खारकच्छ : समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या पाण्याची पट्टी. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद पट्टीने उपसागराचे मुख अंशतः किंवा पूर्णपणे बंद झाले असेल, तर किनारा व ही पट्टी यांमधील जलविभागालाही खारकच्छ म्हणतात. किनाऱ्याजवळील प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छ निर्माण होते. खारकच्छ उथळ असते व सपाट तळाच्या लहान नौकांच्या वाहतुकीस ते उपयुक्त असते.खारकच्छ

असे खारकच्छ भारताच्या नैर्ऋत्य व आग्नेय किनाऱ्यांवर पुष्कळ आढळतात. केरळचे ते एक वैशिष्ट्यच आहे. तेथील नारळ, काथ्या व त्यांपासून बनविलेल्य वस्तू यांची बरीच वाहतूक त्यांतून होते. खारकच्छाचे केरळमधील स्थानिक नाव ‘कायल’ असे आहे. नदीचे पाणी समुद्रात शिरू शकले नाही, तर ते मुखाजवळ किनाऱ्याला समांतर दोन्ही बाजूंस पसरते. त्यासही कायल (बॅक-वॉटर) म्हणतात. वाहतुकीच्या सोयीसाठी कायले एकमेकांस व समुद्राला कालव्यांनी जोडलेली असतात. किनाऱ्यापासून असलेल्या प्रवाळभित्ती आणि किनारा यांच्या दरम्यानचे खारकच्छ रुंद, खोल व विस्तृत असतात. कंकणद्वीपाच्या आतील बाजूस जे जलविभाग असतो तोही खारकच्छ होय. जर्मनी, पोलंड व रशिया यांच्या बाल्टिक समुद्रावरील किनाऱ्यावर काही नद्यांच्या मुखाशी एक टोक जमिनीशी जोडलेल्या वाळूच्या दांड्यांनी खारकच्छ तयार झाले आहेत. त्यांस तेथे ‘हाफ’ म्हणतात व ते तयार करणाऱ्या वाळूच्या दांड्यांस ‘नेहरूंग’ म्हणतात. या बंदिस्त खारकच्छांच्या अरुंद मुखांतून आत आलेल्या जहाजांना तेथे आसरा घेता येतो. नदीच्या पाण्यामुळे या खारकच्छांतील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी खारट व कधी कधी जवळजवळ गोडेच असते. कालांतराने नदीच्या गाळामुळे ‘हाफ’ भरून येऊन ते नौकांस निरुपयोगी होतात. वाळूच्या टेकड्यांमुळेही खारकच्छ तयार होतात. कच्छ याचा अर्थ पाणथळ जागा असा आहे. खार म्हणजे क्षारयुक्त किंवा खारट यांवरून खारकच्छ हा शब्द खाजण (लॅगून) या अर्थी बनला आहे. अनूप, पश्चजल, समुद्रताल हे शब्दही याच अर्थाने वापरता येतील.

कुमठेकर, ज. ब.