गेझेले, गीडो : (१ मे १८३० — २७ नोव्हेंबर १८९९). एक श्रेष्ठ फ्लेमिश भावकवी. जन्म ब्रूझ (बेल्जियम) येथे. ब्रूझ आणि रूलेर येथे तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचे शिक्षण घेतले. १८५४ मध्ये तो धर्मोपदेशक झाला. रूलेर आणि ब्रूझ येथे अनुक्रमे शिक्षक आणि प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले. Kerkhofblommen (१८५८, इं. शी. चर्चयार्ड फ्लॉवर्स) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. Tijdkrans (१८९३, इं. शी. गार्लंड ऑफ टाइम) आणि Rijmsnoer (१८९७, इं. शी. स्ट्रिंग ऑफ ऱ्हाइम) हे त्याच्या उल्लेखनीय काव्यसंग्रहांपैकी काही होत.

गेझेलेची कविता साधी पण स्वतंत्र आहे. साध्यासोप्या छंदांतून लयतालांचा आणि भावगेयतेचा उत्कट प्रत्यय देणाऱ्या त्याच्या कवितेने पढिक अभिव्यक्तीच्या कोंडीतून तत्कालीन फ्लेमिश कवितेची मुक्तता केली. उत्कट धर्मश्रद्धा आणि श्रेष्ठ प्रतिभाशक्ती ह्यांची प्रचीती त्याच्या कवितांतून येते. निसर्गप्रेम ही त्याच्या कवितेमागील मूलप्रेरणा असली, तरी हा निसर्ग ईश्वराचे प्रतीक म्हणून येतो. निसर्गाच्या विविध रूपांचा अर्थ लावण्यात त्याची कविता रंगून गेलेली आहे. उत्कट धर्मश्रद्धेमुळे ती अनेकदा गूढानुभूतींकडे वळली आहे. पश्चिम फ्लँडर्समधील एका बोलभाषेत गेझेलेने आपल्या कविता लिहिल्या, हे विशेष लक्षणीय होय.

लाँगफेलोच्या द साँग ऑफ हायावाथा (१८५५) ह्या कथाकाव्याचा गेझेलेने दर्जेदार अनुवाद केला.

त्याने संपादिलेल्या ’t Jaer 30 व Rond den Heerd (१८६५) ह्या नियतकालिकांतून अनुक्रमे राजकारणावर आणि भाषाशास्त्र, लोकसाहित्य, प्रकृतिविज्ञान ह्या विषयांवर त्याने आस्थेवाईकपणे लेखन केले. ब्रूझ येथेच तो निधन पावला.

संदर्भ : Roosbroeck, G. L. Van, G. Gezelle : The Mystic Poet of, Flanders, 1919. 

कुलकर्णी, अ. र.