सेबॅसिक अम्ल : हे ज्वलनक्षम, पांढरे व स्फटिकमय कार्बनी संयुग असून त्याचे रासायनिक सूत्र COOH·(CH2)·COOH असे आहे. अल्कोहॉल व ईथर यांमध्ये हे विरघळते आणि पाण्यात किंचितच विरघळते. त्याचा रेणुभार २०२·२४, वि. गु. १·२०९, उकळबिंदू २९४·४° से. व वितळबिंदू १३३° से. असून त्याला मंदसा तेलकट वास येतो. ते धोकादायक नसले तरी चटकन पेटते. ॲलिफॅटिक द्विक्षारकीय अम्लांच्या मालिकेतील सर्वाधिक कार्बन अणू असलेले हे अम्ल आहे. डीकेन व ऑक्टेन यांच्याशी असलेल्या संबंधावरून त्याला अनुक्रमे डीकेन डायोइक अम्ल व ऑक्टेन डायकार्बॉक्सिलिक अम्ल असेही म्हणतात. शिवाय सेबॅसायक्लिक अम्ल हेही त्याचे पर्यायी नाव आहे. मेणबत्त्यांच्या निर्मितीत ते वापरत असल्याने मेणबत्ती अर्थाच्या लॅटिन शब्दावरून त्याचे सेबॅसिक अम्ल हे नाव आले आहे.
ओलेइक अम्लाचे उच्च तापमानाला ऊर्ध्वपातन करून किंवा स्टिअरिक अम्लाचे ⇨ ऑक्सिडीभवन करून सेबॅसिक अम्ल तयार करता येते. खनिज तेल रसायनांपासूनही सेबॅसिक अम्ल संश्लेषणाने तयार करता येते. मात्र औद्योगिक प्रमाणावर एरंडेलापासून ते तयार करतात. प्रथम एरंडेलाचा द्रवरूप साबण तयार करतात. विक्रिया कुंडात पॅराफीन व दाहक (कॉस्टिक) सोड्याचा विद्राव यांचे मिश्रण २६०° से.पर्यंत तापवितात. नंतर त्यात द्रवरूप साबण थोडा थोडा मिसळतात. या विक्रियेत २ ऑक्टेनॉल व सेबॅसिक अम्ल तयार होतात.
२ –ऑक्टेनॉल व पाणी बाष्पनशील (बाष्पाच्या रूपात उडून जाणारे) असल्याने ते विक्रिया कुंडातून ऊर्ध्वपातनाने मिळवितात. विक्रिया पूर्ण झाल्यावर कुंडातील मिश्रणावर सौम्य सल्फ्यूरिक अम्लाचे संस्करण करतात. यामुळे पांढऱ्या अवक्षेपाच्या (साक्याच्या) रूपात सेबॅसिक अम्ल मिळते.
सेबॅसिक अम्लाचे विशेष औद्योगिक उपयोग नाहीत. मेणबत्तीच्या मेणाचे मिश्रण, सुवासिक द्रव्ये, रंगलेप जलप्रेरण द्रायू, विशेषतः वैमानिकीय वंगणे, सौंदर्यप्रसाधने, पूतिरोधक द्रव्ये इत्यादींत सेबॅसिक अम्ल वापरतात. त्याच्यापासून बनविलेली दुसरी संयुगे म्हणजे त्याचे अनुजात औद्योगिक क्षेत्रात अधिक उपयुक्त आहेत. उदा., सेबॅसिक एस्टरे प्लॅस्टिक उद्योगात प्लॅस्टिकीकारक म्हणून अतिशय उपयुक्त आहेत. विशेषतः सेल्युलोजयुक्त प्लॅस्टिके, पॉलिव्हिनिल क्लोराइड (पीव्हीसी) व पॉलिएथिलीन या प्लॅस्टिकांत असा उपयोग करतात. विमानातील यंत्रांसाठीची वंगणे बनविण्यासाठीही सेबॅसिक अम्लाचे एस्टर अनुजात वापरतात, तर त्याचे पॉलिअमाइडे अनुजात नायलॉनासारखे कृत्रिम तंतू बनविण्यासाठी उपयुक्त आहेत.
पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने १९६२-६३ मध्ये एरंडेलापासून सेबॅसिक अम्ल तयार केले होते. मात्र भारतात त्याचे औद्योगिक उत्पादन होत नाही. सेबॅसिक अम्लाचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते व त्याचा ९० टक्क्यांहून अधिक जागतिक व्यापार चीनमधून होतो.
ठाकूर, अ. ना.