ग्रेव्ह्‌ज, रॉबर्ट : (२६ जुलै १८९५– ). इंग्रज कवी, कादंबरीकार, निबंधकार व विद्वान. रॉबर्ट ग्रेव्ह्‌ज हा आयरिश वाड्मयीन प्रबोधनाच्या चळवळीचे एक नेते आणि कवी ॲल्फ्रेड पर्सिव्हल ग्रेव्ह्‌ज ह्यांचा पुत्र. जन्म लंडनमध्ये. शिक्षण चार्टरहाउस ह्या विख्यात शिक्षणसंस्थेत व ऑक्सफर्ड विद्यापीठांत. कैरो विद्यापीठात इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक म्हणून एक वर्ष काम केले (१९२६). ऑक्सफर्ड विद्यापीठात तो काव्याचा प्राध्यापक होता (१९६१–६६). ग्रेव्ह्‌जने पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतला. आरंभी युद्धाविषयी त्यास सांकेतिक उत्साह वाटत होता परंतु युद्धाच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर त्याच्यासंबंधी ग्रेव्ह्‌जच्या मनात कडवटपणाच निर्माण झाला. पहिल्या महायुद्धापूर्वी जॉर्जियन कवींच्या संप्रदायातील एक कवी म्हणून ग्रेव्ह्‌जने काव्यलेखन केलेले असले, तरी युद्धोत्तर काळातील आपल्या अनेक कवितांतून युद्धांची निरर्थकता, त्यातील क्रौर्य, अमानुषता आणि दुःख ह्यांचे परिणामकारक चित्रण त्याने केले आहे. इंग्लंडमधील जनतेच्या युद्धविषयक जाणिवेवर आणि भूमिकेवर ह्या कवितांचा प्रभाव पडला होता. कलेक्टेड पोएम्स  हा त्याचा काव्यसंग्रह १९५९ मध्ये प्रसिद्ध झाला. ग्रेव्ह्‌जने लिहिलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतून अभिजात कल्पकतेचे दर्शन घडते. आय क्लॉडिअस (१९३४), वाइफ टू मिस्टर मिल्टन (१९४३) ह्या त्याच्या उल्लेखनीय ऐतिहासिक कादंबऱ्यांपैकी काही होत. त्याच्या निबंधादी वैचारिक लेखनाच्या संदर्भात उल्लेखनीय अशा ग्रंथांपैकी अ सर्व्हे ऑफ मॉडर्निस्ट पोएट्री (लॉरा रायडिंगच्या सहकार्याने, १९२७), द व्हाइट गॉडेस (१९४८) आणि नॅझरीन गॉस्पेल रीस्टोअर्ड (जॉशुआ पॉड्रोच्या सहकार्याने, १९५३) हे काही होत. काव्यातील नानार्थतेच्या संदर्भात पुढे झालेल्या बऱ्याचशा लेखनाचे पूर्वसूचन अ सर्व्हे ऑफ मॉडर्निस्ट पोएर्टीतून प्रत्ययास येते. द व्हाइट गॉडेसमध्ये काव्यप्रतिभेविषयी नवा विचार आला आहे, तर नॅझरीन गॉस्पेल रीस्टोअर्डमध्ये आद्य (प्रिमिटिव्ह) ख्रिस्ती धर्माचे परीक्षण आहे. द ग्रीक मिथ्स (दोन खंड, १९५५) ह्या आपल्या ग्रंथात त्याने ग्रीक देवता, वीरपुरूष इत्यादींसंबंधीच्या मिथ्यकथा, तत्संबंधीचा आधुनिक मानवशास्त्रीय दृष्टिकोण व पुरातत्त्वविद्येचे निष्कर्ष नमूद करून सांगितल्या आहेत. गुड बाय टू ऑल दॅट (१९२९) हे ग्रेव्ह्‌जचे आत्मचरित्र. ह्यांखेरीज होमर, स्विटोनिअस, टेरेन्स आदी ग्रीक-रोमन साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे त्याने इंग्रजी अनुवादही केले आहेत. उमर अली शाह ह्यांच्या सहकार्याने त्याने उमर खय्यामच्या रूबायांचाही अनुवाद केला. त्याची एकूण ग्रंथसंपदा १२५ च्या आसपास आहे.

संदर्भ : 1. Cohen, J. M. Robert Graves, 1960.

2. Day, Dougles, Swifter Than Reason : The Poetry and Criticism of Robert Graves, Chapel Hill (N. C.). 1963.

3. Seymour – Smith, Martin, Robert Graves, 1956.

जोशी, अशोक