खंदक युद्धतंत्र : खुल्या मैदानातील एक बचावात्मक युद्धतंत्र. लांबच लांब, चिंचोळे व ज्यात सैनिकाला उभे राहता येईल (परंतु शिरस्त्राणयुक्त डोके जमिनीच्या पृष्ठाखाली राहील), इतक्या खोलीचे मुद्दाम खणलेले चर म्हणजे खंदक. खंदकाच्या बाजू लाकडी फळ्यांनी भक्कम केलेल्या असतात. खंदकाच्या पुढच्या म्हणजे शत्रूकडे तोंड असलेल्या कडांवर माती टाकून ती बाजू अल्प उंचीच्या बंधाऱ्यासारखी करतात. त्यामुळे खंदकांतील सैनिकांना गोळीबार व तोफगोळ्यांतून उडालेले तुकडे यांपासून बरेचसे संरक्षण मिळते. जमिनीचा चढउतार व उंचसखलपणा लक्षात घेऊन खंदकांची आखणी करतात. खंदकांच्या रांगा वाकड्यातिकड्याही असू शकतात. खंदकांच्या रांगा साधारणपणे आघाडीला शत्रूच्या खंदकांना समांतर असतात. उदा., पहिल्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांची खंदकफळी बेल्जियमच्या सरहद्दीपासून ते बेलफॉर येथील स्वित्झर्लंडच्या सरहद्दीपर्यंत पसरलेली होती. खंदकफळीच्या बगला बहुतेक भुईकोट किंवा नैसर्गिक अडथळ्यांच्या साहाय्याने सुरक्षित ठेवतात. शक्य असल्यास बगला तटस्थ राष्ट्रांच्या सरहद्दीला भिडवितात. त्यामुळे हल्ला करणे झाल्यास असल्या राष्ट्रांच्या तटस्थेचा भंग करणे भाग पडते.
खंदकांच्या फळ्यांतून वा रांगांतून जे युद्ध वा लढाई केली जाते, त्यास खंदकयुद्ध म्हणतात. अशा प्रकारच्या युद्धात शत्रूवर कबजा करण्यास सैनिकांना खंदकाबाहेर पडून आपल्या व शत्रूच्या खंदकांच्या दरम्यान असलेली जमीन तुडवून, तसेच शत्रूच्या गोळीबारास तोंड देऊन त्यावर हल्ला करावा लागतो. म्हणून हल्ला करणाऱ्या सैनिकांची नाहक प्राणहानी होते. शिवाय इष्टसिद्धी होण्यास वरचेवर हल्ले करणे भाग पडते. उदा., अमेरिकन यादवी युद्धातील पिट्सबर्गचे युद्ध.
खंदक युद्धतंत्रात दोन प्रकारांनी हल्ला करता येतो : शत्रूच्या संपूर्ण आघाडीवर समोरून हल्ला करणे, हा एक डाव. यात हल्ला करण्यास भरपूर सैन्य व पूर्वतयारी करावा लागते. सुदैवाने शत्रुफळीत एखादी कमजोर जागा सापडली, तर त्या ठिकाणी एकवटून हल्ला करणे आणि शत्रुफळी फोडणे. शत्रूच्या फळीवरील बगलेवर हल्ला करून शत्रूची आघाडी गुंडाळणे, हा दुसरा डाव.
शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणाचा उपाय म्हणून सैन्यतळाभोवती खोल रुंद खंदक खोदण्याची पद्धत प्राचीन काळी रूढ होती. त्यावेळी भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीभोवती खंदक खोदले जात व त्यांत पाणी सोडण्यात येत असे. तेराव्या शतकात बंदुकीची दारू व पुढे कुलपी गोळे वगैरे प्रक्षेप्य अस्त्रांच्या शोधानंतर मात्र तटाला दूर अंतरावरून खिंडार पाडण्याची व दुरूनच विस्तृत क्षेत्रात गोळ्यांचा भडिमार करण्याची सोय उपलब्ध झाली, त्यामुळे भुईकोट तटबंदी व त्यासभोवारचे खोल खंदक यापूर्वीच्या संरक्षक योजना निरुपयोगी म्हणून मागे पडल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत खंदकी युद्धतंत्राचा वापर क्वचितच झालेला दिसतो. १८१५ मधील सुप्रसिद्ध वॉटर्लूच्या लढाईत खंदकांचा अभाव होता. याचे कारण म्हणजे तत्कालीन वापरात असलेली शस्त्रास्त्रे. गोळीबाराचा आणि गोळामारीचा पल्ला त्याचप्रमाणे अचूकपणाही मर्यादित होता. पुढे पुढे भुईलगत होणाऱ्या गोळीबारापासून व मशीनगन्सच्या माऱ्यापासून बचाव करण्याकरिता खंदकाचा वापर सुरू झाला. खंदकामुळे सैन्याच्या त्वरित हालचालीस पायबंद बसतो. म्हणून खंदकी युद्धतंत्रास स्थिर युद्धप्रकार म्हणणे चुकीचे नाही.
पहिल्या महायुद्धात खंदक युद्धतंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. सैनिक व सामग्री यांची होणारी भयंकर हानी आणि युद्धनिर्णयास लागणारा काळ यांवर मात करण्याकरिता रणगाड्यांचा वापर थोडा वेळ, परंतु साशंकतेने करण्यात आला. १९१८ नंतर सर लिडेल-हार्ट व जनरल फुलर यांसारख्या युद्धशास्त्रज्ञांनी बरेच मौलिक संशोधन करून रणगाड्यांचे महत्त्व आणि त्यांचा उपयोग करण्याच्या तंत्रावर नवा प्रकाश टाकला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी सुरुवातीस रणगाड्यांचा उपयोग करण्यात अग्रेसरत्व मिळवून दोस्तांवर मोठे विजय मिळविले. यापुढे खंदक युद्धतंत्र मागे पडून त्याची जागा शीघ्र हालचालींच्या गतिमान युद्धतंत्राने घेतली.
पारंपरिक युद्ध असो वा अणुयुद्ध असो, सुरक्षिततेसाठी छोट्या छोट्या खंदकांचा आसरा घेणे अपरिहार्य आहे. सध्याच्या अणुयुगातदेखील खंदकी संरक्षण योजनांना पुन्हा एकदा ऊर्जितावस्था येणार, असे १९५० मध्ये नेव्हाडा येथील प्रयोगभूमीवर अमेरिकन अणुशक्ती मंडळाने केलेल्या प्रयोगांत दिसून आले आहे. त्यावेळी अण्वस्त्रांच्या स्फोटाच्या पुष्कळच जवळ खणलेल्या उथळ खंदकांमध्ये आश्रय घेतलेल्या सैनिकांना त्याची बाधा होत नसल्याचे लक्षात आले होते.
संदर्भ : 1. Burne, A. H. The Art of War on Land, London, 1950.
2. Liddel-Hart, B. H. Strategy – The Indirect Approach, London, 1967.
पाटणकर, गो. वि. दीक्षित, हे. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..