सेन, सुकुमार–२ : (३० जानेवारी १९००–३ मार्च १९९२). बंगाली ख्यातनाम प्राच्यविद्यापंडित, भाषाभ्यासक व बहुभाषाकोविद साहित्येतिहासकार आणि ललित लेखक. उत्तर कोलकात्यातील गोआबागन येथे जन्म. बरद्वान येथील म्युन्सिपल विद्यालयातून ते मॅट्रिक झाले (१९१७). पुढे राज कॉलेज, बरद्वान संस्कृत कॉलेज आणि कोलकाता विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. संस्कृत आणि तौलनिक भाषाशास्त्र हे विषय घेऊन अनुक्रमे बी. ए. आणि एम्. ए. ह्या पदव्या त्यांनी संपादन केल्या. ओल्ड पर्शियन इन्स्क्रिप्शन्स ऑफ अकॅमेनिअन एंपायर ह्या त्यांच्या प्रबंधाबद्दल १९३७ साली त्यांना कोलकाता विद्यापीठाची पीएच्. डी. देण्यात आली. ह्या विद्यापीठातच ते तौलनिक भाषाशास्त्राचे अधिव्याख्याते म्हणून काम करू लागले. १९५४ साली त्या विद्यापीठात भाषाशास्त्राचे प्राध्यापक (खैरा प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक्स) या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. १९६४ साली ते विभागप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले.
संस्कृत, पाली, बंगाली, हिंदी, मैथिली, गुजराती, मराठी, भोजपुरी, असमिया, ओडिया ह्या भारतीय भाषांप्रमाणेच ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच ह्यांसारख्या विदेशी भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे पांडित्य व विश्वकोशीय विद्वत्ता यांमुळे त्यांना बौद्धिक क्षेत्रात खास स्थान प्राप्त झाले. आपल्या विद्याव्यासंगी जीवनाच्या आरंभी त्यांनी भाषाशास्त्र आणि प्राच्यविद्यांचा अभ्यास केला. प्राचीन भारतीय साहित्य आणि प्राचीन व मध्ययुगीन बंगाली साहित्य ह्या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. नंतर ते बंगाली संस्कृतीवर आणि आधुनिक बंगाली साहित्यावर ग्रंथलेखन करू लागले. नंतरच्या काळात भारतीय मिथ्यकथांचे आणि आख्यायिकांचेही त्यांनी संशोधन केले तसेच कथालेखनही केले.
बंगाली व इंग्रजी भाषांत त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. भाषार इतिवृत्त (१९३९) हा त्यांचा ग्रंथ भाषा- शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. बांगला साहित्येर इतिहास (४ खंड, १९४०–५८) हा त्यांचा बंगाली ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानला जातो. बंगाली संस्कृती, परंपरा आणि साहित्य ह्यांवर त्यांनी लिहिलेल्या अन्य ग्रंथांत इस्लामी बांगला साहित्य (१९५१), बंगभूमिका (१९७४), नट, नाट्य, नाटक (१९७७), रबींद्रेर इंद्रधनु (१९८४) इत्यादींचा उल्लेख करता येईल. त्यांनी इंग्रजीत लिहिलेला हिस्टरी ऑफ बेंगॉली लिटरेचर (१९६०) हा साहित्य अकादेमी, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ असून, त्याचा मराठी अनुवाद वीणा आलासे यांनी बंगाली साहित्याचा इतिहास या शीर्षकाने केला आहे (१९८२). त्यांच्या अन्य इंग्रजी ग्रंथांत हिस्टरी ऑफ ब्रजबुली लिटरेचर (१९३५), हिस्टॉरिकल सिंटॅक्स ऑफ मिड्ल इंडो-आर्यन (१९५०), हिस्टरी अँड प्री-हिस्टरी ऑफ संस्कृत (१९५८), कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ मिड्ल इंडो-आर्यन (१९६०), द लॅटिन लँग्वेज (१९६१) हे साहित्येतिहास, भाषाशास्त्र व व्याकरणविषयक ग्रंथ ॲन एटिमॉलॉजिकल डिक्शनरी ऑफ बेंगॉली (१०००–१८०० ए.डी.), खंड १ व २ (१९७१) हा व्युत्पत्तिकोश हे खास निर्देशनीय ग्रंथ होत. तसेच ऑरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रामा लेजंड (१९७७) हा ग्रंथ भारतीय पुराणकथांच्या संदर्भात महत्त्वाचा मानला जातो. बंगालीमध्ये त्यांनी लिहिलेल्या लघुकथांचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. पंडिती प्रतिभा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती ह्यांचा मिलाफ त्यांच्या कथांत दिसतो. दिनेर परे दिन जे गेलो (१९८२) या त्यांच्या आठवणींवजा आत्मकथनातून समकालीन जीवनाचे हृद्य दर्शन घडते. सेन यांच्या व्युत्पत्तिविषयक आणि व्याकरणविषयक संशोधनात्मक लेखनाचा प्रभाव नंतरच्या अनेक लेखकांवर पडला. बंगाली भाषेचा त्यांचा व्युत्पत्तिकोश संदर्भग्रंथ म्हणून मौलिक व उपयुक्त ठरला आहे. बंगाली तसेच अन्य भारतीय भाषा-साहित्याचे त्यांनी केलेले संशोधनपूर्ण, साक्षेपी इतिहासलेखन हीदेखील त्यांची अजोड कामगिरी ठरली आहे. त्यांच्या लेखनातून – विशेषत: बंगाली साहित्येतिहासावरील लेखनातून-विविध विषयांत रुची व आस्था असलेले त्यांचे प्रगल्भ, सुसंस्कृत व बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. प्राचीन कोरीव लेख, हस्तलिखिते व संहिता, सामाजिक रीतिरिवाज व सवयी, बंगालमधील धार्मिक संप्रदाय, नाटक व रंगभूमी, रवींद्र संगीत इ. अनेक विषयांत त्यांना रस होता.
सेन यांना अनेक मानसन्मान लाभले : रवींद्र पुरस्कार (१९६३) बरद्वान विद्यापीठाची ‘डी. लिट्’ ही मानद पदवी (१९७०) साहित्य अकादेमीचे सन्मान्य सदस्य (१९७४) व कोलकात्याच्या ‘एशियाटिक सोसायटी’चे अनेक वर्षे सदस्य विद्यासागर पुरस्कार (१९८१) विश्वभारती विद्यापीठाची ‘देशिकोत्तम पदवी’ (१९८२) इत्यादी. लंडनच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ने त्यांच्या प्राच्यविद्या संशोधनकार्याबद्दल त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविले (१९८३). या संस्थेचे त्रैवार्षिक सुवर्णपदक मिळविणारे ते पहिले भारतीय विद्वान होत. तसेच पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९९०).
कुलकर्णी, अ. र.