स्टीव्हन, सर लेस्ली : (२८ नोव्हेंबर १८३२—२२ फेब्रुवारी १९०४). इंग्रज समीक्षक, चरित्रकार आणि निबंधकार. जन्म लंडन शहरी एका सुशिक्षित कुटुंबात. शिक्षण ईटन, ‘ किंग्ज कॉलेज ’, लंडन आणि ‘ ट्रिनिटी हॉल ’, केंब्रिज येथे. १८५५ मध्ये ‘ ट्रिनिटी हॉल ’ चा तो अधिछात्र ( फेलो ) म्हणून निवडला गेला. त्यामुळे त्याला अँग्लिकन चर्चच्या धर्माधिकाराची दीक्षा देण्यात आली आणि डीकन ह्या पदावर त्याला नेमले गेले. १८५९ मध्ये तो प्रीस्ट झाला परंतुत्यानंतर ⇨ जॉन स्ट्यूअर्ट मिल, ⇨ हर्बर्ट स्पेन्सर, ⇨ चार्ल्स डार्विन ह्यांच्या प्रभावातून त्याची धर्मश्रद्धा डळमळीत झाली आणि तो अज्ञेयवादी बनला. १८६४ मध्ये तो लंडनला आला आणि वाङ्मयीन क्षेत्राला त्याने वाहून घेतले. प्रीस्ट या पदाचा त्याने त्याग केला ( सु. १८७०).
लंडनमध्ये लेस्लीचा वाङ्मयीन जगातील प्रवेश त्याचा भाऊ जेम्स फिट्झजेम्स स्टीव्हन ह्याच्यामार्फत झाला. जेम्स द सॅटरडे रिव्ह्यू ह्या साप्ताहिकात लेखन करीत असे. लेस्लीनेही अनेक नियतकालिकांत लेखन केले. १८७१ मध्ये प्रसिद्ध ब्रिटिश प्रकाशक जॉर्ज स्मिथ ह्याने त्याच्या कॉर्नहिल मॅग्झीन ह्या वाङ्मयीन मासिकाचा संपादक होण्याची विनंती लेस्लीला केली. लेस्लीने ह्या मासिकातून बरेच समीक्षात्मक लेखन केले आणि ते पुढे अवर्स इन ए लायब्ररी ह्या नावाने संकलित केले गेले ( तीन भाग —१८७४, १८७६, १८७९ ). ह्या मासिकाच्या संपादकपदी तो अकरा वर्षे होता. त्याच्या संपादकीय कारकीर्दीत त्याने ⇨ टॉमस हार्डी, ⇨ रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन, ⇨ एडमंड गॉस, ⇨ हेन्री जेम्स ह्यांसारख्या साहित्यिकांना लिहिण्यासाठी उत्तेजन दिले.
लेस्लीचा सर्वांत व्यासंगपूर्ण ग्रंथ म्हणजे हिस्टरी ऑफ इंग्लिश थॉट इन द एटीन्थ सेंचरी (१८७६). द इंग्लिश यूटिलिटेरिअन्स (१९००) हा त्याचा तत्त्वज्ञानीय ग्रंथ. यामध्ये त्याने अठराव्या शतकात देववादाच्या विवादातील प्रमुख लेखकांच्या भूमिकांचा आढावा घेतलेला आहे. देववाद हा एक नैसर्गिक धर्म म्हणून सतराव्या–अठराव्या शतकांत उदयाला आला. लेखकांचा एक गट ह्या धर्माशी संबंधित होता. देववादाची भूमिका एकेश्वरी असून त्याच्या अनुयायांना साक्षात्कार, चमत्कार मान्य नव्हते. त्यांचा आचार नैसर्गिक विवेकावर आधारलेला होता. तत्त्वज्ञानातील उपयुक्ततावादाचाही परामर्श त्याने घेतला. द इंग्लिश … मध्ये त्याने हाच विषय स्वतंत्र ग्रंथरूपाने हाताळला आहे. सायन्स ऑफ एथिक्स (१८८२) ह्या आपल्या ग्रंथात त्याने क्रमविकासवाद आणि नीतिशास्त्र ह्यांचा मिलाफ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे; तथापि त्याचे विशेष संस्मरणीय काम म्हणजे डिक्शनरी ऑफ नॅशनल बायॉग्रफी (६६ खंड, १८८५—१९००). १९०० सालापर्यंतच्या राष्ट्रीय नामवंतांची चरित्रे त्यात अंतर्भूत आहेत. १८८२ मध्ये आरंभिलेल्या ह्या चरित्रकोशाचा लेस्ली हा पहिला संपादक. १८९१ पर्यंत तो त्या पदावर होता. ह्या चरित्रकोशाचे पहिले २६ खंड त्याने संपादिले आणि त्यांतील ३७८ चरित्रांचे लेखन केले. त्याच्या ह्या राष्ट्रीय सेवेसाठी त्याला ‘ नाइट कमांडर ऑफ द बाथ ’ हा किताब देण्यात आला (१९०२). इतरही काही मानसन्मान त्याला मिळाले. इंग्लिश लिटरेचर अँड सोसायटी इन द एटीन्थ सेंचरी (१९०४) हा त्याचा ग्रंथ समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून त्याने लिहिला आहे. लेस्ली हा चांगला गिर्यारोहक होता. त्याच्या गिर्यारोहणाचे अनुभव त्याने द प्ले ग्राउंड ऑफ यूरोप (१८७१) ह्या पुस्तकात वर्णिले आहेत.
विख्यात इंग्रजी कादंबरीकार ⇨ विल्यम मेकपीस थॅकरी (१८११—६३) ह्याची धाकटी कन्या हॅरिएट मेरिअन हिच्याशी त्याचा पहिला विवाह झाला होता. तिच्या निधनानंतर ज्युलिआ जॅक्सन हिच्याशी त्याने विवाह केला. विख्यात कादंबरीकर्त्री ⇨ व्हर्जिनिया वुल्फ (१८८२—१९४१) ही त्याची कन्या होय.
लंडन येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.