गोपिनाथन् : (२४ जून १९०८–   ). प्रख्यात कथकळी नर्तक. चंपक्कुळम् येथे कथकळी नृत्यपरंपरेतील एका घराण्यात जन्म. त्यांचे नृत्यशिक्षण प्रारंभी त्यांचे चुलते व त्यावेळचे प्रसिद्ध ‘आशान’ (गुरू) परमू पिळ्ळ व मात्तूर कुंजन पिळ्ळ यांच्याकडे व नंतर ‘केरळ कला मंडलम्’ ह्या नृत्यसंस्थेत गुरू कुंचू-कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांचा विवाह तंकमणी ह्या नर्तकीशी झाला. सुप्रसिद्ध नर्तकी रागिणीदेवी ह्यांच्या नृत्यपथकामध्ये सहभागी होऊन, त्याबरोबर त्यांनी भारतभर दौरा केला व कथकळीचा प्रसार करून त्यास अमाप लोकप्रियता मिळवून दिली. पारंपरिक कथकळी नृत्यातील ढिसाळपणा, भडक रंगभूषा व वेशभूषा, कर्णकर्कश वाद्यसंगीत, प्रदीर्घ मलयाळम् काव्य इ. दोष दूर करून त्यास सुटसुटीत, सुविहित व आधुनिक रूप दिले. कथकळी हे नृत्यनाट्याच्या स्वरूपात असले, तरी त्याचे सुटसुटीत आणि एकपात्री प्रयोग त्यांनीच सर्वप्रथम सादर केले. ‘शिव-पार्वती’, ‘शृंगारलहरी’, ‘व्याध नृत्य’ ही त्यांची विशेष लोकप्रिय नृत्ये होत. त्रावणकोर संस्थानामध्ये १९३५ च्या सुमारास ते दरबारी नर्तक म्हणून होते. त्यांनी मद्रास, दिल्ली, त्रिवेंद्रम, एर्नाकुलम् ह्या ठिकाणी नृत्यसंस्था चालवल्या. मद्रास येथे ‘नटन निकेतन’ ही स्वतःची नृत्यसंस्था स्थापन केली. भारतीय नृत्यकलेवर त्यांनी लेखनही केले आहे. त्यात अभिनयमुकुरम् (१९५३, नागभूषण ह्यांच्यासमवेत) व क्लासिकल डान्स पोझेस इन इंडिया (१९५५, एस्. व्ही. रामन राव ह्यांच्यासह) ह्या पुस्तकांचा समावेश होतो. त्रावणकोरच्या राजाकडून ‘वीरशृंखला’, रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून ‘नृत्यमुकुटमणी’ ही उपाधी, केरळ राज्य व ‘कलामंडलम्’ यांची पारितोषिके, संगीत नाटक अकादमीचे पारितोषिके, रविंद्र भारती विद्यापीठाची डॉक्टरेट यांसारखे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. 

वडगावकर, सुरेंद्र.