ग्यांगत्से : तिबेटमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व व्यापारकेंद्र. लोकसंख्या २०,००० (१९७० अंदाज). हे ल्हासाच्या नैर्ऋत्येस १७५ किमी., शिगात्सेच्या आग्नेयीस ६५ किमी. व भारतीय सीमेपासून २१७ किमी.वर आहे. भारत-तिबेट करारान्वये हे १८५२ मध्ये विदेश व्यापारास खुले झाले व १९०४ नंतर तेथे ब्रिटनच्या व नंतर भारताच्या व्यापार अभिकर्त्याचे ठाणे होते. १९६२ च्या भारत-चीन संघर्षानंतर हा संबंध तुटला.
चीन व्यापण्यापूर्वी येथे तिबेटातील लोकर, फर, कस्तुरी, याकच्या शेपट्या, औषधी वनस्पती, टाकणखार, लोणी इ. निर्यातीसाठी येते आणि बार्ली, चहा, तांदूळ, रेशीम, तंबाखू, साखर, कापड, सुकी फळे, लोखंडी माल वगैरेंची चीनमधून व भारतातून आयात होई. भारतातून चुंबी खोरे मार्गे ल्हासा-शिगात्सेकडे जाणाऱ्या वाटेवर असल्यामुळे याचे महत्त्व होते. कापड, सतरंज्या, पांघरुणे, जीन वगैरेंचे प्रमुख उद्योग येथे चालतात.
जवळच्या टेकडीवरील लामा मठातून भोवतीच्या प्रदेशावर नजर ठेवता येई. चीनने येथून ल्हासा, शिगात्से व सिक्कीम सिमेजवळील याटुंगपर्यंत उत्तम मोटाररस्ते बांधले आहेत व येथे सैनिकीतळ ठेवला आहे.
कांबळे, य. रा.