सोमनाथ – १ : सौराष्ट्रातील सोरठ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्थळ. या ठिकाणी पुराणवस्तू असलेली पाच टेकाडे आहेत. १९५५५७ या दरम्यान येथे उत्खनन झाले. त्यात सिंधू संस्कृतीपासून ते ऐतिहासिक कालापर्यंतचे अवशेष उपलब्ध झाले. पहिली वस्ती उत्तर हडप्पा संस्कृतीची झाली. या काळातले लोक गारगोटीच्या छिलक्यांची हत्यारे वापरीत आणि फिआन्सचे मणी धारण करीत. दुसऱ्या वस्तीत हडप्पा संस्कृतीची खापरे न वापरता उत्कृष्ट तांबड्या झिलईची खापरे वापरू लागले. यांच्या वास्तू दगडगोट्यांच्या बांधलेल्या आढळून आल्या. तिसरी वस्ती लोहयुगाची झाली. यात लोखंडाच्या निरनिराळ्या वस्तू, मौर्यकालीन झिलईची खापरे, काळी-तांबडी खापरे, हस्तिदंती पिना आणि कर्णभूषणे प्रचलित असल्याचे आढळले. यानंतरच्या वस्तीचे लोक साधी तांबड्या रंगाची खापरे वापरीत होते, असा पुरावा मिळाला. याशिवाय लोखंडी भाले व दगडगोट्यांची फरशीही या कालातील थरांत उघडकीस आली. पाचव्या कालखंडातील वस्ती इ. स.च्या सुरुवातीच्या काही शतकांत झाली असावी, असे उत्कृष्ट तांबडी खापरे व गुप्त आणि वलभी नाण्यांवरून ज्ञात होते. या स्थळी विस्तृत उत्खनन केल्यास आणखी माहिती उजेडात येण्याचा संभव आहे, असे पुरातत्त्वज्ञांचे मत आहे.

देव, शां. भा.