सेल्वा : सेल्वाज. ॲमेझॉन नदीखोऱ्यातील (द.अमेरिका) उष्णकटिबंधीय घनदाट वर्षारण्याचा प्रदेश. स्पॅनिश व पोर्तुगीज भाषेतील ‘ सेल्वा ‘ याचा अर्थ जंगल किंवा लाकूड असा आहे. ‘ सेल्वाज ‘ ही बहुवचनी संज्ञा असून ती विशेष रूढ आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेस ५° व दक्षिणेस ५° या अक्षवृत्तांदरम्यानचा हा प्रदेश असल्याने तो ‘विषुववृत्तीय अरण्याचा प्रदेश’ म्हणूनही ओळखला जातो. या प्रदेशात वर्षभर भरपूर उष्णता, पाऊस व सूर्यप्रकाश असल्याने विविध प्रकारच्या वृक्षांची व महावेलींची प्रचंड वाढ होते. या भागात सु. ३० ते ५० मी. उंचीचे अनेक वृक्ष आढळतात. ऑर्किडेसी कुलातील विविध वनस्पतिप्रकार, उंच वृक्ष यांमुळे या प्रदेशावर एकसंध हिरवे छत तयार झालेले असल्याने सूर्यप्रकाश जमिनीवर क्वचितच पोहोचतो. सतत ओला उन्हाळा हा ऋतू आढळतो. जमिनीवर झुडुपे फारशी नसतात. पानगळ वेगवेगळ्या काळात होत असल्याने अरण्य वर्षभर हिरवेगार दिसते. थोड्या जागेत वनस्पतींच्या विविध जाती उगवतात. त्यामुळे एकाच जातीच्या वृक्षांचा व्यापारी उपयोग करणे कठीण जाते. बहुतेक वृक्षांचे लाकूड टणक (कठीण) असते. रबर, मॅहॉगनी, एबनी, ब्राझीलवुड, ब्राझीलनट सिंकोना, ब्रेडफ्रूट इ. वृक्ष प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. सागर किनारी भागात नारळ व कच्छ वनस्पती दिसून येतात.

या प्रदेशात विविध प्रकारची माकडे, पक्षी, साप वगैरे वृक्षचरांची गर्दी जास्त असते. भूचर बहुधा नसतात परंतु विरळ अरण्यांच्या भागात अथवा अरण्ये तोडून मोकळ्या केलेल्या भागात मात्र थोड्या प्रमाणातजमिनीवर राहणारे प्राणी आढळतात. मुंग्या, डास, वाळवी, जळवा इ. जीव असंख्य आढळतात. वेलींचे जाळे, दुर्गम, कोंदट, निरुत्साही वातावरण, अंधारलेले अंतर्भाग यांमुळे येथे मनुष्यवस्ती फार थोडी आहे. नदीकाठी राहणारे काही अमेरिकन इंडियन लोक शिकार, मासेमारी, कंदमुळे, फळे इत्यादींवर उदरनिर्वाह करतात. काही भागांतील लोक जंगल पदार्थांच्या बदल्यात परकीयांकडून कापड, धातूच्या वस्तू, शस्त्रे इ. घेतात. दाट जंगलांतील लोक वस्त्रे कमी वापरतात. खांबांवर उभारलेली निवाऱ्यापुरती झोपडी हे त्यांचे घर असते. काही लोक ‘मिल्पा शेती ‘ (जंगल तोडून तात्पुरती केलेली शेती) करतात. अशा शेतीतून मका, केळी, मॅनिऑक, तांदूळ, रताळी, टोमॅटो, भाजीपाला यांसारखी हंगामी पिके घेतात. याशिवाय कोंबड्या, बदके पाळतात. निक्षालनामुळे जमीन नापीक झाल्यावर ती सोडून ते दुसरीकडे स्थलांतर करतात व याच प्रकारची तेथे शेती करतात. अशा सोडलेल्या जागी निकृष्ट जंगल वेगाने वाढते. नद्यांच्या विस्तृत मैदानी प्रदेशात रबर, लाकूड व अन्य जंगली उत्पादनांच्या व्यापारामुळे यूरोपियांची वसती व काही मोठी शहरे विकसित झाली आहेत. अलिकडच्या काळात हे प्रदेश विकसित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

जगाच्या इतर भागांतील विषुववृत्तीय अरण्यांना व विषुववृत्तीय हवामानाच्या नैसर्गिक विभागाला उद्देशूनही ‘ सेल्वाज ‘ ही संज्ञा वापरली जाते. आफ्रिकेतील काँगो नदीखोरे, गिनीचा किनारा, आशियातील मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, अंदमान बेटे (भारत), म्यानमार, श्रीलंका यांचा दक्षिण भाग, द. अमेरिकेतील कोलंबियाचा किनारा, मेलानी-शियातील मोठी बेटे इ. प्रदेशात काही प्रमाणात अशीे परिस्थिती आढळते. परंतु तेथील वनस्पती, प्राणी व लोकजीवन स्थानिक परिस्थितीनुसार काही बाबतीत भिन्न आढळते. काही भागांत स्थायी स्वरूपाची व मळ्यांची शेती विकसित झाली आहे. खनिज तेल, कथिल, लोह धातुके, सोने, तांबे, जस्त इ. खनिजांचे औद्योगिक दृष्ट्या उत्पादन घेतले जात आहे. विकासाच्या संधी उपलब्ध असल्याने एक समृद्ध, संपन्न व प्रगतशील प्रदेश म्हणून याचा विकास होत आहे.

चौंडे, मा. ल.