स्मिथ, विल्यम : (२३ मार्च १७६९—२८ ऑगस्ट १८३९), ब्रिटिश भूवैज्ञानिक व अभियंते. त्यांनी स्तरविज्ञानाचा विकास केल्याने ते स्तरविज्ञानाचे संस्थापक मानले जातात. जीवाश्मांवरून खडकांचे थर कसे ओळखता येतात, हे त्यांनी शोधून काढले. त्यांनी तयार केलेल्या भूवैज्ञानिक नकाशांवरून आधुनिक भूवैज्ञानिक नकाशांचे स्वरूप व शैली निश्चित झाली. खडकांच्या विविध थरांना त्यांनी सुचविलेली नावे अजूनही वापरली जातात.

स्मिथ यांचा जन्म चर्चिल (ऑक्सफर्डशर, इंग्लंड ) येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी व लोहार होते. विल्यम सात वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचे संगोपन काकांनी केले. विल्यम अकरा वर्षांचे होईपर्यंत खेड्यातील शाळेत अंकगणित, हस्ताक्षर इ. गोष्टी शिकले. त्यांनी सर्वेक्षणविषयक पुस्तके खरेदी केली व त्यांवरून ते सर्वेक्षणाच्या मूलभूत पद्धती शिकले, तसेच त्यांनी स्थानिक कॉट्सवोल्ड टेकड्यांमधून विपुल जीवाश्म ( शिळाभूत झालेले जीवांचे अवशेष ) गोळा केले. तेथून जवळच असलेल्या स्टोव-ऑन-द-वोल्ड येथील सर्वेक्षक एडवर्ड वेब यांचे साहाय्यक म्हणून ते काम करू लागले (१७८७). वेब यांच्यामुळे स्मिथ बाथच्या नैर्ऋत्येस असलेल्या समरसेटशर दगडी कोळशाच्या क्षेत्रात स्थायिक झाले. तोपर्यंत वाफेवर चालणार्‍या आगगाडीच्या एंजिनाचा शोध लागला नव्हता. त्यामुळे दगडी कोळशाची वाहतूक मुख्यतः कालव्यांतून होत असे. परिणामी दगडी कोळशाचे खाणकाम आणि असे कालवे बांधणे, हे व्यवसाय तेव्हा भरभराटीला आले होते.

समरसेटशरमधील अशा प्रस्तावित कालव्यासाठी स्मिथ यांनी प्राथमिक सर्वेक्षण केले (१७९३). या सर्वेक्षणात त्यांना पुढील गोष्ट आढळली. या प्रदेशाच्या उत्तर भागात उघडे पडलेले खडकांचे थर नियमितपणे पूर्वेकडे कललेले आहेत. कापलेला पाय तिरपा ठेवल्यास त्यातील काप जसे कललेले दिसतात, तसे हे थर त्यांना दिसले. कालवे व दगडी कोळशाच्या खाणी यांच्या परीक्षणासाठी त्यांनी १७९४ मध्ये दीर्घ प्रवास केला. यामुळे त्यांची निरीक्षणे व्यापक झाली. समरसेटशरमधील खडकांचे थर इंग्लंडपलीकडे उत्तरेस शोधता येतील, हा त्यांचा अंदाज खरा ठरला. कारण या प्रवासात त्यांना ते थर पुन्हा पुन्हा आढळत होते. या नवीन कालव्याचे उत्खनन १७९५ मध्ये सुरू झाले. यामुळे खडकांच्या थरांचे ताजे थर त्यांनी पाहिले. या छेदांच्या अभ्यासावरून पुढील गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या : प्रत्येक थरामध्ये त्याचे वैशिष्ट्य म्हणता येतील असे प्राणी व वनस्पती यांचे जीवाश्म असतात. तसेच अध्यारोपणाचा नियमही त्यांच्या लक्षात आला. म्हणजे गाळाच्या खडकांचा एक थर दुसर्‍यावर असेल आणि या थरांची उलटापालट झालेली नसेल, तर यांपैकी वरचा थर नंतर तयार झालेला म्हणजे कमी वयाचा असतो.

स्मिथ यांचे कालव्याविषयीचे काम १७९९ पर्यंत चालू होते. मात्र तेव्हा त्यांना अचानक बडतर्फ करण्यात आले. परंतु भूवैज्ञानिक व विशेषतः स्थापत्य अभियंते म्हणून त्यांची चांगलीच ख्याती झालेली होती. यामुळे लवकरच त्यांनी भूवैज्ञानिक अभियंते या नात्याने मोठा व्यवसाय सुरू केला व वाढविला. नंतर त्यांनी या उद्योगाचे मुख्यालय लंडनला हलविले. तेथे त्यांनी आपला जीवाश्मांचा संग्रह व त्यांनी तयार केलेले भूवैज्ञानिक नकाशे लोकांनी पाहावेत म्हणून मांडून ठेवले होते.

यांशिवाय स्मिथ यांनी भूमिपुनरुद्धार प्रकल्पाचे पर्यवेक्षण केले आणि बाथ येथील गरम पाण्याच्या झर्‍यांचे पुनर्स्थापन केले तसेच कालवे व दगडी कोळशाच्या खाणी यांचाही त्यांनी पुनरुद्धार केला. यासाठी दरवर्षी ते सु. १६,००० किमी. प्रवास करीत. भूविज्ञान व भूमिजल यांची सैद्धांतिक आणि व्यावहारिक माहिती असल्याने ते आपल्या व्यवसायात आघाडीवर राहिले. मात्र, इंग्लंडचे विशेषतः भूवैज्ञानिक नकाशे तयार करणे हे त्यांचे व्यक्तिगत ध्येय होते. यासाठी ते सढळपणे खर्च करीत. ‘ए डेलिनिएशन ऑफ द स्ट्राटा ऑफ इंग्लंड अँड वेल्स वुइथ पार्ट ऑफ स्कॉटलंड ’ हा महत्त्वाचा भूवैज्ञानिक नकाशा त्यांनी १८१५ मध्ये प्रसिद्ध केला. त्याची १५ पाने होती व त्यासाठी त्यांनी ५ मैल = १ इंच हे प्रमाण वापरले होते. हा नकाशा तयार करण्यासाठी त्यांनी खडकांच्या थरांचा शेकडो किमी. मागोवा घेतला होता. त्यांनी छेददर्शी भूवैज्ञानिक नकाशेही तयार केले. ‘ जिऑलॉजिकल ॲटलास ऑफ इंग्लंड अँड वेल्स ’ (१८२२) या नकाशासंग्रहात स्मिथ यांचे नकाशे प्रसिद्ध झाले. त्यांनी नंतर १८१९—२४ दरम्यान २१ काउंटी नकाशांची उत्कृष्ट मालिका काढली. नकाशानिर्मितीची ( मानचित्रणाची ) त्यांची तत्त्वे अजून वापरली जातात, म्हणजे त्यांच्या मूळ नकाशात नंतर फक्त जादा मजकूर अंतर्भूत करण्यात आला. या भूवैज्ञानिक नकाशांमुळे त्यांना मोठी कीर्ती लाभली होती.

जीवाश्मांवरून स्पष्टपणे ओळखता येऊ शकणारे खडकांचे थर हे नेहमी त्याच सापेक्ष स्थितीत असतात, असे त्यांना आढळले. खडकांमधील जीवाश्मांचा अभ्यास करून खडकांचे वय कसे ठरविता येते, हे त्यांनी दाखविले. अशा रीतीने त्यांनी पुराजीवविज्ञानाचा पाया घातला, असे म्हणता येते. यासंबंधात त्यांनी स्ट्राटा आयडेंटिफाइड बाय ऑर्गनायझ्ड फॉसिल्स (१८१६) आणि स्ट्राटिग्राफिक सिस्टिम्स ऑफ ऑर्गनायझ्ड फॉसिल्स (१८१८) या दोन पुस्तिका लिहिल्या होत्या. सर्वेक्षक म्हणून केलेल्या अभ्यासातून ऑर्डर ऑफ द स्ट्राटा अँड देअर एम्बेडेड ऑर्गॅनिक रीमेन्स (१७९९) हे पुस्तक त्यांनी लिहिले होते.

आयुष्याच्या अखेरीस त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. याचा परिणाम म्हणून त्यांना आपला जीवाश्मांचा संग्रह लंडनच्या ब्रिटिश म्यूझीयमला विकावा लागला. शिवाय त्यांना कर्ज देणार्‍या मंडळींनी त्यांच्या लंडनमधील मालमत्ता जप्त केल्या. १८१९ मध्ये त्यांना १० आठवडे कर्जदारांच्या तुरुंगात राहावे लागले. नंतर उरलेली मालमत्ता विकून ते यार्कशरला गेले आणि शेवटी स्कारबरो येथे स्थायिक झाले.

स्मिथ यांच्या वरील मूलभूत कार्याची प्रशंसा विल्यम डी. कॉनीबीअर आणि विल्यम फिलिप्स यांनी आपल्या स्तरविज्ञानावरील पाठ्यपुस्तकात केली होती. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेने पहिले वोलॅस्टन पदक स्मिथ यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ दिले (१८३२). याच वर्षी राजसत्तेने त्यांना वार्षिक निवृत्तिवेतन मंजूर केले. शिवाय १८३५ मध्ये त्यांना डब्लिन विद्यापीठाची सन्माननीय एल्.एल्.डी. पदवी मिळाली.

स्मिथ हे वैज्ञानिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बर्मिंगहॅमला जात असताना नॉर्दम्पटन ( नॉर्दम्पटनशर, इंग्लंड ) येथे त्यांचे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.