गोविंददास, सेठ : (१६ ऑक्टोबर १८९६—१८ जून १९७४). हिंदी साहित्यात व भारतीय राजनैतिक क्षेत्रात सेठ गोविंददास प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म जबलपूर येथे वैभवसंपन्न घराण्यात झाला. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा त्यांनी घरीच अभ्यास केला. खासगी रीत्या ते एम्. ए. झाले. लहानपणापासूनच त्यांचा लेखनाकडे ओढा होता. गांधीजींच्या प्रभावाने ते १९१९-२० च्या दरम्यान राजकीय व समाजिक कार्यात उतरले. येथपासून शेवटपर्यंत त्यांनी आपले जीवन त्याग व परिश्रम करण्यात व्यतीत केले. बुद्धीच्या व कर्तृत्वाच्या जोरावर त्यांची अनेक मानसन्मानही मिळविले. १९२३ मध्ये ते केंद्रीय कायदेमंडळात अविरोध निवडून गेले. पुन्हा १९३४ व ४६ मध्येही ते केंद्रीय कायदेमंडळात निवडून गेले. १९४७ मध्ये संविधान समितीवर आणि १९५२ मध्ये लोकसभेवर त्यांची निवड झाली. १९२१ पासून ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य होते. १९५०-५१ व १९५८ मध्ये त्यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्यत्व मिळाले. महाकोसल प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष म्हणून १९५५ पर्यंत त्यांची अकरा वेळा निवड झाली. १९५७ मध्ये मध्य प्रदेशाची पुनर्रचना झाल्यावर मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे ते पहिले अध्यक्ष झाले. लोकसभेत हंगामी सभापती (स्पीकर)
म्हणून १९५७ व १९६२ मध्ये त्यांची निवड झाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी वेळा तुरुंगवास भोगला. सु. आठ वर्षे त्यांनी तुरुंगात घालविली. वडिलार्जित विपुल संपत्तीचा त्यांनी संपूर्ण त्याग तर केलाच, पण पुढे स्वकष्टार्जित संपत्तीही लोकसेवेसाठी अर्पण केली.
सेठ गोविंददास श्रेष्ठ दर्जाचे संसदपटू होते. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठित व्हावी, राष्ट्रलिपी म्हणून देवनागरी स्वीकारली जावी, सामाजिक व राजकीय जीवनातील इंग्रजीसारख्या परकीय भाषेचे महत्त्व कमी व्हावे व तिचे स्थान प्रांतीय भाषांनी व राष्ट्रभाषेने घ्यावे, यासाठी त्यांनी विधानसभेत व सर्व देशात जे कार्य केले, त्याला तोड नाही. आपल्या हिंदी भाषेबाबतच्या मतांचा त्यांनी हिरिरीने प्रचार व प्रसार व्याख्याने, पुस्तके, वृत्तपत्रे यांतून तसेच देशभर दौरे काढून केला. सेठ गोविंददासांवर हिंदू संस्कार होते. हिंदू धर्मावर त्यांची नितांत श्रद्धाही होती. भारतीय संस्कृतीचा त्यांनी आपल्या सर्वच लेखनातून पुरस्कार केला. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत ते प्रगतिशील होते.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत क्रियाशील राहून तसेच अनेक आघाड्यांवर महत्त्वाची कामगिरी करूनही सेठ गोविंददासांनी केलेली विपुल ग्रंथनिर्मिती आश्चर्यचकित करून टाकणारी आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक तसेच प्रहसनात्मक, प्रायोगिक अशी सर्व प्रकारची ११० च्या वर नाटके व एकांकिका त्यांनी लिहिल्या. त्याची ग्रंथरचना विषयाचे वैविध्य व संख्या या दृष्टींनी लक्षणीय आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने त्यांची ही रचना तितकीशी तोलामोलाची नाही, हे आज सर्वच हिंदी समीक्षकांनी मान्य केले आहे. त्यांनी लिहिलेली कर्तव्य (१९३५), कर्ण (१९४६) ही पौराणिक नाटके हर्ष (१९३५), कुलीनता (१९४०), शशीगुप्त (१९४२), अशोक (१९५७) ही ऐतिहासिक नाटके व प्रकाश (१९३०), सेवामय (१९४०), विकास (१९४१), त्याग या ग्रहण (१९४२), संतोष कहाँ ? (१९४५), पाकिस्तान (१९४६), महत्त्व किसे ? (१९४६), गरीबी और अमीरी (१९४७), सिद्धांत स्वातंत्र्य (१९५८) ही सामाजिक नाटके विशेष उल्लेखनीय होत. नवरस (१९४२) हे नाटक प्रतीकात्मक आहे. त्यांनी एकपात्री एकांकिका लिहून हिंदी साहित्यात एक नवा उपक्रम सुरू केला. चतुष्पथ (१९४२) व षट्दर्शन (१९५३) हे त्यांचे एकांकिकासंग्रह विशेष उल्लेखनीय होत. सु. चाळीस एकांकिका त्यांनी लिहिल्या.
सेठ गोविंददासांनी लिहिलेली एक हजार पृष्ठांची प्रदीर्घ कादंबरी इंदुमती (१९५०) म्हणजे सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आरसाच आहे. कथानक, व्यक्तिचित्रण, भावभावनांचे चित्रण, वास्तवाचे रेखांकन या दृष्टींनी ही कादंबरी यशस्वी कृती म्हणून समीक्षकांनी गौरविली आहे. सेठ गोविंददासांच्या सर्व लेखनात सामाजिक समस्यांचे चिंतन, भारतीय संस्कृतीचे गुणगान, आदर्शाचे संस्कार करण्याची धडपड आणि उदात्त मूल्यांचा पुरस्कार दिसून येतो.
नाट्य कला मीमांसा (१९३५) या ग्रंथात त्यांनी नाट्यकलेविषयी आपली मते व्यक्त केली आहेत. राजकीय वा अन्य कारणांनी त्यांनी जगभर विपुल प्रवास केला व त्या निमित्ताने तीन प्रवासवर्णने लिहिली. आफ्रिकेच्या प्रवासाचे इतिवृत्त हमारा प्रधान उपनिवेश (१९१९) राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व त्यांनी केले, त्या निमित्ताने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिजी, मलाया इ. देशांच्या प्रवासाचे वर्णन सुदूर दक्षिण-पूर्व (१९५२) आणि यूरोप व अमेरिकेच्या प्रवासाचे वर्णन पृथ्वी परिक्रमा (१९५४) नावाने त्यांनी शब्दबद्ध केले. पृथ्वी परिक्रमाचे इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहे. त्यांनी देशरत्न राजेंद्र प्रसाद हे चरित्र तसेच आत्मनिरीक्षण (३ भाग, १९५८) नावाचे आत्मचरित्रही प्रसिद्ध केले. यांखेरीज त्यांनी वेळोवेळी दिलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचे संग्रहही प्रसिद्ध आहेत.
सेठ गोविंददासांनी केलेल्या हिंदी राष्ट्रभाषेच्या सेवेचा व वाङ्मयीन कार्याचा गौरव म्हणून १९४८ मध्ये ते अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले गेले. त्यांना अनेक शैक्षणिक व राजकीय बहुमान मिळाले. ‘साहित्य वाचस्पती’, ‘ डॉक्टर ऑफ लॉज’ (जबलपूर विद्यापीठ) या सन्माननीय पदव्याही त्यांना मिळाल्या. १९६१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. जबलपूर येथे ते निधन पावले.
संदर्भ : १. नगेंद्र चतुर्वेदी, महेंद्र, सेठ गोविंददास अभिनंदनग्रंथ, दिल्ली, १९५६.
२. रामचरण, महेंद्र, सेठ गोविंददास नाट्यकला तथा कृतियाँ, दिल्ली, १९५६.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“