स्वरसप्तक : (म्यूझिकल स्केल्स). ठराविक स्वरांचा चढता (आरोही) किंवा उतरता (अवरोही) क्रम म्हणजे ‘ स्वरसप्तक ’. स्वर म्हणजे एका ठराविक स्थिर कंपनसंख्येचा ध्वनी. भारतीय संगीतात षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नी) असे सात मूळ स्वर (सप्तक) मानले गेले आहेत. पाश्चात्त्य संगीतातही डो, रे, मी, फा, सो, ला, सी (C, D, E, F, G, A, B) असे सात स्वर आहेत. कोणतेही सप्तक व्यक्त करीत असताना ते ज्या स्वरापासून सुरू होते, त्याच स्वरावर (पुढच्या सप्तकाच्या पहिल्या स्वरावर) जाऊन थांबते. उदा., सा-रे-ग-म-प-ध–नी-सा. म्हणजे असे एकूण आठ स्वर होतात. पाश्चात्त्य संगीतात या क्रमास ‘ ऑटिव्ह ’ (आठ) अशी संज्ञा दिली आहे. असे असले, तरी जेव्हा सात किंवा त्यांपेक्षा कमी किंवा अधिक स्वरांचा विचार होतो, तेव्हा सप्तक या शब्दाचा अर्थ फक्त सात स्वरांचा समूह असा मर्यादित न घेता एखाद्या संगीतरचनेत येणारे आरोही किंवा अवरोही सर्व स्वर असा व्यापक अर्थाने येथे घेतला आहे.

हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे : षड्ज (सा), कोमल ऋषभ (रे), शुद्ध ऋषभ (रे), कोमल गांधार (ग), शुद्ध गांधार (ग), शुद्ध मध्यम (म), तीव्र मध्यम (म), पंचम (प), कोमल धैवत (ध), शुद्ध धैवत (ध), कोमल निषाद (नी), शुद्ध निषाद (नी) आणि षड्ज (सा) पुढील सप्तकातील. [⟶ संगीत, हिंदुस्थानी ].

कर्नाटक संगीत पद्धतीत मात्र मुख्य स्वर तेच असले, तरी षड्ज आणि पंचम हे दोन अचल स्वर वगळता चल स्वर ( शुद्ध/तीव्र ) अधिक रूपांत अभिव्यक्त होतात. या पद्धतीतील पायाभूत स्वरसप्तक पुढीलप्रमाणे : षड्जम् (सा), शुद्ध ऋषभम् (रे), चतुःश्रुती ऋषभम्  (रे), शुद्ध गांधारम् (ग), शुद्ध मध्यमम् (म), प्रति मध्यमम् (म), पंचमम् (प), शुद्ध धैवतम् (ध), कोमल निषाद (नी), शुद्ध निषाद (नी), षड्ज (सा), चतुःश्रुती धैवतम् (ध), कैसिका निषादम् (नी), काकली निषादम् (नी) आणि षड्जम् (सा) पुढील सप्तकातील. [⟶ संगीत, कर्नाटक].

भारतीय संगीतात सप्तस्वरांचा संबंध निसर्गातील ध्वनींशी जोडला आहे. जसे षड्ज — मोराचा आवाज ऋषभ — चातक पक्ष्याचा आपल्या जोडीदाराला साद घालण्याचा आवाज गांधार — शेळीच्या ओरडण्याचा आवाज मध्यम — करकोच्याचा आवाज पंचम — कोकिळेची कुऽ हुऽ धैवत — घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज निषाद — हत्तीचे ओरडणे.

पाश्चिमात्य संगीतातील स्वरसप्तके : पाश्चिमात्य संगीतात मुख्यत्वे दोन प्रकारची स्वरसप्तके मानली आहेत :

(१) डायटोनिक स्केल : या सप्तकात सात स्वरांचा समावेश असतो आणि आठवा स्वर—अर्थात पुढचा पहिलाच स्वर—एक पट्टी (स्केल) वरच्या दर्जाचा असतो. या सप्तकांची नावे ते सप्तक ज्या स्वरापासून सुरू होते त्यानुसार दिली गेली आहेत. उदा., C शार्प स्केल म्हणजे त्या (C शार्प) स्वराला आरंभ मानून (भारतीय परिभाषेत षड्ज) पूर्ण केलेले सप्तक.

(२) क्रोमाटिक स्केल : या सप्तकात सर्व बारा स्वरांचा समावेश असतो. आपण पियानो हे वाद्य डोळ्यांसमोर आणल्यास त्यावरील कोणत्याही स्वरापासून सुरुवात करून काळ्या आणि पांढर्‍या स्वरांच्या सर्व पट्ट्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दाबल्यास निर्माण होणारा स्वरसमूह.

भारतीय संगीतात एखाद्या स्वरसप्तकाचा पहिला स्वर म्हणजे षड्ज असतो. षड् म्हणजे संस्कृत भाषेत सहा. मूळ स्वरापासून सप्तकातील पुढील स्वर जन्म घेतात, म्हणून त्या स्वराला षड्ज असे म्हटले आहे. पाश्चिमात्य संगीतातही स्वरसप्तकाच्या बाबतीत हीच कल्पना आहे. यात स्वरसप्तके एका पूर्ण स्वराच्या अंतराने किंवा अर्ध्या स्वराच्या अंतराने व्यक्त होतात. या संगीतप्रकारात C हा प्रतिसेकंद २४० कंपने देणारा स्वर आधारभूत मानला गेला आहे. पूर्वीच्या काळी भारतीय संगीतात असे प्रमाणीकरण झाले नव्हते. असे म्हणतात की, भारतीय संगीतातील मूळ सप्तक तीन स्वरांचेच होते. त्यानंतर ते सात स्वरांमध्ये विकसित झाले. पुढे दोन स्वरांमधील सूक्ष्म स्वर (श्रुती) विकसित झाले आणि ते स्केल बावीस श्रुतींमध्ये विभागले गेले. अनेक भारतीय संगीतकारांनी सप्तक म्हणजे एखाद्या रागाचे किंवा थाटाचे प्राथमिक रूप मानले आहे.

थाट आणि स्वरसप्तक : भारतीय शास्त्रीय संगीताचा स्वर-सप्तकाच्या दृष्टिकोणातून विचार करत असताना ‘ थाट ’ ही संकल्पना समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. पंडित विष्णू नारायण भातखंडे (१८६० — १९३६) या थोर आणि विद्वान संगीतशास्त्रकारांनी या बाबतीत अतिशय मोलाचे संशोधन केले आहे. व्यंकटमखी या दक्षिण भारतीय संगीतकाराने सतराव्या शतकात केलेल्या रागवर्गीकरण पद्धतीस पाया मानून पंडित भातखंडे यांनी उत्तर भारतीय संगीतात थाट पद्धती विकसित केली. या पद्धतीनुसार त्यांनी सर्व प्रचलित रागांचे दहा थाटांत वर्गीकरण केले. प्रत्येक थाटास त्यांनी त्या विशिष्ट थाटातील प्रमुख रागाचे नाव दिले. आज ही पद्धती उत्तर भारतीय संगीतात प्रमाण मानली जाते. हे थाट पुढीलप्रमाणे :

. बिलावल थाट (सा-रे-ग-म-प-ध-नि-सा : सर्व शुद्ध स्वर)

. खमाज थाट (सा-शुद्ध रे-शुद्ध ग-शुद्ध म-शुद्ध प-शुद्ध ध-कोमल नि — सा) 

. काफी थाट (सा-शुद्ध रे-कोमल ग-शुद्ध म-प-शुद्ध ध-कोमल नि — सा)

. आसावरी थाट (सा-शुद्ध रे-कोमल ग-शुद्ध म-पंचम प-कोमल ध-कोमल नि — सा)

. भैरवी थाट (सा-कोमल रे-कोमल ग-शुद्ध म-प-कोमल ध-कोमल नि — सा)

. भैरव थाट (सा-कोमल रे-शुद्ध ग-शुद्ध म-प-कोमल ध-शुद्ध नि — सा)

. कल्याण थाट (सा-शुद्ध रे-शुद्ध ग-तीव्र म-प-शुद्ध ध-शुद्ध नि — सा)

. मारवा थाट (सा-कोमल रे-शुद्ध ग-तीव्र म-प-शुद्ध ध-शुद्ध नि — सा)

. पूर्वी थाट (सा-कोमल रे-शुद्ध ग-तीव्र म-प-कोमल ध-शुद्ध नि — सा)

१०. तोडी थाट (सा-कोमल रे-कोमल ग-तीव्र म-कोमल ध-शुद्ध नि — सा).

हे दहा थाट म्हणजे दहा निरनिराळी स्वरसप्तकेच आहेत. प्रत्येक थाटात सात स्वर असतात पण पाच (औडव) किंवा सहा (षाडव) स्वर असलेला रागही थाटात अंतर्भूत असतो. या वर्गीकरणपद्धतीमुळे संगीत अभ्यासकांना मोठाच फायदा झाला आहे. मराठी विश्वकोशा च्या खंडांमध्ये प्रत्येक थाटावर वर्णक्रमाने स्वतंत्र नोंदी अंतर्भूत आहेत. [⟶ थाट].


जपानी संगीत व स्वरसप्तक संकल्पना : पारंपरिक जपानी, चिनी आणि इंडोनेशियन संगीत पद्धतीत प्रामुख्याने पाच स्वरांचाच प्रयोग केला जातो. भारतीय संगीताच्या परिभाषेत ही स्वरसप्तके ‘औडव(पंचस्वरी रचना) जातीची आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पाश्चात्त्य संगीताचा विचार करता या पंचकातील दोन स्वरांमधील अंतरे समान असतीलच, असे नाही. या पद्धतीत पुढील प्रकारची मुख्य स्वरसप्तके समाविष्ट आहेत : (१) अकीबोनो सप्तक, (२) हिराजोशी सप्तक, (३) इने सप्तक, (४) इनसेन सप्तक, (५) इवाटो सप्तक, (६) रित्सु आणि रायो सप्तक आणि (७) यो सप्तक.

पाश्चात्त्य किंवा भारतीय संगीतात एखाद्या सप्तकाचा मूळ स्वर हा सप्तकाच्या सुरुवातीस असतो, तर जपानी संगीतात तो त्या विशिष्ट सप्तकाच्या (खरेतर पंचकाच्या) मध्यभागी असतो. यामध्ये हिराजोशी सप्तक मूळ मानले गेले असून जपानी, चिनी आणि इंडोनेशियन संगीता-तील बरेचसे लोकसंगीत आणि अनेक पारंपरिक रचना पंचकात बद्ध केलेल्या आढळतात.

जपानी संगीताप्रमाणे चिनी संगीतातही पाच स्वरांच्या सप्तकांचा प्रयोग होतो. यातील स्वरांची नावे पुढीलप्रमाणे : गाँग, शांग, जू, झी, यू.

इंडोनेशियन संगीत व स्वरसप्तक संकल्पना : इंडोनेशियन संगीताचा उगम व विकास चिनी आणि भारतीय संगीत परंपरेतून झाला असल्याने या दोन्ही संगीत पद्धतींचा प्रभाव इंडोनेशियन संगीतावर आढळतो. इंडोनेशियन संगीतात मुख्यतः दोन प्रकारची स्वरसप्तके प्रचारात आहेत :

(१) स्लेन्ड्रो स्वरसप्तक : या प्रकारात पाच मुख्य स्वर असतात. हे पाच स्वर आणखी पाच अर्धस्वरांत विभागलेले असतात. असा हा एकूण दहा स्वरांचा समूह हे या संगीतातील मूळ स्वरसप्तक समजले जाते. एखाद्या रचनेत यातील सर्व— दहा — क्वचितच गायले किंवा वाजविले जातात पण त्यांचा कलात्मक वापर करून अनेक स्वररचना तयार करता येतात.

(२) पेलॉग स्वरसप्तक : या सप्तकात सात स्वरांचा अंतर्भाव होतो पण एका वेळी मात्र त्यातील पाचच स्वरांचा वापर केला जातो. हे स्वर-सप्तक स्लेन्ड्रो या दहा स्वरांच्या मूल सप्तकापासूनच विकसित झाले, असे मानले जाते.

इंडोनेशियन संगीतावर स्वरसप्तकाच्या रचनेच्या बाबतीत जरी चिनी संगीताचा प्रभाव असला, तरी एकूण या संगीतप्रकारावर भारतीय संगीताचा प्रभाव अधिक असल्याचे संगीत संशोधकांचे मत आहे.

मध्य-पूर्व संगीतातील स्वरसप्तक संकल्पना : भारत आणि यूरोपातील संगीताप्रमाणे मध्य-पूर्वेतील संगीतही अतिशय प्राचीन असून त्यास खूप मोठी परंपरा लाभली आहे. त्यातील स्वरसप्तक मकाम पद्धतीवर आधारित आहे. मकाममधील दोन स्वरांतील अंतर अर्ध्याऐवजी पाव स्वरांचे असते. मकाम हे एकूण २४ स्वरांच्या निरनिराळ्या स्वरसमूहांवर आधारित असतात. तुर्कस्थानी संगीतातील स्वरसप्तकांनाही मकाम असेच संबोधले जाते पण त्यांची नावे काहीशी वेगळी आहेत.

एकूणच स्वरसप्तक हा अतिशय व्यापक विषय आहे. एखाद्या प्रदेशात विकसित झालेल्या संगीताचा संबंध तेथील संस्कृतीशी आणि लोक-जीवनाशी असतो. त्यामुळे त्या त्या संगीतप्रकारात स्वरसप्तक संकल्पनेची व्याख्याही बदलत जाते.

पहा : थाट रागमालिका रागविचार संगीत, कर्नाटक संगीत, पाश्चात्त्य संगीत, हिंदुस्थानी. 

संदर्भ : भातखंडे, वि. ना. भातखंडे — संगीतशास्त्र, भाग-१, हाथरस, १९६४.

 

कुलकर्णी, रागेश्री अजित