ग्रहगतिदर्शक : (ओरेरी). सूर्यकुलातील खस्थ ज्योतींचे परिभ्रमण, सापेक्ष गती, स्थाने व कला विशद करण्यासाठी बनविलेले एक उपकरण. याच्या मध्यभागी सूर्य दर्शविणारा गोल असतो. त्याला दंतचक्रांची मालिका जोडलेली असून दंतचक्राच्या दांड्यांना ग्रह व उपग्रह दाखविणारे लहानमोठे गोल वेगवेगळ्या अंतरांवर जोडलेले असतात. घड्याळात असणाऱ्या यांत्रिक प्रयुक्तीनेच याचे कार्य चालते. उपकरण चालू केल्यावर गोलांच्या अक्षीय व कक्षीय परिभ्रमणांवरून ग्रह-उपग्रहांच्या प्रत्यक्ष फिरण्याची स्थूल कल्पना येते. साध्या स्वरूपाचे ग्रहगतिदर्शक आकृतीत दाखविले आहे. खस्थ ज्योतींची आकारमाने, सापेक्ष अंतरे, गती वगैरे गोष्टी उपकरणात योग्य प्रमाणात व बिनचुक दाखविणे शक्य नसले, तरी याचा शैक्षणिक दृष्ट्या बराच उपयोग होतो.
जॉर्ज ग्रॅहॅम यांनी प्रथम हे उपकरण १७०४–०९ च्या दरम्यान बनविले. १७१५ मध्ये रोली यांनी अशी पुष्कळ उपकरणे बनविली. त्यांपैकी एक उपकरण त्यांनी ओरेरीचे चवथे अर्ल चार्ल्स बॉइल यांना दिले. त्यांनी या उपकरणाला पुरस्कार देऊन बरेच उत्तेजन दिले म्हणून निबंधकार व पत्रकार रिचर्ड स्टील यांनी या उपकरणाला ‘ओरेरी’ हे नाव दिले. टॉमस टाँपिअन या घड्याळजींनीही असे एक उपकरण बनविले होते.
ओरेरीचे आता निरनिराळे खास प्रकार बनविण्यात आलेले आहेत. ‘प्लॅनेटेरियम’ (कृत्रिम तारामंडळ) या उपकरणावरून सूर्य, ग्रह व उपग्रह यांच्या गति-स्थितीची कल्पना येते [→ तारामंडळ, कृत्रिम]. ‘टेल्यूरियम’ वरून दिवसरात्र, लहानमोठे दिवस व ऋतू यांची कल्पना येते, ल्यूनारियमवरून चंद्राच्या कला व गती यांची कल्पना येते, तर उपग्रहयंत्राने गुरू व त्याचे उपग्रह यांची कल्पना येते.
ठाकूर, अ. ना.
“