गेलार्डिया पल्चेला : (इं. ब्लँकेट फ्लॉवर कुल-कंपॉझिटी). ही मूळची उत्तर अमेरिकेतील शोभेची ओषधी [→ ओषधि]. भारतात व इतरत्र बागेत लोकप्रियतेमुळे लागवडीत आहे. एम्.गेलार्ड (गायार), या फ्रेंच वनस्पतिविज्ञानाच्या पुरस्कर्त्याचे नांव हिच्या नावात अंतर्भूत केले आहे. हिची उंची ४५—६० सेंमी. असून ती वर्षायू (एक वर्ष जगणारी) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व शाखायुक्त असते. पाने बिनदेठाची, एकाआड एक लंबगोल किंवा कुंताकृती, खंडित वा अखंड, खालची अल्पपिच्छाकृती (पिसासारखी) व ठिपकेदार असतात स्तबके मोठी, ५—७ सेंमी. व्यासाची, लांब देठाची, विविधरंगी व एकेरी किंवा दुहेरी असतात. किरण-पुष्पके जिव्हिकाकृती, टोकास पिवळी, मागे लाल व वंध्य बिंब-पुष्पके लालसर जांभळी व फलनक्षम छदमंडल रुंद [→ पुष्पबंध फूल]. फुले मार्च-जुलैमध्ये येतात परंतु अधिक काळही येत रहातात. हारतुरे, फुलदाण्या वगैरेंकरिता विशेष वापरतात. गेलार्डिया लोरेंझियाना ही नवीन दुहेरी जाती फार सुंदर दिसते. मोठ्या एकेरी फुलाच्या जातीत गे पल्चेला-पिक्टा म्हणतात. त्यात अनेक रंगांचे प्रकार आहेत. एका प्रकारात पुष्पके नलिकाकृती असतात. वाफ्याच्या कडेने आणि मधे लावतात. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बी पेरल्यास उन्हाळ्यात फुले मिळतात. मे-जूनमध्ये पेरणी केल्यास पावसाळ्यात फुले येतात. हिवाळ्यात फुले मिळण्यास सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बी पेरतात. डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये बी पेरतात. पेरणीनंतर महिन्याने रोपे काढून दुसरीकडे लावतात. भरपूर सूर्यप्रकाश व मध्यम दुमट जमीन आवश्यक असते त्यानंतर ३१/२ – ४१/२ महिन्यांनी फुले येतात. ही वनस्पती अतिशय काटक असल्याने संवर्धन सोपे असते. फुलांना बाजारात सदैव मागणी असते.
पहा : कंपॉझिटी.
पराडकर, सिंधु अ.
“