खुदाई खिदमतगार : खान अब्दुल गफारखान यांनी १९२९ मध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात स्थापन केलेली एक स्वयंसेवक संघटना. खुदाई खिदमतगार म्हणजे ईश्वराचा सेवक. ईश्वराने निर्माण केलेल्या भूतमात्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय, या तत्त्वावर ही संघटना स्थापन झाली. पठाणांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली वैरभावना आणि तीमुळे घडणारे भीषण गुन्हे नाहीसे करून, नवी दृष्टी घेतलेला व स्वातंत्र्यासाठी झगडणारा समाज तयार व्हावा, हा गफारखानांचा मुख्य हेतू होता. स्वावलंबन, काटकसर व उद्योगप्रियता निर्माण करून पठाणांचा स्वाभिमान जागृत करणे, हे या संघटनेचे कार्य होते. सत्य व अहिंसेचे पालन करून मी देशासाठी प्राणार्पण करीन व अशा रीतीने परमेश्वराची सेवा करीन, अशा अर्थाची शपथ प्रत्येक स्वयंसेवकास घ्यावी लागे. लाल रंगाचा गणवेष हा स्वयंसेवकासाठी ठरविण्यात आला.

प्रथमतः सामाजिक कार्यासाठी जरी ही संघटना स्थापन झाली, तरी लवकरच स्वातंत्र्याच्या चळवळीत ती संघटना प्रामुख्याने भाग घेऊ लागली. कालांतराने तीत लक्षावधी स्वयंसेवक दाखल झाले. त्यांच्या लष्करी थाटाच्या कवायती होत असत परंतु हे स्वयंसेवक, शस्त्रास्त्र तर नाहीच, लाठीदेखील घेत नसत. त्यांनी उत्पन्न केलेल्या जागृतीमुळे ब्रिटिश सरकारचा रोष होऊन संघटना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला व हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले. लाल गणवेषामुळे हे साम्यवादी व रशियाचे हस्तक आहेत, असेही भासविण्याचा प्रयत्न झाला.

पाकिस्ताननिर्मितीनंतर ह्या संघटनेने पख्तुनिस्तानची चळवळ हाती घेतली. पाकिस्तानने ही चळवळ बेकायदेशीर ठरवून ⇨ खान अब्दुल गफारखान  आणि इतर नेत्यांना कैदेत टाकले. परंतु ह्या संघटनेमुळे पठाणांमध्ये निर्माण झालेली स्वायत्त पख्तुनिस्तानची भावना मात्र अद्याप नष्ट झालेली नाही.

केळकर, इंदुमति