ग्लुटामिक अम्ल : एक ⇨ॲमिनो अम्ल . दुसरे नाव आल्फा ॲमिनोग्लुटारिक अम्ल. शरीरात ते संश्लेषणाने (शरीरातील रासायनिक विक्रियांनी तयार होण्याने) सहज तयार होते व म्हणून आवश्यक ॲमिनो अम्लात त्याची गणना करीत नाहीत. त्याचे रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणूंचे प्रकार आणि त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C5H9O4N. त्याचे संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) पुढे दाखविल्याप्रमाणे आहे.

ग्लुटामिक अम्ल

वितळबिंदू १९९° से. (अपघटनासह म्हणजे रेणूचे तुकडे होऊन). ग्लुटेनाचे (स्टार्चरहित गव्हाच्या पिठाच्या सत्त्वाचे) सल्फ्यूरिक अम्लाने जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाच्या रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करीत असताना रिटहाउसेन यांना ग्लुटामिक अम्लाचा शोध १८६६ मध्ये लागला (त्यांनी या पदार्थाला ग्लुटामिनिक अम्ल असे नावही दिले ). पुढे वनस्पतिज प्रथिनातून तसेच प्राणिज प्रथिनातूनही हा पदार्थ मिळविण्यात आला. रक्त, टोमॅटोचा मुरंबा, काकवी, यीस्ट, एकायनोडर्म प्राणी (एक प्रकारचे सागरी प्राणी), करड्या रंगाची काही सागरी तृणे यांमध्येही ते आढळते. स्फटिकी इन्शुलीन आणि गोमांसातील फायब्रीन यांच्या जलीय विच्छेदनापासून ग्लुटामिक अम्ल मिळते. सर्वसाधारणपणे ग्लुटामिक अम्लाच्या उत्पादनाकरिता काकवी, केसीन (दुधातील एक प्रकारचे प्रथिन) किंवा ग्लुटेन वापरतात. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाकरिता मेलॅनिक एस्टर पद्धत वापरतात.

ग्लुटामिक अम्ल प्रकाशतः सक्रिय (एकाच पातळीत कंप पावत असलेल्या म्हणूजे ध्रुवित प्रकाशाची पातळी फिरविण्याचा गुणधर्म असलेला) पदार्थ आहे. त्यापासून दक्षिण वलनी (+) व वाम वलनी (–) म्हणजे ध्रुवित प्रकाशाची पातळी उजवीकडे वळविणारे व डावीकडे वळविणारे असे दोन समघटक (रेणवीय सूत्र एकच पण रेणूतील अणूंची मांडणी निरनिराळी असलेले प्रकार) मिळतात. त्यांना D –  ग्लुटामिक अम्ल आणि L – ग्लुटामिक अम्ल म्हणतात. पहिल्याचे स्फटिक समभूज चौकोनासारखे आणि दुसऱ्याचे लहान लहान पट्ट्यांसारखे असतात.

वाम वलनी समघटकाचे २५° से.ला भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत.

pK1 ( COOH ) : २·१९

pK2 ( COOH ) : ४·२५

pK3 ( NH3+ ): ९·६७

समविद्युत्‌ भारबिंदू : ३·२२

प्रकाशीय वलन : [α] D (पाण्यात) + १२·०

[α] D (हायड्रोक्लोरिक अम्लात) + ३१·८

विद्राव्यता (ग्रॅ. / १०० मिलि. पाण्यात) = ०·८४

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी ग्लुटामिक अम्लाची गरज असते. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.

(१) ग्लुटामीन, ग्लुटाथायोन, फॉलिक अम्ल यांचे संश्लेषण. (२) प्युरिने, हिस्टिडीन आणि ग्लुकोसामीन यांमधील काही नायट्रोजन अणूंच्या पूर्वगामी (अगोदरचा) पदार्थ ग्लुटामिक अम्ल असते. (३) प्रोलीन आणि ⇨आर्जिनीन  या ॲमिनो अम्लांचा पूर्वगामी पदार्थ ग्लुटामिक अम्ल असते. (४) मानव आणि उच्च वर्गाची माकडे यांमध्ये फिनिल ॲसिटिक अम्लाचे विषारी परिणाम होऊ न देण्याचे कार्य ग्लुटामिक अम्ल करते (त्यापासून फिनिल ॲसिटल ग्लुटामीन हा बिनविषारी पदार्थ बनतो ). (५) मेंदूतील कोशिका (पेशी) ग्लुकोजाबरोबरच ग्लुटामिक अम्लाचा आधारद्रव्य म्हणून उपयोग करतात. (६) ऊतकाच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहाच्या) चयापचयामध्ये (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींमध्ये) अमोनिया तयार होतो. तो प्रमाणापेक्षा जास्त साचल्यास विषारी परिणाम होतात. तो रक्तामधून ग्लुटामीन किंवा ॲमिनो अम्लाच्या स्वरूपात मूत्रपिंडात नेला जातो व तेथून मूत्रातून उत्सर्जित होतो (बाहेर टाकला जातो). अमोनियाची ऊतकातील कोशिकांत वाढ न होऊ देण्याच्या कार्यात ग्लुटामिक अम्ल भाग घेते.

जठरातील तीव्र अम्लता कमी करण्याकरिता कॅल्शियम ग्लुटामेट उपयुक्त असते. चयापचयात्मक विघटनात (रेणूचे तुकडे होण्याच्या विक्रियेत) बहुतेक ग्लुटामिक अम्ल आल्फा कीटो ग्लुटारिक अम्लाच्या मार्गाने जाते. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनोमॉर्फम  हे सूक्ष्मजंतू ग्लुटामिक अम्लाचे ब्यूटिरिक अम्ल, ॲसिटिक अम्ल, कार्बन डाय-ऑक्साइड, अमोनिया व हायड्रोजन या संयुगांत किण्वन (सूक्ष्म जीवांनी घडविलेली अपघटनाची क्रिया) करतात. या विक्रियाक्रमात मेसाकोनिक अम्ल व सिट्रामॅलिक अम्ल हे पदार्थही तयार होतात.

हेगिष्टे, म. द. भालेराव, य. त्र्यं.