सेल्टन, राइनहार्ट : (५ ऑक्टोबर १९३०–) प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि नेाबेल पुरस्काराचे सहमानकरी. त्याचा जन्म सामान्य पुस्तकविक्रेत्या कुटुंबात ॲडॉल्फ सेल्टन आणि केट लूटर या सुशिक्षित दांपत्यापोटी ब्रेस्लौ (व्ह्र्ॉट्स्लाफ) या गावी झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्याने फ्रँकफुर्ट विद्यापीठातून गणित विषयात पदवी संपादन केली (१९५७). पुढे त्याने अध्यापन हा व्यवसाय स्वीकारला आणि फ्री विद्यापीठ (बर्लिन), बीकफेल्ट विद्यापीठ आणि बॉन विद्यापीठात सैद्धांतिक अर्थशास्त्राचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्याची गुणश्री प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर बॉन विद्यापीठात तो संशोधन समन्वयक म्हणून एक्सपेरिमेंटल इकॉनॉमिक्स लॅबॉरेटरीमध्ये कार्यरत होता.

सेल्टन विद्यार्थिदशेत असताना (१९४७-४८ दरम्यान) त्याच्या वाचनात फॉर्च्यून हे नियतकालिक आले. त्यात खेळ सिद्धांताविषयी एक लेख होता. त्यावेळेपासून त्याला खेळ सिद्धांताविषयी कुतूहलापोटी गोडी निर्माण झाली. पुढे त्याने जॉन एफ्. नॅश याच्या मूळ खेळविषयक संशोधनावर १९६५ मध्ये संस्करण करून खेळातील वाजवी आणि अवाजवी (असंयुक्तिक) भेद स्पष्ट करणाऱ्या संभाव्य निकालांविषयीच्या उपपत्त्या सूचित केल्या कारण खेळ सिद्धांत ही गणिताची एक शाखा असून तिच्यात संमिश्र हितसंबंध असलेल्या चढाओढीचे परीक्षण केले जाते. गणितातील खेळ सिद्धांताच्या विकासार्थ केलेल्या त्याच्या कार्याचा उचित गौरव म्हणून त्यास अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन एफ्. नॅश व र जॉन चार्ल्स हॉर्ससॅनी यांच्याबरोबर विभागून देण्यात आले (१९९४). त्याचा खेळ सिद्धांत ‘ सेल्टन हॉस ‘ या नावानेसुद्धा ओळखला जातो.

सेल्टन हा बंधित बुद्धिप्रामाण्यवादविषयक (बॉउन्डेड रॅशनॅलिटी) कामासाठी प्रसिद्ध असून प्रायोगिक अर्थशास्त्राच्या संस्थांपैकी तो एक जनक (फाऊंडिंग फादर्स) होता. तो एस्पेरांनी या कृत्रिम भाषेच्या प्रसार-प्रचारार्थ चळवळीमध्ये सहभागी झाला. या चळवळीत एलिझाबेथ लँग्रिनर या युवतीशी त्याची भेट झाली. त्याची परिणती पुढे विवाहात झाली (१९५९). सान मारिनो येथील इंटरनॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सिस या संस्थेचा तो सहसंस्थापक व सदस्य आहे. तसेच अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सिसचे स्टेस प्राईस (२०००) त्याला मिळाले असून काही विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली आहे.

सेल्टन याने प्रामुख्याने अर्थशास्त्रविषयक लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी जनरल इक्विलिब्रियम वीथ प्राइस मेकिंग फर्म्स (सहलेखक टी. मॉर्शाक – १९७४), मॉडेल्स ऑफ स्ट्रॅटेजिक रॅशनॅलिटी (१९८८), ए जनरल थिअरी ऑफ इक्विलिब्रियम सिलेक्शन इन गेम्स (सहलेखक जॉन हॉर्ससॅनी–१९८८) वगैरे प्रसिद्ध आहेत.

राऊत, अमोल