ग्ऱ्यिबयेडॉव्ह, अल्यिक्सांडर: (१५ जानेवारी १७९५–११ फेब्रुवारी १८२९). सुप्रसिद्ध रशियन नाटककार. जन्म मॉस्को येथे. मॉस्को विद्यापीठात भाषाशास्त्र व कायदा ह्या विषयांचे शिक्षण घेतले. १८१२ मध्ये नेपोलियनशी झालेल्या युद्धाच्या वेळी त्याने सैन्यात नोकरी केली. १८२५ मध्ये पहिल्या निकोलसविरुद्ध झालेल्या ‘डिसेंबर चळवळी’त भाग घेतल्याच्या आरोपावरून त्याला अटक झाली (१८२६) परंतु पुरेशा पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. १८२८ मध्ये राजदूत म्हणून त्याची इराणमध्ये नेमणूक झाली. तेहरानमध्ये काही माथेफिरू लोकांनी रशियन दूतावासावर केलेल्या हल्ल्यात तो मारला गेला.
ग्ऱ्यिबयेडॉव्ह हा रशियन वास्तववादी नाटकाचा प्रवर्तक समजला जातो. गोर्ये ऑत उमा (लेखनकाळ १८२२–२४ , इं. शी. वो फ्रॉम विट) ह्या त्याच्या नाटकाने रशियन साहित्य व रंगभूमी ह्यांच्या संदर्भात मोलाची कामगिरी बजावली आहे. औपरोधिक शैलीत लिहिलेल्या ह्या पद्यमय सुखात्मिकेतून गुलाम बाळगणाऱ्या रशियन समाजाच्या ऱ्हासाचे चित्रण केले आहे. ‘डिसेंबर चळवळी’तील तरुणांप्रमाणे क्रांतिकारी विचारांनी भारलेला सरदार घराण्यातील तरुण, पुरोगामी नायक चात्स्की आणि गुलामगिरीच्या प्रथेचे पुरस्कर्ते व जुन्या हुकुमशाही राजवटीचे प्रतिनिधी यांच्यातील संघर्ष हा या नाटकाचा गाभा आहे. गुलाम बाळगणाऱ्या स्कालोजूब, मल्चालीन, फामुसव ह्यांसारख्या व्यक्तिरेखा त्याने निर्माण केल्या. रशियातील दैनंदिन जीवनात ही नावे आता सामान्य नामांप्रमाणे वापरली जातात.
गोर्ये ऑत उमा हे गोगोल, अट्रॉव्हस्की आणि चेकॉव्ह ह्यांसारख्या नाटककारांच्या उपरोधपूर्ण वास्तववादी नाटकांचे अग्रदूत ठरले.
पांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)