ग्वो मो-र्‌वो : (? १८९२ –    ). प्रख्यात चिनी लेखक, विद्वान आणि क्रांतिकारक. सध्या चिनी विज्ञान अकादमीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म सेचवान प्रांतातील शावान (जि. चायटिंग) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. ग्वो यांनी जपान येथून वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१९२१) तथापि त्यांनी वैद्यकीय व्यवसाय कधीच केला नाही. पहिल्यापासूनच त्यांना वाङ्‌मय आणि राजकारण यांची विशेष आवड होती. त्यामुळे शाळेत असल्यापासून त्यांनी जपानविरोधी चळवळीत भाग घेतला आणि नंतर जपानमध्ये वैद्यकाचा अभ्यास करत असतानाच इंग्रजी आणि जर्मन भाषांचे अध्ययन केले.

ग्वो यांनी वाङ्‌मय आणि राजकारण या क्षेत्रांत १९२१ ते १९२४ या काळात विलक्षण प्रसिद्धी मिळविली. कवी, कादंबरीकार, नाटककार, टीकाकार, निबंधकार, इतिहासकार, भाषांतरकार अशा विविध नात्यांनी त्यांची कीर्ती झाली. १९२१ मध्ये त्यांनी जपानमध्ये स्थापन केलेल्या निर्माण संस्थेने (छ्‌वांग-जाव् श) चिनी वाङ्‌मयक्षेत्रात प्रचंड खळबळ उडविली. आधुनिक चीनचे वाङ्‌मय कामगारवर्गाच्या आणि दलितवर्गाच्या समस्यांचे चित्रण करणारे असले पाहिजे, या मार्स्कवादी तत्त्वाचा पुरस्कार त्यांनी प्रथम केला.

ग्वोंचा कल मार्क्सवादाकडे असल्यामुळे ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे साहित्यिक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे चीनमधील त्या काळच्या क्वोमिंतांग राजवटीने त्यांचा छळ केला. १९२७ ते १९३७ ह्या काळात त्यांना जपानमध्ये आश्रय घ्यावा लागला. चीन-जपान युद्ध सुरू झाल्यानंतर ते चीनला परतले व त्यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने युद्धात भाग घेतला.

चिनी कम्युनिस्ट राजवट स्थापन झाल्यावर (१९४९) नवीन सरकारने त्यांना सन्मानाचे स्थान दिले. चिनी विज्ञान अकादमी व शांतता समिती या दोन्हींचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. विज्ञान अकादमी ही चीनमधील सर्वांत महत्त्वाची साहित्य आणि कला या क्षेत्रांत कार्य करणारी संस्था आहे. नव-चीनचे नवे साहित्य व नवी कला निर्माण करण्याची व कलावंतांना उत्तेजन देण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेवर आहे.

 

चीनची शांतता समिती ही संस्था इतर देशांतील डाव्या गटांबरोबर संबंध ठेवण्याचे कार्य करते. शांतता समितीचे अध्यक्ष या नात्याने ग्वोंनी अनेक देशांना भेटी दिल्या.

ग्वो मो – र्‌वोंनी केलेले लिखाण विविध प्रकारचे व विपुल आहे. जपानमध्ये दहा वर्षे असताना ग्वोंनी चिनी पुरावशेषांचे संशोधन केले. चीन-जपान युद्ध संपल्यावर ते रशियात गेले. १९४९ नंतर त्यांनी नव्या चिनी राजवटीत राजकीय व वैचारिक क्षेत्रांतील अनेक बहुमानाची उच्च पदे भूषविली.

साहित्यिक म्हणून सुरुवातीस त्यांनी भावनेने ओतप्रोत भरलेली कविता मुक्तच्छंदात लिहिली. या कवितेमुळे त्यांना खूप लोकप्रियताही मिळाली. त्यांच्या ह्या कवितेवर गटे, व्हिटमन, शेली व टागोर यांचा प्रभाव आहे. Nu-Shen (इं. शी. गॉडेसेस), Hsing-k’ung (१९२३, इं. शी. स्टारी स्काय) आणि P’ing (१९२५, इं. शी. द व्हेस) यांत ती संगृहीत आहे. त्यांच्या सुरुवातीच्या गद्यातही स्वच्छंदतावादी वृत्ती व तिला अनुरूप अशी प्रखर आत्मनिष्ठा आढळते. नंतर मात्र त्यांच्या लेखनात मार्क्सवादाचा प्रभाव आढळतो. त्यांनी व्यक्तिचित्रे (Kanlau १९२६), पत्रात्मक कादंबरी (Lo-yeh, १९२८), ऐतिहासिक कथा, नाटके (T’ang-ti chi hua Ch’u Yuan, १९५३), आत्मचरित्र (९ खंड) तसेच गटे (सॉरोज ऑफ द यंग वेर्थरचे चिनी भाषांतर), शिलर, टुर्ग्येन्येव्ह, टॉलस्टॉय, अप्टन सिंक्लेअर इ. पाश्चात्त्य ग्रंथकारांच्या ग्रंथांची चिनी भाषांतरे केली आहेत. यांशिवाय त्यांनी इतिहास व तत्त्वज्ञानावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात (१९६६—६९) आपल्या लेखनाचा आढावा घेऊन ग्वो यांनी ‘माझे गतकाळचे लिखाण कुचकामी आहे व त्याची होळी करावी’, असे मत प्रदर्शित केले. मार्क्सवादाचा दीर्घ काळ अभ्यास करूनसुद्धा आपल्या लेखनात मार्क्सवाद उठून दिसत नाही, हे त्यांना म्हणायचे होते.

संदर्भ : Roy, David Tod, Kuo Mo-jo : The Early Years, 1971.

देशिंगकर, गि. द.