गौर, हरि सिंग : (२६ नोव्हेंबर १८७०–२५ डिसेंबर १९४९). प्रसिद्ध भारतीय विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ. मध्य प्रदेशातील सागर येथे जन्म. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. ‘डाउनिंग कॉलेज’, केंब्रिज येथे ते एम्.ए. एल्एल्. डी. झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर १८९२ साली ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी सु. ४० वर्षे वकिली केली. ते निष्णात कायदेतज्ञ होते. त्यांनी उच्य न्यायालयासमोर तसेच प्रिव्ही कौन्सिलसमोर अनेक खटले चालविले. ते काही काळ ‘हायकोर्ट बार कौन्सिल’चे सदस्य आणि ‘हायकोर्ट बार असोसिएशन’चे अध्यक्षही होते. त्यांनी द लॉ ऑफ ट्रान्सफर इन ब्रिटिश इंडिया (१९०२), द पीनल लॉ ऑफ इंडिया (१९१४) व द हिंदू लॉ कोड (१९१८) हे तीन प्रसिद्ध ग्रंथ लिहिले. द पीनल लॉ ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रमाणभूत मानला जातो. सर गौर यांची दिल्ली विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली. १९३६ ते ३८ या कालखंडात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठ हे त्यांच्याच कल्पकतेचे व परिश्रमांचे फलित होय.१९४६–४९ या कालखंडात त्यांनी त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडली. सार्वजनिक जीवनाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. १९२१ ते १९३५ या दरम्यान ते मध्यवर्ती विधानसभेचे सदस्य होते. ‘सायमन कमिशन’चेही ते सदस्य होते. तसेच संसदेच्या संयुक्त समितीचे एक प्रतिनिधी म्हणून त्याची निवड झाली होती (१९३३). ‘ द क्विनक्वेनिअल कॉन्फरन्स ऑफ द युनिव्हर्सिटीज ऑफ द ब्रिटिश कॉमनवेल्थ’साठी गेलेल्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. भारतीय घटना परिषदेचेही ते सदस्य होते.
त्यांच्या सार्वजनिक, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील मौलिक कामगिरीबद्दल १९२५ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. तसेच दिल्ली विद्यापीठाने व सागर विद्यापीठाने त्यांना अनुक्रमे ‘डी लिट्.’ व ‘डी. एस्सी.’ या सन्माननीय पदव्या देऊन त्यांचा गौरव केला.
त्यांच्या इतर ग्रंथांमध्ये इंडिया अँड द न्यू कॉन्स्टिट्यूशन, रेनिसांन्स ऑफ इंडिया, द स्पिरिट ऑफ बुद्धिझम (१९२९) व फॅक्ट्स अँड फॅन्सिज हे ग्रंथ तसेच हिज ओन्ली लव्ह (१९२९) ही कादंबरी व रॅन्डम ऱ्हाइम्स हा कवितासंग्रह उल्लेखनीय आहेत. सेव्हन लाइव्ह्ज (१९४४) हे त्यांचे आत्मचरित्र होय. सागर येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Saugar University Publication, Dr. Hari Singh Commemoration Volume, Sagar, 1957.
भोईटे, उत्तम