केसीन : प्रमुख दुग्धप्रथिन (लॅक्टोप्रोटीन) व चीजमधील एक आवश्यक घटक. दुधात ते कॅल्शियम केसिनेट या स्वरूपात असते. दुधात केसीन ३% असते व त्यात असलेल्या दुग्धप्रथिनांत याचे प्रमाण ८०% असते. कॅल्शियम केसिनेट व कॅल्सियम फॉस्फेट यांच्या कलिलीय (अतिसूक्ष्म लोंबकळणाऱ्या) कणांमुळे मलईविरहित दुधाला पांढरा रंग येतो. रेनेटामुळे (दुधाचे दही बनविण्याऱ्या पदार्थामुळे) केसिनाचे पॅराकेसिनामध्ये रूपांतर होते व कॅल्शियम पॅराकेसिनाचे क्लथन(गुठळ्या बनणे) होते. आंबट किंवा अम्लीय मलईविरहित दुधातील केसिनाचे घनिभवन होते व दुग्धजलात (व्हे मध्ये) कॅल्शियम लवणे राहतात.
शुद्ध केसीन हे शुभ्र चूर्णरूपी घन असून त्याला रूची व वास नसतो. व्यापारी केसीन हे साधारण पिवळसर असून त्याला मधूर वास असतो. ओल्या केसिनावर बुरशी व सूक्ष्मजंतू यांची विक्रिया जलद होते आणि त्यामुळे केसिनाला कुबट वास येतो. वि.गु. १·२५ – १·३१. केसीन हे निरनिराळे रेणुभार असलेल्या फॉस्फोप्रथिनांचे मिश्रण असून ते जलस्नेही (पाण्याचे आकर्षण असलेले) कलील (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले द्रव मिश्रण) आहे व ते अल्ब्युमीन आणि जिलेटीन यांसारखे आहे. ते उभयधर्मी (अम्लधर्मी व क्षारघर्मी, म्हणजे अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देण्याचा गुणधर्म असणारे, असे दोन्ही गुणधर्म असणारे) असून pH मान ४·६ [→ पीएच मूल्य] असताना समविद्युत् भारी (विद्युत् भारदृष्ट्या उदासीन) होते. यावेळी त्याची पाण्यातील विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) ०·०१% इतकी असते. ते कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थात) अविद्राव्य आहे.
केसीन हे सामान्यतः मलईविरहित दुधापासून, क्वचित ताकापासून, पुढील तीन पद्धतींनी बनवितात. (१) स्ट्रेप्टोकॉकस लॅक्टिस ह्या सूक्ष्मजंतूमुळे दुग्धशर्करेचे (लॅक्टोजाचे) किण्वन होऊन (सूक्ष्मजंतूच्या क्रियेमुळे घटकद्रव्ये अलग होऊन) पुरेसे लॅक्टिक अम्ल तयार झाल्यावर केसिनाचे घनिभवन होते. (२) विरल हायड्रोक्लोरिक अम्ल किंवा सल्फ्यूरिक अम्ल मिसळून अम्लीय केसीन अवक्षेपित करतात (साका तयार करतात). (३) गरम मलईविरहित दुधात रेनेट मिसळून कॅल्शियम पॅराकेसिनेटाचे क्लथन करतात व त्यातील दुग्धजल अलग करण्यासाठी त्याचे बारीक तुकडे करतात. वरील सर्व पद्धतींत दुग्धजल वेगळे करणे, पाण्याने घनरूप केसीन धुणे, दाबयंत्राने दाबून पाणी वेगळे करणे, गरम हवेत वाळविणे, दळणे इ. प्रक्रिया करतात.
केसिनाचा उपयोग विशिष्ट तयार खाद्यपदार्थांत, औषधांत आणि सौदर्यप्रसाधनांत करतात. आहाराच्या द्दष्टीने ते उत्कृष्ट प्रथिन आहे. म्हणून त्याचा उपयोग पूर्वपाचित (शरीरात होणाऱ्या पचनाच्या क्रियेसारखी कृत्रिम क्रिया केलेल्या) खाद्यपदार्थांत करतात. असे खाद्यपदार्थ जठरदाह, हगवण, प्रथिन-न्यूनता इ. रोगांत दिले जातात. कातडी स्वच्छ करण्यासाठी, पांढऱ्या बुटांच्या पॉलिशात, कापड छपाईत, कीटकनाशक फवाऱ्यात, साबण निर्मितीत इ. धंद्यांत ते थोड्या प्रमाणात वापरतात. मोठ्या प्रमाणावर ते कागदाला गुळगुळीतपणा आणण्यासाठी त्यावर देण्यात येणारे लेप. लाकडी जोड सांधणयाचा सरस, रंगलेप आणि डिस्टेंपर यांमध्ये तसेच लोकरसदृश्य कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी, बटणासारख्या वस्तूंसाठी लागणारे प्लॅस्टिक तयार करण्याकरिता वापरतात.
भारतात केसीन तयार करण्याचे कारखाने महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, पंजाब व प. बंगाल या राज्यांत आहेत. सर्वसाधारणतः भारतात दरवर्षी २,००० टन केसीन तयार केले जाते. त्या पैकी ९०% किण्वन पद्धतीने व १०% रेनेटाचा उपयोग करून करतात.
पहा : तंतु, कृत्रिम दुग्धव्यवसाय प्लॅस्टिक.
संदर्भ: Sutermeister, E. Browne, F.L. Casein and its Industrial Applications, New York, 1939.
कोटणीस, नि. द.