स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ : महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून १७ सप्टेंबर १९९४ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेते, शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्यगौरवार्थ त्यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक आणि अध्यापनात्मक आहे. याचे कार्यक्षेत्र हिंगोली, लातूर, नांदेड व परभणी या चार जिल्ह्यात विस्तारलेले असून ३७५ महाविद्यालये त्यास संलग्नित आहेत. रसायनशास्त्र, वाणिज्य व व्यवसाय प्रबंधन, भूविज्ञान, जीवविज्ञान, गणित व संगणक विज्ञान, शारीरिक शिक्षण आणि सामाजिक विज्ञान या विषयांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या १३ विद्याशाखा विद्यापीठात कार्यरत आहेत. विविध विषयांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी, एम्. फिल्., पीएच. डी. या अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची-मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून विद्यापीठाचे लातूर येथे एक विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
भटकर, जगतानंद