सौंदर्यसाधना : प्रभावी, आकर्षक व सुस्वरूप व्यक्तिमत्वाचे संवर्धन करणारी एक कला साधना. स्त्री-पुरुष आपले व्यक्तिमत्व प्रभावी व आकर्षक होण्यासाठी ज्या प्रक्रिया करतात व उपाय योजतात, त्याला सौंदर्यसाधना म्हणतात. त्यात शरीरसौष्टव टिकविण्याबरोबरच सौंदर्य-प्रसाधनांना विशेष महत्त्व असते कारण सौंदर्य-प्रसाधनांच्या सौंदर्यासाठी वापरण्याच्या क्रिया किंवा प्रक्रियाद्वारे सौंदर्यसाधना केली जाते. स्त्री व पुरुष यांच्या उत्पत्तीबरोबरच एकमेकांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्यसाधना ही संकल्पना निसर्गतःच अस्तित्वात आली असावी. सौंदर्य साधनेला प्राचीन इतिहास असून तत्संबंधीचे दाखले व उल्लेख भारत व भारतेतर प्रदेशांत इ.स.पू. पाचव्या सहस्रकांपासून मिळतात. ईजिप्शियन संस्कृतीतील (इ.स.पू.५०००–६४०) नेफरतीती, हॅटशेपसट व क्लीओपात्रा या राज्यांनी आपले आकर्षक व्यक्तिमत्व टिकविण्यासाठी सौंदर्यसाधना केल्याचे दाखले मिळतात. यांपैकी क्लीओपात्रा ( इ.स.पू.६९?– इ.स.पू.३०) हिच्या सौंदर्यसाधनेविषयीच्या अनेक दंतकथा-वंदता आढळतात. तिच्यावर विल्यम शेक्सस्पियरने नाटकही लिहिले आहे. ग्रीक संस्कृतीत (इ.स.पू. २४००–५५०) हेटीअरा या गणिकासदृश वारांगनांची संस्था ग्रीसमधील उच्चभ्रू समाजाच्या मनोरंजन व ऐहिकसुख यांसाठी कार्यरत होती. त्या फुलांनी सजविलेले कपडे परिधान करून तसेच तत्कालीन सौंदर्यसाधने वापरून सौंदर्यसाधना करीत असत. ॲस्पेशिया नावाच्या हेटीअरांने इ.स.पू. ४५० मध्ये अन्य हेटीअरांना सौंदर्यसाधनेचे प्रशिक्षण देण्यासाठी अथेन्स नगरीत एक विद्यालय काढले होते. शिवाय ती मेगारामध्ये हेटीअरांचा एक अवैध क्लब ऐषारामात चालवीत असे. मध्ययुगात यूरोपीय देशांतील विशेषतः पंधराव्या ते अठराव्या शतकांत कोर्टिझन या कलावंतिणींना समाजामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले होते आणि समाजही त्यांच्याकडे आदराने पाहात असे. त्यामुळे तत्कालीन कलावंतिणी नृत्य-संगीतादी कलांतील नैपुण्याबरोबरच पुरुषांना आकर्षित करण्यासाठी छानछोकी कपडे, अलंकार व सौंदर्यप्रसाधने वापरून आपले व्यक्तिमत्व प्रभावी करीत. त्यांची ही सौंदर्यसाधना अनेक वेळा तत्कालीन क्लब वा स्टुडिओतून चालत असे. जपानमधील सामाजिक जीवनातील ‘गैशा’ ही संस्था अनेक वर्षे, विशेषतः एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत, एक अविभाज्य भाग बनली होती. गैशा तरुणी आधुनिक फॅशनचा छानछोकी पोशाख (विविध प्रकारचे रंगीत झगे) करून चहापार्ट्या व मेजवान्या यांचे आयोजन करीत आणि तिथे येणाऱ्या चोखंदळ उच्चभ्रू गिर्‍हाईकांचे नृत्य-संगीतादीनी  मनोरंजन करीत. चतुर संभाषण कलेचे व अंगमर्दनाचे त्यांना ‘ओकिया’ नावाच्या संस्थेत प्रशिक्षण देण्यात येई. सौंदर्यसाधनेच्या अनेक बाबी त्यांना या संस्थेत शिकविल्या जात.

भारतात सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील ( इ.स.पू.२७५०–१५५०) सौंदर्य-प्रसाधांचे उपयोग उत्खनित पुराव्यावरून दृग्गोचर होतात. ऋतु-मानाप्रमाणे त्यावेळचे स्त्री-पुरुष विपुल प्रमाणात अलंकारांचा सौंदर्य-साधनेसाठी वापर करताना आढळतात. स्त्री-पुरुष सौंदर्य-प्रसाधनांचा वापर करीत असल्याचे काही अवशेष सापडले असून पुरुष दाढी करून मधोमध भांग पाडत असत. स्त्रियांच्या टेराकोटामूर्तींबरोबर उत्खननात आरसे व कंगवेदेखील सापडले आहेत. या सर्व प्रक्रिया भारतीय संस्कृतीत दिनचर्या या नावाने परिचित असल्या, तरी बाह्य सौंदर्यासाठी, व्यक्तिमत्व वृद्धी, सतेज कांती, कमनीय बांधा यांच्याबरोबर या प्रक्रियांचा सबंध पुण्य, आरोग्यदायी आयुष्य आणि सौख्य व आनंद यांच्याशी लावलेला आहे.

प्राचीन भारतात गणिका या संस्थेला विशेष महत्त्व होते. या संस्थेचे उल्लेख प्राचीन संस्कृत, प्राकृत, पाली वाङ्मयात आढळतात. रामायण-महाभारत काळात या संस्थेला प्रतिष्ठा लाभली होती. पांडवांच्या सेनेबरोबरच एक गणिकांचा समूह होता ( महा. उद्योग, १५१, ५८). महाभारतात द्रौपदी सैरंध्रीच्या भूमिकेत असताना महालात काम करीत असे. ती आपल्या सोबत प्रसाधनपेटिका घेऊन आली असल्याचे वर्णन आहे. कौटिलीय अर्थशास्त्र या मौर्यकालीन ( इ.स.पू.३२१–१८५) ग्रंथात ‘ गणिकाध्यक्ष ‘ हे एक स्वतंत्र प्रकरण गणिकांच्या जीवनाविषयी असून त्यांनी सौंदर्यसाधना कशी करावी आणि ऐहिक सुखाबरोबर अन्य कलांचे कसे प्रदर्शन करावे, याविषयी माहिती आहे. त्यांनी गायन, वादन, नृत्यादी कलांत निपुण असले पाहिजे, असा दंडक होता. तिला ‘रूपयौवना’ व ‘शिल्पसंपन्ना’ या विशेषणांनी संबोधिले आहे. तत्कालीन पाली जातकथांतही गणिकांचे वर्णन रूपगुणसंपन्न, कलावंत, चतुर व श्रीमंत असे असून आपली सुडौल अंगकाठी व रूप जपण्यासाठी त्या प्रयत्नशील असत. गुप्तकालीन (इ.स.३२१–५५५) वात्स्यायन लिखित कामसूत्र या ग्रंथातही गणिकांविषयी सविस्तर माहिती एका प्रकरणात दिली आहे, त्यात गणिकेने ६४ कलांत पारंगत होऊन गणिका व्यवसाय सुरू करावा किंवा या कलांचे प्रशिक्षण तिने घ्यावे, असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर वैयक्तिक सौंदर्यवर्धनाच्या कलाही त्यांना ज्ञात होत्या (अध्यय ६, प्रकरण ६/५४), व्यक्तिगत सौंदर्यवृद्धीसाठी व मोहकतेकरिता त्या कपाळावरील अलंकरण, केसातील फुलमाला धारण करीत आणि शरीरावर कुंकम व चंदन लेप (विशेषतः, ३उ रोजावर) लावीत. दात रंगविणे (दशंनवस नांगरागः) इत्यादी गोष्टींचा त्यांचा अभ्यास उत्तम असे. त्यांना आपण सुंदर, तरुण व आकर्षक दिसावे असे नेहमी वाटे. सौंदर्य संवर्धनासाठी त्या अनेक कृत्रिम साधने वापरीत, असे वात्स्यायन ऋषी म्हणतात. त्यांच्या जीवन व व्यवसायातील सौंदर्यसाधना हा अविभाज्य-अत्यावश्यक भाग होता. आणि त्यांना सौंदर्यसाधनेचे प्रशिक्षण कुट्टीणीमाता देत असत. ‘हरिवंश’ या इ.स. चौथ्या-पाचव्या शतकातील (महाभारताचे परिशिष्ट खिलपर्व असलेल्या) ग्रंथात ‘शरीरसौंदर्यार्थ व्रतोपाय’ नावाचा एक अध्यय ( हरिवंश, पूर्वार्ध, अध्यय ८०) आहे, त्यात भगवती (उमा) अरुंधतीला शरीरसौंदर्यवान ठेवण्यासाठी काही व्रते व उपाय सुचविते. ती म्हणते, ‘ पुण्यक व्रताच्या योगाने हे शरीर दुसऱ्याला सुखकरसे करता येईल.’ या व्रतपालनाने अरुंधती शुभ स्त्री पूर्ण चंद्रमुखी होते, असे म्हटले आहे.

भारतामध्ये स्त्रिया रंगीत प्रसाधने म्हणून हात व नखे रंगविण्यासाठी मेंदीचा उपयोग, ओठ रंगविण्यासाठी तांबूल म्हणजे विड्याचा उपयोग, डोळ्यांच्या आकर्षणासाठी काजळ, तर पायावर आलता अशी रंगीत साधने वापरीत. त्याविषयीचे अनेक लिखित दाखले असून शिल्पकला व चित्रकला यांमधूनही तत्संबंधी काही शिल्पे व चित्रे आढळतात. लेणी, स्तूप व मंदिरांवरील मूर्तिशिल्पात दर्पणधारी स्त्री-प्रतिमांची अनेक शिल्पे आहेत तसेच काजळ डोळ्यात घालणाऱ्या सुरसुंदींची अनेक संभ्रम-विभ्रम अवस्थांतील शिल्पे आढळतात आणि स्नात सुरसुंदरी केस, सुकवितानाच्याही काही मूर्ती आहेत, राजस्थानी, पहाडी शैलीतील लघुचित्रांतून प्रसाधन पेटी, वेणी घालणाऱ्या, कुंकुम तिलक लावणाऱ्या यवनींची चित्रे असून क्वचित काही चित्रात प्रसाधनात मग्न असलेली तरुणीही दिसते.

भारतामध्ये प्रसाधनकला प्राचीन काळापासून अस्तित्वात होती आणि ती मध्ययुगात प्रगल्भ अवस्थेला पोहोचली होती. अद्यापि भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नट्ट-फट्टा करण्याची आरसा लावलेली पेटी असून तीत कुंकवाचा करंडा, मेण, काजळ यांच्या डब्या आणि फणी-कंगवा ही साधने असतात. पुढे अव्वल इंग्रजी अंमलात आयुर्वेदीय प्रसाधन साधनांकडे काहीसे दुर्लक्ष झाले पण स्वातंत्र्योत्तर काळात स्वास्थ्य व सौंदर्यसाधनेसाठी पुन्हा आयुर्वेदाचा चपखल उपयोग होऊ लागला असून पाश्‍चात्त्य देशांनाही त्याचे महत्त्व पटू लागले आहे कारण आयुर्वेद हे मानवी स्वास्थ्यासाठी प्राचीन ऋषींनी निर्माण केलेले शास्त्र असले तरी चिरतारुण्य, चमकदार कांती, विपुल काळेभोर केस, तेजस्वी डोळे या सर्व सौंदर्य लक्षणांच्या संवर्धनाच्या गोष्टी सौंदर्यसाधनेत अभिप्रेत असतात. तसेच आयुर्वेदीय वनस्पतियुक्त सौंदर्य प्रसाधनांच्या वापराबरोबरच सुदृढ, सडपातळ अंगकाठी आणि शरीरसौष्टव व व्यक्तिमत्वासाठी योगासने महत्त्वाची भूमिका बजावतात. किंबहुना सौंदर्यसाधना आणि योगासने यांच्या समन्वयातून प्रगल्भ व्यक्तिमत्व उदयाला येते.

प्रसाधन प्रक्रिया या चार विभागांत मुख्यतः मोडतात : १. चेहरा, २. शरीर, ३. केस, ४. हातपाय, दात याशिवाय ह्याचेही आणखी दोन प्रकार पडतात : १. रंगहीन प्रसाधनांचा उपयोग व २. रंगीत प्रसाधनांचा उपयोग. रंगहीन प्रसाधने ही प्राचीन काळापासून आयुर्वेदाच्या शोधानंतर स्वास्थ्य व सौंदर्य वर्धनासाठी वापरली जात असत आणि सांप्रतही त्यांचा उपयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांतील घटकांचा विचार करून वापरली जातात. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहरेपट्टी आणि त्याची त्वचा यांवरील क्रिया-प्रक्रिया महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे सौंदर्य संवर्धनासाठी त्याबाबतीत पुढील गोष्टींनी दखल व काळजी घ्यावी लागते. त्या अशा-स्वच्छता, संरक्षण, संवर्धन, पुनर्जीवन, दोष निर्मूलन आणि रंगसाधना. प्रत्येक भागासाठी विविध औषधोपचार, क्रिया-प्रक्रिया, प्रसाधने आणि उपाय सुचविलेले आढळतात.

पहा : रंगभूषा, रंगभूमीवरील रंगलेप सौंदर्य-प्रसाधने.

संदर्भ : 1. Crihfield Liza, The Institution of Geisha in Modern Japanese Society, Stanford, 1997.

          2. Lannoy Richard, The Speaking Tree : A Study of Indian Culture and Society, London, 1971.

          3. Munshi, Kalpalata K. Trans, &amp Ed. Sringara-Manjiri-Katha of Sri Bhojadeva, Bombay, 1959.

          ४. देशपांडे, सु. र. भारतीय गणिका, पुणे, २०१३ (सुधारित आवृत्ती).

देशपांडे, सु. र. परांजपे, माया