स्पिति : हिमाचल प्रदेशातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने लाहूल-स्पिती जिल्ह्यातील पर्वतमय प्रदेशात दऱ्याखोऱ्यांतून आढळते. त्यांची लोकसंख्या १२,४४५ होती (२०११). येथील हवामान वर्षातील चार महिने अतिथंड असून भूप्रदेश बर्फाच्छादित असतो. त्यामुळे येथे फक्त उन्हाळ्यातच शेतीसाठी जमीन उपलब्ध होते. त्यामुळे शेती व याकपालन यांवरच उपजीविका करणारी ही जमात हिवाळ्यात विणकाम,सूतकताई, दोरखंड वळणे इ. घरगुती हस्तव्यवसाय करते. याक हा प्राणी त्यांच्या आर्थिक व्यवहारातील एक प्रमुख घटक आहे. याक मादीचे पालन दुधाकरिता, तर नराचा उपयोग शेतीसाठी होतो. त्यांच्यापैकी काही- जण खंडाने शेती करतात, तर अन्य मोलमजुरी करतात. जव, गहू आणि कडधान्ये, विशेषतः बार्ली, ही त्यांची मुख्य पिके आहेत. बहुतेक स्पिती मांसाहारी असून अरक व छांग नामक दारू ते पितात. चपाती ( गव्हाची रोटी ) आणि डाळीची आमटी हे त्यांचे मुख्य अन्न होय.
लाहूल खोऱ्यातील गद्दी, स्वांगला व भोट या अन्य जमातींपेक्षा स्पिती कणखर असून मध्यम उंचीचे व वर्णाने उजळ आहेत. ते लाहुली बोली भाषिक असून त्यांपैकी काही भोटिया बोली भाषिक आहेत. त्यांची पितृसत्ताक संयुक्त कुटुंबपद्धती असून ज्येष्ठ मुलाकडे वारसा हक्क जातो. ही जमात खांगचेन ( बाराघर ) व खांगचांग ( छोटा घर ) या दोन प्रमुख वर्गांत सांपत्तिक परिस्थितीनुसार विभागली आहे. शिवाय त्यांच्यात नोनो हा आणखी एक स्वतंत्र वर्ग आढळतो. त्यांच्यात बहुपतिविवाह प्रचलित असून फक्त ज्येष्ठ भावाचे लग्न होते. भ्रातृ-बहुभर्तृत्वासाठी ही जमात विशेष प्रसिद्ध असून एक पत्नी व अनेक पती असे त्याचे स्वरूप आहे. या पतींचे एकमेकांशी भावाभावाचे नाते असते आणि ज्येष्ठ भाऊ वडिलोपार्जित संपत्तीचा वारस ठरतो व राहते घर ( खांगचेन ) त्याच्या नावावर होते. त्यामुळे धाकटे भाऊ मोठ्याची चाकरी करतात किंवा आजन्म अविवाहित राहून लामा बनतात व बौद्ध संघात राहतात. या पद्धतीमुळे स्पितींमध्ये विवाहपूर्व व विवाहबाह्य वैषयिक संबंध ठेवण्यास मुभा आहे तो व्यभिचार मानला जात नाही. मात्र या पद्धतीमुळे त्यांची लोकसंख्या घटत आहे. वयात आलेल्या मुलामुलींचे लग्न झोव्हा या भगत-भविष्यवेत्त्याच्या सल्ल्यानुसार होते. ते सामान्यतः दोन्ही बाजूंच्या वडीलधाऱ्यांकडून ठरविले जाते. त्यांच्यात वधूमूल्याची परंपरा असून लग्नविधी साधा असतो. लग्नानंतर मुलगी ज्येष्ठ मुलाच्या घरी राहण्यास जाते. आतेमामे भावंडांतील विवाहास जमातीची मान्यता आहे मात्र मामाशी भाचीचा विवाह निषिद्ध मानला जातो. या उभयतांना संतती झाली नाही, तर वयात आलेला मुलगा ( पुतोत ) व ऋतुप्राप्त झालेली मुलगी ( पुमतोत ) यांना एकाच वेळी दत्तक घेण्यात येते आणि त्या दोघांचा विवाह करण्यात येतो. जर एका कुटुंबात फक्त मुलींचीच संतती असेल, तर ज्येष्ठ मुलीचे लग्न करून तिच्या पतीस घरजावई करण्यात येते. या दोन्ही पद्धतींत ते संपत्तीचे संयुक्त मालक बनतात.
स्पिती हे हिंदू व बौद्ध असे मिश्र धर्मीय आहेत तथापि बौद्ध धर्माचा त्यांच्यावर अधिक प्रभाव असून त्याचे अनेक मठ आहेत. त्यांच्या प्रमुखाला खाम्पो म्हणतात. ङ्क ओम माने पद्महम् ङ्ख या मंत्रोच्चारामुळे भूतबाधा, रोगराई, आजार नष्ट होतात, अशी त्यांची धारणा आहे. या लोकांवर तांत्रिक लामापद्धतीचा प्रभाव असून जादूटोणा, भूतपिशाच्च यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. यांशिवाय ते पारंपरिक जडवादाचे पालन करतात. त्यांचे अंत्यविधी चमत्कारिक आहेत. ते मृताच्या प्रेताची विल्हेवाट झोव्हा या भगताच्या आदेशानुसार करतात. त्याचे दहन वा दफन करतात किंवा मृतदेह नदीत टाकतात. कधीकधी त्याचे तुकडे करून डोंगरकपारीत रानटी प्राण्यांसाठी भक्षार्थ ठेवतात.
संदर्भ : Mamgain, M. D. Ed. & Comp. Lahul and Spiti-District Gazetteer, Chandigarh, 1975.
भागवत, दुर्गा
“