गेरिक, ओटो फोन : (२० नोव्हेंबर १६०२—११ मे १६८६). जर्मन भौतिकविज्ञ. हवेच्या दाबासंबंधी त्यांनी महत्त्वाचे प्रयोग केले. त्यांचा जन्म मॅग्डेबर्ग येथे झाला. लाइपसिक व येना येथे कायद्याचा आणि नंतर लायडन येथे गणित व यामिकीचा (वस्तूंवर होणारी प्रेरणांची क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचा) त्यांनी अभ्यास केला. १६४६—८१ या काळात ते मॅग्डेबर्गचे महापौर (बर्गोमास्टर) होते.
टोरिचेल्ली व पास्कल यांच्या प्रयोगांचा अभ्यास करून निर्वात स्थिती निर्माण करण्याकरिता त्यांनी बरेच प्रयोग केले व १६५० मध्ये पहिला हवा-पंप तयार करण्यात यश मिळविले. हवेचा प्रचंड दाब दर्शविण्यासाठी त्यांनी तांब्याच्या दोन अर्धगोलांमधील हवा काढून टाकली व मोठ्या प्रयत्नांतीही ते अलग करता येत नाहीत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हा प्रयोग त्यांनी मॅग्डेबर्ग येथे करून दाखविला म्हणून हे अर्धगोल मॅग्डेबर्गचे अर्धगोल म्हणून प्रसिद्ध आहेत. गंधकाच्या फिरत्या गोळ्याच्या साहाय्याने घर्षणजन्य विद्युत् निर्मिती करणारे एक यंत्र त्यांनी १६६० मध्ये तयार केले. ते हँबर्ग येथे मृत्यु पावले.
भदे, व. ग.