गोत्र-प्रवर : गोत्र आणि प्रवर या शब्दांचा संबंध वैदिक धर्माच्या श्रौत व स्मार्त या दोन्ही अंगांशी आहे. गोत्र या शब्दाचा रूढार्थ भारतातील प्राचीन ऋषिकुल असा आहे. प्रवर म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषीचे नाव होय. गोत्र आणि प्रवर यांचा श्रौत आणि स्मार्त कर्मांत बऱ्याच ठिकाणी एकत्र निर्देश येत असल्याने ‘गोत्र-प्रवर’ असा संयुक्त शब्द रूढ आहे.
गोत्र हा शब्द ऋग्वेदात, अन्य वैदिक ग्रंथांत आणि पुढील धार्मिक संस्कृत वाङ्मयात आढळतो. या शब्दाचा मूळचा अर्थ गाईंचा गोठा असा आहे. गोठ्यातील गाई एका कुळाच्या मालकीच्या असल्यामुळे गोत्र या शब्दाने एका कुळाचा आणि त्याच्या प्रमुखाचा बोध होऊ लागला. एखाद्या व्यक्तीचा इतरांच्याहून पृथक निर्देश करावयाचा असल्यास त्या व्यक्तीचे नाव, पित्याचे नाव आणि गोत्रनाम यांचा उच्चार करण्याची प्राचीन पद्धती होती. श्रौत व स्मार्त आचारांत याप्रमाणे व्यक्तीचा निर्देश होत असे. एका गोत्रातील स्त्रीपुरुषांचे बंधुभगिनीचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे, परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात म्हणजे इ. स. पू. सहाव्या-पाचव्या शतकांत ही रुढी असल्याचे स्पष्टच दिसते. याच्याही पूर्वी ब्राह्मणग्रंथांच्या काळात किंबहुना ऋग्वेदकाळीही ही प्रथा असावी. ऋग्वेदाच्या दहा मंडलांपैकी दोन ते सात मंडलांचे द्रष्टे ऋषी अनुक्रमे गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भरद्वाज आणि वसिष्ठ हे आहेत. आठव्या मंडलातील सूक्ते कण्व व अंगिरस् यांची आहेत. उरलेल्या तीन मंडलांतील सूक्तांचे ऋषीही निरनिराळ्या गोत्रांतील आहेत. या गोत्रांतील अनेक ऋषींनी आपापल्या काळात पाहिलेली सूक्ते ऋग्वेदात ग्रथित आहेत. गटागटाने राहिलेल्या या कुळांत स्वाभाविकच आपसांत विवाहसंबंध होत नसत. ऋग्वेदात ‘अरि’ हा शब्द ‘परका’ या अर्थाने वापरला आहे. ‘परका’ या शब्दाचेही तेथे दोन अर्थ आहेत. ‘परका’ म्हणजे ‘शत्रू’ हा एक अर्थ आणि परसमाजातील व्यक्तीला आदरपूर्वक बोलावून कन्या अर्पण करावयाची असता होणारा ‘सन्मान्य अतिथि’ हा दुसरा अर्थ. हे लक्षात घेतले म्हणजे ऋग्वेदकाळीही सगोत्र विवाह होत नसावेत, असे लक्षात येते. पुढे ब्राह्मणग्रंथांच्या काळीही ही प्रथा निश्चितपणे रुढ असली पाहिजे. ब्राह्मणग्रंथांत ‘जामि’ म्हणजे ‘बंधू’ आणि ‘अजामि’ म्हणजे ‘अबंधू’ या शब्दांचा वारंवार प्रयोग झालेला आहे.
प्रवर या शब्दाचा साक्षात निर्देश प्रथम ब्राह्मणग्रंथांत श्रौतविधींच्या निमित्ताने आला आहे. आर्षेय हा त्या शब्दाचा पर्याय म्हणून वापरला आहे. आहिताग्नी यजमान पौर्णिमेला पूर्णमासेष्टी आणि अमावास्येला दर्शेष्टी करतो. या इष्टीत ‘प्रवरण’ नावाचा विधी आहे. होता या नावाचा ऋत्विज मंत्र म्हणून देवतेचे आवाहन आणि स्तुती करतो. अग्निदेवता हा दैवी होता आहे. प्रवरणप्रसंगी होता आणि प्रत्यक्ष हवन करणारा अध्वर्यू हे दोघे यजमानाच्या गोत्रातील प्राचीन ऋषींचा निर्देश करतात. हे ऋषी प्रायः तीन असतात कधी एक किंवा दोन किंवा पाच असतात. या ऋषींना ‘आर्षेय’ अशी संज्ञा आहे. विशिष्ट प्रवरांचा निर्देश ऋग्वेदाच्या एका मंत्रात आढळतो. यजमान क्षत्रिय किंवा वैश्य असल्यास त्याच्या पुरोहिताचे प्रवर उच्चारावयाचे असतात. ‘प्रस्तुत यजमानाच्या गोत्रातील अमुक अमुक प्राचीन ऋषींना बोलावले असता ज्याप्रमाणे, हे अग्ने, तू आलास व देवतांचे आवाहन आणि स्तुती केलीस, त्याप्रमाणे आताही ये’, असा त्या प्रवरणाचा भावार्थ आहे. वस्तुतः दैवी होत्याचे प्रवरण म्हणजे निवड किंवा आवाहन अभिप्रेत असले, तरी प्रत्यक्षात मनुष्य होत्याचे प्रवरण होत असते कारण मनुष्य होता हा दैवी होत्याचा प्रतिनिधी असतो. या प्रवरणावरूनच आर्षेय या अर्थी प्रवर हा शब्द रूढ झाला. प्रवर हे गोत्रातील क्रमशः पिता, पितामह, प्रपितामह असलेले मंत्रद्रष्टे ऋषी होत, अशी मूळ कल्पना आहे. मंत्रद्रष्टे नसलेल्या ऋषींची नावेही पुढे प्रवरांत समाविष्ट झाली. प्रवरांची एकूण संख्या ४९ आहे.
गोत्र आणि प्रवर यांचा संग्रह यजुर्वेदाच्या श्रौतसूत्रांच्या परिशिष्टांत आढळतो. त्याला ‘प्रवराध्याय’ किंवा ‘प्रवरप्रश्न’ अशी संज्ञा आहे. ‘बौद्धायन प्रवराध्याया’त विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ आणि कश्यप हे सप्तर्षी आणि आठवा अगस्त्य यांची संतती म्हणजे गोत्र होय, असे म्हटले आहे. या आठ ऋषींपैकी प्रत्येकाच्या प्रजेमध्ये परस्परविवाह निषिद्ध आहे. या प्रत्येक गोत्रात अनेक गण असून पुन्हा त्या प्रत्येक गणात अनेक गोत्र म्हणजे उपगोत्रे आहेत. या सर्वांची नावे प्रवराध्यायात दिलेली आहेत. गोत्रांची संख्या हजारोंनी, लाखोंनी मोजण्याइतपत आहे, असेही तेथे म्हटले आहे. गोत्रांत जे ऋषी किंवा कर्ते पुरुष झाले, त्यांच्या नावांनीही पुढे गोत्रे चालू झाली. कुटुंब या अर्थानेही गोत्र या शब्दाचा प्रयोग होऊ लागला. ‘बौद्धायन प्रवराध्याया’त गोत्रांची एकूण नावे सु. आठशे आहेत. संस्कारकौस्तुभ या सतराव्या शतकातील ग्रंथात सोळाशे नावे आहेत. भारताच्या सर्व भागांतील ब्राह्मणजातींची गोत्रे संकलित केल्यास त्यांची संख्या दोन-तीनशेच्या बाहेर जाणार नाही. सांप्रतच्या कुटुंबांतील गोत्रांची मोजदाद केली असता, भरद्वाजगोत्री सर्वाधिक आणि त्याच्या खालोखाल काश्यप गोत्रातील कुटुंबे असल्याचे आढळते. ज्याला स्वतःचे गोत्र माहीत नसेल, त्याने आपले भरद्वाज गोत्र मानावे अशी जुनी प्रथा आहे.
विवाहप्रसंगी वधूवरांच्या गोत्रांबरोबर प्रवरांचीही उच्चार करण्याची प्रथा आहे. गोत्र आणि प्रवर समान असलेल्या कुळांत विवाह होत नाही, असे ‘बौद्धायन प्रवराध्याया’त म्हटले आहे. भृगू आणि अंगिरस् यांचा अपवाद वगळता, एक प्रवर समान असला तरी विवाह निषिद्ध आहे. स्मृतिकारांचा सगोत्र आणि सप्रवरांसंबंधी हाच अभिप्राय आहे. गोत्रांची संख्या वाढल्यामुळे सगोत्र विवाहासंबंधीचे निर्बंध पाळणे अडचणीचे झाले. ती अडचण दूर व्हावी, यासाठी प्रवरांचे बंधन प्रचारात आले असण्याची शक्यता आहे. नित्याच्या व्यवहारात गोत्राबरोबर प्रवरांचा निर्देश करण्याची प्रथा भारतात स्मृतिकाळानंतर रूढ झालेली दिसते. त्यातही पुन्हा भारताच्या सर्वत्र भागांत प्रवरांचा निर्देश करण्याची प्रथा आढळत नाही. काळाच्या ओघात गोत्रसंस्था शुद्ध राहिली नाही. गोत्र म्हणजे वंश ही मूळची वस्तुस्थिती आता उरलेली नसल्यामुळे, हिंदू कायद्यात सगोत्र विवाह वैध मानला आहे, हे योग्यच आहे. जैन आणि बौद्ध ग्रंथांत कुटुंब या अर्थाने गोत्र या शब्दाचा प्रयोग केलेला आढळतो.
काशीकर, चिं. ग.
गोत्र-प्रवर व चातुर्वर्ण्य : ऋषींची गोत्रे म्हणजे गणसंस्थेचीच रूपे होते. या गणसंस्थांचीच पुढे एक किंवा अनेक वर्णांच्या रूपाने परिणती झाली. क्षत्रियांचे ब्राह्मण व ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले एकाच ऋषिगणातून त्रैवर्ण्य व चातुर्वर्ण्य प्रादुर्भूत झाले. गोत्रप्रवराध्यायांमध्ये गोत्रे ही ऋषिगणांचा अवांतर प्रकार म्हणूनच वर्णिली आहेत. ऋषिगण ही गणसंस्थाच होत, असे अनुमान करता येते हे पुढील प्रतिपादनावरून ध्यानात येईल.
यासंबंधी महाभारतात व पुराणांत पुष्कळ उदाहरणे सापडतात. अंगिरस्, अंबरीष व यौवनाश्व हे क्षत्रिय होते. त्यांच्या कुळात ब्राह्मण झाले. गोत्र-प्रवरांमध्ये त्यांची गणना आहे.(विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद इ. ब्राह्मणवंश झाले (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ३). गृत्समदापासून शुनक झाला, शुनकाचा शौनक झाला व शौनक गण हा चार वर्णांचा गण बनला (विष्णुपुराण, अंश ४ अध्याय ८). अंगिरस् व भार्गव यांचे गणसुद्धा चातुर्वर्ण्यरूप बनले (हरिवंश, अध्याय ३२ । ३९, ४०). गर्ग, राभ, हारित, मुग्दल, कपी व कण्व हे गण क्षत्रिय असून ब्राह्मण बनले (भागवत, ९ । २०, २१). वायुपुराणातही (३० । ४) शौनक गण कर्मवैचित्र्यामुळे चार वर्णांचा बनला, असे म्हटले आहे. भागवतात म्हटले आहे, की ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी नव्वद क्षत्रिय व दहा ब्राह्मण झाले.
गणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाजसंस्थेचे पहिले स्वरूप होय. अशा अगणित गणसंस्थांचे वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. अनेक वंशांच्या गणांना वर्णभेदांचे स्वरूप हळूहळू प्राप्त झाले. प्राचीन भारतीयांच्या गणसंस्थेत राजसत्ता व प्रजासत्ता यांचे गुण कमीजास्त प्रमाणात मिसळलेले होते. ब्राह्मणस्पती हा गणपती म्हणून ऋग्वेदात स्तविला आहे. विश्व हे गणराज्य म्हणजे देवगणांचे राज्य होय कारण वरुण, मित्र, इंद्र, सविता, भग, पूषन्, विष्णू, वायू इ. देव-समुदाय विश्वाचे राज्य ऋताच्या द्वारे करतात, असे ऋग्वेदात सांगितले आहे. गणप्रमुखास प्रजापती, गणपती, व्रातपती किंवा ब्रह्मणस्पती अशा प्रकारच्या संज्ञा होत्या. यजुर्वेद, ब्राह्मणग्रंथ व पुराणे यांवरून असे दिसते, की प्रजापती हा ब्रह्मा म्हणजे पुरोहित असे म्हणजे गणांचा मुख्य हा पुरोहित व शासक असा एकच असे. त्यात भेद नसे. प्रजापती ही कोणी एक व्यक्ती झाली नाही. प्रजापती हे प्राचीन भारतीयांच्या उच्चतम प्रशासकाचे अभिधान आहे. दक्ष, कश्यप, मनू, वसिष्ठ, अगस्त्य इ. प्रजापती होऊन गेले. ते यज्ञद्वारा किंवा मंत्रद्वारा संस्कार करून चातुर्वर्ण्याचा विभाग करीत असत. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून चार वर्ण निर्माण झाले, ही रूपकाची कल्पना ‘पुरुषसूक्ता’त प्रथम आली. इतर वेदांमध्ये तीच थोड्याफार फरकाने पुनःपुन्हा सांगितली आहे. एकाच प्रजापतीपासून चार वर्ण निर्माण झाले, ही कल्पना वंशभेदसूचक नाही. तिच्यात केवळ कार्यभेद रूपकाच्या भाषेत सूचित केला आहे. यज्ञ किंवा मंत्र यांच्या योगाने प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले, असे वेदांत पुष्कळ ठिकाणी सांगितले आहे (वाजसनेयी-संहिता, १५ । २८–३० तैत्तिरीय ब्राह्मण ३ । १२ । ९ । २ शतपथ ब्राह्मण २ । १ । ४ । १३). वेदद्रष्ट्या ऋषींच्या वंशात चातुर्वर्ण्य निर्माण झाले, असे जे पुराणांमध्ये अनेक ठिकाणी म्हटले आहे, ते यावरून उपपन्न होते. शतपथ ब्राह्मणात (१४ । २ । २३–२७) ब्राह्म प्रथम होते व त्यातून क्रमाने अधिक चांगले असे शूद्रापर्यंत वर्ण उत्पन्न झाले, असे जे म्हटले आहे, ते या मुद्याच्या योगाने स्पष्ट होते. महाभारतातील ‘शांतिपर्वा’तही (१८८ । १० १८९ । ८) असे विस्ताराने प्रतिपादन केले आहे, की एकाच ब्रह्मरूप वर्णाचे चार वर्ण कर्मभेदामुळे व गुणभेदामुळे झाले आहेत.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
संदर्भ : 1. Brough, J. The Early Brahmanical System of Gotra and Pravara, Cambridge, 1953.
2. Ghurye, G. S. The Two Brahmanical Institutions–Gotra and Charana, Bombay, 1972.