खार : स्तनिवर्गाच्या कृंतक (कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणातील सायरिडी कुलातील हा प्राणी आहे. खारी लहान अथवा मध्यम आकारमानाच्या असतात. यांचे मागचे पाय मजबूत असून शेपूट मोठे असते. वृक्षवासी खारींचे शेपूट झुबकेदार असून त्याचा संतोलक (शरीराचा तोल सांभाळणारे) अंग म्हणून उपयोग होतो. पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटे आणि मागच्या पायांना प्रत्येकी पाच बोटे असतात. तोंडाच्या आत अन्न तात्पुरते साठवून ठेवण्याकरिता कपोल-कोष्ठ (गालात असणाऱ्या पिशव्या) असतात. बहुतेक खारी दिवसा काहींना काही उद्योगात गढलेल्या असतात. थंड प्रदेशातील भूचर खारी हिवाळ्यात शीतसुप्तीत (हिवाळ्यात येणाऱ्या अर्धवट अथवा पूर्ण गुंगीच्या स्थितीत) जातात.

खारी जवळजवळ सर्वत्र आहेत असे म्हणता येईल पण त्या ऑस्ट्रेलिया, अगदी ध्रुवालगतचा प्रदेश, मॅलॅगॅसी (मादागास्कर), न्यूझीलंड, हवाई बेटे यांत आढळत नाहीत. उष्ण कटिबंधातील प्रदेशात, विशेषेकरून भारतात, त्या मुबलक आहेत. यांचे सु. ४० वंश आणि अगणित जाती आहेत. त्या ज्या भागात राहतात तेथील परिस्थितीशी त्यांचे अनुकूलन (ज्या प्रक्रियेने प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो ती) झालेले असते.

खार (पाच पट्ट्यांची)

सबंध भारतात खारींच्या दोन जाती प्रामुख्याने आढळतात. यांपैकी एक बरीचशी माणसाच्या सहवासात राहणारी असून तिला सामान्य खार म्हणतात. हिचे शास्त्रीय नाव फ्युनँब्युलस पेन्नांटाय  असून दुसरीचे फ्युनँब्युलस पामेरम  आहे. दोन्ही जाती हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे आढळतात. सामान्य खार शेते, माळराने व मनुष्यवस्तीच्या आसपास राहते. दाट वस्तीची शहरे, गावे आणि खेडी यांतही ती असते. फ्यु. पामेरम ही जात जंगलात राहणारी आहे. भारताच्या दक्षिण आणि पूर्व व पश्चिम भागांत ती जास्त आढळते. उत्तर भारतात सामान्य खारीचे वर्चस्व आहे.

सामान्य खारीची लांबी १३–१५ सेंमी. असून शेपटीची लांबी यापेक्षा किंचित जास्त असते. शरीराचा रंग करडा तपकिरी असतो अंगावरचे केस मऊ व दाट असून पाठीवर पाच फिक्कट पट्टे असतात त्यांपैकी तीन मध्यभागावर आणि प्रत्येक बाजूवर एकेक असतो. फ्यु.पामेरम  या जातीत पाठीवर फक्त तीनच पट्टे असतात. सामान्य खार फार चलाख व कार्यक्षम असते. जमिनीवर किंवा झाडांवर तिची सारखी दौड चालू असते. या गोजिरवाण्या प्राण्याच्या सर्व हालचाली चित्तवेधक असतात. फळे, कठीण कवचाची फळे, शेंगा, कोवळे कोंब, कळ्या हे त्यांचे खाद्य होय. पण शेवरीच्या फुलातला मध, किडे आणि पक्ष्यांची अंडीसुद्धा या खातात.

नर आणि मादी दोनतीन दिवसच एकेठिकाणी येतात याच काळात गर्भधारणा होत असावी. गर्भावधी सु. सहा आठवड्यांचा असतो. पिल्ले जन्मण्याच्या सुमारास मादी पिल्लांकरिता झाडावर, घराच्या आढ्यात किंवा भिंतीच्या बिळात ओबडधोबड घरटे बांधते. दर खेपेला मादीला दोन किंवा तीन पिल्ले होतात. जन्माच्या वेळी ती आंधळी असतात. स्वतः अन्न मिळवू लागेपर्यंत ती घरट्यातच राहतात.

कर्वे, ज. नी.