खाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार. संपूर्ण नाव मुहम्मद हाशिम अली-खाफीखान. पण ते खाफीखान या टोपण नावानेच अधिक ओळखला जातो. खोरासानमधील खाफ या प्रादेशिक नावावरून हे नाव पडले. औरंगजेबाच्या कारकीर्दीत आपला मूल्यवान ग्रंथ दडवून ठेवावा लागला, म्हणून त्यास खाफी हे नाव मिळाले अशीही दंतकथा प्रचलित आहे. पण तीत फारसे तथ्य नाही. त्याचे वडील ख्वाजा मीर हे औरंगजेबाचा भाऊ मुरादबख्श याच्या पदरी नोकरीस होते. तेही इतिहासकार होते. वडिलांप्रमाणेच यानेही मोगलांची नोकरी पतकरून औरंगजेबाच्या सैन्यात व दरबारात चांगली कामगिरी केली. पुढे फरूखसियरच्या काळात निजामुल्मुल्कने त्यास दिवाण केले. मोगल सम्राट मुहम्मदशाह याच्या कारकीर्दीत त्याने लिहिलेल्या मुन्तरववुललुबाब-इ-मुहंमदशाही नावाच्या ग्रंथामुळे त्याची ख्याती झाली.
या ग्रंथात १५१९ मधील बाबरच्या भारतावरील स्वारीपासून ते मोगल बादशाह मुहम्मदशाहाच्या कारकीर्दीतील चौदाव्या वर्षांपर्यंतचा (१७३२–३३) इतिहास आहे. या ग्रंथाची लेखनशैली प्रभावी आहे. त्याचा उत्तरार्ध तुलनेने अधिक विश्वसनीय मानण्यात येतो. त्यात औरंगजेबाच्या संपूर्ण कारकीर्दीची माहिती देण्यात आली आहे. शिवाजीच्या गुणांबद्दल स्तुतिपर उद्गार काढणारा हा एकुलता एक मुसलमान इतिहासकार आहे. तो मुसलमानांचा पक्षपाती आणि गप्पीदास आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.
खोडवे, अच्युत