स्टाइन,विल्यम हॉवर्ड : (२५ जून १९११ – २ फेब्रुवारी १९८०) अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचनेविषयी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल आणि रिबोन्यू किएज, या अग्निपिंडातील ⇨ एंझाइमाचे संघटन व कार्य यांविषयी केलेल्या अध्ययनाबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक स्टाइन व ⇨ स्टॅनफर्ड मुर यांना मिळून अर्धे आणि ⇨ क्रिस्तीआन बोहेमर आनफिनसेन यांना अर्धे असे विभागून देण्यात आले.

स्टाइन यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९३३ साली त्यांनी हार्व्हर्ड येथून रसायनशास्त्राची पदवी आणि १९३८ साली कोलंबिया कॉलेज ऑफ फिजीशियन्स अँड सर्जन्स या संस्थेची जीवरसायनशास्त्राची डॉक्टरेट या पदव्या संपादन केल्या. त्याचवर्षी ते रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (नंतरची रॉकफेलर युनिव्हर्सिटी) या संस्थेत दाखल झाले. कालांतराने ते तेथेच १९५४ मध्ये प्राध्यापक झाले.

स्टाइन व मुर यांनी ⇨ वर्णलेखनाविषयी १९४५ मध्ये संशोधन करण्यास प्रारंभ केला. प्रथिने व जैव द्रायू (द्रव आणि वायू) यांपासून मिळालेल्या ⇨ ॲमिनो अम्लांच्या व पेट्टाइडांच्या विश्‍लेषणासाठी त्यांनी वर्णलेखन तंत्राचा वापर केला. हे उपकरण पुढे सर्वत्र वापरात आले. हे उपकरणा पुढे सर्वत्र वापरात आले. या उपकरणाच्या साहाय्याने स्टाइन व मुर यांनी रिबोन्यूक्लिएज या एंझाइमातील (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनातील) ॲमिनो अम्लांच्या क्रमनिर्धारित केला. अशा तऱ्हेची संरचना ठरविले जाणारे हे दुसरे प्रथिन, परंतु पहिलेच एंझाइम होते. स्टाइन व मुर यांनी रिबोन्यूक्लिएजमधील १२४ ॲमिनो अम्लांच्या साखळीच्या उलगडा केला व तीमधील १८७४ अणूंची स्थाने निर्धारित केली.

स्टाइन न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

दीक्षित, राहुल ज्ञानोबा