स्थलशिल्प : ( लँडस्केप आर्किटेक्चर ). मानवाला उपयुक्त आणि आनंददायी ठरेल अशा प्रांगणातील अवकाशाचा ( स्थळाचा ) सर्जनशील कलात्मक अभिकल्प. यात वास्तुकलेच्या अनुषंगाने दृश्य-कलांतील सौंदर्यतत्त्वांचा वेध घेतला जातो. स्थलशिल्प ही स्थापत्य वास्तुशास्त्राची एक उपशाखा आहे. ती एक वास्तुशास्त्रप्रणाली वा वास्तु-शास्त्रपद्धतीचाच भाग असून तीत मुख्यत्वे उद्यानशिल्पे आणि त्यांतील भौमितिक आकृतिबंध, कारंजी, रस्ते, पदपथ, पुतळे यांना प्राधान्य दिलेले असते. त्यांचा प्रतीकात्मक किंवा सजावट म्हणून उपयोग केलेला असतो आणि सूर्यप्रकाश व पाणी या घटकांवर विशेषतः भर दिलेला आढळतो. ही संकल्पना ( शास्त्र ) प्रथम पाश्चात्त्य देशांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एक स्वतंत्र कलाशैली म्हणून उदयास आली. तिला भूदृश्यशिल्प किंवा निसर्गशिल्प असेही म्हणतात. फ्रेडरिक लॉ ओमस्टेड (१८२२ —१ ९०३) या वास्तुविशारदाने न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्क प्रकल्पाच्या अभिकल्पात प्रथम या संकल्पनेचा वापर केला. त्याने हा अभिकल्प ( आराखडा ) कॅल्व्हर्ट वॉक्स याच्या सहकार्याने बनविला. त्यात सेंट्रल पार्कांतर्गत रस्ते, पदपथ, तळी, सरोवरे, सिंचन, भौमितिक आकृतिबंध, पुतळे, पर्यावरण, इमारती, पारिस्थितिकी ( इकॉलॉजी ) या सर्व घटकांचा व पायाभूत सुविधांचा सौंदर्यशास्त्र दृष्ट्या विचार केला होता. पुढे स्थलशिल्प या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला आणि मालक, संस्था, शासन आदींच्या आर्थिक क्षमतेनुसार प्रांगणाचा जेवढा आकार असेल, त्यानुसार स्थलशिल्पांची मर्यादा सापेक्ष राहिली. काही चौ.मी.पासून काही चौ. किमी.पर्यंत स्थलशिल्पे प्रदेशपरत्वे जागानिहाय आढळतात. त्यांत चित्रप्रकटन आणि सजावट यांवर विशेषत्वाने भर दिलेला असतो. वास्तूच्या सभोवतालच्या प्रांगणातील अवकाश (जागा ) कसे सुंदर, आकर्षक व आल्हाददायक होईल, याकडे वास्तुशिल्पज्ञाचा कटाक्ष दिसतो.
दुसर्या महायुद्धापूर्वी ९०% बांधकाम हे निवासी घरे आणि उद्याने यांपुरतेच मर्यादित होते. त्यामुळे स्थलशिल्पास फारसा प्रतिसाद लाभला नाही मात्र विद्यमान परिस्थितीत ९०% अभिकल्पांचे काम हे संस्थात्मक वास्तू , राष्ट्रीय उद्याने व अन्य मनोरंजनात्मक इमारती ( नाट्यगृहे, चित्रपट-गृहे, नगरभवन इत्यादी ) — विशेषतः प्रादेशिक आणि नगररचना प्रकल्प, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालये यांच्याशी संबद्ध असते. फक्त दहा टक्केच अभिकल्प निवासी इमारतींसाठी किंवा सदनिकांसाठी बनविले जातात.
स्थलशिल्पज्ञ आपला अभिकल्प अनेक घटक विचारात घेऊन तयार करतो. प्रथम तो स्थळाचा काळजीपूर्वक अभ्यास व निरीक्षण करतो. त्यात नैसर्गिक बाबींना ( पाणी, सूर्यप्रकाश, जमिनीचा पोत, उंचसखल भाग इ. ) अधिक प्राधान्य दिले जाते. त्यानंतर मालक वा पक्षकार यांच्या गरजा, आर्थिक क्षमता विचारात घेतो आणि अखेरीस जागेच्या क्षेत्रफळानुसार अभिकल्प बनवितो. स्थलशिल्पज्ञांचे प्राथमिक कर्तव्य मानवी गरजा, पायाभूत सुविधा, अवकाशाचे सौंदर्य आणि निसर्गाचे संवर्धन-संरक्षण हे असावे. त्यात उपयुक्तता, पर्यावरण आणि नैसर्गिक सुंदरता यांचा समन्वय साधला जावा. व्यावसायिक स्थलशिल्पज्ञ हा वास्तुशास्त्र विषयातील पदवीधर व प्रशिक्षित असावा.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : स्थलशिल्प – अभिकल्प ही प्राचीन कला असून तिला आधुनिक काळात व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. विशिष्ट भावपरिपोषाच्या दृष्टिकोणातून केलेला अवकाशाचा बंदीश हा स्थल-शिल्पाचा प्राण आहे. प्रकाश, पाणी, द्रव्य ( मटेरिअल ), रंग, रेषा, घनता हे स्थलशिल्पाचे अविभाज्य घटक होत. इतिहासपूर्वकाळात प्राचीन संस्कृतींतून अनेक उद्याने व स्थलशिल्पे होती. तत्संबंधीचे दाखले प्राचीन साहित्य आणि उत्खनित अवशेषांत आढळतात. सर्वांत प्राचीन स्थल-शिल्प-उद्यानाचे आकार चौरस असून त्यात स्वतंत्र चार भूखंड पाडलेले होते. त्यांपैकी एकात वृक्षवल्ली, दुसर्यात फळझाडे, तिसर्यात फुलझाडे आणि चौथ्यात वास्तू वा इमारती होत्या. फुलझाडांची छाटणी करून त्यांना विविध आकार देण्यात आले होते व उद्यानातून फेरफटका मारता यावा म्हणून पदपथांची काटकोनात योजना केली होती. पदपथांच्या बाजूने पुतळे असत. मेसोपोटेमियात पादपजाताची ( फ्लोरा ) मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याची लिखित माहिती मिळते. काही लिखित पुराव्यांवरून तत्कालीन राजप्रासाद व मंदिरे यांच्या भोवती उद्याने होती. या उद्यानांतून वृक्ष, वेली, फुलझाडे, फळझाडे यांची कलात्मक लागवड केली असून ऋतुमानानुसार त्यांची छाटणीही करण्यात येत असे. उत्खननातील अवशेषांद्वारे यास पुष्टी मिळते. डेर एल्-मेडिनेह ( ईजिप्त ) येथील इ. स. पू. सु. १२५० मधील उद्यान- स्मारकाचे भित्तिचित्र इपीच्या थडग्यात आढळले. इ. स. पू. दुसर्या सहस्रकातील नॉसस ( क्रीट ) येथे बगिचाचा आकृतिबंध ( भित्तिचित्र ) आढळला. असुरबनिपालच्या उत्थित शिल्पाभोवती काही वनस्पती दर्शविल्या आहेत. बॅबिलनची झुलती बाग ( हँगिंग गार्डन ) हे स्थलशिल्पाचे उत्तम उदाहरण होय. ॲकॅमिनिडी आणि ससॅनियन राजांच्या वाड्यांभोवती सुरेख बागा होत्या. याचे दाखले उत्खनित अवशेषांत मिळतात.
अभिजात काळात इ. स. पू. तिसर्या शतकात ग्रेको-रोमन संस्कृतींत स्थलशिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ग्रीकांश संस्कृतीत आणि नंतरही इटलीत, विशेषतः कॅम्पानिया व रोम यांत, सुनियोजित नकाशा-बरहुकूम आराखड्यात बागांची आखीव-रेखीव रीत्या आखणी केलेली होती. अथेन्स आणि थेसास येथील हेराक्लिझच्या मंदिराभोवती फलोद्याने होती. त्यांत प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्षवेली यांची कलात्मक लागवड केली होती. इटलीतील बोस्कोरील येथे ( इ. स. पू. ४०) पहिली सार्वजनिक बाग पॉम्पी याने विरंगुळ्याच्या फेरफटक्यासाठी बांधली. पॉम्पीच्या उद्यानात वृक्षवेली, कारंजी, लहान तलाव तसेच त्याच्या बाजूने पदपथ बांधले होते. उद्यानातील तलाव एकमेकांना अशा रीतीने जोडले होते की, त्यांतील पाणी इकडून तिकडे वाहून जात असे. पॉम्पीचेच अनुकरण ऑगस्टसने केले. स्थलशिल्पकलेचा उल्लेख ⇨ सिसरो ‘ अर्स टोपिॲरिया ’ असा करतो. बाराव्या शतकातील एका कुट्टिमचित्रात शैलीकृत झाडे, प्राणी, भौमितिक आकृतिबंध व काही ग्रीक देवतांची ( उदा., अश्वशरीर व पुरुषाचे मुख ) चित्रे आहेत.
नैर्ऋत्य आशिया, उत्तर आफ्रिका आणि भूमध्य समुद्र-प्रदेश यांतील अवर्षणप्रवण भागांतही लांबून पाणी आणून कृत्रिम बागा काही खिला-फतींतील मुस्लिम सत्ताधीशांनी तयार केल्या होत्या. त्यांतून वृक्षवल्लीं-बरोबर विविध प्रकारची फुलझाडे लावलेली असत. नवव्या शतकात ⇨ अब्बासी खिलाफतीच्या समरा येथील बल्कवार राजवाड्याला भव्य पटांगण तसेच त्याच्या मागील बाजूस अत्यंत रेखीव बाग होती. तीत पदपथ, पाण्याचे हौद होते. फातिमी खिलाफतीच्या (९०९—११७१ ) बागा रेखीव, नियोजनपूर्वक आराखड्यात तयार केलेल्या होत्या. अल्-अझीझ (९७५—९६) या खलीफाने बांधलेल्या राजप्रासादाभोवतीच्या प्रांगणात काफूर जन्नत ( बाग ) प्रसिद्ध होती. कैरो येथील सुवर्ण अल्-लुलूवा ही बाग अभिकल्प दृष्ट्या लक्षणीय होती. अशा प्रकारची इस्लामी प्रभाव असलेली उद्याने मोरोक्को, सिसिली व स्पेनमध्येही आढळतात. अरब स्थलशिल्पाचे अभिकल्प पालेर्मो येथे आढळतात. पर्शियन चित्रकलेत आणि साहित्यातड्ढविशेषतः निझामीच्या काव्यातड्ढह्याचे उल्लेख येतात. अवशिष्ट उद्यानांत सफाविद (सोळावे ते अठरावे शतक ) व काजर (एकोणिसावे शतक ) वंशांतील पहिला शाह अब्बास (१५८७—१६२९) आणि शाह हुसेन (१६९४—१७२२ ) यांनी इस्फान येथे बांधलेल्या राजबागा स्थलशिल्पांचे उत्कृष्ट नमुने होत. त्या कारंजी, द्वारमंडप, स्नानगृहे, तबेले, पर्शियन व यूरोपियन शैलीतील भित्तिचित्रे यांनी सुशोभित असून त्यांचे आराखडे भौमितिक आकृतिबंधात बनविलेले होते.
प्रबोधनकाळात (चौदावे ते सोळावे शतक ) इटली व फ्रान्समधील उद्यानशिल्प-अभिकल्पांत जालक पदपथपद्धती ( ग्रेटिंग फुट सिस्टिम ) वापरलेली होती. ही उद्याने विस्तृत असून त्यांचे सुशोभिकरण तत्कालीन मालकांच्या सांपत्तिक स्थितीचे निदर्शक होते. प्रबोधनकालीन वास्तु-शिल्पज्ञांनी उद्यानांत समतोल व सौंदर्य साधण्यासाठी प्रमाणशीर आयत--चौकोनाकृतींचा वापर केला. तसेच पुष्पपाट, रोपवाटिका, पन्हेरी बाग, पदपथ आदींच्या रचनेत समरूपता आणली. त्यांतील शिल्पांचे स्थान अपरिहार्य असे. तत्कालीन उद्यानांत मध्यवर्ती रस्त्याची कक्षा ( मधून जाणारा मुख्य मार्ग ) अनेक अंतर्गत घटकगुणांनी व्यापलेली होती. त्यांत कारंजी, पायर्यापायर्यांचे घाट, पुतळे इत्यादींचे अलंकरण असे. यांशिवाय दोन रस्ते जिथे एकमेकांना छेद देत, तिथे टोकाला एखादी सुरेख शिल्पाकृती असे. या काळातील बहुतेक सर्व उद्यान-वास्तुकला प्राचीन अभिकल्पांच्या धर्तीवरच आधारित होती त्यांचा आकार-प्रकार छानछोकी-मनोरंजनात्मक उद्याने असाच झाला आहे आणि त्यांचे मानचित्र एक सुंदर निसर्गचित्र असेच आढळते. ही उद्यानमांडणीची छाप ( प्रभाव ) मध्ययुगातील स्पेन, इटली, फ्रान्स, इंग्लंड इ. देशांतून आढळते.
सतराव्या शतकात निर्मिलेल्या पश्चिम यूरोप व लॅटिन अमेरिका येथील उद्यानशिल्पांतून बरोक शैलीचे नमुने आढळतात. बरोक कलेतील गतिमानता व चैतन्यशीलतेचा प्रभावी आविष्कार प्रायः या उद्यान-शिल्पकलेत दिसून येतो. यात नाट्यमयतेचा परिणाम साधण्यासाठी प्रवाही वक्राकारांचा अवलंब केला आहे. तद्वतच स्थलशिल्पांच्या सजावटीत भित्तिचित्रकलेचा वापर विशेषत्वाने करण्यात आला आहे. अलंकरण-प्राधान्य हा बरोक शैलीचा एक प्रमुख विशेष होय. ⇨ वास्तुकला, ⇨ मूर्तिकला आणि ⇨ चित्रकला यांच्या त्रिवेणी संगमातून भव्य व भपकेबाज, अलंकरणसमृद्ध व भावनात्मक असा एकात्म प्रत्यय स्थल-शिल्पांत साधण्याचा प्रयत्न बरोक कलावंत करताना दिसतात. स्थलशिल्प व त्याच्या सभोवतीचा परिसर यांच्यातील अन्योन्यसंबंधांची एक नवीन जाणीव या कालखंडात निर्माण झाली व परिणामी स्थलशिल्पयोजन या उपकलाशास्त्रावर विशेष भर देण्यात आला. रोम, व्हिएन्ना, म्यूनिक, माद्रिद, वॉर्सा, प्राग इ. शहरांतील ख्यातनाम उद्यानांच्या स्थलशिल्पांत याची प्रचिती येते. प्रबोधनकालीन स्थलशिल्पांत पंधराव्या शतकातील स्थलशिल्पांचे नैसर्गिक गुणधर्म आढळतात. या स्थलशिल्पांनी नवीन वास्तुरचनायुक्त संकल्पनेकडे मार्गक्रमण करण्याची दिशा दर्शविली. ही संकल्पना अभिजात प्राचीन रोमन शैलीशी अप्रत्यक्ष रीत्या जोडलेली होती.
अठराव्या शतकात यूरोपमध्ये — विशेषतः इंग्लंडमध्ये — प्राचीन भौमितिक आकृतिबंधातील उद्याने आणि नंतरची प्रबोधनकालीन प्रणालीतील उद्याने यांच्याकडे उपहासात्मक दृष्टीने पाहण्याची चळवळ सुरू झाली आणि उच्चभ्रू जमीनदार-सरंजामदार यांनी अशी उद्याने भाडेपट्टीने घेण्यास सुरुवात केली. यात चार्ल्स ब्रिजमन, विल्यम केंट, लॅन्सलॉट ‘ कॅपेबिलिटी ’ ब्राउन आणि हम्फ्री रेप्टॉन इ. वास्तुशास्त्रज्ञ होते. त्यांनी स्वतंत्र मांडणीचे प्रस्ताव ठेवले. सुरुवातीच्या अभिकल्पकांनी ( ब्रिजमन व विल्यम केंट ) स्थल-शिल्पांच्या विरूपणास सुरुवात केली. त्यांनी पाटली आणि चौरस रचनाबंध हद्दपार करून समरूपता कमी करण्याचा प्रयत्न केला. वक्राकार मार्ग ( पदपथ ) सुचविले, तसेच वर्तुळाकार किंवा आयताकार तळ्यांच्या जागी विषम आकार निर्दिष्ट केले आणि वृक्षलागवड एका रांगेत न करता अरीतसर ( इन्फॉर्मल ) समूहात केली तथापि त्यांची फार थोडी स्थलशिल्पे अवशिष्ट आहेत. ब्राउनने श्रीमंत अशिलांकरिता सुखासीन भूमी निर्मिली, म्हणून त्याला ‘ कॅपेबिलिटी ’ ( क्षमता ) म्हणत कारण तो अशिलाच्या मर्जी व क्षमतेनुसार स्थलशिल्पाची बांधणी करीत असे. त्याच्या स्थलशिल्पांत वृक्षवेली, गवत आणि पाणी यांच्यात लक्षणीय अन्योन्य क्रिया व प्रक्रिया आढळतात. आदर्श अभिकल्पाच्या दृष्टिकोणातून त्या अप्रतिरूप वाटतात. त्याने नैसर्गिक सुंदरतेला फाटा देऊन वृक्षांच्या केवळ काही जातींचीच उद्यानात लागवड केली होती. ब्राउनच्या मृत्यूनंतर (१७८३) रेप्टन हा इंग्लंडमधील प्रसिद्ध अभिकल्पक मानला गेला. व्हिक्टोरियन काळात फुलझाडांवर अधिक लक्ष केंद्रित करून काही गुंतागुंतीची शोभादायक रचना करण्यात येऊ लागली. एकोणिसाव्या शतकात गर्ट्रूड जेकिल हिने पुष्प अनुलिप्त ( बॉर्डर्ड ) अभिकल्प उपपत्ती मांडली. तिचे स्थलशिल्पाचे अभिकल्प दृक्प्रत्ययवादी चित्रकला संप्रदायाशी समांतर होते. तिचा प्रभाव अमेरिकन उद्यानशिल्पांवर लेखन करणार्या महिलांवर पडला. अमेरिकन स्थलशिल्पज्ञ अँड्रू जॅक्सन डॉउनिंग हा तत्कालीन श्रेष्ठ अभिकल्पक असून त्याने आपल्या अभिकल्पात रेप्टन व अन्य इंग्लिश वास्तुविशारदांचे अनुकरण केले. त्याने ट्रिटिझ ऑन द प्रॅक्टिस ऑफ लँडस्केप गार्डनिंग अँड रूरल आर्किटेक्चर (१८४१ ) या प्रबंधात आपल्या कल्पना स्पष्ट केल्या. हॉर्टिकल्चरिस्ट या नियतकालिकाचे तो संपादन करीत असे. निवासी घरांच्या अभिकल्पात मतसंग्रहवाद ( इक्लेक्टिसिझम ) हा टोकाचा शब्द होता. विसाव्या शतकात पाश्चात्त्य देशांतून स्थलशिल्पांच्या अभिकल्पात काही मूलभूत बदल झाले आणि विविध शैली वास्तुकलेत प्रविष्ट झाल्या.
पूर्वेकडील चीन, जपान, भारत इ. देशांतून स्थलशिल्पांचे नमुने प्राचीन काळापासून आढळतात. चीनमध्ये देखणे व नैसर्गिक देखाव्यांचे स्थलशिल्पांचे नमुने असून काही प्राचीन निवासी वास्तूंचे अभिकल्प उत्खननात उघडकीस आले आहेत. जपानी व चिनी मंदिरांच्या बागा पौराणिक प्रतीकवादासाठी प्रसिद्ध होत्या. जपानमधील अप्रतिरूप बगिचे हे आधुनिक स्थलशिल्पांचे आदर्श असून त्यांचा उद्यान अभिकल्प अमेरिकेत लोकप्रिय झाला आहे. जपानी उद्यानांच्या निर्मितीत मोठ्या निसर्गदृश्याचे छोट्या अवकाशात प्रतिरूप निर्माण करणे यास प्राधान्य असून अध्यात्मसाधना मानून या बागांची निर्मिती केली जाते. त्यामुळे निसर्गसंवादी आदर्श रचना, संवेदनशील तरल दृश्यानुभव आणि मनःशांती हा या रचनांचा मूळ उद्देश असतो. भारतात मोगलपूर्व काळापासून स्थलशिल्पांचे अभिकल्प आढळतात. त्यांवर पर्शियन शैलीचा प्रभाव जाणवतो. मोगल काळात (१५२६—१८५७) पर्शियन शैलीतील स्थापत्य शिल्पकलेचे नमुने आरामबाग, सिकंदरा ( आग्रा ) हुमायून याची कबर ( दिल्ली ), तसेच लाहोर येथील शाही बगिच्यांतून आढळतात. अंगुरी बाग ( आग्रा ) या उद्यानात स्त्रियांसाठी स्नानगृहे व वक्राकार संगमरवरी पाषाण रांगा होत्या. यांशिवाय लाल किल्ला येथे शाहीबाग होती. तत्कालीन शालिमार बागाही ( विशेषतः लेकदल, काश्मीर ) प्रसिद्ध होत्या. मोगल शैलीतील राजपूत बागा अंबर, जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर, बुंदी या ठिकाणी होत्या. अर्धयूरोपीय किंवा अर्धचिनी शैलीतील एकोणिसाव्या शतकातील बागा ड्ढ मुबारक शाह ( दिल्ली ) व कैसर बाग आणि सिकंदरा ( लखनौ) — प्रसिद्ध होत्या.
भारतातील मोगल गार्डन्स ( राष्ट्रपतिभवन, नवी दिल्ली ), वृंदावन उद्यान ( म्हैसूर ), नंदन-कानन ( ओडिशा ), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान ( मुंबई ), एन्. टी. रामाराव उद्यान ( हैदराबादड्ढदक्षिण ), महात्मा गांधी उद्यान ( पोर्ट ब्लेअर, अंदमान-निकोबार ) ही काही सुनियोजित अभिकल्पाची स्थलशिल्पे होत. यांतील मोगल गार्डन्समध्ये भौमितिक आकृतिबंधांच्या गुंतागुंतीतून निर्माण होणारे सौंदर्यपूर्ण आकार यांची गुंफण, तसेच कारंजी व पाण्याच्या प्रवाहाचा योग्य वापर यांनी या उद्यानस्थलशिल्पास विलक्षण मोहकता लाभली आहे. एन्. टी. रामाराव उद्यानात लेझर शोची व्यवस्था असून त्यास संगीतमय कारंज्यांची जोड आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेली आहे. त्यामुळे हे वास्तुशिल्प अन्य उद्यानांच्या मानाने वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे.
महाराष्ट्रात अनेक सुनियोजित अभिकल्पाची स्थलशिल्पे असून जिजा-माता उद्यान ( मुंबई ), पेशवे पार्क, बंड गार्डन ( पुणे ), आनंद सागर ( शेगाव ), टाउन हॉल म्यूझीयम ( कोल्हापूर ), नरसिंह मंदिर ( धोम, वाई तालुका ), महाराज बाग ( नागपूर ), सिद्धार्थ बाग ( औरंगाबाद ), ज्ञानेश्वर बाग ( पैठण ) वगैरे काही उद्यान स्थलशिल्पे प्रसिद्ध आहेत. या स्थलशिल्पांतून पदपथ, हिरवळ, सरोवरे, कुंपणे, ताटवे, शिल्पे यांची गुंफण करून वास्तुसौंदर्याला उठाव दिला आहे आणि भौमितिक आकारांची उपयुक्तता जोपासली आहे.
पहा : आधुनिक वास्तुकला उद्याने व उपवने वास्तुकला.
संदर्भ : 1. Brookes, John, The Small Garden, London, 1978.
2. Church, Thomas and Others, Gardens are for People, New York, 1983.
3. Simonds, John O. Landscape Architecture, New York, 1983.
4. Thacker, Christopher, The History of Gardens, California, 1978.
देशपांडे, सु. र.
“