स्टिग्लिट्झ, जोसेफ : (९ फेब्रुवारी १९४३). एक ख्यातकीर्त अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी (२००१). हा मान त्याला जॉर्ज अकेरलॉफ व ⇨ ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स यांच्यासोबत प्राप्त झाला. त्याचा जन्म अमेरिकेतील गॅरी ( इंडियाना ) शहरात झाला. त्याने ॲमहर्स्ट कॉलेजमधून बी.ए. ही पदवी प्राप्त केली (१९६४). मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत (१९६६-६७) पीएच्.डी. घेतल्यानंतर त्याने येल, स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, कोलंबिया या विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. ⇨ जॉन मेनार्ड केन्स या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञाचा प्रभाव त्याच्या संशोधन-लेखनावर आढळतो.
स्टिग्लिट्झचे सूक्ष्म अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, माहिती अर्थशास्त्र हे अभ्यास व संशोधनाचे विषय होत. त्याचे अर्थशास्त्रातील महत्त्वाचे योगदान ( संशोधन ) म्हणजे माहिती विजालन ( स्क्रिनिंग ) तंत्र होय, की ज्याच्या साहाय्याने अर्थव्यवस्थे-तील एक घटक दुसर्या घटकाची गोपनीय माहिती प्राप्त करू शकतो. तत्पूर्वी नवमतवादी अर्थतज्ज्ञ ( काही अपवाद वगळता ) अर्थव्यवस्थेत बाजारपेठा मूलतःच कार्यक्षम असतात, असे गृहीत धरत परंतु स्टिग्लिट्झ व त्याच्या सहकार्यांनी आपल्या माहिती विजालन तंत्राच्या आधारे वरील गृहीतक खोटे ठरवून बाजारपेठा केवळ अपवादात्मक परिस्थितीतच कार्यक्षमपणे काम करतात, हे सप्रमाण सिद्ध केले. स्टिग्लिट्झच्या मतानुसार व्यक्तींच्या बाजारपेठांतील वर्तनाचा इतरांवर परिणाम करणार्या बाह्यशक्ती कार्यरत असतात. त्यामुळे तत्सम बाजारपेठांचे कार्य व्यवस्थित होत नाही. अर्थव्यवस्थेची संरचना अगर ढाचा समजावून घेण्यासाठी संबंधित माहितीची नितांत आवश्यकता असून माहितीच्या अभावामुळे ( समस्यांमुळे ) केवळ बाजारपेठांचेच नव्हे, तर राजकीय अर्थव्यवस्थेचेही आकलन शक्य होत नाही. अपूर्ण व चुकीच्या माहितीचे परिणाम आर्थिक आणि राजकीय प्रक्रियेमध्येही जाणवतात. कर्मचार्यांना दिले जाणारे उचित ( वाजवी ) वेतन व बेरोजगारी यांबाबतही त्याने व्यापक संशोधन केले. स्टिग्लिट्झने भूषविलेली पदे तसेच त्याला मिळालेले सन्मान पुढीलप्रमाणे : जॉन बेटस् क्लार्क मेडल (१९७९), अमेरिकन काउन्सिल ऑफ ॲड्व्हायझर्सचे भूतपूर्व सल्लागार सदस्य व अध्यक्ष (१९९३ —९७), जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख अर्थतज्ज्ञ (१९९७ — २०००), विद्यमान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे आर्थिक धोरण-संदर्भातील सल्लागार-टीकाकार (२०१३). संयुक्त राष्ट्रांच्याआमसभेच्या अध्यक्षांनी तेव्हाच्या जागतिक पातळीवरील आर्थिक संकटाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त केलेल्या आयोगाचा तो अध्यक्ष होता (२००८). आंतरराष्ट्रीय अर्थ संघटनेचे अध्यक्षपद २०११ पासून त्याच्याकडे आहे. तसेच मँचेस्टर विद्यापीठाच्या ब्रुक्सवर्ड पॉव्हर्टी इन्स्टिट्यूट आणि सोशॅलिस्ट इंटरनॅशनल कमिशन ऑन ग्लोबल फायनान्शियल इश्यूजचा तो अध्यक्ष आहे. त्याला अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट व अधिष्ठातापदे दिली आहेत. २०११ मध्ये टाइम मासिकाने जगातील पहिल्या शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये, तर फॉरेन पॉलिसी मासिकाने जागतिक विचारवंतांत त्याचा अंतर्भाव केला.
स्टिग्लिट्झ याची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : इकॉनॉमिक रोल ऑफ द स्टेट (१९८९), विदर सोशॅलिझम (१९९६), इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक सेक्टर (२०००), टूवर्डस् अ न्यू पॅरडाइम द मॉनेटरी इकॉनॉमिक्स (२००३), ग्लोबलाय्झेशन अँड इटस् डिस्कन्टेन्ट (२००३), रोअरिंग नाइन्टीज (२००४), प्रिन्सिपल्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स (२००६), इकॉनॉमिक्स (२००६), मेकिंग ग्लोबलाय्झेशन वर्क (२००७), फ्रिफॉल : अमेरिका, फ्री मार्केटस् अँड सिंकिंग ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी (२०१०), प्राइस ऑफ इन्इक्वालिटी (२०१३).
चौधरी, जयवंत
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..