कोंकण कृषि विद्यापीठ : महाराष्ट्र राज्यातील एक नवोदित कृषि विद्यापीठ. याची स्थापना १८ मे १९७२ रोजी दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाली. या विद्यापीठाचे उद्दिष्ट कोकण या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, परंतु नैसर्गिक संपत्तीने संपन्न असलेल्या प्रदेशाची कृषी व तत्संसबंधित क्षेत्रांत उन्नती करणे, हे आहे. यादृष्टीने फलोद्यान व मत्स्योद्योग यांना या विभागात चांगला वाव आहे. असे संशोधकांना आढळून आले. विद्यापीठाचे सर्वसाधारणतः क्षेत्र कोकण परिसरातील कृषी महाविद्यालयांपुरते मर्यादित असून सध्या विद्यापीठास पशुवैद्यक महाविद्यालय (मुंबई) व कृषी महाविद्यालय (दापोली) ही दोन महाविद्यालये संलग्न केली आहेत. या महाविद्यालयांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय केलेली असून या दोन महाविद्यालयांव्यतिरिक्त चौदा संशोधनकेंद्रे आणि दोन मत्स्यसंवर्धनकेंद्रे यांमध्ये संशोधन केले जाते.
विद्यापीठास सध्या तरी महाराष्ट्र शासन शंभर टक्के अनुदान देते. विद्यपीठात १९७२-७३ मध्ये एकणू ५२२ विद्यार्थी शिकत होते. याशिवाय विद्यापीठाच्या कृषिविस्तार शाखेतर्फे शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करून शेतीचे आधुनिक तंत्र त्यांना शिकविण्यात येते.
देशपांडे, सु. र.