सेनापति, फकीरमोहन : (१३ जानेवारी १८४३-१४ जून १९१८). प्रसिद्ध ओडिया लेखक व आद्य कादंबरीकार. आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्र व र्त कां पै की एकप्रवर्तक. फकीरमोहन सेनापती, ⇨ राधानाथ राय व ⇨ मधुसूदन राव ही आधुनिक ओडिया साहित्याचे प्रवर्तन करणारी श्रेष्ठ त्रयी म्हणून ओळखली जाते. ह्या त्रयीचे फकीरमोहन हे नेते होते. बलसोड श ह रा न जी क मल्लिकाशपूर या गावी एका क्षत्रियकुटुंबात फकीरमोहन यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव लक्ष्मण चरण व आई तुलसी देवी. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील निवर्तले आणि आपल्या काकांच्या घरी ते जहाजांच्या डोलकाठ्या तयार करण्याचे काम करू लागले. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना केवळ प्राथमिक शिक्षण घेता आले तथापि संस्कृत, इंग्रजी व अन्य पाच प्रादेशिक भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यांच्या अंगी उपजत नेतृत्वगुण होते. त्या बळावर बलसोडमधील इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी त्यांना प्रथम मिळाली. ओडियामधील पहिल्या वाङ्मयपत्रिकेचे व वृत्तपत्राचे प्रकाशन त्यांनी बलसोडहून सुरू केले. बंगाली भाषेऐवजी ओडिया भाषा ही शिक्षणाचे व न्यायदानाचे माध्यम व्हावे, म्हणून जी चळवळ सुरू झाली, तिचे नेतृत्व त्यांनी केले. शाळांकरिता त्यांनी क्रमिक पाठ्यपुस्तके लिहिली. बलसोड येथे कीर्तीच्या शिखरावर असतानाच त्यांना संस्थानांत अनेक प्रशासकीय स्वरूपाची कामे देण्यात आली. सु. वीस वर्षे अनेक संस्थानाधिपतींचे दिवाण म्हणून त्यांनी काम केले. प्रशासकीय कामाच्या या व्यापातून सवड काढून त्यांनी महाभारत, रामायण, उपनिषदे व बौद्ध साहित्यातील काही भागांचा ओडियात अनुवाद केला. बामंदा येथील विद्वत् परिषदेने त्यांना ‘व्यास कवी’ ही पदवी दिली. वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांनी जीवनातील समृद्ध अनुभवांचा उपयोग करून कथा-कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. खेड्यातील सामान्य लोकांबद्दल त्यांना गाढ सहानुभूती वाटे. साध्यासुध्या निर्व्याज दृष्टीने जीवनाकडे बघण्याच्या ग्रामजनांच्या वृत्तीत व साध्या राहणीत त्यांना आपल्या आंतरिक शक्तिस्रोताचा उगम गवसला. फकीरमोहन हे ओडिया गद्याचे आद्य जनक मानले जातात. त्यांनी ओडिया गद्याचा व ओडिया कादंबरी लेखनाचा पाया रचला. फकीरमोहनांच्या पूर्वी ओडिया गद्य हे संस्कृतचे किंवा इंग्रजीचे केवळ अनुकरण असे परंतु त्यांनी ओडिया गद्याला त्याचा स्वाभाविक आकार दिला. जनसामान्यांच्या बोली भाषेतील म्हणी व वाक्प्रचार यांचा समर्पक वापर त्यांनी केला. त्यांचे जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण व वास्तववादी वृत्ती त्यांच्या साहित्यातून प्रतीत होत असली, तरी त्यांची ध्येयवादी मूलप्रवृत्तीही त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होते. केवळ स्वत:च्या आत्म्याला आध्यात्मिक शांती लाभावी एवढीच त्यांची मर्यादित इच्छा नव्हती, तर सर्वधर्मसमन्वयाच्या तत्त्वाद्वारे सर्वांनाच शांती लाभावी अशी त्यांची व्यापक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक उत्कृष्ट उद्यान तयार केले व त्याला ‘शांतिकानन’ असे नाव दिले. त्या उद्यानात त्यांनी ‘सर्वधर्मसमन्वय’ नावाचा एक स्तंभ उभारला व त्यावर भगवद्गीतेतील वचने, तसेच गौतम बुद्ध, चैतन्य प्रभू, गुरू नानकदेव, येशू ख्रिस्त व प्रेषित मुहंमद यांची पवित्र वचने कोरली. आत्मजीवन चरित हे त्यांचे आत्मचरित्र हा ओडिया साहित्याचा एक अमोल ठेवा मानला जातो. आधी ते त्रुटित व खंडश: स्वरूपात निरनिराळ्या मासिकपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या त्यांच्या मुलाने ते नंतर संकलित व संपादित केले.
फकीरमोहन हे ओडिया कादंबरीचे जनक मानले जातात. छमाण आठ-गुंठ, लच्छमा व प्रायश्चित्त या त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या. हिंदी साहित्यात प्रेमचंद यांच्या गोदाम या कादंबरीला जे स्थान आहे, तसेच चिरंतन स्थान ओडिया साहित्यात फकीरमोहनांच्या छमाण आठ-गुंठ या कादंबरीला लाभले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ओडिया समाजजीवनातील उपेक्षित, पीडित व शोषित जनांच्या दु:खदैन्याला, समस्यांना त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून वाचा फोडली. सर्वसामान्यांच्या बोली भाषेचा वापर केल्याने ते वास्तवदर्शी झाले व सामान्यजनांना आपलेसे वाटले. त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रे त्यांना जवळची वाटली व त्यांच्याशी ते एकरूप झाले. आधुनिक ओडिया कथावाङ्मयातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी केवळ २०-२५ कथा लिहून लघुकथा-लेखनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नंतरच्या अनेक कथाकारांनी त्यांचे अनुकरण केले.
ओडिशातील जनसामान्यांची फकीरमोहन यांच्यावर श्रध्दा आहे. त्यांची स्मृती पवित्र मानली जाते. बलसोड येथील शासकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ त्यांच्या ‘शांतिकानन’ या उद्यानाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे तसेच बलसोड येथील फकीरमोहन साहित्य परिषद विद्वत्सभा म्हणून काम करीत आहे. फकीरमोहन यांचे समग्र साहित्य अनेक खंडांत प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पहा : ओडिया साहित्य (कादंबरी).
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)
“