ग्रीक धर्म : प्राचीन ग्रीक समाज हा ग्रीसमधील मूळचे भूमध्य समुद्र वंशीय लोक व उत्तरेकडून आलेल्या ॲकियन, ड्रायोप, मिनिअँझ इ. आर्य टोळ्या ह्यांच्या मिश्रणाने बनला होता. स्वतःला ‘हेलेन’ म्हणविणारा आणि इतर समाजांपासून स्वतःला वेगळा मानणारा हा समाज इ.स.पू.सु. दुसऱ्या सहस्रकापासून घडत होता. ग्रीसमधील मूळचे लोक मिनोअन-मायसीनियन संस्कृतीचे होते. ही बरीच प्रगत अशी संस्कृती होती. तेव्हा ग्रीक धर्मामध्ये मिनोअन-मायसीनियन धार्मिक कल्पना व प्रथा आणि आर्य टोळ्यांच्या धार्मिक कल्पना व प्रथा ह्यांचे मिश्रण आढळते.
होमर आणि होमरपूर्व कालखंड : ग्रीक समाजात इ. स. पू. दहावे ते सातवे शतक ह्या कालखंडात प्रचलित असलेल्या धर्माचे प्रतिबिंब होमर व हेसिअड ह्यांच्या काव्यांत पडलेले आढळते. होमरच्या झ्यूस, हेरा, अपोलो, अथीनी वा अथीना, पोसायडन इ. देवदेवता मानवरूपधारी आहेत आणि प्रत्येक देवतेचे स्वतःचे असे रेखीव, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व आहे. काम, क्रोध, असूया इ. मानवी विकार ह्या देवतांच्या ठिकाणी आढळत असले, तरी एकंदरीत त्या न्यायाची बाजू उचलून धरतात. आर्त माणसांविषयी त्यांच्या मनात करुणा असते. झ्यूस हा देवांचा प्रमुख होय आणि स्वर्ग, पृथ्वी व पाताळ– म्हणजे हेडीझ हे मृतात्म्यांचे वसतिस्थान– ह्या साऱ्यांवर त्याचे अधिराज्य आहे. यज्ञ हा प्रमुख विधी आहे व यज्ञाचे स्वरूप बरेच सुसंस्कृत आहे. देवतांना आवाहन करून त्यांच्याशी संवाद साधण्याचे साधन अशी यज्ञाविषयीची कल्पना आढळते. ग्रीसमधील ऑलिंपस पर्वत हे देवतांचे वसतिस्थान मानण्यात येत असे.
होमरच्या मानवरूपधारी देवतांभोवती केंद्रित असलेल्या प्रसन्न व उन्नत धर्माखाली अधिक प्राथमिक अशा धर्माचे स्तर आढळतात. हे स्तर मूळच्या मिनोअन-मायसीनियन धार्मिक प्रथांचे तसेच आर्य टोळ्यांत टिकून राहिलेल्या आदिम धार्मिक प्रथांचे बनलेले आहेत. होमरच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्त्वाच्या देवता हळूहळू सर्व हेलेन समाजाच्या देवता बनल्या पण ह्याशिवाय अनेक स्थानिक देवतांचे संप्रदायही सर्वत्र प्रचलित होते. अनेकदा ह्या देवता विशिष्ट कार्यांच्या, नैसर्गिक शक्तींच्या किंवा घटनांच्या अधिष्ठात्या असत व त्यांचे स्वरूप अंधुक असे. उदा., ‘नांगराच्या फाळाचा देव’, ‘चांगले पीक देणारा देव’ इत्यादी. तसेच पशुपूजा व नागपूजाही तेथे प्रचलित होती. उदा., लांडगा हा पवित्र पशू मानण्यात येत असे. नाग हा विशेषतः वंशाचा आदिपुरुष मानण्यात आलेल्या वीरपुरुषाचे प्रतीक असे. मूळच्या मिनोअन-मायसीनियन धर्मांमध्ये देवीपूजेचे, विशेषतः कुमारी देवीच्या पूजेचे, प्राबल्य होते. अशा स्थानिक देवतांवर अनेकदा होमरच्या अथीनी, आर्टेमिस इ. ऑलिंपिक देवतांचे आरोपण करण्यात आले तसेच लांडगा हा अपोलोचा सहचर व कित्येकदा अवतारही ठरला. नागाचा झ्यूसशी संबंध जोडण्यात आला. स्थानिक मातृदेवता आणि कुमारी देवी ह्यांची आर्टेमिस व अथीनी ह्या ऑलिंपिक देवतांच्या स्वरूपात पूजा होऊ लागली पण अनेकदा प्राचीन संप्रदाय बऱ्याचशा मूळच्या स्वरूपात टिकून राहिले. अशा संप्रदायांतील विधींचे स्वरूप जादूटोण्याचे किंवा यातुनिष्ठ असे. उदा., पीक चांगले येण्यासाठी भूदेवीला बळी देण्यात आलेल्या डुकराचे मांस शेतात विखरीत. अनेक मिथ्यकथांवरून नरबली देण्याचा प्रघातही होता, असे आढळून येते.
मिनोअन-मायसीनियन धर्मामधील स्थानिक संप्रदायांचे विधी ज्या पवित्र स्थानी करीत, ती एखादी नैसर्गिक गुहा असे किंवा वईने बंदिस्त केलेली वनातील जागा असे. एखादा झाडाचा बुंधा, दगडी खांब किंवा दगडाची रास ह्या स्वरूपात देवतेचे प्रतीक आढळत असे. हळूहळू यज्ञस्थाने म्हणून वेदी रचण्यात येऊ लागल्या आणि देवतांच्या ओबडधोबड प्रतीकांची जागा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मूर्तींनी घेतली. हे परिवर्तन होमरपूर्वकाळात हळूहळू घडून येत होते. देवतांची पूजा करणारे व्यावसायिक पुरोहित होमरला परिचित आहेत पण होमरपूर्वकाळी किंवा ऐतिहासिक काळी व्यावसायिक पुरोहितांचा इतर समाजापासून वेगळा व त्याच्याहून श्रेष्ठ मानण्यात आलेला वर्ग उदयाला आला नाही. वेदीवर पशूंचे मांस, फळे, धान्य आणि कधी कधी मद्य देवतेला समर्पण करणे, असे यज्ञविधीचे स्वरूप असे. यज्ञ म्हणजे कुटुंबाने, गणाने किंवा नागरिकांनी देवतेसमवेत केलेले सहभोजन असे. अशा यज्ञांद्वारा भक्त आणि देवता ह्यांतील संबंध दृढ होत पण अशा प्रसन्न विधींशिवाय भीतीची गडद छाया ज्यांच्यावर पडलेली असे, असे ‘कृष्ण’ विधीही आढळतात. उदा., ज्या पशूचा बळी द्यायचा त्याचे डोके खाली करून त्याची मान कापण्यात येत असे व जमिनीत एक खळगा खणून त्याच्यात त्याचे रक्त सोडण्यात येत असे. अतिक्रमण करणाऱ्या माणसांना इहलोकात व परलोकात शासन करणाऱ्या, क्रुद्ध, तामसी, पातालदेवतांना तसेच मृत पितरांना शांत करणे, हे ह्या विधींचे उद्दिष्ट असे. अशा कृष्णविधींची जागा हळूहळू प्रसन्न, क्षमाशील अशा ऑलिंपिक देवतांशी संबंध दृढ करणाऱ्या शुक्लविधींनी घेतली. पण ग्रीक देवता म्हणजे केवळ होमरच्या ऑलिंपिक देवता नव्हेत व ग्रीक धर्माला प्रसन्न व विषण्ण अशा दोन्ही बाजू होत्या, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. शुक्लविधी स्वर्गस्थ देवांना उद्देशून होत व कृष्णविधी पाताळातील देवांना उद्देशून होत. हा भेद ग्रीक धर्मात नेहमीच राहिला.
इ. स. पू. १ooo पूर्वी काही शतकांपासून ग्रीक समाज शेतीवर आधारलेला होता व कुटुंबव्यवस्थाही त्यात स्थिरावलेली होती. ह्यामुळे अनेक गृह्यविधी रूढ झाले. डिमीटर ह्या भूदेवतेचा उत्सव साजरा करण्यात येत असे. घराचे अंगण आणि अग्निकुंड पवित्र मानण्यात येत असे आणि तेथे कौटुंबिक प्रार्थना करण्यासाठी कुटुंबीय जमत. ह्या स्थानांभोवती अनेक कौटुंबिक विधी गुंफण्यात आले होते आणि गृहस्थ धर्माचे– उदा., अतिथी धर्माचे– प्रामाण्य ह्या विधींच्या पावित्र्यावर आधारलेले होते. ह्या कालावधीत ग्रीक समाजाचे संघटन अनेक कुटुंबांचा मिळून बनलेला गण (जीनॉस) व अनेक गणांचे मिळून बनलले सकुलक (फ्राट्री) या रक्ताच्या नात्यांनी बांधलेल्या समूहाद्वारा झालेले असे. ह्या समाजव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान होते. उदा., झ्यूस फ्राट्रिआस किंवा अथीनी फ्राट्रिया ह्या देवतांची सकुलकांच्या संरक्षक देवता म्हणून विधिपूर्वक आराधना करण्यात येत असे. बहुसंख्य ग्रीक समाज जरी खेडोपाडी सकुलकांत विखुरलेला होता, तरी हळूहळू ग्रीक समजाव्यवस्थेचे व संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली अथेन्स, मेगारा इ. नगरराज्ये उदयाला येत होती. ह्या नगरांनाही धार्मिक अधिष्ठान असे. उदा., अथीनी ही देवता अथेन्सची अधिष्ठात्री देवता होती आणि अथेन्समध्ये झ्यूसची ‘झ्यूस पोलियस’ ह्या स्वरूपात आराधना करण्यात येत असे. नगरराज्ये संघटित होण्याच्या ह्या कालखंडात मूळच्या वन्य देवतांना नागररूप प्राप्त झाले. उदा., अपालो हा मूळचा रानावनातील देव. अरण्यातील वाटसरूंचे तो मार्गदर्शन करीत असे. आता नगरातील मार्गांची संरक्षक देवता, हे स्वरूप त्याला प्राप्त झाले.
इ.स.पू. दहाव्या शतकातील महत्त्वाची घटना म्हणजे डायोनायसस ह्या देवतेच्या संप्रदायाचा ग्रीसमध्ये झालेला प्रसार. थ्रेस आणि मॅसिडोनिया ह्या ग्रीसच्या सीमेलगतच्या प्रदेशांतून ह्या देवाचे आगमन झाले. होमरचे अमर आणि मर्त्य मानवांहून भिन्न आणि श्रेष्ठ असलेले जे देव होते, त्यांच्याहून अगदी वेगळ्या स्वरूपाचा हा देव होता. त्याच्या संप्रदायातील प्रमुख विधी देवाचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान ह्या कल्पनांवर आधारला होता. ह्या विधीमध्ये डायोनायससचे उन्मादावस्थेत असलेले भक्त त्याला फाडून त्याचे तुकडे तुकडे करून त्याला ठार करीत. अर्थात देवाने बैल, बकरा ह्यांसारख्या एखाद्या पशूचे किंवा एखाद्या तरुणाचेही रूप घेतलेले असे. ह्या रूपात त्याला मारण्यात येत असे व त्याच्या रक्तामांसाचे भक्षण करण्यात येत असे. ह्या भक्षणामुळे देवाच्या चैतन्याचा भक्तांत संचार होत असे व ते देवाशी तादात्म्य पावत, देवरूप बनत. देवाशी अस तादात्म्य प्राप्त करून देणारी उन्मादावस्था साधणे, हे ह्या आराधनेचे प्रयोजन असे. ह्या संप्रदायाचा फार मोठा प्रभाव नंतरच्या काळातील ग्रीक धर्मावर व तत्त्वज्ञानावर पडला.
दुसरा कालखंड : इ.स.पू. नववे ते सहावे शतक हा कालविभाग या कालखंडात येतो. ह्या कालखंडात होमरच्या महाकाव्यांचा ग्रीसमध्ये सर्वत्र प्रसार झाला. देवतांच्या सार्वजनिक उत्सवांत तसेच सार्वजनिक किंवा घरगुती प्रार्थनेच्या वेळी म्हणण्यासाठी अनुकूल वृत्तांत रचलेली आणि संगीताच्या साथीबरोबर गायिली जाणारी स्तवनगीते रचली गेली. ह्या काव्यामुळे व गीतांमुळे देवतांची रूपे स्थिर होऊ लागली. अस्पष्ट, अंधुक स्वरूपाच्या स्थानिक देवतांना होमरच्या देवतांचे रूप देण्याची प्रृवत्ती बळावली. स्तवनगीते आणि धार्मिक संगीत ह्यांच्या प्रसारामुळे मूळच्या सांप्रदायिक विधींना रेखीव व सुसंस्कृत अर्चनेचे स्वरूप प्राप्त झाले. एकंदरीत पाहता झ्यूस, अपोलो, हेरा, अथीनी ह्या सुस्पष्ट मानवी रूप धारण करणाऱ्या देवता नवीन उन्नत धर्मात महत्त्व पावल्या आणि ज्यांना असे मानवी रूप सहजपणे देता येत नव्हते, अशा देवता निष्प्रभ किंवा लुप्त झाल्या.
ह्याच कालखंडात नगरराज्येही स्थिरावली आणि नगर म्हणजे एक विस्तृत गण किंवा कुटुंब होय, ही कल्पना रूढ झाली. ह्यामुळे अनेक प्राचीन कौटुंबिक विधी नगरातर्फे पार पाडण्यात येऊ लागले. उदा., अथेन्समध्ये सर्व पितरांना शांत करण्यासाठी त्यांना तर्पण करणारा विधी दरवर्षी नगरातर्फे करण्यात येत असे. तसेच नगरात ‘सर्व घरांची झालेली युती’ साजरी करण्यासाठी वार्षिक उत्सव करण्यात येत असे. झ्यूस, हेरा, ॲफ्रोडाइटी व डिमीटर ह्या देवतांना विवाहविधी आणि कुटुंबसंस्था ह्यांच्या पावित्र्याच्या संरक्षक देवता मानण्यात येत असे. नगर म्हणजे एक कुटुंब असे मानण्यात येत असल्यामुळे, नगराचा संस्थापक हा कुटुंबाचा पूर्वज मानण्यात येत असे. साधारणपणे ह्या पूर्वजाचा जन्म एखाद्या देवापासून झाला, अशी श्रद्धा असे व त्या देवाशी नगराचे नाते जुळे. उदा., झ्यूस हा आर्कसचा पिता होय अशी समजूत होती व आर्केडियन लोकांची उत्पत्ती आर्कसपासून झाली, असे मानण्यात येत असे. धर्माला हे जे राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले होते, त्यामुळे नगराच्या मानवी संस्थापकाला दैवी वीरपुरुष मानून त्याची उपासना करणारे अनेक संप्रदाय ह्या कालावधीत उदयाला आले. देवांप्रीत्यर्थ यज्ञ करीत असताना अशा दैवी वीरपुरुषालाही आवाहन करण्यात येत असे. नगर हे मोठे कुटुंब असल्यामुळे व्यक्तीचे कुटुंबातील नैतिक आचरण आणि नागरिक म्हणून तिचे नैतिक आचरण, यांतील भेद क्षीण झाला. उदा., कुटुंबातील किंवा गणातील व्यक्तीचे रक्त सांडले, तर पाप लागते व परिमार्जन करावे लागते, अशी जुनी समजूत होती. आता नगरातील व्यक्तीचे रक्त सांडले, तरी माणूस अशुद्ध होतो व त्याला शुद्ध करून घ्यावे लागते, ही समजूत रूढ झाली. ह्यातून नागरी कायद्यांचा उदय झाला. उदा., अथेन्स येथील न्यायालयात मनुष्यवध केलेल्या माणसावर खटला भरण्यात येत असे आणि त्याचे कृत्य समर्थनीय किंवा क्षम्य ठरले, तर त्याला विधिपूर्वक शुद्ध करून घेण्यात येत असे. अपोलो ही ह्या शुद्धीकरणाच्या विधीची अधिष्ठाती देवता होती आणि ह्या काळात डेल्फाय येथील ⇨ अपोलोच्या प्राचीन मंदिराचे माहात्म्य फार वाढले. धार्मिक विधी, वैयक्तिक व सामाजिक नीती, नगराने करावयाचे कायदे इ. बाबतींत काही कुटप्रश्न निर्माण झाले, तर डेल्फायच्या अपोलोचे मार्गदर्शन घेण्याची प्रथा सबंध ग्रीसमध्ये रूढ झाली. हे मार्गदर्शन अर्थात मंदिराचे पुरोहित करीत असत. पण डेल्फायचा मार्गदर्शक देव ग्रीक लोकांच्या धार्मिक व राजकीय एकतेचे प्रतीक बनला. ह्याच कालखंडात ग्रीकांनी भूमध्य समुद्राच्या परिसरात व पूर्वेला आशिया मायनरमध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. ह्या वसाहतीकरणाला डेल्फायच्या मंदिराने जोराची चालना दिली. ह्यामुळे अनेक नव्याने स्थापन झालेल्या अनेक नगरांनी अपोलोचा आपला संस्थापक देव म्हणून स्वीकार केला. सारांश अनेक देवांची आराधना करणाऱ्या आणि अनेक स्थानिक संप्रदायांचे पालन करणाऱ्या ग्रीक समाजधर्मात काही एकतेचे सूत्र आणणारे, तसेच धार्मिक कल्पनांचे व विधींचे उन्नयन करून विश्वाचे नियमन करणारी दैवी शक्ती आहे व विशुद्ध नैतिक आचरणात धर्माचे सार आहे, ह्या शिकवणीचा ठसा ग्रीक मनावर उमटविणारे एक अधिकृत धार्मिक पीठ म्हणून डेल्फायच्या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले होते.
डेल्फायच्या मंदिराने ⇨डायोनायससच्या संप्रदायाच्या प्रसारालाही उत्तेजन दिले. कारण मानवी आत्म्याचे शुद्धीकरण करणे व त्याला देवरूप प्राप्त करून देणे, ही ह्या संप्रदायातील मध्यवर्ती कल्पना होती. इ.स.पू. आठव्या व सातव्या शतकांत ह्या संप्रदायाचा ग्रीसभर प्रसार झाला. पशुरूप किंवा मानवरूप धारण केलेल्या देवाचे भक्तांनी भक्षण करण्याचा मूळचा रासवट विधीही काहीशा बदललेल्या स्वरूपात अनेक ठिकाणी चालू राहिला तथापि एकंदरीत नगरराज्यांत प्रविष्ट झाल्यावर ह्या संप्रदायाचे विधी बरेच सौम्य व सुसंस्कृत झाले. ग्रीकांच्या धार्मिक जीवनात ह्या संप्रदायाला दुहेरी महत्त्व आहे. ह्या संप्रदायामुळे एका अधिक उत्कट, माणसाच्या पारलौकिक जीवनाशी निगडित असलेल्या धार्मिक श्रद्धेचा, ग्रीक समाजात प्रसार झाला. होमरप्रणीत धर्मात पारलौकिक जीवनाविषयी फारशी आस्था आढळत नाही आणि होमरचे देव मानवी जीवनाचे नैतिक नियमन करणारे व कृपाळू असले, तरी मानवांहून भिन्न व वरिष्ठ कोटीतील त्या व्यक्ती होत्या. त्यांच्याशी सामीप्य किंवा सारूप्य साधणे माणसाला अशक्य होते. उलट डायोनायससच्या संप्रदायात देवाशी सारूप्य साधणे, हे धार्मिक उपासनेचे परमोच्च श्रेय मानलेले आहे. ह्या संप्रदायाचे दुसरे महत्त्व असे, की डायोनायससच्या उपासनेच्या वेळी उन्मादावस्था साधून चित्तशुद्धी करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या भावनोत्कट संगीताच्या साथीवर त्याचे स्तवन करीत. ह्या स्तवनगीताला ‘डिथिरॅम’ म्हणत व ह्याच्यातून ग्रीक शोकात्मिकेचा (ट्रॅजेडीचा) उदय झाला असावा, असे मानण्यात येते.
इ.स.पू. सातव्या शतकात उदयाला आलेल्या ऑर्फिक संघांनी डायोनायससच्या प्राचीन संप्रदायाला, एक वेगळे व उन्नत स्वरूप दिले. ‘ऑर्फियस’ ही ह्या संप्रदायाचा केंद्र असलेली व्यक्ती म्हणजे एक खरीखुरी होऊन गेलेली व्यक्ती होती की देव होता, ह्याविषयी निर्णायक पुरावा नाही किंवा एकमतही नाही. ऑर्फिक संघांचे धार्मिक तत्त्वज्ञान होमरप्रणीत धर्माहून अगदी वेगळे होते. त्याचा सारांश असा : मानवी आत्मा स्वभावातः शुद्ध व दिव्य असतो, त्याचे पतन झाल्यामुळे देहाच्या अशुद्ध कारागृहात तो बंदिस्त होतो पण योग्य त्या यमनियमांचे पालन करून आत्म्याला आपली मूळची शुद्ध अवस्था प्राप्त करून घेता येते व मृत्यूनंतर तो परत आपल्या मूळच्या निवासस्थानी, म्हणजे देवलोकात जाऊ शकतो. पुनर्जन्म व मोक्ष ह्या कल्पना ह्या धार्मिक सिद्धांतांत अनुस्यूत आहेत. ऑर्फिक संप्रदायाचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात सर्व ग्रीसभर पसरला असला, तरी ह्या पंथाचे केंद्र पश्चिम ग्रीसमध्ये होते. पायथॅगोरस ह्या तत्त्ववेत्त्याने ऑर्फिक सिद्धांतांचा स्वीकार केला आणि त्याच्या अनुयायांनी ठिकठिकाणी आपले संघ स्थापन केले. हे संघ राजकीय दृष्ट्याही इतके प्रबळ झाले, की राज्यकर्त्यांना त्यांचा पाडाव करूनच त्यांचे विसर्जन करावे लागले. पायथॅगोरसच्या तत्त्वज्ञानाचा प्लेटोवर प्रभाव पडला होता. मानवी आत्मा हा मानवी व्यक्तिमत्त्वातील दिव्य अंश आहे आणि माणसाने आपला आत्मा शुद्ध केला, तर मृत्यूनंतर आपले दिव्य स्थान त्याला परत प्राप्त होते, ह्या प्लेटोच्या सिद्धांताचे मूळ ऑर्फिक संपद्रायात व त्यावर आधारलेल्या पायथॅगोरसच्या तत्त्वज्ञानात आहे. सर्वसामान्य ग्रीक समाजावर व प्रस्थापित धर्मावर जरी ऑर्फिक संप्रदायाचा फारसा प्रभाव पडला नसला, तरी विशुद्ध जीवनाचे व वैयक्तिक मोक्षाचे उद्दिष्ट स्वीकारणाऱ्या ह्या संप्रदायाचे, ग्रीक समाजाच्या आध्यात्मिक जीवनात एक वैशिष्ट्यपूर्ण दृढ केला.
ह्याच्या उलट अथेन्सजवळील इल्यूसिस येथील गुह्य संप्रदायाचा प्रभाव साऱ्या ग्रीक समाजावर पडला होता. मुळात शेती करणाऱ्या एका गणाचा दीक्षाविधी, असे ह्या संप्रदायाचे स्वरूप होते पण इ.स.पू. सातव्या शतकात सर्व ग्रीक समाजासाठी खुला असलेला संप्रदाय, हे व्यापक स्वरूप त्याने धारण केले. ह्या संप्रदायात अनप्रविष्ट करून घेतलेल्या व्यक्तीला एका पवित्र पेल्यातून तीर्थ प्राशनास देण्यात येत असे. हे तीर्थ म्हणजे ⇨डिमीटरचा– पृथ्वीमातेचा– जीवनरसच होय आणि ते प्राशन केल्याने भक्ताचा पृथ्वीमातेशी गूढ आणि अतूट असा संबंध जुळून येतो, अशी श्रद्धा होती. ह्यानंतर त्याला ‘गुह्य विधींच्या सभागृहा’त नेऊन तेथे गुह्य व पवित्र वस्तूंचे दर्शन घडविण्यात येत असे. बहुधा ही गुह्य व पवित्र वस्तू म्हणजे धान्याचे एक कणीस असावे. तसेच त्याच्यापुढे दिव्य नाट्य मूकाभिनयाने करून दाखविण्यात येत असे. पृथ्वीमातेच्या कन्येचे अपहरण, मातेचा शोक, कन्येसाठी तिने केलेला शोध, कन्या गवसणे, तिचा विवाह आणि अपत्यजन्म ह्या प्रसंगांनी ह्या नाट्याचे कथासूत्र घडविलेले असे. मुळात शेती सफल व्हावी ह्यासाठी करण्यात येत असणाऱ्या ह्या विधीचे रूपांतर, जीवात्म्याची देवांपासून झालेली ताटातूट, त्याचा मृत्यू आणि दिव्य जीवनात त्याचे होणारे पुनरुत्थान ह्या आत्म्याच्या जीवनक्रमाचे व भवितव्याचे साधकाला दर्शन घडविणाऱ्या आणि त्याला अमर, दिव्य जीवनाचे आश्वासन देणाऱ्या विधीमध्ये झाले. देवतांशी अधिक गाढ संबंध प्राप्त करून देणारा आणि व्यक्तीला तिच्या मरणोत्तर सुस्थितीची ग्वाही देणारा, हा संप्रदाय ग्रीसमध्ये सर्वत्र लोकप्रिय झाला. इल्युसिनियन गुह्य संप्रदायामध्ये प्राचीन विधींचे ज्या प्रकारचे उन्नयन व संस्करण झालेले आढळते, तसे इतरही अनेक प्राचीन संप्रदायांचे परिष्करण करून त्यांना वेगवेगळ्या नगरांत अधिकृत धार्मिक विधींचे स्थान ह्या कालखंडात देण्यात आले. ह्या परिष्करणात संगीत, काव्य, चित्रकला इ. कलांचा मोठा हातभार होता. ग्रीक कलांना धार्मिक अनुभवांपासून स्फूर्ती मिळाली व उलट ग्रीक कलांनी धार्मिक अनुभवांना सुसंस्कृत रूप दिले. उदा., ग्रीक शेकात्मिकेचा उगम डायोनायससच्या संप्रदायात, ह्या संप्रदायात जे मूकनाट्याच्या स्वरूपाचे विधी होते त्यांच्यात, आढळतो व डायोनायसस ही ॲटिक रंगभूमीची अधिष्ठाती देवता होती.
तिसरा कालखंड : इ.स.पू. पाचवे आणि चौथे शतक हा कालखंड म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या अत्युच्च उत्कर्षाचा कालखंड होय. काव्य, दृश्य कला, तत्त्वज्ञान आणि राजकारण ह्या संस्कृतीच्या विविध क्षेत्रांत ग्रीसचे निर्मितीशील चैतन्य ह्या कालखंडात उफाळून आले होते. ह्या साऱ्याचा ग्रीक धर्मावर अर्थात खोल परिणाम झाला. बाह्यतः पाहता होमरच्या काळापासूनच चालत आलेले संप्रदाय तसेच चालू राहिले पण देवतांचे स्वरूप, विश्वाच्या व्यवहारातील त्यांचे कार्य, ह्यांविषयीच्या कल्पना अधिक प्रगल्भ होत होत्या. ह्या कालखंडातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे, ग्रीकांनी संयुक्तरीत्या बलाढ्य इराणी साम्राज्याचा पराभव करून स्वतःच्या स्वातंत्र्याचे केलेले संरक्षण. ह्या घटनेमुळे ग्रीक समाजात विलक्षण आत्मविश्वास आला ह्या आत्मप्रत्ययाला धार्मिक अधिष्ठान होते. ग्रीकांच्या दृष्टीने इराण व ग्रीस ह्यांमधील हा संघर्ष म्हणजे पाशवी, जुलमी बळ आणि नैतिक सामर्थ्य ह्यांच्यातील संघर्ष होता आणि ह्या संघर्षात नैतिक शक्ती विजयी ठरली. ऐतिहासिक घटनांमागे विश्वातील सुष्ट व दुष्ट शक्तींचा संघर्ष चालू असतो आणि न्यायाचा संरक्षक देव ⇨झ्यूस हा सुष्टांच्या बाजूने निर्णय देतो. देव सत्प्रवृत्तींना साहाय्य करतात, हा नैतिक दृष्टिकोण हीरॉडोटसच्या इतिहासात आढळतो आणि तो ग्रीकांचा प्रातिनिधिक दृष्टिकोण होता. हा दृष्टिकोण अनेक कलाकृतींतून व्यक्त झालेला आढळतो. तसेच ह्या स्वातंत्र्ययुद्धात ग्रीकांनी जी संयुक्तपणे झुंज दिली, तिच्यामुळे ग्रीकांमधील एकतेची व अस्मितेची भावनाही बळावली. झ्यूसची उपासना ‘हेलेनियस’ ह्या स्वरूपात, म्हणजे सर्व ग्रीकांचा देव ह्या स्वरूपात सुरू झाली. डेल्फायच्या अपोलोलाही नवीन महत्त्व प्राप्त झाले.
ह्या अधिक उन्नत धार्मिक जाणिवेचे प्रतिबिंब पिंडरच्या काव्यांत एस्किलस, सॉफोक्लीझ व युरिपिडीझ ह्यांच्या शोकांतिकांत फिडीयसच्या मूर्तिकलेत इ. ग्रीक कलाकृतींत पडलेले आढळते आणि ह्या कलाकृतींमुळे ही धार्मिक जाणीव स्थिर झालेली दिसते. पिंडर, एस्किलस व सॉफोक्लीझ ह्या सर्वांनी प्रस्थापित धर्म स्वीकारला होता पण त्याला अधिक उदात्त स्वरूप देण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. झ्यूस हा सार्वभौम, सर्वशक्तिमान व पूर्णपणे न्यायी असा देव आहे, ही कल्पना हे तिन्ही कवी प्रभावीपणे पुढे मांडतात. सॉफोक्लीझ झ्यूसच्या कृपाळूपणावर भर देतो. ‘दैव’ किंवा ‘अदृष्ट’ (मोयरा) ही माणसाचे भवितव्य ठरविणारी जी देवी मानण्यात आली होती, तिला झ्यूसच्या शक्तीचा एक आविष्कार, असे ते मानतात. एस्किलस आणि सॉफोक्लीझ ह्या नाटककारांना परंपरागत चालत आलेल्या मिथ्यकथांवर आधारलेल्या शोकांतिका लिहिणे भाग होते पण आपला प्रगल्भ धार्मिक व नैतिक दृष्टिकोण ह्या मिथ्यकथांच्या माध्यमाद्वारा ते प्रभावीपणे व्यक्त करतात आणि ह्यासाठी अनेकदा त्यांना नवा आकार आणि आशय देतात. भवितव्यता (नेमेसिक) ही आंधळी शक्ती नाही आपल्या कृत्यांची नैतिक जबाबदारी आपल्यावर असते आणि आपले भवितव्य त्यांच्यामुळे ठरते नैतिक नियम चिरंतन आहेत व त्यांच्यामागे दैवी अधिष्ठान आहे दुःखाच्या अनुभवाने माणसातील हीण जळून जाते आणि त्याला शहाणपण लाभते, असा त्यांच्या नैतिक शिकवणीचा गाभा होता. ग्रीक नगरराज्यांच्या नागरिकांच्या लौकिक व्यवहाराला जे धार्मिक अधिष्ठान होते, त्याचा आदर ह्या कवींनी केला पण ह्या धर्माला नवीन नैतिक आशयही दिला. उलट, युरिपिडीझ ह्या ग्रीसच्या तिसऱ्या श्रेष्ठ नाटककाराच्या कृतींत प्रस्थापित संप्रदाय, देवदेवता व विधी ह्यांविषयी काहीशी अनादराची भावना व्यक्त झाल्याचे दिसून येते. देवदेवतांच्या अनैतिक वर्तनाच्या ज्या मिथ्यकथा प्रचलित होत्या– उदा., झ्यूसने अनेक देवतांशी आणि मानवी स्त्रियांशी केलेले कामुक वर्तन– त्या ह्या अनादराचे कारण होते. थेलीझप्रभृती ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी केवळ नैसर्गिक तत्त्वांच्या– पृथ्वी, आप इ. महाभूतांच्या– साहाय्याने विश्वाच्या स्वरूपाचा उलगडा करण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याची छाप युरिपिडीझवर होती व म्हणून पारंपरिक देवतांविषयी त्याची वृत्ती संशयवादी होती. नैतिक विशुद्धतेची, क्षमाशीलतेची, आंतरिक श्रद्धेची थोरवी त्याने गायिली. सर्व मानवजाती एक आहे– सबंध पृथ्वी ही सज्जनाची पितृभूमी असते– ही त्याची दृढ भावना होती देवाविषयीची त्याची कल्पना देव विश्वात्मक आहे, ह्या मताकडे झुकत होती. नगरराज्याच्या साऱ्या व्यवहारांचे अधिष्ठान असलेल्या पारंपरिक धर्माला हे विचार पचविणे कठीण होते.
इ.स.पू. सहाव्या आणि पाचव्या शतकांत ह्या स्वरूपाचे धार्मिक प्रबोधन घडून येत होते, ह्याच्या अनेक खाणाखुणा आढळतात. बाह्य विधीपेक्षा आंतरिक शुद्धता महत्त्वाची आहे ईश्वराच्या दृष्टीने पापी वासना आणि पापी कृत्य ह्यांच्यामध्ये काही भेद नाही ईश्वर माणसांच्या अंतःकरणांत पाहू शकतो व त्यांना त्यानुसार न्याय देतो अशी मते अनेकांनी मांडली व त्यांचा लोकजीवनावर परिणाम घडून येत होता. परंतु लोकजीवनात पूर्वापार चालत आलेल्या संप्रदायांचे व विधींचे असलेले माहात्म्य फारसे कमी झाले नाही. उदा., नरबली देण्याची प्रथा अनेक प्राचीन विधींमध्ये आढळत असे. अनेक ठिकाणी तिचे रूपांतर होऊन माणसाचे प्रतीक म्हणून दुसरे काहीतरी बळी म्हणून देण्यात येऊ लागले पण काही ठिकाणी मूळ प्रथा चालूच राहिली. तसेच परंपरेने चालत आलेल्या सफलताविधींचा आवश्यक भाग असलेली लिंगपूजाही अनेक ठिकाणी मूळच्या स्वरूपात चालू राहिली. ॲरिस्टॉटलनेही ह्या प्रथेला अनुमती दाखविली आहे. प्रगल्भ धार्मिक विचार व प्राकृत धार्मिक विधी ह्यांचे आश्चर्यकारक साहचर्य इ.स.पू. पाचव्या व चौथ्या शतकांत आढळते. थेलीझप्रभृती तत्त्ववेत्त्यांचे निसर्गवादी तत्त्वज्ञान, प्रोटॅगोरस इ. सॉफिटांचा संशयवाद ह्यांच्या प्रभावामुळे पारंपरिक धर्मावरील ग्रीक जनतेची श्रद्धा क्षीण झाली होती, असे मानता येणार नाही. पारंपरिक धर्मातील देवता, त्यांचे संप्रदाय आणि विधी हा लोकजीवनाचा, नगरराज्यांचा आधार होता. तेव्हा पारंपरिक धर्माची जनमानसावरील पकड सहजासहजी ढिली होणे अशक्य होते. पारंपरिक धर्माकडे बघण्याचा ग्रीक लोकांचा प्रगल्भ आणि अंतर्मुख दृष्टिकोण काय होता, ह्याची कल्पना प्लेटोवरून येते. नगरराज्याच्या स्वरूपात मानवी समाज सुखाने व निरामयपणे नांदू शकतो, असे प्लेटोचे मत होते. धार्मिक श्रद्धा आणि तिच्यावर आधारलेली नीतिमत्ता ह्यांचे अधिष्ठान नागरिकांच्या जीवनाचे नियमन करण्यासाठी आवश्यक आहे, अशीही त्याची धारणा होती. तेव्हा पारंपरिक धर्माला प्लेटो मान्यता देतो पण देवतांविषयीच्या कल्पना, मिथ्यकथा आणि पारंपरिक विधी ह्यांच्यामध्ये जो अनैतिक व बीभत्स भाग अनेकदा आढळून येत असे, त्यांना वर्ज्य करून पारंपरिक धर्माला अधिक शुद्ध रूप देण्याचा त्याचा प्रयत्न होता. अशा परिष्कृत देवतांना आपल्या अधिकृत तत्त्वज्ञानात त्याने दुय्यम, पण निश्चित असे स्थान दिले आहे.
अखेरचा कालखंड : इ. स. पू. ३३८ पासून मॅसिडॉनचे प्रभुत्व ग्रीक प्रदेशावर स्थापन झाले व नगरराज्यांची स्वायत्तता संपुष्टात आली. अलेक्झांडरने ग्रीक संस्कृतीचा इतर संस्कृतींशी समन्वय साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. ह्याचा परिणाम दुहेरी झाला. नगरराज्याचा अधिष्ठात्या देवता म्हणून अथीनी, झ्यूस इत्यादिकांना असलेले महत्त्व क्षीण होत गेले. ह्याचा अर्थ असा नव्हे, की ह्या देवतांवरील लोकांची भक्ती, लोकांना त्यांचा असलेला लळा एकाएकी कमी झाला. अथीनी, अपोलो, पोसायडन ह्या पारंपरिक देवता, कुटुंबाच्या व व्यक्तीच्या रक्षणकर्त्या म्हणून ख्रिस्ती धर्माचा उदय होईपर्यंत, लोकांच्या अंतःकरणात आणि धार्मिक संप्रदायांत टिकून होत्या. पण नगरराज्य हे जे सामाजिक एकतेचे केंद्र होते, ते निष्प्रभ झाल्यामुळे देवांशी अधिक जिव्हाळ्याचा आणि व्यक्तिगत संबंध जुळवून देईल, अशा धार्मिक संप्रदायांची आवश्यकता अनेकांना भासू लागली आणि इल्यूसिसच्या गुह्य पंथाच्या नमुन्यावर आधारलेले अनेक संघ तेथे उदयाला आले. असे संघ एका विशिष्ट देवतेच्या भक्तीला वाहिलेले असत. एकाच देवतेचे भक्त ह्या एका नात्याने ते एकमेकांना जोडलेले असत, एका विशिष्ट गणाचे सदस्य किंवा नगराचे नागरिक म्हणून, ते एकत्र येत नसत. आराध्य देवतेशी आणि परस्परांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जडलेले असे. अनेकदा सामूहिक प्रीतिभोजनाद्वारा देवाचा प्रसाद ग्रहण करणे, हा अशा संघातील प्रमुख धार्मिक विधी असे. देव हा टोळीच्या, गणाच्या, सकुलकाच्या एकतेचा अधार आहे, ही कल्पना मागे पडली आणि देव भक्तांना एका भ्रातृसंघात बांधतो, ह्या कल्पनेने तिची जागा घेतली. ‘कोणताही सज्जन मला परका नाही’, ‘सर्व माणसांची एक समान प्रकृती असते’, अशा आशयाच्या वचनांतून ही नवीन धार्मिक जाणीव व्यक्त झालेली आढळते. ह्या मानवतावादाचा एक परिणाम असा झाला, की देव एकच आहे पण भिन्न वंश, भिन्न समाज त्याची वेगवेगळ्या नावांनी आराधना करतात ही कल्पना बळावली. उदा., पहिल्या टॉलेमीने ॲलेक्झांड्रिया येथे इ.स.पू.सु. ३oo मध्ये स्थापन केलेल्या सारापिस वा सेरापिस ह्या बॅबिलोनियन देवतेच्या संप्रदायात सारापिस हा देव म्हणजेच ‘ओसायरिस-एपिस’ हा ईजिप्शियन आणि प्लुटॉन हा ग्रीक देव असे मानण्यात येत असे. तसेच अनेक पौर्वात्य देवतांना ‘झ्यूस’ ह्या नावाने ओळखण्यात येत असे. ह्या सर्व धार्मिक मंथनाचा परिणाम म्हणून ख्रिस्ती धर्मासारख्या एकेश्वरवादी धर्माच्या उदयाला अनुकूल मानसिक भूमी घडविली गेली. सर्व माणसांचा आणि विश्वाचा एकच ईश्वर आहे, ह्या मताचा प्रभाव स्टोइक ह्या तात्त्विक पंथावर पडलेला आढळतो. पण स्टोइक पंथीयांचा ईश्वर एक व्यक्ती, एक पुरुषविशेष नव्हता. त्यांच्या मते ईश्वर म्हणजे विश्वातील सर्व वस्तूंत ओतप्रोत भरून राहिलेले चैतन्य होय. ह्या कालखंडातील एक महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे ॲस्क्लीपिअस संप्रदाय होय. इ.स.पू. पाचव्या शतकाच्या अखेरीस हा संप्रदाय अथेन्समध्ये प्रविष्ट झाला. सॉफोक्लीझ त्याचा अनुयायी होता, अशी आख्यायिका आहे. हा भिषजांचा किंवा वैद्यांचा संप्रदाय होता. सुप्रसिद्ध ग्रीक भिषग्वर्य हिपॉक्राटीझ हा ह्याच पंथाचा अनुयायी होता. ह्या पंथात माणसांच्या शारीरिक व आध्यात्मिक व्याधी बरा करणारा, ह्या स्वरूपात देवाची आरधना करण्यात येत असे आणि सर्व आर्तांना त्याच्यात खुले द्वार असे. ग्रीक संस्कृती व पौर्वात्य धर्म ह्यांच्या संगमातून सिद्ध झालेली एक महत्त्वाची निर्मिती म्हणजे ‘हेर्मेटिक साहित्य’. ह्या गूढवादी साहित्याचा उगम जरी इ.स.पू. सहाव्या किंवा पाचव्या शतकात झालेला असला, तरी त्याचा बराचसा भाग इ.स.पू. ३oo च्या सुमारास रचला गेला आहे. ह्या साहित्यात व्यक्त झालेला धार्मिक दृष्टिकोण गूढवादी, अद्वैती आहे आणि परंपरागत ग्रीक धर्माला परका, असा तो दृष्टिकोण आहे. ईश्वराला उद्देशून म्हटलेल्या ‘मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी’, ह्या वचनात हा दृष्टिकोण व्यक्त झालेला आढळतो. मिथ संप्रदायसुद्धा ह्या काळात ग्रीसमध्ये प्रविष्ट झालेला आढळतो पण सर्वांत प्रभावी संप्रदाय म्हणजे ‘ऑर्फिक’ संप्रदाय होय. ह्या गुह्य संप्रदायांपैकी बऱ्याच संप्रदायांत आत्मा अमर आहे, देहपतनानंतर त्याचे पुनरुत्थान होते व तो दिव्य जीवनात प्रवेश करतो, हा सिद्धांत मूलभूत मानण्यात येत असे. पण ह्याचबरोबर सामाजिक व राजकीय अनिश्चिततेच्या ह्या काळात दानव, पिशाच इ. मानवेतर गूढ योनींविषयीची भीती वाढली आणि त्यांना संतुष्ट करू पाहणाऱ्या विधींचे महत्त्व वाढले. तसेच मानवी आत्मा मृत्यूनंतर दिव्य रूप धारण करतो, ह्या सिद्धांताचा एक परिणाम म्हणून अनेक कर्तबगार पुरुषश्रेष्ठांना त्यांच्या मृत्यूनंतर व कधीकधी त्यांच्या जिवंतपणीच देव मानेन, त्यांची आराधना करण्यात येऊ लागली. एक विशिष्ट सामाजिक कार्य असलेला आणि ग्रीक मनोवृत्तीत आढळणाऱ्या कलात्मतेने आणि विचारीपणाने रेखीव व प्रसन्न रूप प्राप्त करून दिलेला पारंपरिक ग्रीक धर्म, अशा अनेक गूढवादी संप्रदायांच्या वेटोळ्यात अडकला. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारापर्यंत ही परिस्थिती अशीच राहिली पण ह्या गूढवादी संप्रदांयातील अनेक सिद्धांत व प्रथा ख्रिस्ती धर्माने आत्मसात केल्या, ह्याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे.
पहा : पुराणकथा (ग्रीक).
संदर्भ : 1. Farnell, L. R. The Higher Aspects of Greek Religion, London, 1912.
2. Murray, G. Four Stages of Greek Religion, London, 1912.
3. Nilsson, M. P. A History of Greek Religion, New York, 1964.
रेगे, मे. पुं.
“