिहिले होते. केम्ब्रिज स्कूल (दिल्ली) येथे अध्यापक तसेच जामिआ मिल्लिया विश्वविद्यालयात अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काही काळ काम केले.

कॉन्ट्रॉ हे कलाविषयक मासिक ऑक्टोव्हिओ पाझ यांच्या सहकाऱ्याने स्वामिनाथन् यांनी सुरू केले (१९६६). यातून त्यांनी तत्कालीन कलेवर टीका केली. भारतीय पारंपरिक कला आणि आधुनिक कला या दोन टोकांच्या कला असून त्यांचा एकत्र आविष्कार त्यांना मान्य नव्हता. तसेच पाश्चिमात्य आधुनिक कलेचा आधार घेऊन भारतात होणारी आधुनिक कला (विशेषतः पॅरिसप्रणीत) आणि परंपरावादाचे आंधळे पुनरुज्जीवनही त्यांना अमान्य होते. कलेचे वास्तव हे स्वतःचे स्वतंत्र असते. ती वास्तवापासून आलेली नसते. कलेतील हे वास्तव नव्या अनुभवविश्वाचे वास्तव असते. एका मुक्त अवस्थेकडे जाण्याचा तो एक उंबरठा असून कला तटस्थकाची भूमिका बजावते, असे त्यांचे मत होते. साऊँ पाउलू (ब्राझील) येथे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांचा सहभाग होता (१९६९).

स्वामिनाथन् यांच्या प्रेरणा आदिम कला, भारतीय लोककला, आदिवासी कला, तांत्रिक-कला, भारतीय लघुचित्रकला यांतून उद्भवल्या होत्या. त्यांची चित्रे चार टप्प्यांत विभागता येतील : पहिल्या टप्प्यात त्यांच्या चित्रांतून प्रागैतिहासिक कला आणि आदिम कलेतील वंश-चिन्हात्मक भाषेच्या प्रतिमांचा वापर दिसतो. ही चित्रे गुहाचित्रांशी साम्य दर्शविणारी आहेत. दुसऱ्या टप्प्यात भारतीय लोककला आणि आदिवासी संस्कृतीतील प्रतीके आणि प्रतिमांचा-विशेषतः ओम, स्वस्तिक, कमळ, लिंग, साप, हाताचे ठसे यांचा-वापर दिसतो. ही त्यांची उत्स्फूर्त निर्मिती आहे. आदिवासी संस्कृतीत घरांच्या भिंतीवर, देवळांत, भांड्यांवर ज्या पद्धतीने चित्रे काढली जातात, त्याच पद्धतीने त्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चित्रांना स्वामिनाथन् यांनी ‘कलर जिऑमिट्री ऑफ स्पेस’ असे नाव दिले. अमूर्त वाटणाऱ्या या चित्रांत तांत्रिक यंत्राचा प्रभाव दिसतो. गुलाबी, जांभळा, फिक्कट हिरवा, पिवळा असे सुंदर रंग आणि त्यांतून भौमितिक आकार आढळतात. त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या अव्यक्ताच्या खिडक्या असल्याचे ते म्हणतात. चौथ्या टप्प्यात त्यांची चित्रे बदलली. त्यांत रचना, रंग यांबरोबरच पर्वत, पक्षी, झाडे या निसर्गातून घेतलेल्या प्रतिमा दिसतात. ही निसर्गसदृश चित्रे प्रतीकात्मक व रूपकात्मक अशा वास्तवाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांच्या भारतीय लघुचित्रशैलीत कांग्रा चित्रशैलीचा प्रभाव दिसतो. अर्धचंद्र (१९७३), दिक्नृत्य (१९७४), दिक दिगान्त (१९७४), संस्तुती (सान्स्तुती) (१९७४) ही त्यांची या मालिकेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रे आहेत.

स्वामिनाथन् यांनी ३५ च्या वर एकल प्रदर्शने केली. त्यांपैकी दिल्ली, मुंबई व सिमला येथे झालेली प्रदर्शने लक्ष्यवेधी ठरली. त्यांचे शेवटचे मोठे प्रदर्शन १९९३ मध्ये दिल्लीला झाले. त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समूह प्रदर्शनांतून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत. १९६७ ते ७० या काळात त्यांना जवाहरलाल नेहरू छात्रवृत्ती देण्यात आली. ‘द रेलिव्हन्स ऑफ द ट्रॅडिशनल न्यूमेन टू कंटेम्पोररी आर्ट’ या विषयावर त्यांनी संशोधनात्मक प्रबंध लिहिला. मध्य प्रदेशातील ‘रूपकर’ या मध्य प्रदेशातील संग्रहालयाचे ते संचालक होते (१९८१—९०). भोपाळमधील राष्ट्रीय मानव संग्रहालयाचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते.

रंग, अवकाश, आकार आणि रचना यांतून एका अलौकिक अनुभूतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांच्या चित्रांतून प्रतीत होतो. युरोपियन आधुनिक कलावादांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आधुनिक भारतीय कलेला अव्हेरून भारतीय परंपरेतील लघुचित्रकला, तांत्रिक कला, आदिवासी कला यांतून स्फूर्ती घेऊन अभिव्यक्ती करणारे स्वशिक्षित चित्रकार म्हणून त्यांची ओळख होती.

दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

इमारते, माधव