गोमेटी : वेलीची फांदी व फळ

गोमेटी : (घोयंट, वनतुंडी हिं. तरली, कुंद्री क. शिंदोंडे लॅ. झेनेरिया अंबेलॅटा, मेलोथ्रिया हेटेरोफायला कुल-कुकर्बिटेसी). ही ओषधीय [→ ओषधि] वेल भारतात सर्वत्र सु. २,१०० मी. उंचीपर्यंत आढळते. हिची मुळे मांसल पाने साधी, विविध आकारांची, अखंड किंवा विविध प्रकारे खंडित व दातेरी असतात. एकलिंगी फुले लहान, पिवळी पुं-पुष्पे अनेक व विविध प्रकारच्या फुलोऱ्यांवर आणि स्त्री-पुष्पे एकेकटी. मृदुफळ लांबट गोल, तोंडल्यासारखे पण तपकिरी व गोडसर असून त्यात अनेक अर्धगोल, गुळगुळीत बिया असतात. मुळे, पाने व फळे खाद्य असून फळांची भाजी करतात. मूळ उत्तेजक, शक्तिवर्धक व रेचक असून परम्यावर व मूत्रोत्सर्ग बंद झाल्यावर देतात. कोकणात मुळांचा रस जिरे व साखर घालून थंड दुधातून स्वप्नावस्थेवर आणि पुष्टीकरिता देतात. बिब्बा उतल्यावर पानांचा रस लावतात. इंडोचायनात बिया रेचक म्हणून वापरतात.

पहा : कुकर्बिटेसी.

जमदाडे, ज. वि.