गोल्डश्मिट, व्हिक्टॉर मॉरिट्‌स : (२७ जानेवारी १८८८—२० मार्च १९४७). नॉर्वेजियन भूरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी स्फटिक रसायनशास्त्र या नव्या विज्ञानशाखेचा पाया घातला आणि भूरसायनशास्त्राला आधुनिक स्वरूप दिले. त्यांचा जन्म झुरिक व शालेय शिक्षण हायड्लबर्ग येथे झाले. १९०० साली ते क्रिस्तियानीया (ऑस्लो) येथे आले आणि १९०५ साली त्यांना नॉर्वेजियन नागरिकत्व मिळाले. ऑस्लो, व्हिएन्ना व म्युनिक येथे त्यांनी खनिजविज्ञान, भूविज्ञान आणि रसायनशास्त्र यांचा अभ्यास केला. १९११ साली त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. १९१४ साली क्रिस्तियानीया येथील खनिजवैज्ञानिक संस्थेमध्ये त्यांची प्राध्यापक व संचालक म्हणून नेमणूक झाली. १९१७–३० च्या दरम्यान ते नॉर्वेजियन सरकारच्या कच्च्या मालाच्या प्रयोगशाळेचेही संचालक होते. १९२९ साली ते गटिंगेन (जर्मनी) येथे प्राध्यापक व खनिजवैज्ञानिक संस्थेचे प्रमुख म्हणून गेले. परंतु १९३५ साली हिटलर राजवटीच्या निषेधार्थ राजीनामा देऊन ते ऑस्लोला परतले. १९४२ साली जर्मनांनी त्यांची नॉर्वेतील बंदी छावणीत रवानगी केली. परंतु तेथून सुटका करून घेऊन ते स्वीडनमार्गे ग्रेट ब्रिटनला गेले. तेथे त्यांनी कृषिसंशोधन परिषदेत काम केले. १९४३ साली ते रॉयल सोसायटीचे परदेशस्थ सभासद झाले. १९४६ साली ते ऑस्लोला परत आले.

भूकवचातील मूलद्रव्यांच्या वाटणीसंबंधीच्या नियमांचा अभ्यास करून त्यांनी भूरसायनशास्त्राचा पाया घातला. तसेच आयनिक संयुगांच्या (एक संयोग होताना एका किंवा अधिक इलेक्ट्रॉनांचे स्थानांतरण होऊन स्थिर संरचना असलेले रेणू तयार होणाऱ्या संयुगांच्या) स्फटिक संरचनेविषयीच्या त्यांच्या अभ्यासातूनच स्फटिक रसायनशास्त्र उदयास आले. लेश (अल्प प्रमाणात असलेल्या) मूलद्रव्यांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे भूकवचातील गौण घटकांच्या वाटणीबद्दलच्या माहितीमध्ये भर पडली. संस्पर्शी (अग्निज राशीच्या संपर्काने होणाऱ्या) व प्रादेशिक (तीव्र दाब व उच्च तापमान यांमुळे होणाऱ्या) रूपांतरणाने बदललेल्या खडकांच्या रासायनिक संघटनांचे त्यांनी काळजीपूर्वक अध्ययन केले होते.

त्यांनी अनेक संस्मरणिका लिहिल्या असून ए. म्यूर यांनी संपादित केलेला द जिओकेमिस्ट्री (१९५४) हा त्यांचा लेखांचा विवेचक ग्रंथ महत्त्वाचा आहे. ते ऑस्लो येथे मृत्यू पावले.  

ठाकूर, अ. ना.