खंडकाव्य, मराठी: भावगीत, नाट्यगीत व इतर स्फुट भावकविता सोडल्यास सलग, निबद्ध म्हणता येईल अशी दीर्घ कविता, विशेषत: कथात्मक कविता, आज खंडकाव्य म्हणून समजली जाऊ लागली आहे. मराठी काव्यशास्त्रात हा शब्द अलीकडेच समाविष्ट झाला, असे म्हणावे लागेल. सु. पन्नास वर्षांपूर्वी गिरीश कवींचे अभागी कमल (१९२३) हे काव्य पुस्तकरूपात प्रकाशित होताना त्याचा उल्लेख एक सामाजिक खंडकाव्य असा करण्यात आला आणि तेव्हापासून स्वरूपत: त्यासारखी लिहिली गेलेली काव्ये ‘खंडकाव्य’ या संज्ञेने ओळखली जाऊ लागली. स्थूलमानाने संस्कृतमधील ‘सर्गां’प्रमाणे त्यांचे अनेक खंड असत, एकंदर कवितेचा विस्तारही अशा दहा-पंधरा खंडांचा असे आणि त्या काव्यात एखादी कथा सांगितलेली असे. गिरीशांचेच आंबराई (१९२८) आणि यशवंतांचे बंदीशाळा (१९३२) ही पुढील काव्ये या स्वरूपाची आहेत. खंडकाव्याची ही स्थूल कल्पना रूढ झाल्यावर त्या कल्पनेचे निरनिराळ्या बाजूंनी प्रसरण झाले. सामाजिक कथांबरोबर ऐतिहासिक, पौराणिक आणि कल्पनारम्य कथांचाही त्याच्या विषयात अंतर्भाव झाला. अनेक खंडात्मक कथेबरोबर एकखंडात्मक सलग अशा दीर्घ कथारचनाही त्या कल्पनेत बसू लागली. पूर्वीच्या सर्गांच्या मानाने बऱ्याच तोकड्या, पण संख्येने पुष्कळच अधिक अशा खंडांचे कथाकाव्यही खंडकाव्य म्हणून मान्यता पावू लागले आणि कथा अशी म्हणण्यासारखी नसतानाही एक वा दोन-चार खंडांचे चिंतनपर काव्यही खंडकाव्य म्हटले जाऊ लागले.
संस्कृत काव्यशास्त्रात खंडकाव्याचा निर्देश झालेला आहे, परंतु तत्संबंधी विवेचन असे जवळजवळ झालेच नाही. महाकाव्याचे मान्य असे जे विषय आहेत, त्यांतील एका विषयावर लिहिलेले काव्य, ते खंडकाव्य अशी त्याची व्याख्या केलेली असते (‘महाकाव्यस्य एकदेशानुसारि’– विश्वनाथ). उदाहरण म्हणून ‘ज्याप्रमाणे मेघदूत’ एवढाच आणखी खुलासा येतो. या उदाहरणाच्या केवळ उल्लेखावरून आपण खंडकाव्याची कल्पना बांधावयाची, एवढेच यामुळे आपणास करता येण्यासारखे आहे. हे काव्य जुन्या परिभाषेत निबद्ध म्हणजे सलग, अर्थदृष्ट्या परस्परसंबद्ध अशा श्लोकांचे काव्य आहे हे खरे परंतु त्याला कथाकाव्य असे उपचारानेच म्हणावे लागते. कुबेराच्या शापामुळे पत्नीपासून वियुक्त झालेल्या यक्षाने आपली कुशल वार्ता मेघाच्या द्वारे कळविली, एवढेच या कथाभागाचे स्वरूप आहे. महाकाव्याच्या विषयांत विप्रलम्भ म्हणजे विरह या विषयाचा अंतर्भाव झालेला असल्याने व तो या काव्याचा प्रधान विषय झाल्याने महाकाव्याच्या एकदेशाचे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे व म्हणून ते खंडकाव्य ठरते. ऋतुवर्णन हा महाकाव्याचा आणखी एक विषय आहे. कालिदासाने सहाही ऋतू आपल्या ऋतुसंहार काव्याचा विषय केले आहेत. परंतु त्याचे सहा ऋतूंस अनुरूप असे लहान का होईनात, सहा खंड आहेत. त्यात कथाभाग आहे, असे म्हणता येत नाही आणि एकंदर विस्तारही अल्पच आहे. याला खंडकाव्य म्हणावयाचे की नाही ते स्पष्ट नाही. सहा खंड असल्यास जर चालत असेल तर बारा सर्ग, लहान का असेनात, असणारे गीतगोविंद हे जयदेव कवीचे काव्य खंडकाव्य होऊ शकेल की नाही, याबद्दल नि:शंकपणे सांगता येत नाही. त्यात विषय एकच म्हणजे राधा-कृष्णाचे एक प्रेमप्रकरण असा आहे. काही कथाभागही आहे. महाकाव्याच्या सर्गांच्या मानाने त्यातील सर्ग लहान असून एकंदर काव्याचा विस्तारही कमीच आहे. त्यास महाकाव्य तर म्हणता येत नाही तरी खंडकाव्य म्हणावयाचे की नाही, ते ठरविता येत नाही. तत्संबंधी संस्कृत काव्यशास्त्रातील विवेचन इतके अपुरे आहे, की मराठी खंडकाव्याच्या संकल्पनेच्या घटनेस त्याचा तादृश उपयोग होत नाही.
ज्या अभागी कमल या काव्यामुळे ‘सामाजिक’ या विशेषणासह का होईना, पण खंडकाव्य ही संज्ञा मराठी काव्यशास्त्रामध्ये आली, त्याचा संस्कृत काव्यापेक्षा इंग्रजी काव्याशीच अधिक संबंध आहे, असे दिसते. गिरीशांच्या पुढे टेनिसनचा आदर्श — विशेषत: त्याचे प्रिन्सेस हे काव्य अथवा त्याचे कीर्तिकरांनी केलेले इंदिरा (१८८४) हे मराठी रूपांतर – या रचनेच्या वेळी असावे. त्या काव्यात मधूनमधून जी गीते येतात तशी गीते मराठीमधील स्वतंत्र खंडकाव्यांत प्रथम अभागी कमलमध्येच आली आहेत. टेनिसनच्या घोटीव भाषेचा परिणामही गिरीशांच्या भाषेवर दिसतो. त्याच्या एनॉक आर्डेन या काव्याचा सरळ अनुवाद त्यांनी पुढे अनिकेत (१९५४) ह्या नावाने केला आहे. प्रिन्सेस हे काव्य कल्पनारम्य आहे, तसे अभागी कमल सामाजिक असूनही काहीसे कल्पनारम्यच म्हणावे लागेल. अभागी कमलचे हे स्वरूप डोळ्यांपुढे ठेवून पुढील आंबराई आणि बंदीशाळा ही खंडकाव्ये लिहिली गेली आणि खंडकाव्याचे स्थूल स्वरूप ठरल्यासारखे झाले. प्रिन्सेससारखी काव्ये इंग्रजीत महाकाव्ये गणली जात नाहीत किंबहुना आपल्याकडील विदग्ध महाकाव्येसुद्धा तिकडे महाकाव्ये (एपिक) म्हणून मान्य होणार नाहीत. इंग्रजीमधील ‘लाँगर नॅरेटिव्ह पोएट्री’ या काव्यप्रकाराशीच खंडकाव्य या अर्वाचीन मराठी काव्यप्रकाराचे जवळचे नाते आहे, असे म्हणणे योग्य होईल.
आजच्या मराठी काव्यविचारात खंडकाव्य ही संज्ञा फारच उदारपणे वापरण्यात येत आहे. कालिदासाच्या मेघदूताचे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेले मेघदूतनामक काव्य (१८६५) हे मराठी भाषांतर आणि त्याचे अनुकरण करणारी इतर दूतकाव्ये संस्कृतचा वारसा सांगून हक्कानेच येतात. एका संकल्पित महाकाव्याचा एक खंड म्हणून सावरकरांचे कमला (१९१४) काव्यही खंडकाव्य सहजच होऊ शकते. सामाजिक का होईना पण ‘खंडकाव्य’ म्हणून जाणून वा नेणून नामकरणच झाल्याने अभागी कमल आणि तत्सदृश इतर काव्ये ही खंडकाव्ये ठरतात. रचनादृष्ट्या सादृश्य असल्यामुळे काव्ये सामाजिक असोत वा ऐतिहासिक, पौराणिक वा कल्पनारम्य असोत, त्यांना खंडकाव्य म्हणावयास हरकत घेता येत नाही. म्हणून गो. वा. कानिटकर ह्यांचे अकबर बादशाहा (१८७९), ग. स. लेले यांचे कृष्णाकुमारी (१८८८) अथवा वि. गो. साठ्ये ह्यांचे श्री संजीवणीहरण (१९४८) यांसारखी काव्येही त्याच नावाने ओळखण्यात येतात. वस्तुत: रचनादृष्ट्या ही काव्ये संस्कृतमधील विदग्ध महाकाव्यांसारखी आहेत. परंतु आपण आपली आजची महाकाव्याची संकल्पना इंग्रजी ‘एपिक’च्या कल्पनेवरून स्वीकारली असल्याने या काव्यांना महाकाव्य न म्हणता खंडकाव्यांतच त्यांचा समावेश करू लागलो आहोत आणि स्वत: कवीने आपल्या काव्यास ‘महाकाव्य’ असे संबोधले असूनही वा. वा. खरे यांचे यशवंतराय महाकाव्य (१८८८) हेही खंडकाव्य मानू लागलो आहोत. रचना आणि पद्धती या दोन्ही दृष्टींनी संस्कृत विदग्ध महाकाव्यांसारख्या हेतुत: रचल्या गेलेल्या साधुदासांच्या रणविहार (१९१६), गृहविहार (१९२८) ह्यांसारख्या ‘विहार’ काव्यांसही खंडकाव्यांतच ओढण्यात आले. अगदी इंग्रजी महाकाव्याच्या कल्पनेप्रमाणे लिहावयास घेतलेले राजा शिवाजी (१८६९) हे कुंटे यांचे काव्यही ‘महाकाव्य’ या संज्ञेस पात्र न ठरल्याने अखेरीस खंडकाव्यातच जमा करण्यात आले. खंडांची संख्या आणि त्यांची किमान लांबी यांवर काही मर्यादा घालता येत नसल्याने माधव जूलियनांचे विरहतरंग (१९२६), पाठकांचे शशिमोहन (१९२९) यांसारखी कथाकाव्येही खंडकाव्ये ठरली, एवढेच नव्हे तर प्रकृतिदृष्ट्या अगदी वेगळे असूनही बावीस स्फुट अशा भावगीतांचे यशवंतांचे जयमंगला (१९३१) हे काव्यही त्याच नावाने ओळखले जाऊ लागले. महाकाव्याचा एक खंड या कल्पनेस न उतरणाऱ्या चंद्रशेखरांच्या काय हो चमत्कार ! (१९११) अथवा विनायकांच्या मोहानंतर (१९०५) यांसारख्या दीर्घ कथाकवितांचाही समावेश कथात्वांच्या जोरावर खंडकाव्यात होऊ शकतो, असे काहींना वाटले. अगदी किरकोळ कथाकविताही ‘आहूतेषु विहंगमेषु मशको नायान् पुरो वार्यते’ या न्यायाने खंडकाव्य समजण्याची पाळी आली. उलट कथा अशी फारशी नसलेले, किंबहुना मुळीच नसलेले, कवी अनिलांचे भग्नमूर्ति (१९४०) किंवा मृगावर्त (१९७१) यांना ‘खंडकाव्यत्व’ नाकारणे त्यांच्या गुणांमुळे अशक्य ठरले. सारांश, यासंबंधीच्या उदार धोरणामुळे जे भावगीत नसेल आणि ज्यात कथेचा अल्पही अंश असेल, त्यास खंडकाव्य म्हणावे अशीच जवळजवळ परिस्थिती आहे. ही मोठीशी स्पृहणीय नसली, तरी वस्तुस्थिती आहे.
पहा: आख्यानकाव्य, मराठी कथाकाव्य महाकाव्य.
संदर्भ: तोडमल, ह. कि. अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये, पुणे, १९६३.
जोग,रा. श्री.