सायमन स्टेव्हाइनस्टेव्हाइन, सायमन : (१५४८—१६२०). फ्लेमिश गणिती व अभियंता. दशांश अपूर्णांकांच्या उपयोगाचे प्रमाणीकरण करण्या-साठी त्यांनी साहाय्य केले. जडवस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक गतीने खाली पडतात, या ॲरिस्टॉटल यांच्या सिद्धांताचे स्टेव्हाइन यांनी खंडन केले.

स्टेव्हाइन यांचा जन्म ब्रुजेस( तेव्हाचे नेदर्लंड्स ) येथे झाला. सुरुवातीला ते ब्रुजेस व अँटवर्प येथे आर्थिक व्यवस्थापनात कार्यरत होते. १५७१—७७ दरम्यान पोलंड, प्रशिया व नॉर्वे या देशांत त्यांनी प्रवास केला. १५८१ मध्ये ते लायडनला स्थायिक झाले व मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन १५८३ मध्ये अध्ययनासाठी विद्यापीठात दाखल झाले. तेव्हाच्या उत्तर नेदर्लंड्सच्या नवीन गणराज्यात आर्थिक व सांस्कृतिक पुनर्जीवनाच्या कार्यामध्ये ते सहभागी झाले. सुरुवातीला त्यांची ओळख अभियंता अशी होती व ते सार्वजनिक बांधकामविषयक कामाचे आयुक्त होते. पुढे १६०४ मध्ये ते राजपुत्र मॉरिस यांच्या अखत्यारीतील सैन्याचे क्वार्टरमास्टर-जनरल झाले. त्याच सुमारास त्यांनी नॅसॉ परगण्याच्या मॉरिस या राजपुत्राला गणित व विज्ञान हे विषय शिकविले. हे खाजगी शिक्षकाचे काम करताना त्यांनी त्याच्यासाठी अनेक पाठ्यपुस्तके लिहिली. संरक्षण व नौकानयन ( मार्गनिर्देशन ) या बाबतींत अनेकदा त्यांचा सल्ला घेतला जाई. त्यांनी लायडन येथे अभियांत्रिकीचे विद्यालय सुरू केले. मॉरिस यांच्या राज्यातील प्रभागांचे ते प्रशासकही होते. स्टेव्हाइन यांनी विशिष्ट भागात पूर आणण्यासाठी सांडव्यांची एक प्रणाली उभारली. सांडव्यांतून पाण्याचा झोत सोडून शत्रूला हुसकावून लावण्याचा त्यांचा यामागे उद्देश होता. ही तेथील महत्त्वपूर्ण संरक्षण-योजना होती. त्यांनी २६ प्रवाशांसाठी वाहन शोधले होते व ते समुद्रकिनार्‍यावर वापरण्यासाठी त्याला शिडे लावली होती.

स्टेव्हाइन यांनी गणित, यामिकी, ज्योतिषशास्त्र, मार्गनिर्देशन, युद्धशास्त्र, अभियांत्रिकी, संगीतशास्त्र, युक्तिवादशास्त्र, जमाखर्च, भूगोल, वास्तुशास्त्र इ. विविध विषयांवर लेखन केले. यांशिवाय त्यांनी सु. १६०० सालाच्या काळातील वैज्ञानिक विषयांचा आढावा घेणारे लेखनही केले. या लेखनात त्या त्या विषयाचे सुबोध व पद्धतशीर विवेचनही त्यांनी केले. डच भाषेत अशा नवीन संकल्पना मांडण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखविले होते. त्यांनी व समकालीन वैज्ञानिकांनी डच भाषेत तयार केलेली वैज्ञानिक परिभाषा नंतरही वापरात राहिली आहे.

स्टेव्हाइन यांचे पहिले पुस्तक Tafelen Van Interest (१५८२) हे असून त्यात सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांचे नियम विशद केले आहेत. वस्तूंच्या किमतीवर मिळणारी सूट व वर्षासन यांचे हिशोब करताना जलदपणे आकडेमोड करण्यासाठी उपयुक्त असलेली कोष्टके या पुस्तकात दिली आहेत. पूर्वी बँकांनी गुप्त राखलेली ही कोष्टके या पुस्तकामुळे सार्वजनिक रीत्या वापरली जाऊ लागली. १५८३ मध्ये त्यांनी पूर्णपणे भूमितीशी निगडित असलेले Problemata Geometrica हे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर यूक्लिड व आर्किमिडीज यांचा प्रभाव असल्याचे जाणवते.

स्टेव्हाइन यांचे L’Arithmetique हे पुस्तक व De Thiende (‘ द टेन्थ ’ म्हणजे दहावा ) ही २९ पानांची पुस्तिका १५८५ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांनी या पुस्तकात अंकगणित व बीजगणित यांची माहिती दिली आहे. अंकगणित व बीजगणित यांतील संकल्पना आणि भूमितीमधील संबंधित समतुल्य संकल्पना यांच्यातील सारखेपणा त्यांनी या पुस्तकात दाखवून दिला आहे. सदर पुस्तिकेत त्यांनी दशांश अपूर्णांकांचा प्राथमिक स्वरूपाचा ( तत्त्वविषयक ) व पूर्ण आढावा घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील वापर विशद केला आहे. या पुस्तिकेच्या शेवटच्या भागात त्यांनी दशांश पद्धतीची नाणे पद्धती ( चलन ), वजने, मापे, वर्तुळाच्या चापाचे विभाग यांचा सार्वत्रिक वापरही थोड्याच काळात होणारी गोष्ट आहे असे घोषित केले होते. १५८५ मध्ये त्यांनी याच विषयावरील La Disme ( दशमान, डेसिमल ) हे पुस्तक लिहिले.

De Beghinselen der Weeghconst (१५८६, स्थितिकी व जलस्थितिकी ) या पुस्तकात स्टेव्हाइन यांनी प्रेरणांच्या त्रिकोणाचे प्रमेय प्रसिद्ध केले. या प्रेरणांच्या त्रिकोणांची माहिती प्रेरणांच्या समांतरभुज चौकोनी आकृतीशी समतुल्य आहे. यामुळे पूर्वी तरफेच्या सिद्धांतावर आधारलेल्या स्थितिकीच्या अभ्यासाला नवीन जोरदार प्रेरणा मिळाली. गॅलिलिओ यांनी लावलेल्या शोधांच्या पन्नास वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. मात्र, यात तरफेविषयीची उपपत्ती, ⇨ उतरणीविषयीची प्रमेये, गुरुत्वमध्य काढण्याची पद्धत यांचीही माहिती आलेली आहे. उतरणीविषयीचा स्टेव्हाइन यांचा नियम हे त्यांचे सर्वांत प्रसिद्ध संशोधन आहे. De Beghinselen des Waterwichts या त्यांच्या पुस्तकात जलस्थितिकी या विषयाचा ऊहापोह केला असून त्यात स्टेव्हाइन यांनी आर्किमिडीज यांच्या विस्थापनाच्या तत्त्वाचे सोपे व सहज समजेल असे स्पष्टीकरण दिले आहे. द्रवाचा खालच्या दिशेतील दाब तो ज्या पात्रात साठविला आहे त्या पात्राच्या आकारावर अवलंबून नसतो तर तो फक्त द्रवाची उंची व आधारतळ यांच्यावर अवलंबून असतो हाही शोध स्टेव्हाइन यांनी लावला.

स्टेव्हाइन यांनी १५८६ मध्ये आपल्या एका प्रयोगाचा अहवाल प्रसिद्ध केला. या प्रयोगात त्यांनी शिशाचे भिन्न वजनांचे दोन गोळे ३० फूट उंचीवरून जमिनीवर टाकले. एक गोळा दुसर्‍यापेक्षा दहापट वजनाचा होता व हे दोन्ही गोळे एकाच वेळी जमिनीवर पडले, असे त्यांनी अहवालात म्हटले होते. या अहवालाकडे इतरांचे जवळजवळ दुर्लक्षच झाले. तथापि, हा प्रयोग त्यांनी गॅलिलिओ यांच्या गुरुत्वाविषयीचा पहिला विवेचक ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी तीन वर्षे आधी आणि गॅलिलिओ यांच्या खाली पडणार्‍या वस्तूंविषयीच्या सैद्धांतिक संशोधनाच्या अठरा वर्षे आधी केला होता.

De Hemelloop (१६०८) या स्टेव्हाइन यांच्या पुस्तकात कोपर्निकस यांच्या ग्रहांच्या गतीविषयीच्या पद्धतीला दुजोरा दिला होता. गॅलिलिओ यांच्या कित्येक वर्षे आधी म्हणजे ज्या काळात कोपर्निकस पद्धतीचा पाठपुरावा करण्याचे धाडस अगदी थोड्याच शास्त्रज्ञांनी केले होते, त्या काळात स्टेव्हाइन यांनी कोपर्निकस पद्धतीला पाठिंबा दिला होता.

डच गणराज्य समुद्रपर्यटनाशी संबंधित देश असल्याने नौकानयन हा त्या देशाचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे स्टेव्हाइन यांनी नौका-नयनावर De Havenvinding आणि Van de Zeijlstreken ही दोन महत्त्वाची पुस्तके लिहिली होती.

De Stercten Bouwing आणि De Legermeting ही स्टेव्हाइन यांची युद्धशास्त्रावरील पुस्तके आहेत. त्यांच्यामध्ये त्यांनी तटबंदी, सैन्याचे तळ उभारणे, रसद पुरवठा, सैन्याच्या निवासाची सोय, युद्धभूमीवरील सैन्याची रचना ( व्यूह ) वगैरे गोष्टींची चर्चा केली आहे.

स्टेव्हाइन यांनी संगीतशास्त्रावरचे Van de Spiegeling der Sing-cost हे आणि नागरी जीवनावरचे Het Burgherlick हे पुस्तक लिहिले आहे. यांपैकी दुसर्‍या पुस्तकात नागरी जीवनात क्षोभ वा खळबळ निर्माण झाल्यास कसे वागावे हे सांगितले आहे. त्यांच्या देशाला बंडाळीतून स्वातंत्र्यप्राप्ती झाली होती, म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे ठरले.

त्यांनी १६०५-०८ या काळात गणितातील कार्य Wisconstighe Ghedachtenissen नावाच्या दोन खंडांच्या ग्रंथात एकत्रित करून प्रसिद्ध केले. या ग्रंथाचे लगेच फ्रेंच व लॅटिन भाषांत अनुवादही झाले.

स्टेव्हाइन यांच्या लेखनातून त्यांची बहुश्रुतता व विचारांतील स्पष्टता सहज लक्षात येते. त्यांच्या लिखाणात उपपत्ती व उपयोजन यांचे सुंदर मिश्रण झालेले आढळते. त्यांचे समग्र लेखन The Principle Works of Simon Stevine या शीर्षकाने पाच खंडांत प्रसिद्ध झाले आहे.

स्टेव्हाइन यांचे निधन हेग ( नेदर्लंड्स ) येथे झाले.

ओक, स. ज. टिकेकर, व. ग.