स्वाझी : बांतू भाषासमूहातील स्वाती ( सिस्वाती ) बोली बोलणारी स्वाझीलँडमधील एक जमात. त्यांची पूर्व ट्रान्सव्हाल ( दक्षिण आफ्रिका) प्रांतातही वस्ती आढळते. ही जमात निग्रोइड कुलीन असून ते बुशमन व काडकॅसोइड जमातींचे मिश्रवंशीय आहेत. कृष्णवर्णीय स्वाझी मध्यम अथवा ठेंगणे असून ते बाणेदार व देखणे आहेत. हे लोक आतिथ्यशील आहेत. त्यांचा शेती, शिकार, पशुपालन हे पारंपरिक व्यवसाय असून ते शेतात मका, ज्वारी व बाजरी ही मुख्य पिके घेतात. अलीकडे त्यांतील काही सुशिक्षित नोकर्या करू लागले असून व्यवसायांतही गुंतले आहेत.
पंधराव्या शतकात स्वाझी लोक दक्षिणेकडील लिम्पोपो नदी ओलांडून टोगोलँड ( विद्यमान मोझँबीक ) येथे सु. २०० वर्षे वास्तव्यास होते. तेथून ते झूलूंच्या दबावामुळे पाँग्गोला नदीच्या उत्तरेस एन्ड्वांड्वे लोकांच्या वस्तीजवळ स्थायिक झाले. कालांतराने जमिनीच्या कमतरतेमुळे आर्थिक दबाव निर्माण होऊन या दोन गटांत लढाई झाली आणि स्वाझी लोक मागे हटले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकामध्ये स्वाझींना झूलू राजाच्या अमलात राहावे लागले. त्यामुळे दलमिनी वंशातील राजा सोबूझा याच्या नेतृत्वाखाली स्वाझी लोक बोअर लोकांच्या ( डच ) सहकार्याने झूलूंशी लढले व त्यात त्यांनी यश मिळविले. विजयानंतर स्वाझींचा राजा सोबूझा याच्याच नेतृत्वाखाली एन्गुनी व सोथो भाषिक जमातींसह संमिश्र राज्याची त्यांनी निर्मिती केली दुसर्या सोभूजा (१८९९—१९८२) राजाच्या अमदानीत स्वाझीलँडची निर्मिती झाली (१९६८).
बहुसंख्य स्वाझी परंपरागत धर्माचे आचरण करतात तथापि काही लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांची मूळची श्रेष्ठ देवता ‘ म्खुलुम्नंमचंडी ’ असून ती जमातीचे आरोग्य, संरक्षण आणि कल्याण करते, असा त्यांच्यात समज आहे. तिचा मोठा उत्सव असतो. शिवाय ‘ नेवाला ’ हा राजसभेचा समारंभही मोठा असतो. त्यांच्या परंपरागत संस्कृतीनुसार राजकीय, आर्थिक आणि वांशिक आचरणाची वाटणी आनुवंशिकतेने पुरुष अधिपती आणि त्याची आई किंवा आईव्यतिरिक्त दुसरा यांच्यामध्ये होते. स्वाझी लोक गुराढोरांना वरदान मानून त्यांच्या कळपांचा आदर करतात. स्वाझी परंपरेनुसार त्यांचा अन्नासाठी कधीच जीव घेत नाहीत परंतु काही स्वाझी पैशांसाठी त्यांची विक्री करतात किंवा धार्मिक समारंभात त्यांचा बळी देतात. बहुधा स्वाझी पुरुष व मुले गुराढोरांची राखण करतात.
स्वाझी जमातीत संयुक्त कुटुंबपद्धती रूढ असून त्यामध्ये आई-वडील, लग्न न झालेली मुलेमुली आणि लग्न झालेली मुले व त्यांचे कुटुंबीय इ. एकाच ठिकाणी, परंतु प्रत्येक कुटुंब ( लग्न झालेल्या मुलांचे व वडिलांचे ) वेगवेगळ्या घरांत राहते. पूर्वी हे लोक छोट्या वर्तुळाकृती झोपड्या बांधून राहत असत. त्यांशेजारी गुरांचा गोठा असे परंतु विद्यमान परिस्थितीत बरेच सधन स्वाझी पाश्चिमात्य पद्धतीची घरे बांधून राहू लागले आहेत.
स्वाझींत बहुपतिपत्नीत्वाची चाल असून राजाच्या भार्या आणि मुले विविध खेड्यांतून राजनीतीनुसार विभागलेली होती. राष्ट्रीय दर्जाचे अधिकारी विशिष्ट कुळींतून निवडलेले असून स्थानिक व केंद्रीय प्रशासनात उमराव-शाहीचा सत्तासमतोल साधला आहे. लिकोकोनामक मध्यवर्ती खासगी मंडळ महत्त्वाच्या प्रश्नावर विचारविनिमय करीत असे, तर राष्ट्रीय मंडळात राजासह काही प्रमुख सरदार मंडळी असत. स्वाझी जमातीत लग्नविधी साधारणतः उन्हाळ्यात ( जून ते ऑगस्ट ) पार पाडला जातो. तो विधी मुख्यतः तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी वधू व तिचे नातेवाईक लग्नठिकाणी येतात. दुसर्या व तिसर्या दिवशी लग्नविधी पार पडतो. शेवटच्या दिवशी वराच्या कुटुंबाकडून वधूच्या कुटुंबाला काही गुरेढोरे दिली जातात त्यानंतरच त्या लग्नाला समाजात कायदेशीर मान्यता मिळते. हे लोक लग्नाला ‘ अमत्सीम्बा ’ असे म्हणतात. या जमातीत बायकोच्या धाकट्या बहिणीशी तसेच मृत भावाच्या बायकोशी लग्न करण्याची पद्धत आहे.
पूर्वी परंपरेनुसार स्वाझी लोक प्राण्यांची कातडी किंवा पांढर्या रंगाचे कपडे परिधान करीत. तसेच ते सुंदर मण्यांनी तयार केलेला सुशोभित दागिना घालीत परंतु सांप्रत स्वाझी लोक पाश्चिमात्य प्रकारचे कपडे वापरतात. यांच्या सांस्कृतिक जीवनात पारंपरिक संगीत व नृत्याला विशेष महत्त्व आहे. हे लोक भिन्न रंगांची मृत्पात्रे बनविण्यात व कोरीव कामात फार हुशार आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्यावर पाश्चात्त्यांच्या राहणीमानाचा व शिक्षणाचा प्रभाव पडला. अलीकडे अनेक लोक शहरांत स्थायिक झाले असून ते सरकारी खाती, कारखाने, कार्यालये आणि दुकाने यांत काम करीत आहेत. प्रौढ शिक्षणावर शासनाने भर दिला असला, तरी ६०% लोक अद्यापि निरक्षर आहेत.
भागवत, दुर्गा
“