स्टोक्स, सर जॉर्ज गेब्रिएल : (१३ ऑगस्ट १८१९ — १ फेब्रुवारी १९०३). ब्रिटिश भौतिकीविद व गणितज्ञ. श्यान ( दाट ) द्रायू ( द्रव किंवा वायू ) यांच्या वर्तनाच्या अभ्यासासाठी त्यांची ख्याती असून स्टोक्स नियम व स्टोक्स सिद्धांत यांविषयीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. स्टोक्स नियम ⇨ श्यानतेविषयी असून त्यात घन गोलाच्या द्रायूतील गतीचे किंवा हालचालीचे वर्णन केले आहे. स्टोक्स सिद्धांत हा ⇨ सदिश विश्लेषणातील मूलभूत सिद्धांत आहे. तसेच त्यांनी पदार्थातील आकार्यता व प्रेरित कंपने यांवर संशोधन केले. स्टोक्स यांचा जन्म स्क्रीन ( स्लायगो काउन्टी, आयर्लंड ) येथे झाला. १८४१ मध्ये त्यांनी केंब्रिज येथील पेम्ब्रोक कॉलेजातून सीनियर रँग्लर ही पदवी व स्मिथ पारितोषिक मिळविले. १८४९ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठात गणिताचे ल्यूकेशिअन प्राध्यापक झाले. स्टोक्स यांचे द्रायूंची गती व असंपीडनीय ( दाबता येऊ न शकणार्या ) द्रायूंची स्थिर गती यांवरील शोधनिबंध अनुक्रमे १८४२ व १८४३ मध्ये प्रसिद्ध झाले. गतिमान द्रायूंचे घर्षण आणि स्थितिस्थापक घन पदार्थांचे संतुलन व गती यांविषयीच्या त्यांच्या संशोधन कार्यांचे शोधनिबंध १८४५ मध्ये प्रसिद्ध झाले [⟶ द्रायुयामिकी ]. फ्ल्युओरेसेन्स ( अनुस्फुरण ) ही संज्ञा त्यांनी तयार केली व या आविष्काराविषयी संशोधन केले. अनुस्फुरणाचा त्यांनी जंबुपार प्रकाशाच्या अध्ययनात उपयोग केला. साध्या काचेमधून पलीकडे न जाणारा जंबुपार प्रकाश क्वॉर्ट्झ या खनिजातून पलीकडे जातो, असे त्यांनी दाखविले. प्रकाशाच्या तरंगविषयक सिद्धांताचे आणि ज्यातून प्रकाशाच्या तरंगांचा प्रवास होत असावा, असे मानणार्या ईथर या माध्यमाच्या संकल्पनेचे स्टोक्स हे समर्थक होते [⟶ ईथर–२]. ईथरच्या वरवर भासणार्या परस्परविरोधी गुणधर्मांचे स्पष्टीकरण देताना त्यांनी पुढील मत मांडले होते : ईथर पुष्कळ प्रमाणात मेणासारखे वर्तन करते, ते दृढ आहे पण कक्षेत भ्रमण करणार्या ग्रहांकडून लावण्यात येणार्या प्रेरणेसारख्या मंद पण स्थिर प्रेरणेखाली ईथर प्रवाहित होते. शिवाय ग्रह त्यांच्या सोबत घर्षणाद्वारे ईथरचा काही भाग ओढून नेतात.
पृथ्वीचे आकारमान व आकार आणि तिचे गुरुत्वीय क्षेत्र यांच्या अध्ययनाला ⇨ भूगणित म्हणतात आणि स्टोक्स हे भूगणिताचा अभ्यास करणारे सुरुवातीचे महत्त्वाचे संशोधक होते. भूपृष्ठावरील गुरुत्वात होणारा बदल यासंबंधीचा त्यांचा शोधनिबंध १८४९ मध्ये प्रसिद्ध झाला.१८५१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीवर स्टोक्स यांची निवड झाली. १८५४ मध्ये ते या सोसायटीचे सचिव झाले आणि या पदावर ३० वर्षे काम केल्यानंतर सदर सोसायटीचे अध्यक्ष झाले. ल्यूकेशिअन प्राध्यापक तसेच रॉयल सोसायटीचे सचिव व अध्यक्ष ही तीन पदे भूषविणारे स्टोक्स हे सर आयझॅक न्यूटन यांच्यानंतरचे पहिले गृहस्थ होत.
सूर्याच्या बाह्यस्तरांमधील व ठराविक तरंगलांबींचा प्रकाश शोषणार्या अणूंमुळे वर्णपटातील फ्राउनहोफर रेषा निर्माण होत असाव्यात, असे स्टोक्स यांनी १८५४ मध्ये सुचविले होते. तथापि, या शक्यतेचा नंतर त्यांनी पाठपुरावा केला नाही. नंतर जर्मन भौतिकीविद ⇨ गुस्टाफ रोबेर्ट किरखोफ यांनी फ्राउनहोफर रेषांचे आपले स्पष्टीकरण प्रसिद्ध केले तेव्हा स्टोक्स यांचा हा आधी शोध लावल्याचा दावा नाकारण्यात आला. स्टोक्स १८८९ मध्ये बॅरनेट ( बॅरनपेक्षा खालच्या दर्जाचा उमराव व नाइट म्हणजे सर या पदवीपेक्षा श्रेष्ठ पदवी ) झाले.
स्टोक्स यांचे गणित व भौतिकी या विषयांवरील शोधनिबंध पाच खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. यांपैकी पहिल्या तीन खंडांचे संपादन त्यांनी स्वतः केले व ते अनुक्रमे १८८०, १८८३ व १९०१ मध्ये प्रसिद्ध झाले. पुढील दोन खंडांचे संपादन सर जोसफ लार्मॉर यांनी केले. यांशिवाय स्टोक्स यांनी ऑन लाइट (१८८७) व नॅचरल थीऑलॉजी (१८९१) ही पुस्तकेही लिहिली. ⇨ रामन परिणामातील कमी-अधिक कंप्रतेच्या प्रकाश वर्णपट रेषांस अनुक्रमे स्टोक्स व प्रतिस्टोक्स रेषा अशा संज्ञा स्टोक्स यांच्या नावावरून देण्यात आलेल्या आहेत.
स्टोक्स यांचे निधन केंब्रिज ( केंब्रिजशर, इंग्लंड ) येथे झाले.
ठाकूर, अ. ना.