स्वच्छंदतावाद : ( रोमँटिसिझम ). कला-साहित्यातील एक संप्रदाय. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध ह्या कालखंडात हा संप्रदाय यूरोपमधील अनेक देशांत विस्तारत गेला व त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. ही चळवळ केवळ कला–वाङ्मयीन क्षेत्रांपुरतीच मर्यादित न राहता मानवी जीवनव्यवहाराच्या धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण इ. अनेकविध क्षेत्रांमध्ये रुजली होती. खरे तर, ही मानवी मनाची एक मूलभूत व शाश्वत प्रवृत्ती असल्याने तिचे आविष्कार कोणत्याही देश-काल-स्थितींतल्या कोणत्याही कलावंताच्या, लेखकाच्या सर्जनशील आविष्कारांतून व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे ती विशिष्ट स्थलकालाशी मर्यादित अशी चळवळ वा संप्रदाय न राहता, ‘ रोमँटिक ’ वा ‘ स्वच्छंदी ’ प्रवृत्तीचे प्रचलन सार्वत्रिक, सार्वकालीन परिमाण व व्याप्ती धारण करते, असेही म्हणता येईल. ह्या संप्रदायातून वा चळवळीतून जी तत्त्वे, ज्या धारणा व जी मूल्ये निर्माण व प्रसृत होत गेली, त्यांनी मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. उदा., व्यक्तिवादी वा आत्माविष्कारी जीवनजाणिवा, स्वातंत्र्याच्या ऊर्मी व व्यक्तिस्वातंत्र्य हेच सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याची धारणा, निसर्गाची ओढ, निसर्गप्रेम आणि त्यातील नैसर्गिक साधेपणाची आसक्ती, दूरस्थ परप्रदेशातील ( इग्झॉटिक ) व काळातील कल्पनारम्य सुंदर जीवनाबद्दलचे आकर्षण, त्यातून आदिमतेविषयी ( प्रिमिटिव्हिझम ) तसेच भविष्यकालीन भावी जीवनातील स्वप्नांविषयी वाटणारी ओढ, राष्ट्रीय अस्मितेची जाणीव आणि या चळवळीच्या अखेरच्या कालखंडातील भ्रमनिरास व वैफल्यभावना. मुख्यतः विवेकवादी ( रॅशनॅलिस्ट ) विचारसरणीविरुद्ध बंडाची, विद्रोहाची भूमिका या चळवळीत प्राधान्याने घेतली गेली. हे स्वच्छंदतावादी वृत्तिविशेष कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही कलावंताच्या ठायी आढळू शकतात. त्यामुळे स्वच्छंदता ही सनातन, मूलभूत, सार्वत्रिक व शाश्वत मनोवृत्ती आहे, असे म्हणता येईल. स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे कला--वाङ्मयीन आविष्कार व्यापक, सार्वत्रिक, बहुविध असल्याने मूळच्या ‘ रोमँटिक ’ या संज्ञेचा अर्थविस्तार होत जाऊन त्याला अनेकविध आशयाची परिमाणे व अर्थच्छटा प्राप्त होत गेल्या.
संज्ञाविचार : ‘रोमँटिसिझम’ ही इंग्रजी संज्ञा अनेक अर्थांनी, वेगवेगळ्या संदर्भांत वापरली गेली. त्याची एक विस्तृत यादीच झाक बारझन यांनी क्लासिक, रोमँटिक अँड मॉडर्न (१९६१) या ग्रंथात दिली आहे. ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या नेमक्या अर्थाविषयी अनेक मतमतांतरे व कित्येकदा परस्परविरोधी विधानेही केली गेली. त्यामुळे ही संज्ञा संदिग्ध, अनेकार्थसूचक व बहुव्यापक बनल्याचे या संप्रदायाच्या इतिहासात आढळून आले. १८२४ मध्ये या संज्ञेच्या संदर्भात तज्ज्ञांची मते पडताळून पाहिली असता, त्यांत परस्परविसंगत व परस्परविरोधी अशी अनेक विधाने आढळली. इंग्लिश लेखक एफ्. एल्. ल्यूकस याने १९४८ मध्ये ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या वेगवेगळ्या एकूण ११,३९६ व्याख्यांची नोंद केली. ए. ओ. लव्हजॉय या अमेरिकन तत्त्वज्ञाने ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या कालखंडांतील व्याख्या, अर्थभेद आणि त्यांतले प्रचंड वैविध्य व मतमतांतरे लक्षात घेता ही संज्ञा बहुवचनी — अनेक ‘रोमँटिसिझम्स’ — मानावी, असे सुचवले. ही बहुतत्त्ववादी ( प्लूरॅलिस्ट ) भूमिका लव्हजॉयने आपल्या ‘ऑन द डिस्क्रिमिनेशन ऑफ रोमँटिसिझम’ या शोधनिबंधात मांडली. ‘रोमँटिसिझम’चा अर्थ लावताना पाश्चात्त्य समीक्षकांनी ज्या विविध, परस्परविरोधी भूमिका मांडल्या, त्यांचा आढावा घेतल्यास या चळवळीचे अनेकजिनसी, व्यामिश्र स्वरूप स्पष्ट होऊ शकेल. उदा., (१) रोमँटिसिझम ही एक सार्वत्रिक, सार्वकालीन जीवनरीती आहे, असे म्हणणारा एक पक्ष आहे तर रोमँटिसिझम ही एक मनोरुग्णावस्था आहे, असा आक्षेपही काही समीक्षकांनी घेतला आहे. (२) रोमँटिसिझम म्हणजे निसर्गाकडे परत जाण्याची अवस्था —आदिमता, गूढरम्यता, प्राचीन दूरस्थ व परस्थ गोष्टींविषयीचे आकर्षण अशी वैशिष्ट्ये जशी नोंदवली आहेत, तसेच ते वास्तवापासूनचे पलायन आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. (३) रोमँटिसिझम हा जसा सौंदर्याचा आविष्कार मानला गेला आहे, तसाच तो अद्भुततेचाही आविष्कार मानला आहे. रेने वेलेक व नॉर्थ्रप फ्राय यांनी ‘ एका विशिष्ट ऐतिहासिक काळातली एक विशिष्ट संवेदनशीलता ’ असे रोमँटिसिझमचे स्वरूप विशद केले आहे. एखादी संकल्पना विशिष्ट सांस्कृतिक वातावरणातून व विशिष्ट कालखंडात निर्माण होते, ह्या सूत्रानुसार मांडलेली ही रोमँटिसिझमची कालवाचक संकल्पना ( पीरिअड कन्सेप्ट ) आहे. सु. १७९० — १८३० ह्या कालखंडात आत्मदर्शी जाणिवेने सर्जनशील निर्मिती करणार्या लेखक-कलावंत गटाचा विचार या संज्ञेत प्रस्तुत आहे आणि युगचैतन्याचा ( स्पिरिट ऑफ एज ) आविष्कार त्याच्या गाभ्याशी आहे. हे युगचैतन्य केवळ दृक्कला व साहित्य यांतूनच व्यक्त झालेले नसून, ते या कालखंडातल्या धर्ममीमांसा, इतिहासमीमांसा, राजकारण, संस्कृतिकरण, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगांतून व सर्वच क्षेत्रांतून आविष्कृत झाले आहे, असे दिसून येते. काव्याचा विचार करताना सर्जनशील कल्पनाशक्ती, विश्वाचा विचार करताना निसर्ग आणि शैलीचा विचार करताना प्रतिमा, प्रतीके व प्राक्कथा या तीन कसोट्या स्वच्छंदतावादाच्या संदर्भात लक्षात घ्याव्यात, असे या समीक्षकांनी सुचविले आहे. लिलियन फ्यूर्स्टने आणखी एक वेगळा दृष्टिकोण मांडला आहे : तिच्या मते, यूरोप खंडातल्या विविध देशांत रोमँटिसिझममध्ये जरी साम्यस्थळे आढळत असली, तरी प्रत्येक राष्ट्राच्या विशिष्ट गरजा, प्रकृतिविशेष व परिस्थिती यांनुसार रोमँटिसिझमच्या एखाद्या विशिष्ट भागावर विशेष भर दिलेला दिसतो आणि त्यामुळे त्या त्या देशातल्या रोमँटिसिझमला विशिष्ट असे देशीयत्व लाभलेले दिसते. उदा., जर्मन रोमँटिसिझम इतिहासाच्या अतिरिक्त अभिमानामुळे अधिकाधिक राष्ट्रवादी, तर फ्रेंच रोमँटिसिझम स्वातंत्र्यप्रेमामुळे सर्वदेशीय ( कॉस्मॉपॉलिटन ) झालेला दिसतो. ही ‘ देशीयता ’ विचारात घ्यावी, असे फ्यूर्स्टने सुचविले आहे.
‘रोमँटिसिझम’ ला मराठी साहित्य-समीक्षा व्यवहारात अनेक पर्यायी संज्ञा आजवर सुचविण्यात व वापरण्यात आल्या आहेत. उदा., सौंदर्यवाद, गूढवाद, निर्भरवाद, छायावाद, रोमांचवाद, स्वच्छंदतावाद इत्यादी पण ह्या पर्यायांतून मूळ इंग्रजी संज्ञेच्या काही अर्थच्छटाच फक्त व्यक्त होतात संप्रदायाची काही वैशिष्ट्येच सूचित होतात. त्यामुळे कोणतीच संज्ञा पर्याप्त व परिपूर्ण ठरत नाही. काही समीक्षक मूळ इंग्रजी ‘रोमँटिक’ व तद्भव शब्दच वापरणे पसंत करतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी व जडणघडण : अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कला व साहित्य या क्षेत्रांत यूरोपमध्ये स्वच्छंदतावादाची जोरदार लाट उसळली. तत्कालीन राजकीय–सामाजिक घडामोडींचे पडसाद तीत उमटलेले दिसतात. ⇨ फ्रेंच राज्यक्रांतीतून राजकीय स्वातंत्र्याचे नवे आदर्श प्रस्थापित झाले. त्यातूनही स्वच्छंदतावादाची जडणघडण झाली. ही चळवळ यूरोपभर लाटेसारखी पसरत गेली. तत्पूर्वीचे प्रबोधनकालीन कला-साहित्य हे कलांची आश्रयदाती राजघराणी, अमीर-उमरावांचे वैभवशाली जीवन ह्यांभोवतीच घुटमळत होते तथापि ही उमरावशाही स्वच्छंदतावादाने जोरदारपणे नाकारली. अठराव्या शतकापासून राजेशाहीचा प्रभाव ओसरू लागला. ⇨ माँतेस्क्यू, ⇨ व्हॉल्तेअर यांसारख्या तत्त्वज्ञांनी तत्कालीन राज्य-धर्मसंस्थांचा चिकित्सक शोध घेतला. फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ रूसो ह्याचा प्रभावही या काळावर पडला. त्याने शिक्षणाची मौलिकता व निसर्गातील साधेपणा या तत्त्वांकडे लोकांचे लक्ष वेधले. जनसामान्यांत विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांविषयीचे कुतूहल व आस्था वाढीस लागली. माणसे म्हणजे राज्यशासन व चर्चप्रणीत धर्मसत्ता यांच्या यंत्रणेतील केवळ चाके नसून, स्वतंत्रपणे विचार करू शकणार्या त्या व्यक्ती आहेत, अशा आशयाचा व्यक्तिवाद ह्या काळात जोपासला गेला. कलावंतांची निर्मिती राजाश्रयावर अवलंबून न राहता, तिला विशाल जनसमुदायाच्या—त्या काळी सतत वाढत्या मध्यमवर्गाच्या — अभिरुचीचे व्यापक व विस्तृत अधिष्ठान लाभले. लेखक-कलावंतांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नवी जाणीव निर्माण झाली. माणसांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे नवे धैर्य समाजजीवनात जोपासले गेले. माणसाच्या विवेकाला लगाम घालणारी चर्चची सत्ता दुबळी झाली. व्यक्तिव्यक्तींतील सद्गुण-दुर्गुणांपेक्षा, मानवतेच्या सर्वसामान्य समस्या लेखक-कलावंतांना भेडसावू लागल्या. ते मोठ्या धैर्याने प्रश्न उपस्थित करू लागले व त्यांची सांकेतिक उत्तरे नाकारू लागले. लेखक–कलावंत भोवतालच्या समाजजीवनाशी एकरूप झाले व आपल्या विशिष्ट वर्गाच्या वा पक्षाच्या भावभावना व आकांक्षा शब्दबद्ध करू लागले. राजकीय प्रगतीचाही अंतःस्तर स्वच्छंदतावादातून वाहताना दिसतो. इंग्रज कवी ⇨ बायरन हा ‘ स्वच्छंदी खिन्नते ’चे ( रोमँटिक मेलँकली ) परिपूर्ण उदाहरण मानला जातो. त्याने ग्रीक स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला. अनेक स्वच्छंदतावादी लेखकांना आपल्या स्वतंत्र विचारसरणीबद्दल हद्दपारी भोगावी लागली. स्वच्छंदतावादी इंग्रज कवी ⇨ शेली हा सुधारणावादी ( रिफॉर्मर ) होता. आपल्या ‘ प्रॉमिथ्यूस अन्बाउंड ’ या भावकाव्यात त्याने मानवी स्वातंत्र्याचा विषय हाताळला. स्वच्छंदतावादी फ्रेंच चित्रकार ⇨ दलाक्र्वा (१७९८—१८६३) यानेही लिबर्टी लीडिंग द पीपल (१८३०) हे स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर आधारित प्रतीकात्मक चित्र काढले. ते स्वच्छंदतावादी वर्तुळात फार गाजले. तेव्हापासून ‘ रोमँटिसिझम ’ ही संज्ञाही प्रचलित झाली व दलाक्र्वा या चळवळीचा नेता मानला जाऊ लागला. शेली परागंदा झाला व त्याने इटलीमध्ये आश्रय घेतला. काँटिनेन्टमधील अनेक शरणार्थी — त्यांत बरेच कलावंतही होते — इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.
सभोवतालच्या जीवनाशी स्वच्छंदतावादी लेखकांचे जे नाते होते, त्याचा एक पैलू म्हणजे त्यांना प्रत्यक्ष लोकजीवनाविषयी वाटणारी सखोल, गाढ आस्था होय. अभिजाततावादी साहित्यात जे व्यक्तींचे सांकेतिक साचे दिसतात, त्याच्या विरोधात हे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसते. व्यक्तिजीवनाच्या अभ्यासातून त्याच्या भोवतालच्या वातावरणाविषयीचेही कुतूहल जागृत झाले. स्वच्छंदतावादी लेखक निसर्गात ‘ निसर्ग ’ म्हणूनच रममाण झाले. उदा., ⇨ विल्यम वर्ड्स्वर्थचे इंग्लिश सरोवरांबद्दलचे काव्य. मानवी भावभावनांची अभिव्यक्ती त्यांनी समांतर अशा निसर्गा-तील वेगवेगळ्या भावावस्थांमधून (मूड्स) साकार केली. निसर्गाची रौद्र-वादळी, शांत-गंभीर, प्रसन्न व रमणीय अशी वेगवेगळी रूपे स्वच्छंदतावादी चित्रकाव्यांतून दिसतात. ⇨ जॉन कीट्सचे ‘टू अ नाइटिंगेल’, शेलीचे ढगांविषयीचे किंवा वर्ड्स्वर्थचे कोकिळेविषयीचे काव्य यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. इंग्लिश निसर्ग-कवींप्रमाणेच निसर्गचित्रकारांचीही एक परंपरा स्वच्छंदतावादात दिसून येते. जोझेफ मॅलर्ड विल्यम टर्नर, जॉन कॉन्स्टेबल प्रभृती चित्रकारांचा या संदर्भात निर्देश करता येईल.
भोवतालच्या परिसराबरोबरच ऐतिहासिक अद्भुतरम्यतेविषयी ( रोमान्स ) लेखकांना आकर्षण वाटू लागले. ⇨ सर वॉल्टर स्कॉट याने या इतिहासप्रेमाचे भरणपोषण केले. ऐतिहासिक वास्तूंविषयी, मध्ययुगीन जीवनाविषयी कलावंतांमध्ये आसक्ती वाढली. त्यातून गूढ, अतिंद्रिय प्रवृत्तींच्या लेखक कलावंतांनी चित्रण केले. ⇨ गटेचे ⇨ फाउस्ट व ⇨ विल्यम ब्लेकची चित्रे यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. कलावंतांनी निर्मितिप्रेरणांचा शोध जसा स्वकालाच्या पलीकडे (उदा., ऐतिहासिक, मध्ययुगीन वातावरण) जाऊन घेतला, तसाच स्वदेशाच्या पलीकडे जाऊनही घेतला. पौर्वात्य तसेच विदेशी, वैचित्र्यपूर्ण प्रदेश-परिसराचे आकर्षण व चित्रण त्यातून वाढीस लागले.
कलेतील स्वच्छंदतावाद : स्वच्छंदतावादी कलावंतांच्या प्रेरणा व उद्दिष्टे तत्कालीन लेखकांप्रमाणेच होती. अभिजाततावादी कलापरंपरा व संकेत झुगारून देण्याची बंडखोर भूमिका त्यांनी घेतली व मुक्त, चैतन्यशील वृत्तीचा आविष्कार आपल्या कलानिर्मितीतून घडवला. नव-अभिजाततावादातून कलेवर जे जाचक निर्बंध लादले गेले ( उदा., उच्च व उदात्त विषयांचीच निवड, विषयांची संयमपूर्ण हाताळणी, चित्रसंयोजनातील समतोल व प्रमाणबद्धता यांचे दंडक, रंगांपेक्षा रेखनकौशल्यावर भर देण्याची प्रवृत्ती ), त्याविरुद्ध स्वच्छंदतावादी चित्रकारांनी बंड केले. त्यांच्या विरोधात त्यांनी व्यक्तिनिष्ठ आत्मानुभूतीला प्राधान्य, नाट्यपूर्ण व भावनोत्कट प्रसंग, रंग आणि प्रकाश यांचा चित्रणात नाट्यपूर्ण वापर व मुक्त कुंचलांकन या गुणवैशिष्ट्यांवर भर दिला. भूतकालीन-ऐतिहासिक व मध्ययुगीन-पौर्वात्य, तसेच गूढ, अतींद्रिय विषयांचे त्यांनी समर्थ चित्रण केले. अपवादात्मक, अलौकिक, चमत्कृति-पूर्ण, विलक्षण व विक्षिप्त गोष्टींविषयी त्यांना आत्यंतिक ओढ व आकर्षण होते. तद्वतच निसर्गाच्या विराट व रौद्ररूप दर्शनाने मनाला भयचकित करणारा जो अनुभव येतो, त्याचे संवेदनाक्षम चित्रण त्यांनी केले. मानव जीवनातील रुग्णावस्था, यातना, मृत्यू अशी दृश्ये त्यांना आकर्षून घेत. सारांश, स्वच्छंदतावादी कलेत अलौकिक, अनन्यसाधारण, एकमेवाद्वितीय आत्मानुभूतीचे — ‘ स्व ’ त्वाचे — दर्शन घडते. काही आधुनिक कलावंतांतही हे अलौकिक आत्मप्रकटन दिसून येते.
चित्रकला : स्वच्छंदतावादी चित्रकलेत मुख्यत्वे दोन प्रवाह दिसून येतात : व्यक्तिचित्रणपर व निसर्गचित्रणपर. या संदर्भात फ्रान्स, इंग्लंड,स्पेन, जर्मनी व अमेरिका येथील अनेक चित्रकारांचे निर्देश करता येतील.
इंग्लिश कवी व चित्रकार ⇨ विल्यम ब्लेक (१७५७—१८२७) याचे द ग्रेट रेड ड्रॅगन अँड द विमेन क्लोद्ड विथ द सन हे बुक ऑफ रिव्हिलेशन या ग्रंथसजावटीसाठी केलेले जलरंगचित्र असून, त्यात अद्भुतरम्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीवर आरूढ झालेल्या राक्षसाचे दृश्य रंगविले आहे. स्पॅनिश चित्रकार ⇨ गोया (१७४६—१८२८) याची Los Caprichos ( इं. शी. ‘ द कॅप्रिसेस ’) ही अम्लरेखनांची ( एचिंग ) मालिकाही उल्लेखनीय आहे. तीत मानवी भावभावनांचे — त्यातील भयावह निष्ठुरता, क्षुद्र मनोवृत्ती, नैतिक मूल्यांचे अधःपतन यांचे — प्रत्ययकारी चित्रण आढळते. त्यावर एक कल्पनारम्य, पण खिन्न-उदास छाया पसरलेली आहे. त्याचे सॅटर्न डिव्हरिंग हिज सन्स हे भित्तिचित्र मनावर विलक्षण भयप्रद परिणाम घडवून आणते.
दलाक्र्वा हा स्वच्छंदतावादाचा प्रमुख प्रवर्तक मानला जातो. त्याच्या रंगांच्या उपयोजनातले अभिव्यक्तिसामर्थ्य, कुंचल्याची वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी यांमुळे चित्रणात भावोत्कटता निर्माण झाली आहे. त्याच्या लिबर्टी लीडिंग द पीपलचा उल्लेख आधी आलाच आहे. डेथ ऑफ सार्डनापेलस हे त्याचे ऐतिहासिक विषयावरील आणखी एक उल्लेखनीय चित्र. एका ॲसिरियन राजाच्या पराभवाचे व आत्मनाशाचे चित्रण त्यात आहे. बायरनचे ह्याच विषयावर एक नाटकही होते. त्याचा दलाक्र्वावर प्रभाव असल्याची अन्य उदाहरणेही आहेत. स्वतःला हॅम्लेट कल्पून दलाक्र्वाने एक आत्मचित्र रंगविले. मृत्यू, कामवासना, पौर्वात्य गूढवाद यांचे वैशिष्ट्य-पूर्ण चित्रण त्याने केले. नेऑदॉर झेरीको (१७९१—१८२४) हा फ्रेंच चित्रकार स्वच्छंदतावादी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची घोड्याची चित्रे गतिमानतेचा आभासात्मक प्रत्यय देणारी आहेत. त्याला रुग्णावस्थेचे, विकृतीचे व स्वच्छंदतेला साजेसे आकर्षण होते. त्याने मृतावस्थेतील व्यक्तींची अभ्यासपूर्ण रेखाटने केली.
निसर्गचित्रणपर स्वच्छंदतावादाचा प्रमुख प्रणेता म्हणून इंग्लिश चित्रकार ⇨ जे. एम्. डब्ल्यू. टर्नर (१७७५—१८५१) याचा उल्लेख करावा लागेल. त्याचे स्लेव्ह शिप (१८४०) हे या प्रकारातील उत्कृष्ट उदाहरण. रक्तवर्ण आकाशाखाली पसरलेला मलीन काळोखमय समुद्र, दूरवर उभे असलेले सैतानी गलबत, लाटांमधून डोकावणारा राक्षसी मासा आणि या सर्वांमध्ये अग्रभागी तरंगणारा, बेड्यांनी जखडलेला काळा पाय असे दृश्य त्यात आहे. निसर्गाचा विराटपणा व सामर्थ्य यांचा उपयोग टर्नरने विशेषत्वाने करून घेतला. निसर्गाला सामर्थ्य प्राप्त करून देणार्या विविध घटकांचा— हवा, पृथ्वी, अग्नी, जल इत्यादींचा — वापर करून त्याने भव्यतेचा साक्षात्कार घडवला. टॉमस कोलसारख्या अमेरिकन चित्रकाराचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. निसर्गाच्या शक्तीपुढे जाणवणारा माणसाचा दुबळेपणा त्याच्या चित्रांतून प्रत्ययास येतो. फ्रेंच निसर्गचित्रकार कोरो याने वृक्षांची आदर्शीकृत अभ्यास-रेखाटने केली. ⇨ जॉन कॉन्स्टेबल (१७७६—१८३७) हा टर्नरचा समकालीन इंग्रज निसर्गचित्रकार. त्याने भावनाविष्कारांचे सूक्ष्म व तरल रंगचित्रण केले. त्याच्या चित्रांतील उन्हात न्हालेली शेते, कालवे, इंग्लंडच्या ग्रामीण परिसरातील किनारपट्टी यांतील भावनिक आवाहन त्याचा मित्र वर्ड्स्वर्थ याच्या कवितेशी मिळतेजुळते आहे. फाँतेनब्लूनजीकच्या जंगल प्रदेशाचे चित्रण करणार्या ‘ बार्बिझाँ ’ या स्वच्छंदतावादी संप्रदायी चित्रकारांनी निसर्गाच्या विविध भावावस्था रंगविल्या. जर्मनीमध्ये कास्पर डेव्हिड फ्रायड्रिख यानेही भावपूर्ण निसर्गदृश्ये रंगवली. गुंतागुंतीच्या गूढ व धार्मिक भावनांचे प्रतीकात्मक चित्रण करण्यासाठी त्याने निसर्गदृश्यांचा वापर केला. क्लॉइस्टर ग्रेव्ह्यार्ड अंडर स्नो (१८१०) या त्याच्या चित्रात निष्पर्ण गाठाळ वृक्ष, थडग्यावरील दगड आणि उद्ध्वस्त प्रार्थनामंदिराकडे ( चॅपेल ) दोन-दोनच्या रांगा करून, संथपणे बर्फ तुडवत चाललेले भिक्षू असे दृश्य परिणामकारकपणे रंगवून त्याने आपल्या चित्रणात प्रतीकात्मकता दर्शविली आहे. [⟶ चित्रकला ] .
वास्तुकला : वास्तुकलेत स्वच्छंदतावादाचे स्वरूप हे पूर्वकालीन विविध शैलींचा कल्पकतापूर्ण वापर करून, त्यातून भावनात्मक परिणाम साधणे, हे होते. इंग्लंडमध्ये गॉथिक वास्तुशैली लोकप्रिय होती, तर फ्रान्समध्ये अधिक अभिजात कल्पना वास्तूंतून साकारण्यात आल्या. अठराव्या शतकाच्या मध्यावधीत इंग्रज साहित्यिक ⇨ हॉरिस वॉल्पोल (१७१७—९७) याने ‘ स्ट्रॉबेरी हिल ’ नामक स्वतःचे निवासस्थान उभारले. व्हिकेनहॅमने ‘ लिट्ल गॉथिक कासल ’ ( गॉथिक वास्तुशैलीच्या धर्तीची छोटेखानी गढी ) उभारले आणि तेथेच त्याने द कासल ऑफ ओट्रँटो या कादंबरीचे लेखन केले. या घटनांतून गतकालीन संवेदना जागवण्याची त्याची ऊर्मी दिसून येते. त्यात गद्यप्राय वर्तमानकाळाच्या विरोधात दूरस्थ गोष्टींत रमण्याची स्वच्छंद वृत्ती प्रकटली आहे. याच प्रवृत्तीतून विल्यम बेकफोर्डने विल्टशायर येथे ‘ फाँटहिल ’ हे गॉथिक शैलीतील वैचित्र्यपूर्ण घर बांधले. त्यात मूलभूत अशी वास्तूरचनेची तत्त्वेही पाळली न गेल्याने लवकरच ते जमीनदोस्तही झाले. विचित्र व परक्या गोष्टींविषयीच्या आकर्षणामुळे अतिपूर्वेकडील देशांतून — विशेषतः चीनमधून—कलावस्तूंची आयात होऊ लागली व त्यांच्या अनुकरणात यूरोपीय कारागीर धन्यता मानू लागले. [⟶ वास्तुकला ].
शिल्पकला : स्वच्छंदतावादाचा जोम व भावनिक परिणाम शिल्पांतही काही प्रमाणात जाणवतो. उदा., फ्रांस्वा रूद याचे पॅरिस येथील ‘ आर्च दी त्रिआँफ द लेत्वाल ’ ( विजयकमान ) वरील ला मार्सेयॅझ हे उत्थित शिल्प. तसेच आंत्वान ली वारी याची प्राणिविषयक शिल्पे. स्वच्छंदतावादातील प्रखर भावनाविष्कार श्रेष्ठ शिल्पकार ⇨ रॉदँ (१८४०—१९१७) याच्या शिल्पांत दिसतो. त्याच्या शिल्पांतले देहसौष्ठव, सामर्थ्य व सहेतूक ठेवलेले ओबडधोबड पृष्ठ-पोत यांतून मानवी मनाच्या नाट्यपूर्ण तीव्र भावावस्थांचा प्रत्यय येतो. त्याचा द बर्गर्स ऑफ कॅले हा धीरोदात्त वीरपुरुषांचा पूर्णाकृती शिल्पसमूह प्रेक्षकांना त्या वीरपुरुषांच्या प्रचंड तणावाखाली असलेल्या अस्वस्थ मनःस्थितीचा प्रत्यय देतो. [⟶ शिल्पकला ].
संगीत : यूरोपीय संगीतक्षेत्रात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा प्रभाव मुख्यत्वे जर्मनी व फ्रान्स येथील संगीतात आढळतो. चित्रकला व वाङ्मय या क्षेत्रांप्रमाणेच स्वच्छंदतावादी संगीताचे गुणधर्म भावनात्मक आवाहनावर भर देणारे होते. दृश्यांचे व कथांचे वर्णन करणारे संगीत ( प्रोग्रॅम म्यूझिक ) हे प्राधान्याने स्वच्छंदतावादी होते. महान जर्मन संगीतकार ⇨ बेथोव्हन याची इरॉटिका सिंफनी (१८०४) ही संगीतकृती स्वच्छंदतावादाचा वेगळाच नावीन्यपूर्ण आविष्कार घडविणारी आहे. तसेच वेबरच्या संगीतात लोकसंगीताचे नव्यानेच घडविलेले पुनरुज्जीवन दिसते. ऑस्ट्रियन संगीतरचनाकार ⇨ फ्रांट्स पेटर शूबर्ट व जर्मन संगीतरचनाकार ⇨ रॉबर्ट शूमान यांनी जर्मन कवी ⇨ हाइन्रिख हाइन याची भावगीते संगीतबद्ध केली. त्यांत स्वच्छंदीवृत्तीच्या निदर्शक अशा अनेकविध भावछटा आढळतात. उदा., शूबर्टची ‘ द अर्लकिंग ’, ‘ द रेथ ’, ‘ हार्क द लार्क ’, ‘ हू इज सिल्व्हिया ’ आणि शूमानची ‘ द लव्ह्ली मंथ ऑॅफ मे ’, ‘ लेडी-बर्ड ’, ‘ फ्रॉम आउट माय टिअर्स आर स्प्रिंगिंग ’, ‘ आय विल नॉट ग्रीव्ह ’ ही गीते. यांची शीर्षकेच स्वच्छंदतावादाची सूचक आहेत. ⇨ रिखार्ट व्हाग्नर ची द रिंग ऑफ द नीबलुंग ही संगीतिका-मालिका व ट्रिस्टान अँड इसोल्ड ही रचना उत्तरेकडील लोकगीतांतून स्फुरलेल्या आहेत. व्हेर्दीने आपल्या ऑपेरांसाठी ⇨ विल्यम शेक्सपिअर च्या नाटकांतून विषय निवडले ( उदा., ‘ ऑथेल्लो ’, ‘ फॉलस्टॉफ ’). [⟶ संगीत, पाश्चार्त्त्यें].
उत्तरकालीन स्वच्छंदतावादात ( पोस्ट रोमँटिसिझम ) एक प्रकारचा साचेबंद निर्जीवपणा व कृत्रिमपणा आला. चित्रकारांचे विषय व चित्रण या दोन्हींमध्ये सांकेतिक कृत्रिमता आणि निर्जीवता जाणवते. त्याविरुद्ध एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात कूर्बे या फ्रेंच वास्तववादी चित्रकाराने आपल्या चित्रनिर्मितीतून विरोधी प्रतिक्रिया प्रकट केली वत्याद्वारे फ्रेंच चित्रकलेत वास्तववादाची बीजे रोवली.
सामान्यतः असे म्हटले जाते, की अभिजाततावादी मनोवृत्ती ही स्थितिशील असते, तर स्वच्छंदतावादी मनोवृत्ती ही गतिशील असते. आधुनिक काळातही या मूलप्रवृत्तींचे वेगवेगळ्या रूपांत दर्शन घडते. पूर्वनिश्चित व सुघटित आकारांची निर्मिती अभिजाततावादी, तर भावनाविष्कारांची मुक्त अभिव्यक्ती स्वच्छंदतावादी मानता येईल. उदा., आधुनिक कलेतील भौमितिक अमूर्तीकरणाची प्रवृत्ती अभिजाततावादी, तर रंगांचे उत्कट भावप्रक्षोभक, अभिव्यक्तिवादी उपयोजन हे स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचे प्रातिनिधिक मानता येईल.
साहित्यातील स्वच्छंदतावाद : वाङ्मयीन स्वच्छंदतावादी चळवळीची पहिली लाट अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंड व जर्मनी या देशांतील साहित्यात निर्माण झाली.
ब्रिटिश स्वच्छंदतावाद : इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात स्वच्छंदता-वादाच्या उदयाला पोषक अशी वाङ्मयीन पार्श्वभूमी निर्माण झाली होती. इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाच्या आद्य खाणाखुणा अठराव्या शतकातच दिसू लागल्या. अठराव्या शतकातील ⇨ जेम्स टॉमसन (१७००—४८) ह्या कवीचे निसर्गकाव्य—विशेषतः द सीझन्स (४ भाग, १७२६—३०) हे ऋतुवर्णनपर भावकाव्य — स्वच्छंदतावादाची पूर्वचिन्हे सूचित करणारे आहे. तसेच हॉरिस वॉल्पोलच्या गूढ व भयप्रद वातावरणनिर्मिती करणार्या कादंबर्या ⇨ रॉबर्ट बर्न्स, विल्यम ब्लेक व ⇨ टॉमस चॅटरटन इत्यादींचे स्वच्छंदीवृत्तीला पोषक असे काव्य ⇨ एडमंड बर्कचे (१७२९—९७) ‘ उदात्त ’ व ‘ सुंदर ’ यांची मीमांसा करणारे आणि अंत:प्रेरणांना महत्त्व देणारे तत्त्वज्ञान तसेच शाफ्टस्बरीचे (१६७१—१७१३) वाङ्मयाभिरुचीविषयीचे मौलिक विचार — उदा., ‘ जे चांगले व सुंदर आहे त्याकडे मनाची असलेली स्वाभाविक ओढ ही मनुष्य स्वभावातल्या नैतिकतेचीच साक्ष देते साहित्यसमीक्षकाने जाणीवपूर्वक या नैतिकतेची जोपासना केली पाहिजे ’ ही त्याची वाङ्मयीन भूमिका — यांसारखे घटक ब्रिटिश स्वच्छंदतावादाच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायक व पोषक ठरले.
साधारण १७८० पासून १८३० पर्यंतचा काळ हा ब्रिटिश स्वच्छंदता-वादी वाङ्मयाच्या बहराचा काळ होता. ह्या काळात साहित्याला — विशेषतः काव्यनिर्मिती व काव्यविचार यांना — पूर्णपणे नवे वळण लाभले. हे नवे वळण विल्यम ब्लेक, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स, बायरन ह्या प्रमुख कवींच्या काव्याविष्कारांतून तसेच सर वॉल्टर स्कॉटच्या कादं-बर्यांतून आणि ⇨ चार्ल्स लँबच्या (१७७५—१८३४) व्यक्तिनिष्ठ निबंध वाङ्मयातून जसे जाणवते तसेच ते तत्कालीन काव्यविचारांतूनही प्रतीत होते. विल्यम वर्ड्स्वर्थ व ⇨ एस्. टी. कोलरिज (१७७२—१८३४) या बंडखोर कवींच्या लिरिकल बॅलड्स (१७९८) ह्या भावकाव्यसंग्रहातून इंग्रजी साहित्यातले नवे स्वच्छंदतावादी वळण स्पष्टपणे व ठळकपणे दिसू लागले. पूर्वकालीन नवअभिजात परंपरा पूर्णपणे खंडित करणारी ही स्वच्छंदतावादी कविता होती. वर्ड्स्वर्थने लिरिकल बॅलड्सच्या दुसर्या आवृत्तीला लिहिलेली प्रस्तावना आणि कोलरिजचा बायोग्राफिआ लिटरारिआ (१८१७ इं. शी. ‘ लिटररी ऑटोबायॉग्रफी ’) हे दोन्ही मिळून इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी चळवळीचा जाहीरनामा मानला जातो. कविता म्हणजे ‘ उत्कट प्रमाथी भावनांचा उत्स्फूर्त उत्सेक ’ ही वर्ड्स्वर्थने केलेली व्याख्या स्वच्छंदतावादी वाङ्मय-विचाराच्या गाभ्याशी होती. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना सर्वसामान्यांच्याच भाषेत व्यक्त करणे, हे वर्ड्स्वर्थने काव्यनिर्मितीचे मुख्य प्रयोजन मानले. त्यातून निसर्गाच्या मूलतत्त्वांचा, नियमांचा शोध घेण्याची त्याची आकांक्षा होती. वर्ड्स्वर्थने सामान्य माणसांची भाषा, रोजच्या जीवनातले प्रसंग व अतिसामान्य कष्टकरी, कामकरी जीवन ( उदा., ‘ द सॉलिटरी रीपर ’ व ‘ लीच गॅदरर ’ ) यांतून अप्रतिम काव्य निर्माण केले. साधेसुधे ग्रामजीवन काव्यविषय म्हणून त्याला विशेषत्वाने भावले. अशा जीवनावस्थेत मानवी भावभावना निसर्गाच्या सुंदर व चिरंतन रूपांशी एकरूप होत असल्याची अनुभूती त्याने आपल्या काव्यातून प्रकट केली. वर्ड्स्वर्थचे निसर्गप्रेम व निसर्गसान्निध्यातून त्याला येणारा परतत्त्वानुभव ही स्वच्छंदतावादी वृत्तीची खास वैशिष्ट्ये त्याच्या काव्यातून प्रकर्षाने प्रतीत झाली तर कोलरिजने आपल्या काव्यातून अतर्क्य, विलक्षण गूढ अनुभूतींचे, तसेच अतिंद्रिय व अतिमानुष वृत्तिविशेषांचे स्वच्छंद चित्रण केले. त्याची ‘ द एन्शंट मरिनर ’ ही स्वच्छंदतावादी विशेषांनी युक्त अशी सर्वोत्कृष्ट कविता मानली जाते. कोलरिजने ‘ कल्पनाशक्ती ही सार्वभौम सर्जनशक्ती असून समग्र व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची द्योतक आहे ’, ही स्वच्छंदतावादी वाङ्मयीन भूमिका ठामपणे मांडून इंग्रजी समीक्षाविचारात क्रांती घडवून आणली. विल्यम ब्लेकची साक्षात्कारी अनुभूती, त्याने निर्मिलेले पर्यायी विश्व आणि मिथक सृष्टी हे स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे समर्थ प्रभावी आविष्कार म्हणता येतील. त्याची ‘ द टायगर ’ ही कविता सृष्टीच्या, जीवनाच्या गूढ रहस्याविषयी आश्चर्याने, कुतूहलाने, अविश्वासाने जे प्रश्न उपस्थित करते, ते स्वच्छंदतावादी वृत्तीचे निदर्शक होते. जॉन कीट्स हा स्वच्छंदतावादी पंथातील आणखी एक श्रेष्ठ इंग्रज कवी. त्याला प्राचीन ग्रीक संस्कृतीविषयी वाटत असलेले प्रेम हे स्वच्छंदीवृत्तीचे निदर्शक होते. कीट्सला सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजेच सौंदर्य असा अद्वैतरूपी साक्षात्कार झाला. ‘ ओड ऑन अ ग्रेशन अर्न ’ ह्या उद्देशिकेच्या अखेरीस त्याने सत्य व सौंदर्य यांच्या एकात्मतेवरील आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. ‘ ब्यूटी इज ट्रथ, ट्रथ ब्यूटी ’ किंवा ‘ अ थिंग ऑफ ब्यूटी इज अ जॉय फॉर एव्हर ’ ह्यांसारख्या त्याच्या सुभाषितवजा ओळी स्वच्छंदतावादी कला--वाङ्मयीन धारणेचा गाभा सूचित करणार्या आहेत. त्याची ही सौंदर्यासक्ती व उत्कट भावावस्था व्यक्त करणारी प्रतिमासृष्टी हे इंग्रजी स्वच्छंदतावादी चळवळीचे आणखी एक बलस्थान ठरले. काव्यात विचारांपेक्षा विशुद्ध संवेदनशीलतेला त्याने निर्णायक महत्त्व दिले. संपन्न प्रतिमांद्वारे घडवून आणलेली नाद, स्पर्श, गंधादी इंद्रिय-संवेदनाची उत्कट अभिव्यक्ती हा त्याच्या काव्याचा लक्षणीय विशेष स्वच्छंदतावादी वृत्तीचा निदर्शक आहे. शेलीच्या काव्यात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा मुक्त विकास दिसतो. आदर्शाची व मृत्यूची ओढ ही स्वच्छंदवृत्तीची लक्षणे शेलीच्या काव्यात मुख्यत्वे आढळतात. वर्ड्स्वर्थ व शेली हे दोघेही स्वच्छंदतावादी परंपरेतले प्रमुख कवी असले, तरी शेली वर्ड्स्वर्थच्या अगदी विरुद्ध म्हणजे विज्ञानप्रेमी होता. अनेक वैज्ञानिक संकल्पना त्याने आपल्या काव्यातून प्रतीकरूपात वापरल्या आहेत. गोल्डन ट्रेझरी या प्रातिनिधिक स्वच्छंदता-वादी काव्यसंग्रहात शेलीच्या पंधराच्या वर कविता समाविष्ट आहेत. त्याच्या काव्यात प्लेटोमत व क्रांतीचे तत्त्वज्ञान यांचेही तात्त्विक पडसाद दिसून येतात. लॉर्ड बायरनच्या काव्यात अभिजात व स्वच्छंद प्रवृत्तींचे अनोखे मिश्रण आढळते. ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यातला त्याचा सहभाग म्हणजे स्वच्छंदतावादी, स्वातंत्र्यप्रेमी वृत्तीला त्याने दिलेली कृतीची जोड म्हणता येईल. निराश मनःस्थितीचा तीव्र, प्रखर आविष्कार व स्वातंत्र्याचा अविरत, प्रामाणिक ध्यास ही त्याच्या स्वच्छंदतावादाची प्रधान वैशिष्ट्ये होत. चाइल्ड हॅरल्ड्स पिलग्रिमेज ( ४ खंड, १८१२—१८ ) ह्या खंडकाव्यातील ‘ उदास यात्रिका ’ ची प्रतिमा, तसेच डॉन वॉन ही नाय-काच्या अनेक साहसांची पद्यबद्ध कादंबरी ही बायरनच्या स्वच्छंदतावादी वाङ्मयीन आविष्काराची काही ठळक उदाहरणे.
सारांश, विल्यम ब्लेक, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स, बायरन हे इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायातील प्रमुख कवी आपापल्या काव्या-विष्कारांतून स्वच्छंदतावादाचे वेगवेगळे गुणविशेष प्रकट करीत असले, तरी त्यांचे निर्मितिसूत्र एकच असल्याचे जाणवते ते म्हणजे स्वतःच्या सर्जनशील कल्पनाशक्तीतून प्रतीत झालेले विश्वाचे भान ते आपल्या काव्यातून प्रकट करतात. कवीचे आत्मभान तरल व तीव्र संवेदनशील झालेले असून कल्पनेच्या, अंतःप्रेरणेच्या आधारे विश्वातील सर्व थरांवरचे अनुभव घेऊन त्याला आकार देण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, हे स्वच्छंदतावादी इंग्रजी काव्यातून जाणवते. यंत्रतंत्राधिष्ठित वैज्ञानिक सत्यांच्या स्पष्टीकरणापलीकडे असलेले सृष्टीचे रहस्य व त्यांतली अतिंद्रिय गूढता ही केवळ कल्पनाशक्तीनेच अवगत होऊ शकते व अंतःप्रेरणेच्या साहाय्याने ती कलाकृतीतून आविष्कृत करता येते, ही दृढ धारणा स्वच्छंदतावादानेच रुजवली. काव्याची आद्यशक्ती म्हणजे सर्जनशील कल्पनाशक्ती. त्यातून काव्याने अनुकृतींकडून आविष्काराकडे नव्या दिशेने वाटचाल केली, ती स्वच्छंदतावादी काव्यात ठळकपणे दिसते. विविध काव्यप्रकार — उदा., ⇨ बॅलड, ⇨ सुनीत, ⇨ गीत, ⇨ ओड ( उद्देशिका ), गूढकाव्य, दीर्घकाव्य, ⇨ भावगीत इ. — स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायात नव्याने उदयास आले वा विकसित झाले. तसेच स्वच्छंदतावादी काव्यात विविध भावावस्थांना — उदा., गूढानुभव, प्रणय, स्वातंत्र्यप्रेम, निसर्गप्रेम तसेच सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील विविध प्रकारच्या भावछटा यांना—काव्यरूपे लाभली. त्यांत सहजता व उत्स्फूर्तता, उत्कटता आणि प्रामाणिकपणा असल्याने ही स्वच्छंदतावादी कविता जनसामान्यांच्या अंतःकरणाला भिडली व अफाट लोकप्रिय ठरली. अशा प्रकारे अठराव्या–एकोणिसाव्या शतकांत इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादी कवींचे काव्य हे एक समृद्ध वाङ्मयीन दालन निर्माण झाले आणि त्याने एकूणच विश्वसाहित्य प्रेरित व प्रभावित केले.
इंग्रजी गद्य साहित्यातही स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे प्रभावी नानाविध आविष्कार दिसून येतात. ⇨ टॉमस कार्लाइल (१७९५—१८८१) याच्या सार्टोर रीसार्ट्स ( इं. शी. ‘द टेलर री-पॅच्ड’ ) या आलंकारिक व्यामिश्र गद्यशैलीतील ग्रंथावर जर्मन स्वच्छंदतावादाचा व विशेषतः ⇨ झां पाउल ह्या विख्यात जर्मन लेखकाचा प्रभाव जाणवतो. चिद्वादी तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीचे पडसादही कार्लाइलच्या लिखाणात उमटलेले दिसून येतात. ऐतिहासिक वीरांची गाथा असलेल्या हीरोज अँड हीरो-वर्शिप (१८४१) या ग्रंथातही कार्लाइलच्या स्वच्छंदतावादी विचारसरणीचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. सर वॉल्टर स्कॉटच्या ऐतिहासिक कादंबर्यांतून प्राचीन व मध्ययुगीन जीवनातील अनुभवांचे स्वच्छंदतावादी चित्रण आढळते. वेव्हर्ली (१८१४) या त्याच्या कादंबरीत स्वच्छंदतावादाची गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने प्रकटली आहेत.
ब्रिटिश स्वच्छंदतावादी संप्रदायात गॉथिक कादंबरी हा नवा प्रकार उदयाला आला. विल्यम बेकफोर्डची वॅथेक (१७८४), ॲन रॅडक्लिफची द मिस्टरीज ऑफ यूडोल्फो (१७९४), मॅथ्यू ल्यूइसची द मंक (१७९५) या कादंबर्या गॉथिकची उदाहरणे होत. गॉथिक कादंबर्या इंग्लंडमध्ये फार लोकप्रिय ठरल्या. ⇨ एमिली ब्राँटीची (१८१८—४८) वदरिंग हाइट्स (१८४७) व ⇨ शार्लट ब्राँटीची (१८१६—५५) जेन आयर (१८४७) या स्वच्छंदतावादी गॉथिक कादंबर्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. गॉथिक कादंबर्यांतून अनेकविध स्वच्छंदतावादी गुणधर्म उत्कटत्वाने व उत्कृष्ट रीत्या आविष्कृत झाले. अतिभौतिक ( सुपरनॅचरल ) अनुभवसृष्टी, तीव्रोत्कट भावनाविष्कारांवर भर, भूतकाळाबद्दल वाटणारी ओढ, दूरस्थ परक्या वातावरणाचे, पार्श्वभूमीचे चित्रण खिन्न, उदास, गूढ व आकर्षक व्यक्तिरेखा ( उदा., ‘ बायरनिक हिरो ’ ची श्रेष्ठ वीरनायकाची प्रतिमा ) ही ब्रिटिश गॉथिक कादंबर्यांची काही वैशिष्ट्ये स्वच्छंदतावादाची द्योतक आहेत. [⟶ इंग्रजी साहित्य ].
जर्मन स्वच्छंदतावाद : जर्मनी हे स्वच्छंदतावादी तत्त्वज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. स्वच्छंदतावादाच्या तात्त्विक विचारसरणीची मांडणी करण्यात जर्मन विचारवंतांचा वाटा मोठा आहे. १७९८ मध्ये बर्लिन येथे ⇨ लूटव्हिख टीक (१७७३—१८५३), श्लेगेल बंधू, ⇨ नोव्हालिस (१७७२—१८०१) प्रभृती साहित्यिकांनी स्वच्छंदतावादी संप्रदायाची स्थापना केली. आथेनेउम (१७९८—१८००) हे संप्रदायाचे मुखपत्रही चालू केले. स्वच्छंदतावादी जर्मन लेखक-विचारवंतांनी व्यक्तिस्वातंत्र्य हे एक मूलभूत तत्त्व मानले. त्यामागे व्यक्तिविकासाची समृद्ध, सर्वांगीण व प्रगल्भ जाणीव होती. काव्य ही मानवाची मातृभाषा होय, असे हेर्डर म्हणत असे. स्वच्छंदतावाद्यांना काव्य हे विश्वव्यापी तत्त्व वाटत होते व काव्याची अभिव्यक्ती सर्व जीवनक्षेत्रे व सर्व कलामाध्यमे यांतून करण्याची आंतरिक गरज वाटत होती. जर्मन स्वच्छंदतावादी विचारसरणीतून आत्मभानयुक्त सौंदर्यशास्त्र व काव्यशास्त्र प्रस्थापित झाले आणि त्यातून व्यक्तिनिष्ठ संवेदनशीलता व अतिशायी मर्मदृष्टी यांचे महत्त्व विवेकनिष्ठ अनुभवापेक्षा जास्त असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. जर्मन ⇨ अतिशायितावाद ( ट्रान्सेंडेंटॅलिझम ) व त्यातील तत्त्वज्ञानात्मक विचारसरणी स्वच्छंदतावादी तत्त्वप्रणालीला पायाभूत ठरली. इंद्रियगोचर विश्वापलीकडचे असे अस्तित्व आहे आणि तार्किक अनुमानाहून अन्य मार्गांनी ह्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला होऊ शकते किंवा त्याचा अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतो, ही अतिशायितावादाची सारभूत भूमिका होय. ⇨ इमॅन्युएल कांटच्या तत्त्वज्ञानात ह्या भूमिकेचा उगम आढळतो. कांटनंतरच्या ⇨ फिक्टे, ⇨ फ्रीड्रिख व्हिल्हेल्म योझेफ फोन शेलिंग व ⇨ हेगेल या जर्मन विचारवंतांनी जर्मन अतिशायितावादी तत्त्वज्ञानाची मांडणी केली. तसेच ⇨ लायप्निट्स, ⇨ आउगुस्ट व्हिल्हेल्म फोन श्लेगेल, सूलत्झर, ⇨ हेर्डर इ. विचारवंतांनं कलानिर्मितीच्या रहस्याचा शोध घेताना स्वच्छंदतावादी विचारसरणीला पूरक व पोषक अशी तत्त्वे मांडली. कला-कृती व यंत्र यांच्या निर्मितिप्रक्रिया ( उदा., कविता व घड्याळ ) पूर्णपणे भिन्न आहेत. कलाकृती ही स्वयंनिर्धारित, स्वायत्त व आंतरिक प्रेरणेने, सूत्राने निबद्ध अशी आकृती असते. तिच्यातील घटक व पूर्णाकृती यांचे अन्योन्य संबंध सेंद्रिय स्वरूपाचे असतात. एखाद्या रोपट्याच्या वाढीची नैसर्गिक प्रक्रिया व कलानिर्मितीची प्रक्रिया यांची तुलना केल्यास कलानिर्मितीचे स्वरूप स्पष्ट होऊ शकेल. शेलिंगच्या तत्त्वप्रणाली-मध्ये कल्पनाशक्तीचे एक सृजनशक्ती म्हणून जसे विवेचन येते तसेच कलेच्या आंतरिक अपरिहार्यतेचेही येते. साध्य व साधन यांची एकात्मता, स्वायत्तता, आंतरिक अपरिहार्यता, जाणीव व नेणीव यांचे अन्योन्यत्व अशा कलानिर्मितीच्या घटकांचा, कलाप्रक्रियेतील संकल्प-नांचा या तत्त्वज्ञांनी ऊहापोह केला. १८०१—१९०४ या दरम्यान ए. डब्ल्यू. श्लेगेलने बर्लिनमध्ये दिलेल्या व्याख्यानांतून लायप्निट्स, कांट,⇨ फ्रीड्रिख फोन श्लेगेल, शेलिंग या सर्वांच्या विचारांचा परामर्श घेऊन एक सुसूत्र स्वच्छंदतावादी कलामीमांसा रचण्याचा प्रयत्न केला. व्हिल्हेल्म व्हाकेनरोडरने प्रबोधनकालीन चित्रकारांविषयी लिहिताना ( ॲनेक्डोट्स,१७९७ ) नव-अभिजाततावादी विश्लेषणाची जागा भावनात्मक प्रतिसादाने घेतल्याचे म्हटले. कलानिर्मितीस त्याने पवित्र धर्मकृत्याचे स्थान दिले. श्लेगेल बंधूंनी मिथके, प्रतीके, उपरोध, कल्पनाशक्ती यांविषयी नव्या संकल्पना मांडल्या आणि कलानिर्मितीत मनाच्या तार्किक व अतार्किक अवस्थांचा संयोग घडून आला पाहिजे, अशी भूमिका मांडली. स्वच्छंदता-वादी विचारसरणीचा प्रमुख प्रवर्तक असलेल्या फ्रीड्रिख फोन श्लेगेलने भौतिक वास्तवाच्या तथ्यांतून, सर्जनशील कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आध्यात्मिक सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्वच्छंदतावादात केला जातो, अशी भूमिका मांडली. परिपूर्ण साहित्यकृती ही सांकेतिक नियमबद्ध वाङ्मयप्रकारांच्या [ झांर ( Genre ) थिअरी ] साचेबद्धतेपासून मुक्त असते आणि अशा साहित्यकृतीत काव्य, गद्य, समीक्षा व तत्त्वज्ञान यांचे एकजिनसी रसायन असते, अशी त्याची धारणा होती. नोव्हालिसचे ह्युमनेन आन डी नाख्ट (१८००, ‘ रात्रसूक्ते ’) हे गद्यकाव्य अशा मिश्रणाचे उदाहरण मानता येईल. इंग्रजी वाङ्मयातले सर्वपरिचित उदाहरण म्हणजे कार्लाइलचे सार्टोर रीसार्ट्स त्यातही अनेक वाङ्मयप्रकारांच्या मिश्रणातून साकारलेली एकात्म कलाकृती प्रत्ययास येते. ⇨ फ्रीड्रिख श्लायरमाखर या ईश्वरविद्या-वेत्त्याने धर्मविचारात व्यक्तिवादाचे स्वच्छंदतावादी तत्त्व प्रभावीपणे मांडले. अशाप्रकारे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत जर्मन स्वच्छंदतावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो.
जर्मन साहित्यातही स्वच्छंदतावादाचे वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनीयुक्त असे समृद्ध आविष्कार दिसून येतात. गटे या श्रेष्ठ जर्मन साहित्यिकाच्या द सॉरोज ऑफ यंग वेर्थर (१७७४ इं. भा. ) या कादंबरीमध्ये जर्मन स्वच्छंदतावादी कल्पनांचे मूलादर्श आढळतात. अतिसंवेदनशील कविमनाच्या वेर्थरचे असफल प्रेम, हळव्या तरुण प्रेमाचे श्रेष्ठत्व, वैफल्यात असल्याची उत्कट भावना यांचे पत्ररूप चित्रण या कादंबरीत आढळते. ⇨ लूटव्हिख टीक हा जर्मन स्वच्छंदतावादी चळवळीतील प्रमुख आद्य साहित्यिक. कादंबर्या, नाटके, समीक्षा,परीकथा इ. विविध प्रकारच्या लेखनातून त्याने स्वच्छंदतावादी आविष्कार घडवले. त्याची डी गेशिश्ट डेस हेर्न विलिअम लोव्हेल (३ खंड, १७९५-९६, इं. शी. ‘ द स्टोरी ऑफ मिस्टर विल्यम लव्हेल ’) ही पत्ररूप कादंबरी जर्मनीतील स्वच्छंदतावादाचा उदय सूचित करते. एका हळव्या, बुद्धिमान तरुणाच्या नैतिक आत्मनाशाचे या कादंबरीत चित्रण आहे. टीकची डेअर ब्लोंड एकबेर्ट ही स्वच्छंदतावादी परीकथा निसर्ग व मानवी संबंध ह्यांतील गूढ नात्याचे चित्रण करते. श्लेगेल बंधू ह्या मान्यवर स्वच्छंदतावादी समीक्षकांनी तिची प्रशंसा केली. त्याने काही निखळ स्वच्छंदतावादी पद्यनाटकेही लिहिली. व्हिल्हेल्म व्हाकेनरोडर ह्या त्याच्या समकालीन साहित्यिक मित्राने स्वच्छंदतावादी कलासंकल्पनाविषयक छोटे पुस्तक लिहिले, त्यातही टीक याने काही लेख लिहिले (‘ ए फ्यूजन्स ऑफ ॲन आर्टलव्हिंग फ्रायर ’- ‘ कलाप्रेमी भिक्षूचा मुक्त लेखनप्रवाह ’, १७९७). ईश्वराचे गुणगान गात चित्रशिल्पादी कलाकृती निर्मिणार्या मध्ययुगीन, प्रबोधनकालीन कलावंतांना त्याने संतपद बहाल केले. फ्रीड्रिख श्लेगेलने लुसिंडऽऽ (१७९९, इं. भा. १९१३—१५) ही कादंबरी लिहून भावविवशतेचा व मुक्त प्रेमाचा स्वच्छंद उद्घोष केला. नोव्हालिस या श्रेष्ठ स्वच्छंदतावादी भावकवीची ‘ रात्रसूक्ते ’ ही उत्कट स्वच्छंदवृत्तीची निदर्शक आहेत. तसेच त्याची हायन्रिश फोन ओफ्टरडिंगेन (१७९९-१८००) ही कादंबरी स्वच्छंदतावादी संप्रदायातील वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृती मानली जाते. अप्राप्य ध्येयासाठी झुरणे ही स्वच्छंदतावादी प्रवृत्ती या कादंबरीत ‘ नीलपुष्प ’ या प्रतीकाद्वारे सूचित केली आहे. ⇨ फ्रीड्रिख हल्डरलीन (१७७०—१८४३) ह्या भावकवीचे आत्मनिष्ठ काव्य स्वच्छंदतावादाला जवळचे होते. प्राचीन ग्रीक अभिजात काव्याचा आदर्श त्याच्यासमोर होता. तसेच प्राचीन ग्रीसच्या दूरस्थ व परस्थ आदर्श सांस्कृतिक वैभवाचे स्वप्नमग्न आकर्षण आणि ते वैभव सद्यस्थितीत प्रत्यक्षात येत नसल्याची खंत व नैराश्य ही स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये त्याच्या काव्यातून प्रतीत होतात.
जर्मन स्वच्छंदतावादी वाङ्मयाचे दुसरे पर्व १८०६ च्या सुमारास हायड्लबर्ग येथे सुरू झाले. ब्रेन्टानो (१७७८—१८४२), आर्निम (१७८१—१८३१) व गरेस (१७७६—१८४८) या साहित्यिकांनी या चळवळीचे नेतृत्व केले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वच्छंदता-वादाला प्रखर राष्ट्रवादाचे प्रभावी परिमाण प्राप्त करून देण्यात या साहित्यिकांचा मोठा वाटा होता. आपल्या कलाजाणिवांची प्रचलित काळाशी सांगड घातल्याने जर्मन लोकजीवनावर त्यांचा गहिरा प्रभाव पडला. इतिहासग्रंथ लिहून त्यांनी जर्मन जनतेत देशाच्या इतिहासाचे भान जागृत केले. लोकसाहित्य, लोकगीते यांचे संकलन करून तो ठेवा त्यांनी जतन केला. परीकथा, लोककथा यांच्या संशोधन-संकलनात ⇨ याकोप ग्रिम व व्हिल्हेल्म ग्रिम या बंधूंनी केलेली कामगिरी अजोड अशीच आहे. लोकसाहित्याच्या या संकलनातून स्वच्छंदतावादी वाङ्मयाला कच्ची सामग्री भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली. ⇨ इ. टी. ए. होफमानच्या (१७७६—१८२२) भयप्रद व वैचित्र्यपूर्ण कथांनी जर्मन स्वच्छंदतावादी साहित्यात मोलाची भर घातली. तसेच ⇨ हाइन्रिख हाइन (१७९७—१८५६) ह्या कवीच्या काव्यातील विशुद्ध भावनांची उत्कट अभिव्यक्ती व भव्योदात्ततेचा प्रत्यय हे स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये दर्शविणारे विलोभनीय गुण आहेत. या दृष्टीने त्याची भावकाव्ये व कृतक महाकाव्य ( मॉक एपिक ) विशेष उल्लेखनीय आहेत. जर्मन स्वच्छंदतावाद ही आत्मजाणिवेने संपन्न व समृद्ध अशी प्रभावी वाङ्मयीन चळवळ असल्याचे ह्या साहित्याने सिद्ध केले आहे. [⟶ जर्मन साहित्य ].
जर्मनीमध्ये राजकीय क्षेत्रातही स्वच्छंदतावादी वृत्तीचे पडसाद उमटलेले दिसून येतात. नव्या स्वच्छंदी, व्यक्तिवादी जाणिवेतून, अस्मितेतून बिस्मार्कच्या प्रधानमंत्रिपदाच्या काळात नवा सुसंघटित जर्मनी उदयाला आला. अनेक लहानमोठी राज्ये एकत्र येऊन आधुनिक जर्मनीचा उदय झाला. स्वच्छंदतावादाचा हा राजकीय आविष्कार म्हणता येईल. आज काही समाजशास्त्रज्ञ, विचारवंत फॅसिझमची मुळे या स्वच्छंदतावादात होती, असे प्रतिपादन करतात.
फ्रेंच स्वच्छंदतावाद : ⇨ रूसो (१७१२—७८) हा फ्रेंच स्वच्छं-दतावादी चळवळीचा आद्य प्रवर्तक मानला जातो. त्याच्या ‘ उदात्त आदिमते ’च्या ( नोबेल सॅव्हेज ) व ‘ सामाजिक करारा ’च्या ( सोशल काँट्रॅक्ट ) संकल्पनांनी फ्रेंच स्वच्छंदतावादाची तात्त्विक पार्श्वभूमी सिद्ध केली. मानवाची आदिम, संस्कृतिपूर्व अवस्था उदात्त असते व मानवी संस्कृती या अवस्थेला भ्रष्ट करीत असते, असे प्रतिपादन रूसोने केले. आदिम अवस्थेमध्ये मानवी मन तर्कशुद्ध, संकल्पनानिष्ठ भाषा वापरत नाही तर रूपके, प्रतीके यांची भाषा वापरत असते. काव्य हा आदिम मनाचा उद्गार असतो, हा सिद्धांत स्वच्छंदतावादात केंद्रिभूत ठरला. तसेच आदिमता हे स्वच्छंदतावादी कला-साहित्याच्या निर्मितीत महत्त्वाचे मूल्य मानले गेले. हा रूसोच्या विचारांचा प्रभाव होता. व्यक्तिस्वातंत्र्य हे रूसोने पुरस्कारलेले मूल्यही स्वच्छंदतावादाला पोषक ठरले. शिवाय रूसोने स्वतः काही स्वच्छंदतावादी वळणाच्या कादंबर्याही लिहिल्या.
रूसो हा जरी फ्रेंच स्वच्छंदतावादाचा पूर्वसूरी असला, तरी फ्रान्समध्ये प्रत्यक्षात स्वच्छंदतावादी चळवळ काहीशी उशिरानेच फोफावली. ⇨ फ्रांस्वा शातोब्रीआं (१७६८—१८४८) हा फ्रेंच कादंबरीकार स्वच्छंदतावादाचा उद्गाता होता. त्याच्या आताला (१८०१) व रने (१८०२) ह्या स्वच्छंदतावादी कादंबर्या होत. त्याने रंगविलेला स्वच्छंदी वृत्तीचा अस्वस्थ, निराश तरुण ‘ रने ’ हा स्वच्छंदतावादी फ्रेंच नायकाचा उत्तम नमुना होता व पुढील कादंबर्यांमधील नायकाची आदर्श प्रतिमा ( रोल मॉडेल ) त्यात आद्यरूपात आढळते. ‘ आन्वी ’ (ennui) ही खिन्न मनःस्थितीतील ग्लानीची अवस्था, स्मृतिरंजन ( नॉस्टाल्जिआ ), दूरस्थ परक्या स्थळांचे व गूढतेचे आकर्षण ही स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये या कादंबर्यांत बीजरूपाने होती. ती पुढील स्वच्छंदतावादी फ्रेंच वाङ्मयात विकसित, वृद्धिगंत झाली. ⇨ मादाम द स्ताल (१७६६—१८१७) ह्या फ्रेंच लेखिकेने लिहिलेल्या द लालमाग्न्य (१८१०, इं. शी. ‘ ऑन जर्मनी ’) या पुस्तकात रंगविलेल्या आदर्श जर्मनीच्या प्रतिमाचित्रामुळे फ्रेंच लेखकांत जर्मन स्वच्छंदतावादाविषयी आकर्षण निर्माण झाले. तसेच द ला लितेरात्यूर (१८००, इं. शी. ‘ ऑन लिटरेचर ’) या पुस्तकात अभिजात व स्वच्छंदतावादी काव्यवैशिष्ट्यांचे तुलनात्मक साम्यभेदांचे विवेचन केले होते, तेही महत्त्वाचे ठरले. तिने दोन अंशतः आत्मचरित्रात्मक कादंबर्याही लिहिल्या ( देल्फीन, १८०२ व कॉरीन, १८०७ ) त्यांतही स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये आढळतात.
फ्रेंच स्वच्छंदतावादी वाङ्मयीन चळवळीचे नेतृत्व ⇨ व्हिक्टर ह्यूगो (१८०२—८५) ह्या ख्यातनाम साहित्यिकाने केले. यॅर्नानी या त्याच्या नाटकाचा पहिला प्रयोग १८३० मध्ये झाला व त्याने अभिजाततावादी नाट्यरचनेची बंधने तोडून स्वच्छंदतावादी मुक्तनाट्याची नांदी केली. अभिजात व स्वच्छंदी वृत्तींतील हे द्वंद्व फ्रेंच रंगभूमीवर पुढेही काही काळ चालूच राहिले. कवी, नाटककार व कादंबरीकार या त्रिविध नात्यांनी त्याने फ्रेंच स्वच्छंदतावादी चळवळीत जोम व नवचैतन्य निर्माण केले. त्याच्या नॉत्र-दाम द पारी (१८३१) व ले मिझेराब्ल (१८६२) या कादंबर्यांनी स्वच्छंदतावादाचे नवे युग निर्माण केले. त्याच्या क्रॉम्वेल (१८२७) या नाटकाला त्याने लिहिलेली प्रस्तावना म्हणजे फ्रेंच स्वच्छंदतावादी चळवळीचा मूळ दस्तऐवज मानला गेला. ⇨ आल्फ्रेद व्हीक्तॉर द व्हीन्यी (१७९७—१८६३) हा स्वच्छंदतावादी फ्रेंच कवी, कादंबरीकार व नाटककार ह्यूगोच्या बरोबरीनेच स्वच्छंदतावादी चळवळीचा अग्रणी मानला जातो. त्याच्या सँ मार (१८२६) या ऐतिहासिक कादंबरीतून, शोतेताँ (१८३५ इं. शी. ‘चॅटरटन’) या नाटकातून व शेक्सपिअरच्या नाटकांच्या फ्रेंच रूपांतरांतून स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये दिसून येतात. ⇨ आल्फ्रेद द म्यूसे (१८१०—५७) ह्या भावकवीची ले न्युई (१८३५—३७ इं. शी. ‘द नाइट्स’) ही सुंदर प्रेमगीतांची मालिका स्वच्छंदतावादी गुणवैशिष्ट्यांनी युक्त आहे. म्यूसेची स्वच्छंदतावादी जीवनदृष्टी म्हणजे आदर्श जीवनानंदाचा शोध घेणे व असा आनंद न मिळाल्यास तितक्याच तीव्र दु:खात बुडून जाणे, अशा प्रकारची होती. ⇨ शार्ल-ऑग्यूस्तँ सँत-बव्ह (१८०४—६९) हा स्वच्छंदतावादी पंथाचा प्रमुख समीक्षक होता. त्याचा लिटररी पोटर्र्ट्स (१८३२—३९) हा एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच स्वच्छंदतावादी समीक्षेचा प्रातिनिधिक ग्रंथ मानला जातो. ⇨ बाल्झॅक (१७९९—१८५०) हा प्रख्यात फ्रेंच कादंबरीकारही सुरुवातीच्या काळात स्वच्छंदतावादाच्या प्रभावाखाली होता. सर वॉल्टर स्कॉटच्या अनुकरणातून त्याने काही स्वच्छंदतावादी वळणाच्या कादंबर्या लिहिल्या. उदा., ले श्वां (१८२९ इं. भा. द लास्ट श्वान ). पुढे फ्रेंच वास्तववादी कादंबरीचा जनक म्हणून तो नावारूपाला आला. फ्रेंच स्वच्छंदतावादाचा परिपूर्ण आविष्कार ⇨ शार्ल बोदलेअरच्या (१८२१—६७) ले फ्लर द्यू माल (१८५७ इं. भा. फ्लॉवर्स ऑफ ईव्हिल ) या काव्यसंग्रहात आढळतो. बोदलेअरप्रणीत हा स्वच्छंदतावाद पुढे ⇨ प्रतीकवादात परिणत झाला. अनेक प्रतीकवादी कवींच्या काव्यातून स्वच्छंदतावादी वृत्तिविशेष नवनव्या विविध रूपांत आढळतात. यूरोपीय स्वच्छंदतावादाची फ्रान्स ही एका अर्थी जन्मभूमी मानता येईल. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, साहित्य यांच्या बरोबरीनेच स्वच्छंदतावादाचा रोमांचकारी ऐतिहासिक आविष्कार फ्रेंच राज्यक्रांतीच्या रूपाने घडून आला. फ्रेंच राज्यक्रांतीची स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये म्हणजे व्यक्तिवादी, लोकशाही तत्त्वज्ञानाचीच त्रिसूत्री होती. १७९१ मध्ये राजकीय संविधान तयार करण्यात आले. ही फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण होते. या राज्यक्रांतीला स्वच्छंदतावादी विचारसरणीचे व्यापक पायाभूत अधिष्ठान होते. [⟶ फ्रेंच साहित्य ].
अमेरिकन स्वच्छंदतावाद : अमेरिकेत स्वच्छंदतावादी वाङ्मयीन चळवळ १८२० — ६५ या काळात जोमाने फोफावली. या चळवळीच्या प्रेरणा व प्रभाव बाहेरच्या देशांतून आले होते. ⇨ जेम्स फेनिमोर कूपर (१७८९—१८५१) या अमेरिकन कादंबरीकाराने ‘ लेदर-स्टॉकिंग टेल्स ’ (१८२३—४१) ही पाच कादंबर्यांची मालिका लिहिली. तीत स्वच्छंदतावादी लक्षणे प्रकर्षाने आढळतात. अमेरिकन जीवनानुभवांना मिथकाचा आकार देणार्या त्याच्या कादंबर्यांवर स्कॉटचा प्रभाव जाणवतो. ⇨ एडगर ॲलन पो (१८०९—४९) हा सर्वांत प्रभावी व प्रमुख अमेरिकन कवी, कथाकार व समीक्षक होय. बायरन, शेली आणि कोलरिज या इंग्रज स्वच्छंदतावादी कवींचा प्रभाव त्याच्या सुरुवातीच्या काव्यावर होता पण पुढे काव्याविषयी आपली स्वतंत्र भूमिका त्याने मांडली : भावकाव्य हेच खरे काव्य सौंदर्य हाच कवितेचा खरा प्रांत सौंदर्याची लयतालबद्ध निर्मिती म्हणजे कविता विषण्णता हाच कवितेचा खरा सूर आणि हरपलेले श्रेय हाच काव्याचा श्रेष्ठ विषय यांसारखी त्याची समीक्षातत्त्वे स्वच्छंदतावादास पूरक व पोषक ठरली. भयकथा व गुप्तहेरकथा या प्रकारांचा तो प्रणेता मानला जातो. टेल्स ऑफ द ग्रोटेस्क अँड ॲरबेस्क (१८४०) हा त्याचा गाजलेला कथासंग्रह. त्याच्या कथा प्रतीकात्मक आहेत. वाच्यार्थाखालून वाहणार्या सूचक ध्वन्यर्थाचा अंतःस्रोत ललित साहित्याच्या रचनाबंधनातून प्रतीत व्हावा, अशी त्याची भूमिका होती. मृत्यू आणि विनाश यांच्याशी अटळ नियतीने बांधल्या गेलेल्या पार्थिवतेतून मुक्त होऊन, स्वप्नाच्या वाटेने काही क्षण तरी अतिमानुष सौंदर्याचा अनुभव घेण्याची आकांक्षा त्याच्या कथांतून सूचित होते. त्याच्या कथांतून जाणवणारा हा रूपकार्थ स्वच्छंदतावादाचा निदर्शक आहे. अमेरिकेचा अत्यंत लोकप्रिय कवी ⇨ लाँगफेलो (१८०७—८२) ह्याने लिहिलेली इव्हँजेलिन : ए टेल ऑफ अकेडी (१८४७) सारखी ऐतिहासिक कथनकाव्ये, द साँग ऑफ हायावाथा (१८५५) हे विशेष गाजलेले कथनकाव्य व त्याची आत्यंतिक आत्मनिष्ठ सुनीते ह्यांतून स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे विविध आविष्कार दिसून येतात. त्याची कविता अत्यंत हळवी, भावविवश असली, तरी स्वच्छंदतावादाचे अनेक वैशिष्ट्य-पूर्ण घटक बहुजनांपर्यंत पोहोचवण्यात व लोकप्रिय करण्यात ह्या कवितेचा मोठा वाटा आहे. ⇨ राल्फ वॉल्डो एमर्सन (१८०३—८२) व ⇨ हेन्री डेव्हिड थोरो (१८१७—६२) यांनी जर्मन अतिशायितावादाच्या प्रभावातून अमेरिकन स्वच्छंदतावादी विचारसरणी मांडली. एमर्सन व थोरो अति-शायितावादी तत्त्वज्ञानाचे प्रमुख अमेरिकन प्रतिनिधी. इंद्रियगोचर विश्वा-पलीकडे असलेल्या अस्तित्वाचा तार्किक अनुमानांहून भिन्न अशा मार्गांनी शोध घेणे, ही अतिशायितावादाची भूमिका स्वच्छंदतावादी तत्त्वज्ञानाच्या मूळाशी होती. आत्यंतिक आत्मनिष्ठा, विवेकापेक्षा भावनेचे मोल अधिक मानणे, उत्कट निसर्गप्रेम ही स्वच्छंदतावादी साहित्याची तात्त्विक मूल्ये अतिशायितावादी विचारसरणीतून उत्क्रांत झाली. एमर्सनच्या अतिशायिता-वादी तत्त्वज्ञानाचा परिपाक त्याच्या नेचर (१८३६) मध्ये दिसतो. त्याच्यावर कार्लाइल, वर्ड्स्वर्थ व कोलरिज यांचा प्रभाव होता. त्याने स्वच्छंदतावादी अतिशायी तत्त्वज्ञान जसे जर्मन प्रभावातून मांडले, तसेच इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्याच्या प्रभावातून स्वच्छंदतावादी वळणाच्या कविताही लिहिल्या. कला-वाङ्मयातील सेंद्रिय घाटाची ( ऑर्गॉनिक फॉर्म ) संकल्पना त्याने मांडली. मानवी श्रेष्ठत्वाची मीमांसा त्याने कार्लाइल-प्रमाणेच आपल्या ‘ रेप्रेझें टेटिव्ह मेन … ’ (१८५०) मधून केली. एमर्सनने केलेला भारतीय तत्त्वज्ञानाचा गौरव व त्याने लिहिलेली ‘ ब्रअ ’ सारखी कविता यांमुळे भारतीय राष्ट्रीय विचारसरणीच्या प्रभावकाळात अनेक भारतीय लेखक-विचारवंत त्याच्या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाले. थोरोने वाल्डेन (१८५४) मधून अतिशायी तत्वज्ञानानुसार प्रत्यक्ष निसर्गसान्निध्यात जगलेल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचा अत्यंत उत्कट आविष्कार घडवला. एमर्सन व थोरो यांच्या उत्कट व विशुद्ध निसर्ग-प्रेमातूनच पुढे विसाव्या शतकात पर्यावरणीय संस्कृतीला आणि आंदो-लनाला चालना मिळाली. ⇨ नथॅन्यल हॉथॉर्न (१८०४—६४) या अमेरिकन लेखकाने आपल्या कथा-कादंबर्यांतून रूपक-प्रतीकांचा सढळ वापर करून प्यूरिटन प्रवृत्तींचा संघर्ष रंगवला. गुंतागुंतीचा प्रतीकात्मक आकृतिबंध असलेल्या त्याच्या कादंबर्या अमेरिकन स्वच्छंदतावादी चळवळीत महत्त्वपूर्ण ठरल्या. द स्कारलेट लेटर (१८५०) या त्याच्या प्रमुख कादंबरीचा उल्लेख उदाहरणादाखल करता येईल. आनुवंशिक अपराधभाव, पातक व नैतिकता ह्या विषयांचा वेध त्याने रूपक--प्रतीकांद्वारे आपल्या कादंबर्यांतून घेतला. ⇨ हर्मन मेल्व्हिलची (१८१९—९१) मोबी डिक (१८५१) ही प्रतीकरूपाने जीवनसंघर्षातील मूलभूत तत्त्वांचे दर्शन घडविणारी महान कादंबरी अमेरिकन स्वच्छंदता-वादाचा मानदंड ठरली. तसेच सर्वश्रेष्ठ मानला गेलेला अमेरिकन कवी ⇨ वॉल्ट व्हिटमन (१८१९—९२) याचा आत्माभिव्यक्तीचे सामर्थ्यशाली दर्शन घडविणारा लीव्ह्ज ऑफ ग्रास (१८५५) हा काव्यसंग्रह स्वच्छंदता-वादाचे सर्व गुणधर्म उत्कटतेने व प्रभावीपणे प्रकट करणारा आहे. त्यातील कवितांमध्ये स्वरांच्या आरोहावरोहांनी ( केडेन्स ) युक्त अशी मुक्तछंदात्मक प्रवाही लय आहे व्यक्तिवादी तत्त्वाचा प्रभावी आविष्कार आहे, स्वातंत्र्याचे उत्कट प्रेम व आत्माविष्काराची उसळती ऊर्मी आहे. थोडक्यात, स्वच्छंदतावादाचे मूलघटक त्याच्या काव्यात प्रकर्षाने व सारसत्त्वरूपाने प्रकटले आहेत.
स्वच्छंदतावादाचे उत्तरकालीन आविष्कार : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपीय कला-वाङ्मयविश्वातील स्वच्छंदतावादाचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. स्वच्छंदतावादातील तीव्रोत्कट भावनाविष्कार, तसेच कलाविष्कारातील आकारिक साचेबद्धता व नियमांची सांकेतिकता या मर्यादा झुगारून देण्याची स्वच्छंदवृत्ती ह्या वैशिष्ट्यांच्या अतिरेकातच स्वच्छंदतावादाच्या भ्रष्टतेची व विनाशाची बीजे दडली होती. स्वच्छंदता-वादाच्या दुसर्या फळीतले लेखक सामान्य प्रतिभेचे व कमी कुवतीचे होते. त्यांच्या हाती स्वच्छंदतावादी वृत्तीची अतिरेकी शस्त्रे गेल्याने ती विनाशकारी ठरली. शिवाय एकोणिसावे शतक हे वैज्ञानिक प्रगतीचे शतक होते. वर्ड्स्वर्थने असे भाकित केले होते, की उद्याचा कवी विज्ञानाचा उपयोग स्वतःच्या सर्जनशील निर्मितीच्या उद्दिष्टांसाठी करून घेईल पण दुर्दैवाने हे भाकित खरे ठरले नाही, उलट विरोधी व विपरीत परिस्थिती निर्माण झाली कारण, वैज्ञानिक प्रगतीबरोबरच जडवाद, व्यवहारवाद, प्रत्यक्षार्थवाद अशा तात्त्विक विचारसरणी विकसित होत गेल्या आणि त्या स्वच्छंदतावादी अतिशायी तत्त्वज्ञानाला व ऐंद्रिय, भौतिक जगापलीकडील सर्जनशील कल्पनासृष्टीच्या सार्वभौमत्वावर भर देणार्या विचारसरणीला मारक ठरल्या.
लोकशाहीतील सामान्य माणसाच्या प्रगतीचे स्वच्छंदतावाद्यांनी जरी स्वागत केले, तरी त्यातून उद्भवलेल्या सामाजिक समस्यांच्या जबरदस्त रेट्याने स्वच्छंदतावादाची पाळेमुळे उखडून टाकली. उपयुक्ततावादाच्या वाढत्या प्रभावाने ‘कलेसाठी कला’ हे स्वच्छंदतावादी तत्त्वज्ञान मोडीत काढले. हे वास्तवापासूनचे पलायन मानले गेले. कलावंताने सामान्य माणसाप्रमाणेच उन्हातान्हात शेतामातीत राबले पाहिजे व ह्या दैनंदिन काबाडकष्टांतूनच आपली कला फुलवली पाहिजे, हे कलानिर्मितीचे रोखठोक व कठोर वास्तववादी तत्त्वज्ञान आकाराला आले व ते स्वच्छंदतावादाला मारक ठरले. अमेरिकन इतिहासकार झाक बार्झनने असे विधान केले, की बायरनचा स्वच्छंदतावादी महानायक ( रोमँटिक हीरो ) हा ‘ फेबिअन सोसायटी ’मध्ये ( इंग्लंडमध्ये १८८४ मध्ये स्थापन झालेली समाजवादी संघटना ) विसंगतच ठरेल .
इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात, फ्रान्समध्ये १८६० च्या दशकात व अमेरिकेत नागरी युद्धोत्तर काळात स्वच्छंदतावादाच्या विरोधातले हे घटक प्रभावी व शक्तिशाली ठरले. त्याच वेळी दुय्यम दर्जाच्या लेखकांनी स्वच्छंदतावादी मूल्यांच्या अतिरेकातून व विपर्यासातून या चळवळीचा घात घडवून आणला. परिणामी स्वप्नरंजित आदर्शवादी साहित्याकडून वस्तुस्थितिदर्शी वास्तववादी साहित्याकडे वाटचाल होत गेली. ह्या नव्या वास्तववादी चळवळीत अतिशायी तत्त्वाची जागा जड भौतिकवादाने घेतली. व्यक्तिवादी मूल्ये लोप पावून त्या जागी समूहजीवनाची लोकशाही मूल्ये प्रस्थापित झाली. स्थलकालातीत, तसेच दूरस्थ व परस्थ गूढ प्रदेशांच्या आकर्षणाची जागा ‘ इथे आणि आता ’ या तात्कालप्रत्ययी वर्तमान जीवनमूल्यांनी घेतली. आध्यात्मिकतेची जागा उपयुक्ततावादाने घेतली. परिणामी स्वच्छंदतावाद सुप्तावस्थेत गेला पण ही दीर्घ निद्रा होती, मृत्यू नव्हता. विसाव्या शतकात स्वच्छंदतावादाला नवे चैतन्य लाभून त्याचे जोमाने पुनरागमन झाले. व्यक्तिवादी मूल्यांविषयी निष्ठा आणि नियम, निर्बंध, व्यवस्था व त्यातले संकेत, विवेकवाद, आकारिक साचेबद्धता या सर्वांविरुद्ध बंडखोरी व त्यातून मिळवलेले मुक्त, अनिर्बंध स्वातंत्र्य ही स्वच्छंदतावादी मूल्ये पुनःप्रस्थापित होत गेली. आज जगभरातील कला--वाङ्मयीन आविष्कारांत जिथे जिथे म्हणून व्यक्तिनिष्ठेला मूल्यगर्भ प्रतिष्ठा लाभली आहे कला-वाङ्मयीन आकारिक घटकांमध्ये, घाटांमध्ये उत्स्फूर्त प्रयोगशीलता व प्रतीकवादी आविष्कार दिसत आहेत त्यांतली तीव्रोत्कट अंतर्मुख संवेदना प्रत्ययास येत आहे, अशा सर्व कला-वाङ्मयीन सर्जनशील निर्मितीतून स्वच्छंदतावादाचे जोमाने व नव्या सामर्थ्याने पुररुज्जीवन घडत आहे, असे म्हणता येईल. प्लेटोमत व जर्मन अति-शायितावाद ह्या पूर्वोक्त स्वच्छंदतावादी तात्त्विक विचारसरणींची जागा विसाव्या शतकात अस्तित्ववादासारख्या तत्त्वप्रणालींनी घेतली आहे मात्र त्यामागील पायाभूत मूल्यांचे अधिष्ठान पूर्वी जसे होते तसेच आजही कायम राहिले आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत स्वच्छंदतावादाच्या नावाखाली ज्या बौद्धिक लढाया, ज्या संकल्पनांच्या आयुधांनिशी लढल्या गेल्या त्याच बौद्धिक लढाया त्याच संज्ञांच्या शस्त्रांसह, थोड्याफार फरकाने आजच्या वाङ्मयातही खेळल्या जात आहेत, असेही म्हणता येईल.
स्वच्छंदतावादी मराठी साहित्य : मराठी काव्याच्या क्षेत्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वच्छंदतावादाचे नवे युग अवतरले, ते प्रामुख्याने इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्याच्या प्रभावातून. मुख्यत्वे फ्रान्सिस टर्नर पालग्रेव्ह यांनी संपादिलेल्या गोल्डन ट्रेझरी (१८६१) या प्रातिनिधीक स्वच्छंदतावादी काव्यसंग्रहाच्या प्रभावातून मराठी स्वच्छंदतावादी काव्यपर्वाची जडण-घडण होत गेली. ⇨ महादेव मोरेश्वर कुंटे यांनी राजा शिवाजी (१८६९) या त्यांच्या काव्याला जी इंग्रजी विवेचक प्रस्तावना जोडली, त्यात स्वच्छंदतावादाला पोषक अशी तात्त्विक पार्श्वभूमी विशद केली होती. कवितेत संस्कृत पंडिती भाषेऐवजी साधी, सहज, नित्याच्या व्यवहारातील भाषा वापरावी, असा कुंटे यांचा दृष्टिकोण स्वच्छंदतावादी शैलीला प्रेरक ठरला. आपल्या प्रस्तावनेत कुंटे यांनी विविध पश्चिमी काव्यप्रकारांचा परिचय करून दिला. स्वतःच्या काव्यशैलीचे वर्णन त्यांनी ‘ रोमँटिक स्टाइल ’ असे केले आहे. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनीही रोमँटिसिझमच्या वैशिष्ट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या आद्य पर्वात केला. ह्याच काळात इंग्रजी कवितांची विपुल प्रमाणात मराठी भाषांतरे झाली. विशेषतः ⇨ विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी विल्यम ब्लेक, कीट्स, स्कॉट, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, ब्राउनिंग, बायरन, टेनिसन, लाँगफेलो इ. कवींच्या काव्याची मराठी भाषांतरे केली व ही आत्मपर भावकविता कुसुमांजली (१८८५) संग्रहाच्या रूपाने मराठीत आणली. ती स्वच्छंदता-वादी मराठी काव्याच्या विकासाला पोषक ठरली. जुन्या धर्मप्रधान समाजव्यवस्थेत वाङ्मयनिर्मितीत आलेली जडता व निर्जीवता, तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व त्यावरील निर्बंध यांविरुद्ध बंडखोरीची भावना ह्या इंग्रजी काव्याच्या प्रभावातून मराठी कवितेत रुजली आणि व्यक्तिवादी दृष्टिकोण व उत्कट, प्रबळ भावभावनांचा आत्माविष्कार ही स्वच्छंदता-वादाची प्रमुख वैशिष्ट्ये काव्यातून जोपासली गेली.
मराठी काव्यातील स्वच्छंदतावादी युगाचे आद्य प्रवर्तक म्हणून कवी ⇨ केशवसुत (१८६६—१९०५) ओळखले जातात. त्यांच्याबरोबरच गोविंदाग्रज, बालकवी, भा. रा. तांबे, रेव्हरंड टिळक इ. कवीही मराठी काव्यात स्वच्छंदतावादाची प्रतिष्ठापना करणारे प्रमुख कवी मानले जातात. तसेच त्यांच्या आगेमागे लिहिणारे चंद्रशेखर, रेंदाळकर, बी या कवींच्या काव्यातही स्वच्छंदतावादाच्या नव्या प्रभावाची चाहूल दिसते. ह्या सर्व कवींच्या काव्यात स्वच्छंदतावादाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे, प्रवृत्ति-विशेषांचे दर्शन घडते. त्यामुळे या कवींचे काव्य म्हणजेच मराठीतील स्वच्छंदतावादाचा आविष्कार होय, असे मत आता सर्वमान्य झाले आहे. साधारणपणे १८८५—१९२० हा मराठी काव्यातील स्वच्छंदतावादाच्या उदयाचा व बहराचा कालखंड मानला जातो.
केशवसुतांनी पूर्वकालीन मराठी काव्यातील आध्यात्मिक जाणिवेला इहवादी, मानवकेंद्री बनवले. व्यक्तिवाद ह्या स्वच्छंदतावादातील प्रमुख केंद्रवर्ती तत्त्वाचा उत्कट, सामर्थ्यवान, प्रभावी आविष्कार केशवसुतांच्या कवितेत दिसतो. विशेषतः कवीची अस्मिता, अहंता, सर्जनशील काव्य-शक्तीविषयीचा सार्थ अभिमान ह्या जाणिवा त्यांच्या काव्यात समर्थपणे प्रकटल्या. कवीचे समाजातील महत्त्व व त्याची प्रतिष्ठा, कवीची स्वप्ने पाहण्याची वृत्ती व कल्पकता, नव्या कवितेची प्राणप्रतिष्ठा अशा व्यक्ति-सापेक्ष मूल्यांविषयी त्यांनी फार उत्कटतेने लिहिले. स्वच्छंदतावादी वैशिष्ट्यांचा सम्यक् आविष्कार त्यांच्या कवितेत दिसतो. एमर्सन, शेली, कीट्स आणि वर्ड्स्वर्थ यांच्या काव्यातून व्यक्त होणार्या भावनांचा, विचारांचा आणि मूल्यांचा नेमका वेध त्यांनी घेतला.
ब्रिटिश स्वच्छंदतावादाच्या प्रभावाखाली मराठी काव्यात स्वच्छंदतावादी जाणिवेचा जो नवा, आद्य आविष्कार घडला, तो तात्त्विक पातळीपेक्षा सामाजिक स्तरावरून जास्त व्यक्त झाला. जाचक रूढी, दुष्ट परंपरा, अंधश्रद्धा अशा सामाजिक अन्याय्य व अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधात बंडखोरी व्यक्त करणारी कविता स्वच्छंदतावादाच्या आद्य पर्वात लिहिली गेली. उदा., केशवसुतांच्या ‘जुनें जाउ द्या मरणालागुनि जाळुनि किंवा पुरूनि टाका’ या काव्यपंक्ती, तसेच ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘हरपले श्रेय’ यांसारख्या कवितांतून बंडखोरीची नवी जाणीव दिसते. उदात्त सुंदर भविष्याची स्वप्नेही त्यांच्या कवितेतून प्रकटली. ‘प्राप्तकाळाच्या विशाल भूधरावर सुंदर लेणी खोदण्याची’ किंवा ‘स्वर्ग धरेवर आणण्याची’ ही भविष्यकालीन स्वप्ने स्वच्छंदवृत्तीचीच निदर्शक होती. त्यांच्या ‘झपूर्झा’ सारख्या कवितेत उन्मनी आध्यात्मिक अवस्थेची बेहोशी प्रत्ययाला येते.
केशवसुतांच्या काव्याचा प्रभाव नंतरच्या अनेक कवींवर पडला. त्यांनी आपापल्या संवेदन-स्वभावांनुसार व वृत्तींनुसार स्वच्छंदतावादी आशयाच्या, शैलीच्या वेगवेगळ्या छटांना, गुणवैशिष्ट्यांना आपापल्या काव्यांतून गोचर केले. ⇨ बालकवींच्या (१८९०—१९१८) काव्यात निसर्गाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल करून त्यावर मानवी भावभावनांचे आरोपन केले आहे. औदासिन्याची गडद झाकही त्यांच्या काही कवितांत दिसते. बालकवींच्या निसर्गकवितेवर इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्यातील निसर्गपूजक वृत्तीचा प्रभाव जाणवतो तथापि पाश्चात्त्य समाजात औद्योगिक क्रांतीमुळे जे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले, त्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून निसर्गाकडे परतण्याचा उद्घोष पाश्चात्त्य रोमँटिक कवींनी केला. या वृत्तीत आदिम संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा भाव होता व आदिमतेच्या आविष्कारावर भर होता. ही आदिमता मराठी स्वच्छंदतावादी काव्यात अभावानेच आढळते. ⇨ राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांच्या (१८८५—१९१९) प्रेमकवितेत इंग्रजी प्रभावातून आलेली ‘रोमँटिक’वृत्ती आणि मराठी शाहिरी परंपरेतील शृंगारिकता यांचेही सूर आढळतात. ⇨ भा. रा. तांबे (१८७३—१९४१) यांच्या काव्यनिर्मितीवर ब्राउनिंगचा प्रभाव जाणवत असला, तरी त्यांच्या काव्याचे गृहस्थाश्रमी वळण खास भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेतले आहे. थोडक्यात, इंग्रजी काव्यातून आलेला स्वच्छंदतावादाचा प्रभाव व आपल्या भारतीय परंपरेचे संचित ह्यांच्या समन्वयातून मराठी स्वच्छंदतावादी कविता साकारली आहे, असे म्हणता येईल. संतकाव्याच्या समृद्ध परंपरेत रुजलेली चैतन्यवादी स्वच्छंद-वृत्ती व तिचा मुक्त उत्कट आविष्कार हा इंग्रजी रोमँटिक काव्यापेक्षा अधिक उच्च, उदात्त व श्रेष्ठ दर्जाचा असल्याचा अभिप्राय वा. व. पटवर्धन यांनी नोंदवला आहे (‘ विल्सन फायलालॉजिकल लेक्चर्स ’, १९१५). कवी ⇨ बी (१८७२—१९४७) यांच्या कवितेतील गूढगुंजन हा मराठी स्वच्छंदतावादाचा एक आगळावेगळा पैलू होय. ⇨ विनायकांची (१८७३—१९०९) राष्ट्रवादी कविता स्वातंत्र्यवीर ⇨ विनायक दामोदर सावरकरांचे (१८८३—१९६६) स्वतंत्रता देवतेचे स्तोत्र, ⇨ कुसुमाग्रजांच्या (१९१२—९९) काव्यातील ‘ क्रांतीचा जय-जयकार ’ अशा विविध आविष्कारांतून मराठी स्वच्छंदतावादाला लाभलेले राष्ट्र-वादाचे परिमाण जाणवते. ⇨ रविकिरण मंडळातील कवींच्या काव्या-तूनही स्वच्छंदतावादी वृत्तिप्रवृत्तींचे नानाविध आविष्कार आढळून येतात. ⇨ माधव जूलियनांच्या (१८९४—३९) काव्यातील व्यक्ती विरुद्ध समाज हे द्वंद्व स्वच्छंदतावादाचे निदर्शक आहे. त्यांनी अशारीर ( प्लेटॉनिक ) प्रेमाची महती गायिली. त्यांच्या काव्यातील आत्यंतिक व्यक्तिकेंद्रितता, कल्पनेच्या राज्यात रममाण होण्याची वृत्ती, निसर्गाकडे तसेच भूतकाळात वा भविष्यातल्या स्वप्नांकडे धाव घेण्याची ओढ इ. स्वच्छंदतावादी वैशिष्ट्ये त्यांच्या ‘ तेथे चल राणी ’ या कवितेत एकवटली आहेत. या कवितेचे स्वच्छंदतावादी दृष्टिकोणातून सांगोपांग विवेचन दिगंबर पाध्ये यांनी केले आहे. (‘रोमँटिसिझमचा साहित्य-क्षेत्रातील आविष्कार’ हा वाङ्मयीन वाद : संकल्पना व स्वरूप या ग्रंथातील लेख ). ⇨ बा. भ. बोरकरांच्या (१९१०—८४) काव्यातील शृंगाराची विविध रूपे, तसेच ⇨ अनिलांच्या (१९०१—८२) कवितेतील मानवताप्रेम ही मराठी स्वच्छंदवृत्तीचीच काही रूपे होत. ⇨ वसंत बापट (१९२२—२००२) यांच्या काव्यातही आधुनिक स्वच्छंदी मनोवृत्तीचे मनोज्ञ आविष्कार आढळतात.
सारांश, ब्रिटिश रोमँटिसिझमचा प्रभाव मराठी स्वच्छंदतावादी काव्यावर बर्याच अंशी पडला पण तो सम्यक् स्वरूपात पडलेला जाणवत नाही संपूर्ण प्रभाव पचवल्याचे, आत्मसात केल्याचेही दिसत नाही. परभृतता असली, तरी ती संपृक्त परिपूर्ण रूपात, समग्र व्यापक व सखोल प्रमाणात दिसत नाही. त्यामुळे पाश्चात्त्य स्वच्छंदतावादातील आशयाभिव्यक्तीच्या, शैलीविशेषांच्या सर्वच छटा पुर्या सामर्थ्यानिशी मराठी स्वच्छंदतावादी काव्यात अवतरल्यात, असे म्हणता येत नाही.
मराठी गद्य साहित्यातही स्वच्छंदतावादी वृत्तिवैशिष्ट्यांचे काही गुण-विशेष प्रकटलेले आढळून येतात. ह. ना. आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबर्या श्री. कृ. कोल्हटकर, राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी यांची नाटके शि. म. परांजपे यांचे ललित निबंध ही स्वच्छंदतावादाच्या पहिल्या टप्प्यातील काही उदाहरणे होत. कल्पनारम्यता, वीरपूजनवृत्ती, भावाविष्कारांतील वैविध्य व उत्कटता, अनिष्ट रूढी-परंपरांना नकार, समकालीन सामाजिक प्रश्नांचे भान, भाषाशैलीतील दैनंदिन घरगुतीपणा किंवा भरजरी अलंकृत शैली इ. वैशिष्ट्ये काव्याप्रमाणेच स्वच्छंदतावादी गद्य साहित्यातही आढळतात. दुसर्या पर्वात ना. सी. फडके यांच्या प्रणयरम्य कथा-कादंबर्या वि. स. खांडेकरांच्या ध्येयवादी आदर्शपूजक कथा--कादंबर्या तसेच रणजित देसाई, ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत प्रभृतींच्या ऐतिहासिक-पौराणिक कादंबर्या इ. साहित्यातून स्वच्छंद वृत्तिप्रवृत्तींचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते.
पहा : अभिजाततावाद.
संदर्भ : 1. Abrams, M. H. The Mirror and the Lamp : Romantic Theory of the Critical Tradition, New York, 1958.
2. Barzun, Jacques, Classic, Romantic and Modern, Boston, 1961.
3. Bowra, M. The Romantic Imagination, London, 1961.
4. Furst, Lilian R. Romanticism in Perspective : A Comparative Study of Romantic Movement in England, France and Germany, London, 1959.
5. Lovejoy, Arthuro, Essays in the History of Ideas, 1978.
6. Praz, Mario, The Romantic Agony, Oxford, 1970.
7. Wellek, Rene, A History of Modern Criticism Vol. 2, The Romantic Age, London, 1955.
८. रायकर, सीताराम व इतर, संपा. वाङ्मयीन वाद : संकल्पना व स्वरूप, पुणे, १९९०.
९. सप्रे, अविनाश, “ ब्रिटिश रोमँटिसिझम आणि मराठी कविता : एक तौलनिक परिप्रेक्ष्य ’’ जहागिरदार, चंद्रशेखर, संपा. तौलनिक साहित्याभ्यास : तत्त्वे आणि दिशा, कोल्हापूर, १९९२.
१०. क्षीरसागर, श्री. के. वाद-संवाद, मुंबई, १९६०.
इनामदार, श्री. दे.
“